‘चित्रपट क्षेत्रात पुरुषांनी फक्त रंगभूषाकार म्हणून काम करावे आणि स्त्रियांनी फक्त केशभूषाकार म्हणून काम करावं..’ चित्रपटसृष्टीसाठी सिने मेकअप आर्टिस्टच्या संघटनेनं घालून दिलेला हा एक अन्याय्य नियम. साठ वर्षांच्या या नियमाविरुद्ध काही जणी उभ्या राहिल्या आणि त्यांनी अथक परिश्रम करत हा लढा कायदेशीररीत्या जिंकला. आता कोणतीही स्त्री तिच्या या क्षेत्रातल्या शिक्षणाच्या जोरावर मेकअप-आर्टिस्ट वा रंगभूषाकार म्हणून काम करू शकणार आहे.. या लढय़ाविषयी..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एक आंधळा, निर्थक नियम संपवण्यासाठी त्याविरोधात तिला साठ वर्षांनी कायदेशीर लढा द्यावा लागला, कारण रंगभूषाकार व्हायचं जे स्वप्न तिनं लहानपणापासून पाहिलं होतं, त्यालाच धक्का बसला होता.. आपल्या छंदाला व्यवसायात बदलण्याच्या तिच्या ध्येयाला एका नियमानं सुरुंग लागला होता.. पण तिच्या अथक परिश्रमांनंतर, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं हा अनाकलनीय नियम संपुष्टात आला आणि आज तिला आपल्या स्वप्नांना व्यवसायात बदलण्याचं बळ मिळालं आहे; परंतु हा निर्णय तिच्यापुरताच मर्यादित राहिलेला नाही, तर चित्रपटसृष्टीत मेकअप आर्टिस्ट वा रंगभूषाकार म्हणून काम करू इच्छिणाऱ्या सगळ्याच स्त्रियांसाठी आयुष्य बदलवून टाकणारा एक ऐतिहासिक निर्णय ठरला आहे.. 

चित्रपटसृष्टीसाठी सिने मेकअप आर्टिस्टच्या संघटनेने एक नियम घातला होता, की चित्रपट क्षेत्रात पुरुषांनी फक्त रंगभूषाकार म्हणून काम करावं आणि स्त्रियांनी फक्त के शभूषाकार म्हणून काम करावं. त्यांनी पुढे केलेली कारणं कोणतीही असली तरी रंगभूषाकार स्त्रीसाठी आणि केशभूषाकार पुरुषांसाठी हा नियम खरं तर अन्यायच होता; पण गेल्या साठ वर्षांमध्ये या नियमाविरुद्ध कोणीच आवाज उठवला नाही किंवा त्यांचा आवाज दाबला गेला असावा, कारण काही मोजक्या गुंड प्रवृत्तीच्या संघटनेची दादागिरी एवढी मोठी होती की, इतकी वर्षे त्या नियमावर बोट ठेवून वेगवेगळे पर्याय शोधत या रंगभूषाकार स्त्रियांना आपला व्यवसाय टिकवावा लागला किंवा त्यातही तडजोड करावी लागली. म्हणूनच चित्रपटसृष्टीसाठी सिने मेकअप आर्टिस्टच्या संघटनेने घालून दिलेल्या या नियमाच्या विरोधात चारू खुराणांना आवाज उठवावाच लागला.
