७०-८० केळ्यांचा फणा ज्यातून निर्माण होतो ते केळफूल फुलासारखं दिसतच नाही. केळफुलाच्या वरची गुलाबी, लाल रंगाची जाड पानं उलगडत गेलं की आत पिवळसर फुलांचे केळ्याच्या घडासारखे घड दिसतात.
केळफुलात कोलेस्टोरॉल नाही, साखर नाही, पण भरपूर चोथा आणि कॅल्शियम असतं. सोडियमने समृद्ध असलेल्या या केळफुलात चांगल्या प्रतीची प्रथिनं असतात, तसेच मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपरही असतं. केळफुलाचा अर्क साखर नियंत्रणात ठेवतो, शरीरातल्या जंतूंची वाढ रोखतो.
केळफुलाची भाजी निवडायला किचकट. कारण त्यातल्या प्रत्येक फुलातला कडक दांडा आणि पातळ पापुद्रा काढावा लागतो. पण ती अतिशय पौष्टिक असल्याने जरूर खावी. चिरल्यानंतर भाजी ताक किंवा लिंबू घातलेल्या पाण्यात घालावी नाही तर काळी पडते.

केळफुलाचे अप्पे
साहित्य : १ वाटी बारीक चिरलेलं केळफूल, १ वाटी बारीक रवा, १ वाटी दही, १ मोठा चमचा बेसन, २ मोठे चमचे मोहरी, हिंग, हळद घातलेली तेलाची फोडणी, प्रत्येकी १ चमचा तीळ आणि लसूण-मिरची ठेचा, चवीला मीठ, साखर, पाव वाटी कोमट पाणी, १ चमचा इनो फ्रूट सॉल्ट.

कृती : चिरलेलं केळफूल कुस्करावं. एक मोठा चमचा फोडणी वगळून इतर सर्व जिन्नस एकत्र करावेत, नॉन स्टीक अप्पेपात्रात थेंब थेंब चमचा फोडणी घालून त्यात पीठ घालावं, झाकण ठेवून ४ मिनिटांनी अप्पे उलटावे. परत थोडीथोडी फोडणी घालून दुसरी बाजू भाजावी.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वसुंधरा पर्वते
vgparvate@yahoo.com
(सदर समाप्त)