जयराज साळगावकर

वडिलांचे लग्न होण्याआधी ते मालवणहून नागपूरला कापडाच्या दुकानात नोकरीसाठी निघाले होते. मध्ये पुण्याला, त्यांचे सगळे सामान चोरीला गेले, तेव्हा अंगावरच्या कपडय़ांनिशीच जर नशीब अजमावायचे असेल, तर मुंबईत जाऊन का अजमावू नये? असा विचार करून ते मुंबईला आले. सुरुवातीचे काही दिवस ते फुटपाथवर झोपले. नंतर थोडे स्थिरस्थावर झाल्यावर त्यांना कॅप्टन शिंदे नावाचे लेखक भेटले. ते त्यांना ‘लोकसत्ता’चे संपादक ह. रा. महाजनी यांच्याकडे घेऊन गेले.

मालवणात वडिलांना लाटकर शास्त्री नावाचे विद्वान शिक्षक भेटले होते. त्यांनी वडिलांकडून संस्कृत व संतसाहित्याचा दांडगा अभ्यास करवून घेतला होता. त्यामुळे वडिलांचे पाठांतर कमालीचे होते, शब्दांवर पकड घट्ट होती. गंमत म्हणून शब्दकोडी रचण्याचा छंद होता, तसेच मालवणात वसंत लाडोबा म्हापणकर हे प्रसिद्ध ज्योतिषी होते, त्यांनी वडिलांना ज्योतिषाचे धडे दिले होते. त्याचा उपयोग ‘लोकसत्ता’मध्ये त्याकाळी साडे-चारशे रुपयांची नोकरी मिळवण्यात झाला. ही घटना त्यांच्या आयुष्याचे पुढचे टप्पे ठरवणार होती. वडील १९५२ पासून मुंबईत ‘लोकसत्ता’ दैनिकामध्ये शब्दकोडे रचनाकार म्हणून कार्यरत झाले. पुढे तिथे ते भविष्यही लिहू लागले. विद्याधर गोखले, र. ना. लाटे, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, मा. पं. शिखरे, माधव गडकरी, मोहन वाघ वगरे पुढे पत्रकारितेत नावाजलेली मंडळी ‘लोकसत्ता’तच होती. सगळ्यांची आमच्या घरी वर्दळ असे. त्यांच्या होणाऱ्या चर्चा आणि वादविवाद यातून मिळालेले शिक्षण कुठल्याही विश्वविद्यालयात मिळाले नसते. पुढे तर पु. भा. भावे, पु. ल. देशपांडे, वामनराव चोरघडे, जयवंत दळवी, राजदत्त, रंगसम्राट मुळगांवकर, एस. एम. पंडित, राम मराठे असे कला क्षेत्रातले दिग्गजही घरी येत.

मला समजू लागले, तेव्हा आमचे घर (खोली) परेलच्या ‘निर्मला निवास’ या चाळीत पाचव्या मजल्यावर होते. ‘निर्मला निवास’च्या पाच मजल्याच्या तीन महाकाय चाळी म्हणजे फाळणीनंतर भारतात आलेल्या सिंधी-पंजाबी निर्वासितांची जणू एक छावणीच होती (या चाळी आजही अस्तित्वात आहेत). परेलमधील ज्या प्राथमिक शाळेत मी जात असे तिथले हेडमास्तर कल्याणपूरकर मुलांना खूप मारायचे. एकदा त्यांनी भिंत आणि दार यामध्ये उभा करून दाराची उघडझाप करत त्या दाराचाच मला दणकून मार दिला. घरी आल्यावर झालेला प्रकार मी आईला सांगितला. तिने तो वडिलांच्या कानावर घातला. त्यावर वडिलांनी विचारले, ‘ही शाळा नको तर तुला ‘बालमोहन’मध्ये जायचे आहे, की ‘किंग जॉर्ज’मध्ये? ‘किंग जॉर्ज’ हे नाव इंग्रजी वाटल्याने आणि बालमोहन हे बाळबोध मराठी वाटल्याने मी ‘बालमोहन’ असे सांगून मोकळा झालो. सांगायचा मुद्दा इतकाच, की पहिलीतल्या मुलालाही पर्याय-चॉईस देऊन निर्णय घेण्याची मुभा दिली. वडील म्हणून त्यांचे वेगळेपण जाणवण्याची ही सुरुवात होती..