आपल्या या अधिकाराविषयी बोलताना त्या म्हणाल्या, ‘‘मला ज्या कामात आनंद मिळतो ते मी करणारच. माझ्याकडे कामाचे योग्य शिक्षण आहे, गुणवत्ता आहे; पण कुठल्या तरी संघटनेचा नियम सांगतो की, चित्रपट क्षेत्रात पुरुषांनी रंगभूषाकार म्हणून काम करावे आणि महिलांनी के शभूषाकार म्हणून काम करावं, अशी विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे तुम्हाला रंगभूषाकार म्हणून काम करण्यासाठी परवाना दिला जाणार नाही- हे मी का ऐकावं? कोणी बनवले हे नियम? या विभागणीला नेमका आधार कोणता? अशा कुठल्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळत नाहीत. फक्त तुम्हाला ‘नाही,’ असं ठामपणे सांगितलं जातं. तेव्हा मी ते का ऐकावं?’’ चारू खुराणा यांनी या प्रश्नांचा वेध घेत संघटनेच्या विरोधात लढायचा निर्णय घेतला आणि त्यात अखेर यश मिळवलं. गेले एक वर्ष त्या ही न्यायालयीन लढाई लढत होत्या आणि अखेर स्त्रियांनाही रंगभूषाकार म्हणून चित्रपटसृष्टीत काम करता आलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना पाच वर्षांच्या निवासी दाखल्याचीही गरज नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केले आणि ही लढाई जिंकली गेली. यामुळे चारु यांचा वैयक्तिक फायदा होण्याबरोबरच सर्वच स्त्रियांसाठी चित्रपटसृष्टीत रंगभूषाकार होण्याचा मार्ग खुला झाला आहे आणि हेच स्त्रियांच्या अधिकारासाठीचं एक महत्त्वाचं पाऊल मानायला हवं.
स्त्रियांना रंगभूषाकार म्हणून काम करण्यास नकार देणे यामागे चित्रपट क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी संपू नये, हेच कारण आहे हे उघड सत्य आहे. तरीही याविरोधात उभे राहायला आत्तापर्यंत कोणीही तयार नसल्यानेच आजवर कित्येक स्त्री रंगभूषाकारांना आपलं आवडीचं काम सोडून केशभूषाकार म्हणून काम करावं लागलं, तर काही जणींनी संघटनेच्या लोकांपासून लपतछपत काम सुरू ठेवलं.
चारू खुराणा स्वत: गेली काही वर्षे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत रंगभूषाकार म्हणून काम करत होत्या. त्यामागे प्रेरणा होती ती मेकअपच्या साहित्यातील रंग-गंधाचं आकर्षण. लहान असताना एकदा त्यांना आईच्या व्हॅनिटी किटमध्ये रंगभूषेचं हे साहित्य सापडलं होतं. विविध लिपस्टिक्स, फेस पावडर, ब्लश, नेलपॉलिश, आयश्ॉडो, मस्कारा याचे विविध रंग, त्यांचा गंध त्यांना इतका मोहवून गेला की, त्याच वेळी त्यांनी एक निर्णय स्वत:साठी घेऊन टाकला. तो होता, करिअर म्हणून रंगभूषाकारच व्हायचं. लहानपणी पाहिलेलं हे स्वप्न जिवंत ठेवतच त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण संपल्यानंतर लॉस एंजेलिसमध्ये जाऊन रंगभूषेचं रीतसर प्रशिक्षण घेतलं. या अभ्यासक्रमासाठी त्यांनी थोडेथोडके नाही, तर ३० लाख रुपयांचे कर्ज काढले होते. भारतात परत गेल्यावर या शिक्षणाच्या बळावर हे कर्ज आपण सहज फेडू, अशी त्यांची समजूत होती; पण त्याला तडा गेला. त्यांनी सांगितलं, ‘‘मी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला खरा, मात्र इंडस्ट्रीत काम करण्यासाठी परवाना मागायला गेल्यानंतर सुरुवातच ‘नाही’ने झाली. रंगभूषाकार म्हणून परवाना मिळणार नाही, असे सांगितल्यानंतर ते न मिळवता काम करण्याचा प्रयत्न मी केला. मी हे काम करते आहे हे कळू नये म्हणून व्हॅनिटी व्हॅनमध्ये बसून मी