वैवाहिक जीवनात अपत्यजन्माविषयीचे नियोजन ही पती-पत्नीची खासगी बाब असली तरी समाजाच्या जडण-घडणीचा तो पाया आहे हे विसरता येत नाही. अपत्यजन्माचे नियोजन योग्य पद्धतीने होण्यासाठी दोन अपत्यांमध्ये योग्य ते अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी जननक्षम जोडप्यांनी पाळणा लांबविण्याच्या साधनांचा वापर नियमितपणे केला पाहिजे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘साधनांचा वापर’ ही बाब ग्रामीण जनतेपासून दूर आहे. या साधनांबद्दल त्यांच्या मनामध्ये एकतर भीती आहे, नाही तर गैरसमज आहेत. ग्रामीण भागातील जननक्षम जोडप्यांचा कल, आपल्याला हवी तेवढी अपत्यं एकानंतर एक होऊ देणे आणि नंतर स्त्रियांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेणे या पद्धतीकडेच अधिक आहे; पुरुष नसबंदी नाहीच म्हटलं तरी चालेल. तांबी, गर्भनिरोधक गोळ्या, निरोध या प्रचलित साधनांशिवाय ‘सेफ पीरियड’, गर्भनिरोधक इंजक्शने, स्तनपानाच्या कालावधीतील उपाय अशी काही कमी प्रचलित साधने देखील उपलब्ध आहेत. यापैकी बहुतेक सर्व पद्धतींचा वापर शरीरसंबंधांपूर्वी केला जातो; फक्त निरोध या साधनांचा वापर संबंधांच्या वेळेस केला जातो. गर्भनिरोधक इंजेक्शनच्या बाबतीत आलेला  स्त्रियांच्या असहायतेची प्रचीती देणारा एक अनुभव नमूद करावासा वाटतो. समाजात काही स्त्रिया मनाविरुद्ध लादल्या जाणाऱ्या गर्भधारणांनी हैराण आहेत. नवऱ्याच्या, सासू-सासऱ्याच्या मर्जीनुसारच त्यांना वागावं लागतं. ‘हम ताकत का इंजेक्शन लगवाने डॉक्टर के पास जा रहे है’ असं घरी सांगून डॉक्टरकडे येतात आणि गर्भनिरोधक इंजेक्शन द्या मात्र घरच्यांना सांगू नका अशी विनंती करतात. अशी इंजेक्शने या स्त्रियांसाठी वरदानच म्हणावं लागेल.

तातडीचे संततिनियमनाच्या गोळ्या (Emergency Contraception Pills) ही पद्धत देखील आजकाल वापरात येत आहे. संभोगानंतर उपयोगात येणारी ही एकमेव अशी पद्धत आहे. या पद्धतीचा वापर फक्त ‘संकटकालीन’ परिस्थितीतच केला गेला पाहिजे. या विषयासंबंधी अजून एका गोष्टीची इथे माहिती द्यावीशी वाटते. गर्भधारणेच्या नऊ महिन्यांच्या कालावधीत स्त्रियांची मासिक पाळी बंद असते. बाळंतपणानंतर (नॉर्मल होवो अथवा सिझर) ती परत सुरू होण्यासाठी दीड महिन्यांपासून दीड वर्षांचा कालावधीही लागू शकतो. बाळंतपणानंतर पाळी पुन्हा सुरू होईपर्यंत गर्भधारणा राहात नसते असा गैरसमज अनेकांचा आहे. काही जण कोणत्याही साधनाचा वापर न करता आपल्या लैंगिक जीवनाची सुरुवात करतात, त्यामुळे ग्रामीण भाषेत सांगायचं म्हणजे ‘मिंधं’ राहू शकतं. बाळंतपणानंतर पाळी पूर्ववत सुरू होण्यापूर्वी कोणतेही साधन न वापरता शारीरिक संबंध ठेवल्यास गर्भधारणा राहू शकते, म्हणून त्या कालावधीत देखील ‘काळजी’ घेतली पाहिजे.