घरातले आणि ‘बालमोहन’चे संस्कार यातून माझे (परळ-नायगावमधील) बालपण घडत गेले. मी दुसरीत-तिसरीत असताना एकदा वडील मला ‘केशव भिकाजी ढवळे’ या पुस्तकाच्या दुकानात घेऊन गेले आणि हवी ती पुस्तके घे, म्हणाले. मी अधाशासारखी २०-२५ पुस्तके निवडली आणि अधाशासारखीच ती वाचूनही काढली. ही गोष्ट भविष्यात माझ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरली. कारण तेव्हा निर्माण झालेली वाचनाची आवड आजतागायत टिकून राहिलीय. वाचन केले नसते, तर आज मी कोण, कुठे, काय असतो हे सांगता येणे कठीण आहे. एव्हाना आम्ही परेलहून नायगाव येथे फ्लॅटमध्ये राहायला आलो होतो.

वडिलांच्या अफाट लोकसंग्रहात माझ्या आईचा (जयश्री)वाटा महत्त्वाचा होता. ती माशांचे तसेच शाकाहारी, मालवणी पद्धतीचे जेवण अप्रतिम बनवत असे. घरी येणाऱ्या पाहुण्यांना इतर गोष्टींबरोबरच या जेवणात खूप रस असायचा. पु.ल. – भाई (सुकी मोरी), गदिमा -अण्णा (चण्याच्या डाळीची आमटी) ही काही उदाहरणे. शिवाय, वडिलांची एक नाटक कंपनी होती. त्या हौशी संगीत नाटकांचे खेळ नायगावला ‘रंगमंदिर’ नावाचे खुले नाटय़गृह होते, तेथे होत असत. ग. दि. माडगूळकर तर जवळजवळ सहा महिने आमच्या घरी ‘गीतगोपाल’ ही रचना करण्यासाठी मुक्कामाला होते. लतादीदींची काही आवडती गाणी सी. रामचंद्र यांच्या संग्रहात नव्हती, परंतु त्या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका वडिलांकडे होत्या. ती गाणी ऐकताना एवढय़ा मोठय़ा संगीतकाराला भावनाविवश होऊन अश्रू ढाळताना अनेक वेळा पाहिले आहे. सी. रामचंद्र माणूस म्हणून सोन्याचे होते.

१९५७-५८ मध्ये वडिलांनी ‘शब्दरंजन स्पर्धा’ हे शब्दकोडे सुरू केले. या स्पर्धेने वडिलांना यश, पसा बरेच काही मिळवून दिले. त्यांना सतत नव्या कल्पना सुचायच्या आणि मग त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याच्या मागे ते लागायचे. मग पैसे येवोत की जावोत. ‘शब्दरंजन’ शब्दकोडय़ातून जसजसा फायदा होत होता, त्यातून त्या काळातल्या वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना, समाजोपयोगी कामांना ते भरघोस आर्थिक मदतही करीत. त्या निमित्ताने त्या-त्या क्षेत्रातील मोठे समाजसेवी लोक नेहमी घरी येत असत. ‘शब्दरंजन’ स्पर्धेतून मिळालेल्या आर्थिक समृद्धीतून त्यांना वेध लागले, ते लोकांना स्वस्तात संतवाङ्मय उपलब्ध करून देण्याचे. ‘दासबोध’ लोकांपर्यंत पोहोचावा, यासाठी त्यांनी त्या वेळी सव्वा रुपया किमतीत तो उपलब्ध करून दिला. आजही आम्ही नवे छपाई यंत्र घेतले, की ‘दासबोध’ छापून स्वस्तात उपलब्ध करून देतो. अशा लाखभर प्रती आत्तापर्यंत छापण्यात आल्या आहेत.

