जिराफ हा आता दुर्मिळ होत चाललेला प्राणी. ‘आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन’ संघटनेनुसार गेल्या ३० वर्षांत त्यांची संख्या जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पारिजातची ही कहाणी. मातेने अव्हेरलेल्या, जन्मापासून एकाकी झालेल्या पारिजातची जीवनेच्छा मात्र इतकी प्रबळ आणि चिवट की, आज परिजात तिच्या प्रजातीसाठी राजदूत म्हणून शब्दश: आणि लाक्षणिक अर्थानेही उंच उभी आहे. आसाम प्राणिसंग्रहालयाच्या मदतीने तिला वाचवण्याची पराकाष्ठा करणाऱ्या तुषार कुलकर्णी यांचा हा लेख.

असाम राज्य प्राणिसंग्रहालय… तो दिवस होता, १६ नोव्हेंबर २०२३. त्या दिवशी या जगात एका अतिशय सुंदर अशा नव्या जीवाचं आगमन झालं. ती होती ‘पारिजात’, जिराफाची बछडी. तिचा जन्म हा प्राणिसंग्रहालयातील सर्वांसाठी अतिशय आनंदाचा क्षण होता, पण… तिच्यासाठी मात्र तो दु:खाचा ठरला होता. का कोण जाणे, तिची माता विजया तिला स्वीकारायलाच तयार नव्हती. अजिबात जवळही येऊ देत नव्हती. जणू काही ती कुणी वैरीण असावी असंच तिचं वागणं होतं.

stock market news in marathi
सेन्सेक्सची त्रिशतकी घसरण, निफ्टी २३,७०० खाली; शेअर बाजाराच्या आजच्या सावध विरामाची कारणे काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Will Meghe Medical Group be taken over by Adani
मेघे वैद्यकीय समूह अदानी टेक ओव्हर करणार? नेमके काय घडले…
Nagpur sikandarabaad Vande Bharat Express coaches to be reduced
टीसचा अहवाल जाहीर करा, आदिवासी संघटनांची मागणी
pune gbs loksatta news
पुण्यात गेल्या वर्षभरात आढळले ‘जीबीएस’चे १८५ रुग्ण; आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून माहिती समोर
Gen Z and the Lost Art of Conversation
तब्बल पाच हजार वर्षांचा इतिहास असलेला थेट मानवी संवाद हरवतोय? नेमके काय घडते आहे?
loksatta anvyarth quality of school students has deteriorated clear from the asar survey
अन्वयार्थ: कोविडोत्तर निरीक्षणांच्या इयत्ताबदलाचा ‘असर’!
Loksatta samorchya bakawarun February 1st upcoming budget
समोरच्या बाकावरून: दिल्लीतील कुजबुज असे सांगते की…

आई म्हटलं की, तिच्याभोवतीची सगळी गृहीतकं खरं तर हात जोडून उभी असतात, पण विजयाला काय झालं असावं नेमकं? आम्ही लहानपणी कवी माधव ज्यूलियन यांची ‘प्रेमस्वरूप आई’ कविता वाचली होती. प्राण्यातील का होईना, पण त्या आईहून एखादी आई इतकी वेगळी असू शकते, असा प्रश्नच पडला तिला पाहून. साहजिकच त्या प्रश्नाचा मागोवा घेतला गेला.

काही संशोधकांच्या अभ्यासानुसार, कधी कधी जिराफ मादी प्रसूतीनंतर नवजात पिल्लाला बघून घाबरलेली असते. कधी कधी तिच्यातील मातृत्वाची संवेदनाच जागृत झालेली नसते. पहिलटकरीण असेल तर पिल्लू झाल्यानंतर काय करायचं याची तिला जाणीवच नसते. अशा मातेने पाठ फिरवलेल्या पिल्लांचा जीवनप्रवास किती खडतर असू शकतो, याची कल्पना या पृथ्वीतलावरील कोणताही जीव सहज करू शकतो. पण माझ्यासाठी पारिजातचा जन्म एका विलक्षण प्रवासाची सुरुवात असेल, असं मला तेव्हा तरी वाटलं नव्हतं.

आसाम प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. अश्विनी कुमार यांचा मला फोन आला की, माझी तिथं तातडीने गरज आहे. मी जिराफ संवंर्धनाचं काम करीत असल्याने त्यांनी मला बोलावून घेतलं होतं. त्यांनी पारिजातबद्दल माहिती दिली. ती एकून इतर कुठलाही विचार न करता मी दुसऱ्याच दिवशी सकाळी संग्रहालयात पोहोचलो. पारिजातला जगण्याची, त्यासाठी लढण्याची संधी देणं हे एक विलक्षण आव्हान आणि कठीण काम असेल याची मला पूर्ण जाणीव होती. तिच्यासाठी आणि माझ्यासाठीसुद्धा.

