डॉ. दीपक कासराळीकर

जगाशी ‘अप टू डेट’ राहायला मला आवडतं. वाचन, सिनेमा किंवा टीव्ही बघणं, नवीन काही ऐकणं, याची ओढ तरुणपणीच लागली. जिथे जे कार्यक्रम असतील तिथे मी जात असे. ‘हे जग मी सुंदर करून जाईन’ अशा शीर्षकाचा पु. ल. देशपांडे यांचा लेख महाविद्यालयात असताना वाचनात आला अन् त्यात सांगितल्याप्रमाणे सर्व बाबतीत मी रस घेऊ लागलो. १५-२० वर्षांपूर्वीपर्यंत सर्व काही ठीक होतं, पण नंतर तांत्रिक विकासाचा स्फोटच झाला! मोबाइल, इंटरनेट, ओटीटी यांमुळे जग जवळ आलं; अगदी हाताच्या अंगठय़ावर तोलता येईल असं, पण आम्ही मात्र जगापासून दूर गेलो. कारण यांपैकी काहीच जमत नव्हतं. आपण ‘अप टू डेट’ आहोत हा अभिमान वृथाच ठरला. आपण कुठे तरी ‘साइिडग’ला पडलो असं वाटू लागलं!

pune bhel seller old couple video viral
Pune : पुण्यासारखी माणुसकी कुठे सापडेल? भेळ विकणाऱ्या वृद्ध जोडप्याचा VIDEO होतोय व्हायरल
cabinet deputy secretary mrunmai joshi guidance for upsc
माझीस्पर्धा परीक्षा :अभ्यास करावा नेटका…
When can my baby drink cow’s milk
सहा महिने की बारा महिने, बाळाला गायीचे दूध केव्हा देऊ शकता? WHO चे नवे मार्गदर्शक तत्व काय सांगतात? जाणून घ्या
live in relationship old age marathi article
समुपदेशन : वृद्धत्वात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ ?

माझा मुलगा कॉम्प्युटर इंजिनीअर. पण मला मात्र कॉम्प्युटर उघडता आणि बंद करता येईना. मुलगा नेहमी म्हणे, ‘शिकून घ्या. मी सांगतो.’ पण त्यात डोकंच घातलं नाही. परत परत त्याचं सांगणं असे, ‘‘तुम्हाला पुस्तकं वाचायची सवय आहे. ई-बुक वाचायला शिका. तुम्ही प्रवासही खूप करता. मोबाइल वापरता येणं प्रवासात सोपं जातं.’’ पण कुठं जमायचं आम्हाला? मी दुर्लक्ष करत राहिलो. तो म्हणायचा, ‘‘तुम्ही व्याख्यानाला जाता, तेव्हा रेकॉर्ड करायला शिका. तुमचे व्हिडीओ अपलोड करा. सिनेमाही बघता, त्याची अ‍ॅप्स डाऊनलोड करून घ्या. मी तुम्हाला टॅब घेऊन देतो.’’ त्यानं सारखं असं म्हटल्यामुळे मी ठरवलं, की चला, करू या सगळं. आणि हळूहळू शिकत गेलो.

आधी मोबाइलसंदर्भात काहीच कळत नव्हतं. फोन करणं आणि आलेला फोन घेणं (तोही काही वेळा घेता यायचा नाही!) एवढंच जमे. काही मित्र-नातेवाईकांचे ग्रुप होते. ते म्हणायचे, की ‘जॉइन व्हा ना!’ पण कसं व्हायचं माहीत नाही. ते मुलानं शिकवलं. माझा नातू आठ वर्षांचा आणि नात सात वर्षांची. अलीकडची पिढी या क्षेत्रात विलक्षण तरबेज! व्हिडीओ कसा ‘अपलोड’ करायचा, हे ते पटापटा सांगत! काही अडचण आली की त्यांना फोन लावायचा. मी पुण्याला त्यांच्याजवळ असलो म्हणजे प्रत्यक्ष अडचणी  लवकर दूर होत असत. फोनवरून लवकर कळायचं नाही. पुन्हा पुन्हा विचारावं लागायचं. तेव्हा कधी कधी नातू म्हणायचा, ‘‘अरे दद्दू, किती सोप्पंय.. नाही तर असं करा, या इथे उद्या, सांगतो सगळं.’’ त्याला सगळंच ‘सोप्पंय’! आम्ही नवीन पिढीला या संदर्भात अडाणीच वाटतो! आणि पुण्याला लगेच तेवढं समजून घ्यायला ‘उद्याच’ जाणं सोप्पंय?