१९६० मध्ये त्यांनी मुंबईत शिवाजी पार्कवर ‘स्वरगंगा’ नावाचा एक भक्तिगीतांचा खूप मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. वसंत देसाई कार्यक्रमाचे संयोजक होते. या वेळी बालगंधर्व, गोहरजान, भार्गवराम आचरेकर असे दिग्गज गायक अगदी जवळून ऐकता-पाहता-अनुभवता आले. ‘शब्दरंजन’ नावानेच त्यांनी एक मासिकही सुरू केले होते. त्याचे संपादक ग. दि. माडगूळकर होते. मोठे लेखक, कवी, कथाकार त्यात लेखन करत. मालवणला असताना वयाच्या सतराव्या वर्षी वडिलांनी ‘ज्योती’ नावाचे साप्ताहिक चालवले होते. ते ज्या जुनाट छपाई यंत्रावर (हॅण्ड प्रेस) छापले जाई, ते नंतर मी माझ्या मालवणच्या मामांमार्फत मिळवून मुंबईला आणले. डागडुजी केलेले हे अल्बियन (१८६९) ब्रिटिश यंत्र आमच्याकडे आजही आहे.

‘शब्दरंजन’ स्पर्धेची ही भरधाव निघालेली गाडी अचानक ब्रेक लागावा, तशी १९६२ पासून मंदीच्या, अवैध व्यावसायिक स्पर्धेच्या, अपप्रचाराच्या वावटळीत सापडली. चीनचे युद्ध झाले. आणखी मंदी आली. त्यातच १९६९ मध्ये महाराष्ट्र सरकारने लॉटरी सुरू केली. लोक लॉटरीची तिकिटे विकत घ्यायला लागले. शब्दकोडी चालेनात. विजेत्यांची बक्षिसे देणे, छपाई, कागदवाल्यांची बिले देणे, कर्मचाऱ्यांचे पगार, हे सगळे हाताबाहेर जायला लागले. लाखो रुपयांचे कर्ज झाले (पुढे ते ‘कालनिर्णय’मधून फेडले.). अनेक जण कोर्टात गेले, ‘शब्दरंजन’ बंद झाले. घराची विजेची बिले थकल्यामुळे वीज कापली जाई. एकदा तर शाळेची फी थकल्यामुळे वार्षिक निकाल न मिळण्यापर्यंत वेळ आली होती. कोडय़ांच्या बक्षिसाचे पैसे थकल्यामुळे घरी गुंड येऊन वडिलांच्या पोटाला चाकू लावून धमकावीत, आई-बहिणीवरून शिव्या घालीत (नंतर काही वर्षांनी याच गुंडांनी घरी येऊन वडिलांचे पाय पश्चात्तापाने धरले.). या कठीण काळात काही जवळच्या लोकांनी, तुम्ही रोड रोलर घेऊन भाडय़ाने द्या तर कुणी ‘सुशिक्षित बेकार योजने’त तेलाचा टँकर घ्या (म्हणून सतराव्या वर्षी हेवी मोटर व्हेईकल एचएमव्ही टँकरचे लायसन्सही ‘हिंद मोटर स्कूल’मधून मी मिळवले) असे सल्ले दिले. एक सज्जन म्हणाले, की वहिनी चांगला स्वयंपाक करतात, तुम्ही खाणावळ सुरू करा. सगळे हवेतले सल्ले ठरले. काही उद्योगपती शून्यातून उद्योग उभारतात. आम्ही मात्र त्या काळच्या मायनस दहा-बारा लाख रुपयांनी सुरुवात केली. पण गाठीशी अनुभव होता व चांगल्या मित्रांची साथ होती.

त्या काळात परिस्थितीशी खूप झगडावे लागले. नुसती गरिबी अनुभवणे कठीण असते हे खरे, पण एकदा घरी चार डॉज, डिसोटा, शेवरलेट गाडय़ा असण्यापर्यंत श्रीमंती अनुभवल्यानंतर, टोकाची हलाखीची परिस्थिती, उमलत्या वयात अनुभवायला लागणे कमालीचे क्लेशदायक होते. वडिलांची जिद्द होती म्हणून ते परिस्थितीतून चिकाटीने वाट काढत गेले हे खरे, पण एकदा मात्र त्यांनी साफ हाय खाल्ली होती. गंधाम्लाची बाटली आणून कपाटात लपवली होती. त्या रात्री त्यांचा आत्महत्या करायचा बेत होता. आईच्या हे लक्षात आले. तिने त्यांना प्रतिबंध केला, तेव्हा आपण दोघेही आत्महत्या करू, असे ते म्हणाले. मग ‘या मुलांना काय भिकेला लावणार का? त्यांचे काय?’ अशी तिने त्यांची समजूत काढली. कपाटाच्या ज्या फळीवर ती अ‍ॅसिडची बाटली ठेवली होती तिथे त्या बाटलीच्या तळाला लागलेल्या अ‍ॅसिडचा एक बांगडीसारखा वर्तुळाकार डाग उमटला होता. ते कपाट आईने खूप वर्षे सांभाळून ठेवले होते, ‘लक्ष्मी सदन’ या नव्या घरात गेल्यावरसुद्धा! शेवटी अगदी अलीकडे तिने ते कपाट काढले.