प्रत्यक्ष जन्मदात्या मातेने अव्हेरलेल्या या बछडीनं करावं तरी काय? मातेच्या दुधाविना ती जगणं केवळ अशक्य होतं. विजयाचं मन बदलेल असा विचार करण्यात काहीच अर्थ नव्हता. पारिजातचं संगोपन आपल्यालाच करायचंय याची खात्री पटली. वेळ दवडण्यात काहीच अर्थ नव्हता.

मी लगेच काय काय करावं लागणार याची सूची तयार केली. सर्वप्रथम पारिजातला कोलोस्ट्रम पिऊ घालणं आवश्यक होतं. कोलोस्ट्रम म्हणजे नवजात बालकांच्या प्रतिकारशक्तीसाठी आवश्यक प्रतिपिंडं (अँटीबॉडी)असलेलं मातेचं प्रसूतीनंतरचं पहिलं चिकाचं दूध. जिराफाच्या बछड्यांना आहार देण्यासाठी गाईचं चिकाचं दूध आणि साधं दूध हे प्राधान्य पर्याय आहेत. आम्हा सर्वांचं दैव बलवत्तर होतं. त्या रात्री जवळच्या गावातील गायीनं वासराला जन्म दिला होता. त्यामुळे आम्ही गायीचं ताजं चिकाचं दूध मिळवू शकलो. डॉ. हरीश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मी आहारासाठी आवश्यक चिकाचं दूध तयार करण्याची योग्य पद्धत टीमला दाखवून दिली. यामध्ये दूध अगदी योग्य प्रमाणात गरम करणं, जेणेकरून त्याचं दही तयार होऊ नये आणि ते पारिजातसाठी सुरक्षित आणि सहज पचण्याजोगं असावं हेदेखील महत्त्वाचं होतं. आमच्या परिश्रमांना यश आलं आणि पारिजातनं बाटलीतून उत्सुकतेने दूध घेत सकारात्मक प्रतिसाद दिला. यामुळे आम्हा सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला, पण खरी परीक्षा पुढे होती. त्यानंतर तिच्या अतिदक्षता प्रवासाची सुरुवात झाली…

एक गोष्ट आमच्या प्रयत्नांसाठी पूरक होती, ती म्हणजे पारिजातची शारीरिक स्थिती चांगली होती. प्राथमिक आरोग्य मूल्यांकनात आम्हाला दिसून आलं की, तिचं वजन ५७ किलोग्रॅम होतं आणि उंची ५ फूट ६ इंच होती. तिला मातेची उणीव भासू न देणं आणि मातेच्या हाती मूल जसं सुरक्षित असतं तेवढी सुरक्षा तिला देणं हे एक आव्हानच होतं. त्यामुळेच तिची काळजी घेण्यासाठी एक अत्यंत दक्ष, सुयोग्य अशी योजना त्वरित अमलात आणली गेली. दूध पाजण्यासाठी घेतलेल्या बाटल्या निर्जंतुक केल्या गेल्या आणि गायीचं ताजं चिकाचं दूध तयार करून पारिजातला दिलं जात होतं, दर तीन तासांनी तिला दूध देण्याचं ठरवलं. संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण स्वच्छता राखली गेली आणि तिच्या दुधात प्रोबायोटिक्स, कॅल्शियम आणि मल्टिव्हिटामिन यांसारखे आवश्यक पूरक आहार जोडण्यात आले.