अपत्यजन्माच्या नियोजनाच्या संदर्भात कळत नकळत अजून एक पायंडा समाजात पडतो आहे वाटतं. पहिली मुलगी झाल्यानंतर दुसरा मुलगा होईल या अपेक्षेने लगेच ‘सेकंड चान्स’ घेतात, पाळणा लांबविण्याचं कोणतंही साधन सहसा वापरत नाहीत. पहिला मुलगा झाला तर मात्र ‘सेकंड चान्स’ घेण्याची ते घाई करत नाहीत, काहीतरी ‘वापरतात’ वास्तविक पाहता पाळणा लांबविण्याच्या प्रत्येक पद्धतीच्या वापरासोबत काहीना काही अडचणी येतातच, पाळणा लांबविण्याची कोणतीही पद्धत ही शंभर टक्के परिणामकारक नाही. प्रत्येक पद्धत ही अत्यंत अल्प प्रमाणात का होईना अयशस्वी अथवा ‘फेल’ ठरण्याची शक्यता असते. तरी जगभर असंख्य स्त्री-पुरुष कोणत्या न कोणत्या पद्धतीचा वापर करत आहेत. याचं कारण असं की कोणत्याही पद्धतीच्या साइड इफेक्ट्स आणि अयशस्वी होण्याच्या शक्यतेच्या तुलनेत त्यांच्या वापरामुळे होणारा ‘फायदा’ हा कितीतरी पटीने जास्त आहे. तांबी किंवा निरोधच्या वापराने कुणी मृत्युमुखी पडल्याची एकही केस जगात नोंद नाही, उलट या साधनांचा वापर न केल्यामुळे जी ‘नको’ असलेली गर्भधारणा राहू शकते, ती जीवघेणी ठरू शकते. दुर्दैव असं की आपण पाळणा लांबविण्याच्या साधनांच्या हितकारक बाबीपेक्षा क्वचित प्रसंगी होणाऱ्या साइड इफेक्ट्सबद्दल जास्त चर्चा करतो, त्यामुळे गैरसमज पसरतात. या बाबतीत लोकांनी झालेल्या फायदेशीर बाबींची चर्चा करण्याची सवय लावून घेतली पाहिजे.

या निमित्ताने, तरुण मंडळी, ज्याचं लग्न ठरलेलं आहे, त्यांना सांगावंसं वाटतं की अपत्यजन्माचं नियोजन लग्नापूर्वी किमान एक महिना अगोदर करा. एकदा लग्न ठरलं की आपण, कार्यालय, केटरर, फोटोग्राफर, कपडे आणि दागिन्यांची खरेदी वगैरे सगळी तयारी करतो पण लग्नानंतर वैवाहिक जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या लैंगिक संबंधांबद्दल आणि होणाऱ्या गर्भधारणेच्या बाबतीत संकोचामुळे बोलण्याचं टाळतो. या बाबतीत बोलून लग्नापूर्वीच निर्णय घेणे हा लग्नाच्या तयारीचाच एक महत्त्वाचा भाग आहे. साखरपुडा झाल्यानंतर लग्न होईपर्यंतचा काळ हा या विषयासंबंधी मोकळेपणाने बोलण्याचा योग्य कालावधी आहे. असं बोलणं झाल्यामुळे नवविवाहित जोडपे गर्भधारणेच्या बाबतीत ‘घोळ’ घालणार नाही. विवाहपूर्व समुपदेशाने अपत्यजन्माच्या नियोजनात एक शिस्तबद्धता येईल. मुलामुलींच्या आई-वडिलांनी ही बाब लक्षात घेऊन पुढाकार घ्यायला पाहिजे. लग्नापूर्वी मुलामुलींना एकदा डॉक्टरकडे जाऊन या, असं सांगितलं पाहिजे.