अभिनेत्रींचा मेकअप करायची; पण सेटवर मात्र कोणत्या तरी पुरुष सहकाऱ्याला, त्यानेच ते काम केलं आहे, असे भासवून पाठवायची. माझी कामातली हुशारी, माझे व्यक्तित्व हे त्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये बंद असायचे आणि माझा चेहरा म्हणून लोकांसमोर कोणी एक पुरुष सहकारी असायचा, त्याच्याबरोबर आपले कामाचे पैसेही वाटून घ्यायला लागायचे. या सगळ्या गोष्टींमुळे संताप होत होता; पण हे करणं भाग होतं, कारण कर्ज फेडायचं होतं; पण मनातल्या संतापाला मी थंड होऊ देत नव्हते. घटनेने मला जो अधिकार आणि स्वातंत्र्य दिलं आहे ते डावललं जातं आहे याची जाणीव मला होती. ती जाणीव मी सतत जिवंत ठेवत होते, कारण माझ्यावर अन्याय होतो आहे, हे मला जाणवत होतं. त्याचबरोबर आणखी एक गोष्ट जाणवत होती, ती म्हणजे, तुम्हाला तुमचे उपजीविकेचे साधन टिकवायचे असेल तर तुमचा लढा तुम्हालाच द्यावा लागतो. मी हा लढा दिला, कारण रंगभूषाकार होणं हा माझ्या चरितार्थाचा एक भाग असला तरी ते माझं स्वप्न होतं, ध्येय होतं.’’ चारू यांच्यासाठी हा लढा जीवन-मरणाचा सवाल होता. त्यासाठी योग्य मार्गाने जाणं गरजेचं होतं. त्या दिशेनं आणि एक जबाबदार नागरिक म्हणून त्यांनी पहिलं पाऊल उचललं आणि महाराष्ट्रात राज्य आयोगाकडे दाद मागितली होती. त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही तेव्हा दक्षिणेकडे मोहरा वळवला. तिथेही त्यांना तोच अनुभव आला.
दरम्यान, त्यांचा चित्रपटसृष्टीतला संघर्ष सुरूच होता. एक अनुभव त्यांनी सांगितला. ‘‘एकदा ‘इनाडू’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान तिथल्या मेकअप आणि हेअरड्रेसर्सच्या संघटनेतील लोकांनी मला सेटवर पकडलं आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. तेव्हा खुद्द अभिनेता कमल हसन यांनी पुढाकार घेऊन मला रंगभूषाकार म्हणून काम करण्याची परवानगी दिली जावी, यासाठी त्यांच्याशी चर्चा केली. हरएक प्रयत्न केले; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. मला दंडाची रक्कम तर भरावी लागली लागलीच; पण पुढच्या चित्रपटात चारूला काम करता येणार नाही, असे सांगत त्यांनी चित्रीकरण बंद पाडलं. तेव्हाही त्या चित्रपटाची नायिका प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी हिने संघटनेच्या लोकांशी वाद घातला; पण परिणाम शून्य.’’या प्रसंगानंतर चारू खुराणा यांना आपलं काम सोडावं लागलं; पण त्याच वेळी एका गोष्टीची जाणीव त्यांना झाली ते म्हणजे एखाददुसरी अभिनेत्री, निर्माता यांच्या बोलण्याने काहीही होणार नाही. या समस्येतून बाहेर पडायचे असेल तर कायदेशीर चौकटीतूनच या नियमातला पोकळपणा सिद्ध करावा लागेल.
चारू यांच्यासारखाच अनुभव बॉलीवूडमध्ये काम करणाऱ्या दिव्या छाबलानी यांनीही घेतला होता. आपला अनुभव त्या सांगतात, ‘‘गेली तेरा-चौदा र्वष मी बॉलीवूडमध्ये काम करते आहे; पण भीती सावलीसारखी घट्ट चिटकून असायची. कोणी आपल्याला पाहात तर नाही ना? आपल्याला दंड भरावा लागणार नाही ना? सतत सेटवर कोणी चाचपणी करत नाही ना, अन्यथा सेटवर तमाशा होईल म्हणून मी व्हॅनिटीमध्ये बसून अभिनेत्रींची रंगभूषा करायची.’’ दिव्याचं हे दु:ख खरंच मोठं आहे. खरं तर, बॉलीवूडमध्ये अभिनेत्रींची संख्या खूप मोठी आहे. स्त्री रंगभूषाकार असणं ही त्यांचीही गरज असते.