नंतर एकदा ‘नायगावचा ब्लॉक विकून परत परेलच्या चाळीत जाऊ, इथला खर्च परवडत नाही’ असे वडील म्हणू लागले, तेव्हा मी त्यांना उसने अवसान आणून सांगितले की, ‘मला एक ट्रेडल-पिंट्रिंग मशीन लावून द्या मी चालवतो घरखर्च!’ माझा आत्मविश्वास पाहून ते पुन्हा नव्या उभारीने कामाला लागले. माझी आई या परिस्थितीत खंबीरपणे, धीराने संसार चालवीत राहिली. वडिलांचे जवळचे मित्र अ‍ॅड. व्यंकटेश प त्यांच्या मागे ठाम उभे राहिले. त्या कोवळ्या वयात हे सगळे सोसताना-अनुभवताना खूप त्रास झाला तरी त्यातून खूप बळ मिळाले. यातूनच भविष्यात कोणताही कठीण प्रसंग आला, तरी धीराने, जिद्दीने पुढचा प्रवास कसा करायचा हे गुण अंगी बाणवले गेले ते कायमचे!

यादरम्यान आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन मी उभा ठाकलो होतो. एस.एस.सी.च्या परीक्षेत वडिलांच्या अपेक्षेपेक्षा मला जास्त मार्क पडले. त्यामुळे अचानक वडिलांना मला डॉक्टर करण्याची इच्छा निर्माण झाली. पण माझी काही डॉक्टर होण्याची अजिबात इच्छा नव्हती. एस.आय.ई.एस. महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य प्रा. राम जोशी यांच्याकडे मला ते घेऊन गेले आणि बळजबरीने ‘सायन्स’ला घातले. खरे तर, मला रुईया महाविद्यालयात ‘आर्ट्स’ला जाऊन अर्थशास्त्राचा अभ्यास करावयाचा होता. बायॉलॉजीच्या प्रॅक्टिकलच्या पहिल्याच दिवशी द्रावणात ठेवलेले किडे, झुरळे बघून मला कसेसेच झाले. बेडूक कापण्याच्या नुसत्या कल्पनेने पोटात मळमळू लागले. त्या लॅबमधला तो उग्र रासायनिक वास. तीच गोष्ट केमिस्ट्री लॅबची! मी तडक लॅबच्या बाहेर पडलो, तो कायमचा! वडिलांकडे मिनतवाऱ्या केल्या की दुसऱ्या टर्मला तरी मला कला शाखेला जाऊ द्या. वडिलांनी त्यांचा हट्ट काही सोडला नाही. एस.आय.ई.एस.मध्ये तेव्हाचे मराठीचे प्राध्यापक श्री. पु. भागवत, तसेच यास्मीन शेख व गणिताचे प्राध्यापक रामकृष्णन यांची लेक्चर्स मात्र मी कधी चुकवली नाहीत. इतर वेळात ग्रंथालयात जाऊन समग्र हिंदी कवी वाचून काढले. ‘चिरो’ हस्तसामुद्रिकाची बरीच पुस्तके वाचून काढली. मॅटिनी सिनेमे पाहिले. शेवटी होणार होते तेच झाले, मला परीक्षेचा फॉर्म नाकारण्यात आला.