     मुलांनी टचस्क्रीनचा मोबाइल घेऊन दिला, त्याच्या फजिती तर विचारूच नका! चुकून बोट वा अंगठा लागला की कुठे तरी फोन लागायचा. कधी कधी तर व्हिडीओच लागे. इमोजींचा अर्थ तर सुरुवातीला कळायचाच नाही. आनंदाच्या प्रसंगी चुकून चेहरा पडलेला इमोजी जायचा. मग संबंधित मनुष्य आमची टाळू बडवायचा अन् आमचा चेहरा त्या पाठवलेल्या इमोजीसारखा व्हायचा! ‘गूगल पे’त ट्रेंड होण्यासाठी सराव म्हणून मी एक एक रुपया पाठवत असे. यात आमचे ४००- ५०० रुपये गेले हो! फेसबुकची तर गंमतच. एकदा आमचा फोटोच उलटा गेला. जगभर आम्ही उलटे ठरलो!

   आमच्या आवडत्या देव आनंदच्या ‘गाइड’चा एकदा ‘रिपीट शो’ लागला होता. ऑनलाइन बुकिंग करायचं बऱ्यापैकी शिकलो होतो. मेसेजही आला होता. सिनेमाला १० मिनिटं असताना थिएटरवर गेलो. आत सोडणाऱ्या पोऱ्याला तो मेसेज दाखवायचा होता, पण तो काही सापडेचना! सिनेमा सुरू व्हायची वेळ झाली. आम्हाला सेन्सॉरच्या सर्टिफिकेशनपासून सिनेमा पाहायची सवय. मेसेजचा शोध घेऊ लागलो. तो पोऱ्या माझ्याकडे ‘काय गबाळा’ अशा नजरेनं बघत होता. काय करावं कळेना. त्याला ‘शोधून दे’ म्हणण्याचं ठरवत होतो, पण त्याची ती नजर बघवेना. तेवढय़ात एक कॉलेज कन्यका आली. माझी त्रेधातिरपीट तिनं पाहिली आणि म्हणाली, ‘‘काय प्रॉब्लेम?’’ मी सांगितलं. तिनं चटकन तो मेसेज काढून दिला. गाइडमध्ये वहिदाचा ‘गाइड’ देव होता, इथं आमची गाइड ही ‘वहिदा’ झाली!

एखाद्या लेखाचा फोटो ‘स्कॅन’ करून पाठवणं, स्क्रीनशॉट घेणं अशा गोष्टी समजून घेऊन शिकत गेलो. मला प्रवासाची आणि गाण्यांची आवड. ‘ब्ल्यूटूथ’चा उपयोग करून हेडफोन लावून गाणी ऐका, असं मुलाचं सांगणं. त्यानं तसा हेडफोन घेऊनही दिला आणि ते लावून ऐकू लागलो. चांगलं चालत होतं, पण एकदा प्रवासात बंद पडलं. मग प्रवासातच एका तरुणाला विचारलं आणि त्यानं जुजबी दुरुस्त केलं. पुन्हा ते चालेना, तेव्हा मुलाला फोन केला. त्यानं ‘व्हिडीओ फोन’ (तोही कसा करायचा व कसा घ्यायचा हे शिकून घेतलं होतं.) करून तो ‘प्रॉब्लेम’ कसा सोडवायचा हे सांगितलं अन् मला जमलं की हो! अशा रीतीनं मी ‘अपडेट’ होत गेलो आणि अजूनही होत आहे. या तांत्रिक क्षेत्रात आपण अडाणी ठरतो की काय, असं वाटत होतं, पण मुलाच्या, नातवंडांच्या, प्रवासात क्वचित एखाद्या जाणकाराच्या सहाय्यानं ‘सुशिक्षित’ झालो, ‘अपडेट’ झालो!