याविषयी अभिनेत्री सोनाली बेंद्रेला बोलतं केलं. ती म्हणाली, ‘‘मी माझ्या महिला रंगभूषाकाराबरोबर एकदम मोकळेपणानं वावरू शकते. कोणत्याही अभिनेत्रीसाठी स्त्री रंगभूषाकारच हवी, कारण त्या एकमेकांशी सहज जोडल्या जातात, आम्हाला त्यांच्याकडून काय हवं आहे हे त्यांनाही सहज समजून घेता येतं. त्यामुळे एक अभिनेत्री आणि तिची रंगभूषाकार यांच्यातलं नातं प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे.’’ सोनालीचं म्हणणं दिव्या अधिक तपशिलांसह मांडते. कित्येकदा त्यांना संपूर्ण देहाला रंगभूषा करायची असते, टॅटू काढायचा असतो. चेहऱ्यावर मेकअप करतानाही खूप जवळून काम करावं लागतं. अशा वेळी पुरुष रंगभूषाकारांबरोबर काम करताना त्यांनाही अवघडल्यासारखं वाटणं साहजिकच आहे.’’
दिव्याने बिपाशा बसूची वैयक्तिक रंगभूषाकार म्हणून काम पाहिले आहे. ती सांगते, ‘‘माझ्याबरोबर बिपाशाचे टय़ुनिंग खूप छान जुळलं असल्यानंच एक टीम म्हणून आम्ही काम करत होतो, मात्र विक्रम भट्ट दिग्दर्शित एका चित्रपटाच्या सेटवर युनियनच्या लोकांनी माझी अडवणूक केली. मुळात, निर्मात्यांना हा नियम मान्य आहे असं नाही, मात्र युनियनचे लोक अचानकपणे सेटवर येऊन काम बंद पाडतात तेव्हा त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान होतं. अशा परिस्थितीत तुम्ही काम करू शकत नाही. बिपाशानं युनियनला पत्राद्वारे असा कोणताही नियम नसून अशा प्रकारे स्त्री रंगभूषाकारांना त्रास दिला जाऊ नये, असं सुनावलं होतं. त्यावर युनियननं बिपाशालाच उलट पत्र पाठवून तिनं युनियनच्या कामात ढवळाढवळ करू नये, अशी धमकीवजा ताकीद दिली. महेश भट्ट यांनीही युनियनकडे पाठपुरावा केला होता; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही आणि चांगले चित्रपट सोडावे लागले.’’ दिव्याच्या सुरातून खंत उमटत राहाते..
दरम्यान, राज्य आयोगाकडून काहीच होत नाही म्हटल्यावर चारू खुराणा यांनी दिल्लीत राष्ट्रीय महिला आयोगाकडे या प्रकरणी दाद मागितली. या लढय़ाविषयी त्यांनी सांगितलं, ‘‘सुरुवातीला मी एकटीच होते. माझ्या हाताखाली काम करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यांना माझी बाजू पटत होती. आमच्यावर लादलेला नियम अन्याय्य आहे, हे त्यांनाही माहीत होते; पण त्याविरोधात लढा द्यावा एवढी त्यांची ताकद नव्हती. योगायोगाने माझी गाठ अ‍ॅडव्होकेट ज्योती कालरा यांच्याशी पडली. मी दोन र्वष काहीही काम करू शकलेले नाही, याची जाणीव असलेल्या ज्योती यांनी एक पैसाही न घेता हा खटला लढवला. स्वातंत्र्याचा बडेजाव मिरवणाऱ्या या देशात अशा बिनबुडाच्या नियमाची भीती दाखवून पुरुषी मक्तेदारी कशी काय टिकवली जाऊ शकते, याचेच त्यांना आश्चर्य वाटत होतं. शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात दाखल झालं आणि मग आमची खरी लढाई सुरू झाली.’’
