गर्भावस्था आणि अपत्यजन्म हे दोन्ही जगातील जवळपास प्रत्येक कुटुंबासाठी जिव्हाळ्याचे प्रसंग आहेत. हे अनुभव त्या गर्भवतीसाठी तर कौतुकाचे असतातच, पण त्याबद्दलची उत्सुकता ही कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रपरिवारात असते. सर्वसाधारणपणे या प्रसंगाचा शेवट हा गोडच होतो किंवा गोड व्हावा असं अपेक्षित असतं. त्या गर्भवतीला वेदना होत असतात, नातेवाईकांची धावपळ होत असते, तरी त्यात एक आनंद होत असतो. एरवी दुसऱ्या कोणत्याही त्रासासाठी डॉक्टरची भेट, रुग्णालयात दाखल होणे, औषध-गोळ्या-इंजेक्शन – सलाइन घेणे या फार काही स्वागतार्ह गोष्टी नाहीत. गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या बाबतीत असं होत नाही. पूर्वी बाळंतपण म्हणजे ज्याला आपण नॉर्मल डिलिव्हरी म्हणतो असंच अपेक्षित असायचं, पण गेल्या काही वर्षांत सिझेरियन होणं ‘नॉर्मल’ झालं आहे असं थोडंसं अतिशयोक्ती करून म्हणता येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गर्भवती स्त्री आणि जन्माला येणारं मूल या दोघांसाठी वरदान ठरलेल्या ‘सिझेरियन सेक्शन’ ही शस्त्रक्रिया आज समाजाच्या दृष्टिकोनातून ‘बदनाम’ आहे. या बदनामीसाठी जबाबदार कोण? असा प्रश्न विचारल्याशिवाय राहवत नाही. डॉक्टरांची मनमानी होत आहे का? गर्भवती स्त्रियांची वेदना सहन न करण्याची इच्छा हा मुद्दा प्रभावशाली होत आहे का? पैसा-कंपनी ‘पे’ करणार असल्यामुळे किंवा आरोग्य विमा घेतलेला असल्यामुळे नातेवाईकांची संमती कारणीभूत आहे का? ही आणि अशी अनेक अवैद्यकीय कारणे आज सिझेरियन नामक ‘साथीच्या रोगाचा’ जगभर फैलावासाठी जबाबदार आहेत अशी चर्चा आहे. नॉर्मल का सिझर? हा सध्याच्या काळात खूप संवेदनशील आणि चर्चेचा मुद्दा झाला आहे. सिझेरियन करण्याचा निर्णय घेत असताना फक्त त्या मातेची अवस्था आणि पोटात असलेल्या बाळाची तब्येत महत्त्वाची ठरते की अन्य काही कारणांचा त्या निर्णयप्रक्रियेवर प्रभाव असतो; असलाच तर ती कारणे विचारात घेणे योग्य की अयोग्य याचा या सदरातून केला जाणारा ऊहापोह वाचकांच्या ज्ञानात भर पाडणारा असेल.

‘सिझेरियन सेक्शन’ झालं आणि मुलगा झाला की ती गर्भवती आणि नातेवाईक खूश होतात आणि मुलगी झाली की आजही, एकविसाव्या शतकातदेखील नाराज होतात. सिझेरियन झालं हरकत नाही; पण निदान मुलगा झाला असता तर सिझेरियन झाल्याचं काही वाटलं नसतं, असं म्हणणारी माणसं भेटली. पैसे सिझेरियनच्या बिलाइतके घ्या, पण डिलिव्हरी नॉर्मल करा, असं म्हणणारी माणसंदेखील भेटली. सिझेरियन होऊन मुलगा झाला की नातेवाईकांचा सिझेरियन या शस्त्रक्रियेला सुरुवातीला असलेला विरोध तितकासा उरत नाही. एवढंच नाही तर डॉक्टरदेखील मुलगा झाला की आनंदी होतात आणि मुलगी झाली की गुपचूप बसतात हे भयावह आहे. मग, सिझेरियनच्या बाबतीत काय खरं आणि काय खोटं याचा शोध घेणं गरजेचं आहे. या संदर्भातील डॉक्टर म्हणून आलेले अनुभव वाचकांसमोर मांडणं महत्त्वाचे आहे. त्या प्रत्येक अनुभवातून आपल्याला समाजासाठी नेमका संदेश देता येईल, जेणेकरून या बाबतीत डॉक्टर आणि समाज यांमध्ये जी दरी निर्माण झालेली आहे ती कमी करता येईल. गैरसमज दूर करता येतील.

गर्भावस्था आणि बाळंतपण हा विषय केवळ नॉर्मल का सिझर, एवढय़ापुरताच मर्यादित नाही. अपत्यजन्मासंबंधित अनेक विविध अनुभवांतून आम्हा डॉक्टरांना जावे लागते. या अनुभवानंतर असं वाटतं की, गर्भावस्था आणि बाळंतपणाच्या बाबतीत घराघरांतून पारंपरिक प्रथांचा पगडा अजूनही म्हणावा तितका कमी झालेला नाही.  आई, सासू, काकू-मावशी-आत्या, प्रसंगी मोलकरीणदेखील, त्या गर्भवती किंवा नुकत्याच बाळंत झालेल्या स्त्रीस अनेक बारीकसारीक सूचना अधिकारवाणीने देतात. त्यातील बऱ्याच  गैरलागू असतात. काही वेळेस अशा सूचनांचं पालन करताना अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण होतात. या सर्व आया आणि सासवांना या लेखमालेत मांडलेल्या विचारातून शहाणं करता येईल. शिवाय पतीराजांनाही,  जे पुरुष अशा अवस्थेत आपल्या पत्नीला योग्य ती ‘साथ’ देत नाहीत त्यांनादेखील या लेखमालेतून काही सूचना दिल्या पाहिजेत असं वाटतं.

गर्भ राहिल्याची ‘गुड न्यूज’ कळल्यापासून ते बाळंतपण होईपर्यंत ‘सगळं काही व्यवस्थित’ आहे ना? काही काळजी करण्यासारखं तर नाही ना? या प्रश्नांना डॉक्टरांना उत्तर द्यावं लागतं. रुग्णाला आणि नातेवाईकांना या प्रश्नांचं ‘हो’ उत्तर अपेक्षित असतं. अपेक्षित ‘हो’ म्हणताना डॉक्टरांच्या मनातदेखील ‘धाकधूक’ असते. गर्भावस्था आणि अपत्यजन्माच्या बाबतीत कधी काय होईल हे डॉक्टरांना माहिती असतं आणि समाजाला सगळं काही व्यवस्थित व्हावं असं वाटत असतं. ही परिस्थितीच अनेक प्रसंगांना आणि अनुभवांना जन्म देत असते. त्याचा अभ्यासपूर्ण मागोवा या लेखमालेतून घ्यायचा आहे. समाजमनातून निर्माण झालेल्या प्रसंगाची ‘शिदोरी’ घेऊन समाजाला अपत्यजन्माच्या विषयात ‘पास’ करायचे आहे.

डॉ. किशोर अतनूरकर

atnurkarkishore@gmail.com

chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व अपत्यजन्माचे समाजभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Articles in marathi on pregnancy and childbirth
First published on: 06-01-2018 at 05:10 IST