त्यानंतर शिक्षण सोडून काही कामाचे पाहावे, असा टोकाचा मानस वडिलांनी व्यक्त केला. कारण घरची आर्थिक परिस्थिती वाईट होती आणि भविष्यात मी डॉक्टर होणार नव्हतो, तर मग कशाला शिका? पण या बिकट प्रसंगी माझ्या मागे माझी आई उभी राहिली. तिने माझे शिक्षण चालू ठेवण्याचा आग्रह वडिलांकडे धरला. शेवटी मधला मार्ग म्हणून मी महाविद्यालयात सकाळचे सत्र करावे व दिवसा वेगवेगळ्या मुद्रणालयात-वृत्तपत्रात काम करावे असे ठरले. मी रुईया महाविद्यालयाच्या सकाळ सत्रात दाखल झालो. पुढे हा माझ्या जीवनातला एक मलाचा दगड ठरणार होता.

याच काळात ‘दै. मराठा’मध्ये राजेंद्र प यांच्याबरोबर भागीदारीत एक छोटा प्रेस (विक्रम पिंट्रर्स) वडिलांनी काढून दिला. रोज ‘मराठा’मध्ये जाणे सुरू झाले. याच काळात ‘निर्णयसागर’चे एके काळचे व्यवस्थापक गणेश सदाशिव बैंदूर यांच्या ‘महेश पिंट्रर्स’ या प्रेसमध्येही शिकायला ठेवले. कडक शिस्तीचे बैंदूर हे गांधीवादी मार्कसिस्ट कम्युनिस्ट (कार्ड होल्डर) होते, ते खादी वापरत. त्यांनी मला मुद्रणशास्त्राची मूलतत्त्वे शिकवली. ‘महेश पिंट्रर्स’मध्ये एकाच वेळी पूर्ण ओळीच्या (लाइन) अक्षरांचे उकळत्या शिशात खिळे कास्ट होत असत (लायनो टाईप ४८ हे जुनाट मशीन तेथे होते.). त्यासाठी शिसे तापवण्याची भट्टी लायनो टाईप मशीनमध्येच असे. या उकळत्या शिशाच्या वाफेने (फ्युम्स) बहुतेक कामगारांना टी.बी. होत असे, म्हणून रोज आम्हाला केळे, अंडे व दूध दिले जाई. एकदा एका कामगाराच्या तळहातावर उकळत्या शिशाचा थेंब पडल्यामुळे त्याचा खांद्याखालचा हात कापावा लागला.

त्यानंतर ऑटोमॅटीक इलेक्ट्रिकचे एम. जी. भट यांच्याकडे मला पाठवण्यात आले. सन्यासाठी थर्मामीटरसारखी अनेक प्रकारची मापन सयंत्रे व इतर उपकरणे बनवण्याचा त्यांचा खूप मोठा व्यवसाय होता. थर्मामीटरची तांब्याची डायल छापण्यासाठी त्यांनी एक ऑफसेट छपाई यंत्र स्वत:च बनविले होते. मी त्यावर कामगार म्हणून काम करीत असे. पहिल्याच आठवडय़ात त्यांच्या छपाई यंत्राचे ड्रॉईंग मी त्यांना काढून दाखवले, याचे त्यांना आश्चर्य वाटले. कारण माझी शैक्षणिक पाश्र्वभूमी इंजिनीअिरगची नव्हती. त्यानंतर भट यांनी मला प्रभादेवी येथे ‘मराठे उद्योग भवन’मध्ये ‘स्विफ्ट’ नावाच्या छोटय़ा ऑफसेट यंत्रावर ट्रेनिंगसाठी पाठवले. भारतात बनविलेल्या या पहिल्या ऑफसेट मशिनचे डिझाइन एम. जी. भट यांनीच त्यांना जपानहून आणून दिले होते. या सगळ्या मोठय़ा लोकांकडे मला वडिलांमुळे प्रवेश व चांगली वागणूक मिळाली.