ग्रामीण भागातील बरीच जनता आणि शहरी भागातील भागातील काही सुशिक्षित लोकदेखील, आपल्याला एखादं बाळ होऊ  द्यावं का नको या बाबतीत गांभीर्याने  विचार करत असतील असं अजिबात वाटत नाही. एका अपत्याच्या जन्मानंतर लगेच दुसरं अपत्य त्यांना लगेच नको असतं पण त्यासाठी काही ‘वापरायचं’ असतं हे त्यांना कळत नाही. आम्हाला लगेच दुसरं बाळ नको त्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे, असं स्वत:हून विचारणारं ग्रामीण भागातील जोडपं एखाद्या नर्स किंवा डॉक्टरकडे जाताना दिसत नाही. आम्ही जेव्हा एखाद्या अशा जोडप्याला विचारतो, ‘दुसरं बाळ तुम्हाला इतक्यात नको होतं ना? मग? नुसतं नको म्हणून कसं चालेल, काहीतरी वापरावं लागेल ना?’ या प्रश्नावर एकतर त्यांचा चेहरा भावनाशून्य किंवा कोरा असतो, नाहीतर ते फक्त हसतात. फारशी इच्छा नसताना देखील चुकून राहिलेला एखादा गर्भ वाढवणं, त्या ‘एक्स्ट्रा’ बाळाला जन्म देणं या गोष्टी बऱ्याच प्रमाणात घडत असतात. अशी एक्स्ट्राची गर्भधारणा वाढवून, तिला जन्म देणे, त्या बाळाचं संगोपन करणे या सर्व गोष्टीमुळे आपल्या शरीरावर, मनावर, आर्थिक परिस्थितीवर लगेचचे आणि काही दूरगामी परिणाम होत असतात हा विचार देखील त्यांच्या मनात नसतो.

आपल्या देशातील लोकांचं अपत्यजन्माच्या नियोजनाच्या बाबतीत असलेलं भान आणि देशाची भरमसाट वाढणाऱ्या लोकसंख्येची समस्या या दोन मुद्दय़ांची सांगड घालून विचार केला तर काही गोष्टींचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. लेखाच्या सुरुवातीला नमूद केल्याप्रमाणे वैवाहिक जीवनात अपत्यजन्माविषयीचे नियोजन ही पती-पत्नीची खासगी बाब असली, तरी समाजाच्या जडण-घडणीचा तो पाया आहे. आपल्या राष्ट्राची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि एक बलशाली राष्ट्र उभारण्यासाठी आपण आपलं कुटुंब मर्यादित ठेवलं पाहिजे, अशी खूणगाठ बांधून कुणी आपल्या पत्नीशी शारीरिक सबंध ठेवत नाही; कुटुंबाचा आकार ठरवत नाही. आज जी जोडपी कुटुंब छोटं ठेवतात कारण त्यांना स्वत:चं राहणीमान उंचावण्याची इच्छा आहे. असं केल्याने देशाच्या विकासासाठी हातभार लागतो हा त्याचा हितकारक असा ‘साइड इफेक्ट’ आहे यात शंका नाही. दुर्दैवाने हे सगळं ओळखून जीवन जगण्याची समज आपल्या देशातील लोकांमध्ये अभावानेच आढळते. राष्ट्राच्या कल्याणासाठी जर मग कुणी मूल जन्माला घालत नसेल तर मग अपत्यजन्माच्या खर्चाचा बोजा लोकांनी सरकारवर टाकू नये असं कुणी म्हटलं तर ते वावगं ठरू नये.

थोडक्यात काय तर अपत्य जन्माला घालताना लोकांनी भावनेच्या भरात न जाता, आपापल्या बौद्धिक आणि आर्थिक कुवतीचा विचार केला पाहिजे. या बाबतीत सरकारकडून किती अपेक्षा कराव्यात याला काही मर्यादा आहेतच.

– डॉ. किशोर अतनूरकर

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on child birth planning
First published on: 17-03-2018 at 01:18 IST