त्याच दरम्यान, मुंबईत दिव्या छाबलानी, नम्रता सोनी अशा बॉलीवूडमध्ये वर्षांनुर्वष काम करणाऱ्या रंगभूषाकारांना चारूनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याची माहिती मिळाली आणि त्याही या लढय़ात सहभागी झाल्या. आज न्यायालयानं दिलेल्या निर्णयानंतर आपण स्वाभिमानाने रंगभूषाकार म्हणून बॉलीवूडमध्ये वावरू शकतो, याचा खूप आनंद झाला असल्याचं दिव्यानं सांगितलं. न्यायालयाने ‘सिने कॉस्च्युम मेकअप आर्टिस्ट अँड हेअर ड्रेसर्स असोसिएशन’ला निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी दहा दिवस दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय संघटनेवर बंधनकारक आहे, मात्र या निर्णयानं त्यांच्या मानसिकतेत सहजी बदल होईल अशी अपेक्षा करणे चुकीचे आहे, असे मत चारू आणि दिव्यापेक्षाही अनुभवी असणाऱ्या रंगभूषाकार विद्या तिकारा यांनी व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा महिला रंगभूषाकारांना न्याय मिळवून देणारा आहे, मात्र त्यामुळे आमच्या व्यवसायावर गदा येईल, असा विचार पुरुष रंगभूषाकारांनी करण्याची गरज नाही; पण त्यांनाही त्यांच्या दृष्टिकोनात बदल करण्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे, असे त्या सांगतात.
सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणावरच्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती दीपक मिश्रा आणि यु. यु. ललित यांनी कामाच्या बाबतीत स्त्री-पुरुष असा भेदभाव करत पक्षपात करणाऱ्या असोसिएशनच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत. फक्त पुरुषांनाच रंगभूषा करण्याची परवानगी का? पुरुषच रंगभूषाकार होऊ शकतात आणि स्त्रियाच केशभूषाकारच होऊ शकतात असे का? एखाद्या स्त्रीने प्रशिक्षण घेतले असेल, तर तिला रंगभूषाकार म्हणून काम करण्यास बंदी घालण्याचे एकही कारण आम्हाला सापडत नाही, असे स्पष्ट करतानाच आपण २०१४ मध्ये जगत आहोत १९३५ मध्ये नाही, याचे भान ठेवण्यासही त्यांनी असोसिएशनला सुनावले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी मांडलेली भूमिका आणि त्यांनी दिलेला निर्णय हा योग्यच आहे, असे सांगत राष्ट्रीय पुरस्कार विजेते रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांनी या निर्णयाचं स्वागत केलं. गेली २५ वर्षे मी याविषयी बोलत आलो आहे. ‘नासा’पासून ‘इस्रो’पर्यंत सगळीकडे स्त्री पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत असेल, तर रंगभूषेच्या क्षेत्रात त्यांना काम न करू देण्यामागचे तर्कशास्त्र काय, हे आजही आपल्याला समजलेलं नाही, असं ते म्हणतात. आजवर हा नियम सुरू राहिला यामागं असोसिएशनच्या विरोधात उभं राहण्याचं चारू खुराणा यांनी जे धाडस दाखवलं ते आत्तापर्यंत कोणी दाखवलं नाही हा एक भाग आहे. तसंच मोठमोठे निर्माते, कलाकार यांनीही युनियच्या विरोधात पंगा घेण्यात रस दाखवला नाही, त्यामुळे स्त्रियांना कोणाचाच भक्कम पाठिंबा मिळाला नाही. उशिराने का होईना या नियमावर कायदेशीर बडगा उगारला गेल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. माझ्यासारख्या अनेक पुरुष रंगभूषाकारांनी या निर्णयाचं स्वागतच केलं आहे.
अर्थात, काही जणांना माझे काम जाईल का? अशी व्यर्थ भीती मनात निर्माण होऊ शकते, मात्र आत्ताच्या काळात क्षेत्र कोणतंही असो, तुम्ही स्त्री आहात की पुरुष याने फरक पडत नाही. तुमचं कामच तुम्हाला पुढे नेतं, असं सांगत गायकवाड यांनी आपल्या स्त्री सहकाऱ्यांचे आपल्याच क्षेत्रातील विजयाचं स्वागत केलं आहे.