आधीच्या काळात वडिलांनी मला ‘दै. लोकसत्ता’मध्ये संपादक असलेल्या र. ना. लाटे यांच्याकडे पाठवले होते. त्यांनी मला कॉम्रेड डांगे यांच्या लालबाग-परळच्या सभांचे रिपोर्टिंग करायला सांगितले. कॉम्रेड डांगे हे त्याकाळी खूपच लोकप्रिय होते. पुढे ‘मराठा’मध्ये अनिल बर्वे आणि नामदेव ढसाळ यांच्याशी मत्री झाली. अनिल बर्वेचे ‘साप्ताहिक रणांगण’ आम्ही ‘विक्रम पिंट्रर्स’मध्ये छापत असू. त्या काळात अनिल बर्वेमुळे कॉम्रेड डांगे ‘डी’यांच्याबरोबर चहा पिण्याची (त्यांनी स्वत: बनवलेला चहा मिळणे हा एक मोठा बहुमान होता.) आणि मार्क्‍स-केन्स यांच्या अर्थशास्त्रावर चर्चा करण्याची संधी अनेकदा मिळाली. वा. दा. थत्ते तेव्हा ‘दै. सकाळ’चे व्यवस्थापक होते. तेही वडिलांचे ‘लोकसत्ता’तील मित्र. ‘सकाळ’ हे एकमेव वृत्तपत्र ‘गॉस’ मशीनवर वेब ऑफसेट तंत्राने छापले जायचे. तिकडे प्लेटमेकिंग आणि वेब ऑफसेट रोटरी पिंट्रिंगचा बहुमोल अनुभव मिळाला. तो ‘कालनिर्णय’च्या वाढीला कारणीभूत ठरला. ‘कालनिर्णय’ वेब ऑफसेटने रोटरीवर छापले न जाते, तर ते एवढे न वाढते. त्याकाळी ‘उषा ऑफसेट’ या कांदिवलीच्या एकाच प्रेसमध्ये ‘हमादा’ हे जपानी कमर्शिअल वेब ऑफसेट रोटरी यंत्र होते. तिथे छपाई सुरू झाली, म्हणून एवढा खप पुढे पेलता आला. पुढे अशी तीन रोटरी मशीन्स आम्हाला आमच्याकडे लावावी लागली.

वडील खूपदा ‘निर्णयसागर’च्या प्रेसमध्ये जात. तिथे व्यवस्थापक मोरे होते. वडील ‘निर्णयसागर’ कॅलेंडरमध्ये भविष्य लिहीत, त्याचा मोबदला म्हणून त्यांना कॅलेंडरच्या २५ प्रती दिल्या जात. तिथेच मी पुस्तके, छपाईचे मशीन, छपाईचे खिळे, शाईचे रंग हे सगळे बघत, अनुभवत गेलो. ‘कालनिर्णय’ची कल्पना मला मुळात तिथेच सुचली आणि वडिलांनीही ती उचलून धरली. इथे आमच्या आयुष्याला पुन्हा नवे वळण लागणार होते.

मी रुईया कॉलेजच्या प्रथम वर्षांला असतानाच ‘कालनिर्णय’ सुरू झाले (१९७३). साहित्य, छपाई, कला या मला लाभलेल्या पाश्र्वभूमीमुळे आणि वडिलांच्या अनुभवामुळे ‘कालनिर्णय’च्या निर्मितीत आणि यशात मी अगदी सुरुवातीपासून सहभागी होऊ शकलो, हे खरे! ‘कालनिर्णय’चा मी पहिला संपादक, मुद्रक, प्रकाशक (आरएनआय रजिस्टर ऑफ न्यूजपेपर्स ऑफ इंडियासाठी कोर्टात दाखल केलेल्या वचनपत्रानुसार)आहे. पहिल्या वर्षांच्या ‘कालनिर्णय’चे डिझाइन रुईया कॉलेजमध्ये माझ्याबरोबर सकाळ सत्रात असणाऱ्या आडविरकर नावाच्या आर्टिस्टने केले होते. नंतर आम्ही आर्टिस्ट परब व नंतर कमल शेडगे यांना डिझाइनची जबाबदारी दिली. वडिलांचा लोकसंग्रह ‘कालनिर्णय’च्या उभारीत कामाला आला. त्यांनी जोडून ठेवलेली माणसे खंबीरपणे आमच्या मागे उभी राहिली. ज्योतिषातील ज्ञानामुळे किंवा अनुभवामुळे असेल, बघताक्षणी माणूस ओळखण्याची कला त्यांना अवगत होती. वडिलांना जशी ‘लोकसत्ता’मध्ये मोठी माणसे भेटली, तशी ‘दै. मराठा’तही मिळाली. आचार्य अत्रे गेल्यावर जो काही काळ ‘दै. मराठा’ चालला, त्यात व्यंकटेश आणि शिरीष प यांच्याबरोबर वडिलांचाही काही वाटा होता.