या निर्णयाचे हिंदीतील कलाकारांनीही स्वागत केलं आहे. सोनम कपूरपासून फार व्यक्त न होणाऱ्या रणबीर कपूरसारख्या अभिनेत्यानेही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. काही महिन्यांपूर्वी स्त्री रंगभूषाकाराच्या आग्रहामुळे सोनम कपूरचा असोसिएशनच्या अधिकाऱ्यांबरोबर वाद झाला होता. आज या निर्णयामुळं आपलं काम जाईल, अशी भीती पुरुष रंगभूषाकारांनी वाटून घेऊ नये. तुमचं काम चांगले असेल, तर तुम्ही स्त्री असाल वा पुरुष तुम्हाला पुढे जाण्यापासून कोणीही अडवू शकणार नाही, असे सांगत सोनमनं या निर्णयामुळे चांगले बदल होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. बिपाशानंही सगळ्या रंगभूषाकारांचं मनापासून अभिनंदन केलं आहे आणि या निर्णयामुळे आपल्या आवडत्या रंगभूषाकाराबरोबर नेहमी काम करायला मिळणार, याबद्दल तिला अधिक आनंद झाला असल्याचं दिव्यानं सांगितलं. या निर्णयानंतर बॉलीवूडमधून आपल्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला असल्याचं दिव्याचं म्हणणं आहे.
एकीकडे सोनम आणि दीपिकासारख्या अभिनेत्रींनी स्त्री रंगभूषाकारांबरोबर काम करायला मिळणार, याबद्दल आनंद व्यक्त केला आहे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे इतकी र्वष या रंगभूषाकारांसाठी अन्यायकारक ठरलेला हा नियमच हद्दपार झाल्याबद्दल अभिनेता फरहान अख्तर, दिग्दर्शक निखिल अडवाणी अशा अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे. मात्र, यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत कामापासून मानधनापर्यंत प्रत्येक गोष्टीत स्त्री-पुरुष असा जो दुजाभाव केला जातो त्याबद्दल नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
प्रश्न आजही अनेक आहेत. मात्र स्त्री-पुरुषांवर अन्याय्य ठरणारा रंगभूषा आणि केशभूषेसंदर्भातील हा नियम आत्ता सध्या तरी सुटला आहे, असं वाटत आहे. स्त्रियांसाठी आपली आवड जोपासण्याची आणि चरितार्थासाठीची एक नवी वाट खुली झाली आहे, इतकं मात्र नक्की.

आम्ही स्त्रियांच्या विरोधात नाही…
‘‘चारू खुराणा यांना रंगभूषाकार म्हणून परवाना नाकारण्याची कारणे वेगळी होती. त्यांच्याकडे राज्य सरकारने अधिसूचित केलेल्या नियमाप्रमाणे पंधरा र्वष वास्तव्याचा दाखला नव्हता, त्यामुळे त्यांना परवाना देण्यात अडचण होती,’’ असे ‘सिने कॉस्च्युम मेकअप आर्टिस्ट अँड हेअर ड्रेसर्स असोसिएशन’चे अध्यक्ष शरद शेलार यांनी सांगितले, मात्र त्यांनी न्यायालयापर्यंत वाद नेल्यामुळे असोसिएशन स्त्रियांच्या विरोधात असल्याचे चुकीचे चित्र निर्माण झाले आहे, असे शेलार यांचे म्हणणे आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर असोसिएशनच्या घटनेत बदल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र योग्य ते प्रशिक्षण आणि त्यासंबंधीची पदवी, पदविका घेऊन येणाऱ्यांनाच काम करण्याची परवानगी देण्यात येईल, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर स्त्री रंगभूषाकारांना परवाना देण्यासाठी सज्ज झालेले असोसिएशन पुरुषांना केशभूषाकार म्हणून परवानगी देण्यास मात्र अजून तयार नाही. एकमेकांचे व्यवसाय विभागलेले असले म्हणजे प्रत्येकालाच या क्षेत्रात टिकाव धरता येईल, असा असोसिएशनचा विचार होता. त्यामुळे पुरुषांना के शभूषाकार म्हणून काम करता येणार नाही, या नियमात आता लगेच बदल होणे शक्य नसल्याचेही शेलार यांनी स्पष्ट केले.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After long ban women in india can soon work as bollywood makeup artists
First published on: 22-11-2014 at 12:52 IST