भेटीसाठी वडील ज्यांच्या-ज्यांच्याकडे जात तिकडे त्यांच्याबरोबर अनेकदा मलाही घेऊन जात. साहित्य, कला या क्षेत्रांपासून मोठमोठे राजकारणी, उद्योगपती अशा अनेकांशी वडिलांचे कदाचित ते ज्योतिषी असल्यामुळे व्यक्तिगत संबंध होते. मुंबईच्या मरिन ड्राइव्हवरील ‘शांती कुटीर’ इमारतीत स. का. पाटील यांचा रोज सकाळी नऊ वाजता लोकदरबार भरायचा. संपूर्ण सूट-टाय-बूट घालून आप्पा चेहऱ्यावरून पंजा फिरवत बसलेले असायचे. या दरबारात नामांकित व्यक्तींची ये-जा असायची, त्यातही सामील होण्याचा योग वडिलांमुळे आला.

‘दै. लोकसत्ता’पासून ह. रा. महाजनी आणि त्यांच्या रॉयीस्ट गटामुळे  यशवंतराव चव्हाण आणि इतर रॉयीस्ट विद्वानांशी (बॅ. नाथ प वगरे) वडिलांचा संबंध आला होता. यशवंतरावांच्या ‘रिव्हिएरा’ या इमारतीतील प्रशस्त घरात जाण्याचा योग येई. साहित्य, ज्योतिष, कला, कोकण इत्यादी गोष्टींवर तेथे चहा-चर्चा चाले. या चर्चाचा मी एक बाल-श्रोता होतो. वसंतदादा पाटील यांना अनेकदा प्रत्यक्ष मुंबई-दिल्ली येथे भेटण्याची संधीही वडिलांमुळेच मिळाली. वसंतदादा जेव्हा मालिश करून घ्यायचे, त्या वेळात ते वडिलांना भेटायला बोलवायचे. अ. रा. अंतुले यांना त्यांच्या मरिन ड्राइव्ह इथल्या

‘अल् सबा’ या निवासस्थानी भेटण्याचा योगही असाच जुळून यायचा. जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. वि. म. दांडेकर घरी येत, त्यांच्या गप्पा ऐकण्याचा योग अनेकदा जुळून आला. त्यांच्या अर्थपूर्ण गप्पांचा फायदा मला अर्थशास्त्राचा अभ्यास करताना झाला.

डॉ. दांडेकरांना ज्योतिषाचा दांडगा छंद होता.

मोरोपंत पिंगळे, अटलबिहारी वाजपेयी, शरदराव पवार, बाळासाहेब ठाकरे, बाळासाहेब देसाई, सुधाकरराव नाईक, डॉ. दत्ता सामंत अशा राजकारणातल्या दिग्गजांची भेट वडिलांमुळे घडत असे. तसेच लक्ष्मणशास्त्री जोशी, आचार्य अत्रे, नवल टाटा, मंगेशकर कुटुंबीय, पु. भा. भावे, मंगेश पाडगावकर, शिरीष प अशा अनेक दिग्गजांना वडिलांमुळे जवळून बघता आले, त्यांच्याकडून काही शिकता आले. मोठी स्वप्ने पाहता आली. या सगळ्याचा परिणाम म्हणून माझ्या व्यक्तिमत्त्वाला विविध पलू पडत गेले. पुढे या अनुभवांच्या मिळकतीवर मी स्वत:चे मित्र जोडत गेलो, ज्यांच्याविना मला आयुष्यात जे काही थोडेफार करता आले ते जमवणे काहीसे कठीण गेले असते.

बालवयापासून कधी पौर्णिमेचे चांदणे तर कधी मध्यान्हीचे ऊन नियतीने पदरात टाकले. त्यातून अनुभवविश्व विस्तारत गेले. मागे वळून पाहताना आता ते मध्यान्हीचे ऊनही जणू कोजागिरीचे चांदणे भासते. आता लयाला गेलेल्या ज्योतिर्भास्कराची आभाळमाया स्मृतीरूपी चांदणे होऊन राहिली आहे. ती तशीच कायम राहो ही प्रार्थना. आई-वडिलांच्या स्मृतीस सादर प्रणाम.

jayraj3june@gmail.com