जिराफाच्या बछड्याचं असं माणसांनी संगोपन करणं अतिशय अवघड काम आहे आणि पारिजातही त्याला अपवाद नव्हती. जिराफ हे गुंतागुंतीची शरीररचना असलेले, आकाराने मोठे प्राणी आहेत. त्यांची बछडी स्वभावाने हट्टी असू शकतात, कधी कधी बाटलीतून पिण्यास नकार देतात, मग त्यांना सक्तीने आहार देण्याची आवश्यकता भासते. परिजातच्या बाबतीत सुरुवात तर मनासारखी झाली होती. पण दुसऱ्याच दिवशी एक अडचण आली. पारिजातनं बाटलीतून दूध पिण्यास चक्क नकार दिला. आम्हाला धस्स झालं, रात्रभर प्रयत्न करूनही ती काही गायीचं चिकाचं दूध पिईना. लगेचच संपूर्ण टीमची तातडीची बैठक बोलावण्यात आली. या अडचणींवर काही तरी तोडगा काढणं गरजेचं होते, किंबहुना पर्यायच नव्हता. गायीचं पहिलं चिकाचं दूध पोटात जाऊन २४ तास उलटून गेले होते आणि पचनाची क्रिया सुरू झाली होती. पोटात गेलेलं दूध हे काही तिच्या आईचं दूध नव्हतं, त्यामुळे पारिजातला अपचन होऊ शकेल अशीही भीती आम्हाला भेडसावत होती. मग ३० टक्के गायीचं साधं दूध, ७० टक्के चिकाचं दूध, ग्राइप वॉटर, प्रोबायोटिक्स, तिच्या डॉक्टरांनी सुचवलेलं औषध असं सारं एकत्र करून पचनाला हलकं मिश्रण तयार करण्यात आलं. पारिजात सकाळी कसंबसं २५० मिलिलिटर दूध प्यायली. नंतर दर तीन तासांनी तिनं हे दूध घेतलं. पण झालं काय, की तिसऱ्या दिवशी तिची विष्ठा ही प्रमाणाबाहेर पातळ होती. लगेचच त्याची तपासणी करण्यात आली. सुदैवाने त्यात काही जंतू आढळले नाहीत. संध्याकाळपर्यंत हळूहळू पारिजात जरा सक्रिय झाली, पळू लागली आणि आमचा जीव भांड्यात पडला. असं म्हणतात की, बाईची, प्राण्यातल्या मादीचीही जीवनेच्छा प्रबळ आणि चिवट असते. बहुदा ते पारिजातच्या बाबतीतही खरं असावं. कारण तिनंही ते सिद्ध केलं की, ती येणाऱ्या परिस्थितीशी सहज जुळवून घेऊ शकते, त्यामुळेच लवकरच तिचं-आमचं नातं छान जुळलं आणि संगोपनाची ही प्रक्रिया बऱ्यापैकी सुरळीत झाली.

आता तिच्या आहाराचा दुसरा अध्याय सुरू व्हायला हवा होता, तो झाला. सहाव्या दिवसापर्यंत, पारिजातचा आहार हा चिकाच्या दूधापासून पूर्णपणे गायीच्या ताज्या दुधात बदलला होता. तिसऱ्या आठवड्यात तर तिची पाण्याशी ओळख झाली आणि चौथ्या आठवड्यात तिनं थोडी पाने आणि फांद्या कुरतडायला सुरुवात केली होती. तिच्या पहिल्या महिन्याच्या अखेरीस वाढीमध्ये लक्षणीय प्रगती दिसून आली. ती दररोज ८ लिटर दूध घेत होती. आता तिचं वजन ८२ किलोग्रॅम झालं नि उंची सुमारे ६.७ फूट झाली होती. आसाममध्ये हिवाळा असल्याने तिला उबदार वाटावं यासाठी, तबेल्यातील तिच्या जागेजवळ अतिरिक्त उष्णतेची व्यवस्था करण्यात आली होती.

दरम्यान, तिची उत्सुकता वाढू लागली आणि ती आवडीने पानं आणि फांद्या खाऊ लागली आणि फळं आणि भाज्यांची चव घेऊ लागली. तिसऱ्या महिन्यापर्यंत ती मिश्रित अन्नधान्यांसह घन आहार घेत होती आणि तिचं दुधाचं प्रमाण दिवसाला १० लिटरपर्यंत वाढलं होतं. तिच्या प्रतिसादामुळे आमचाही उत्साह दुणावत होता. आम्हाला तिनं स्वीकारलं होतं.

दरम्यान, मायलेकरांमधील दुरावा कमी करण्याचे आमचे प्रयत्न सुरूच होते, पण सगळेच असफल ठरत होते. विजयाची आक्रमकता तसूभरही कमी झाली नव्हती आणि लहानग्या बछड्याला बघूनही तिला पान्हा फुटत नव्हता. आता पारिजातच्या आयुष्यातला आणखी एक अध्याय सुरू होणं गरजेचं होतं. तिला तिच्या बांधवांशी जोडणं तितकंच आवश्यक होतं. त्यासाठी मदतीला आला प्राणिसंग्रहालयातील नर जिराफ विजय. त्यानं आपुलकी आणि कुतूहल दाखवलं. पारिजातला कळपात सामावून घेण्यासाठी आवश्यक असणारा सहवास दिला. तिच्या पहिल्या वाढदिवसापर्यंत, पारिजात १० फूट ४ इंच (३२० सें.मी.) पेक्षा जास्त उंच झालेली आणि ३७० किलोग्रॅम वजनाची, मजबूत आणि निरोगी बछडं झालेली होती. तिनं दुधाचा पूर्णपणे त्याग केला होता आणि तिच्या आवडत्या फळं आणि पानांसह घन आहार घेऊ लागली होती. तिचं हे उल्लेखनीय परिवर्तन, म्हणजे आमच्या संगोपन प्रक्रियेला मिळालेलं यश आणि संपूर्ण टीमच्या योग्य आणि अथक परिश्रमांना आलेलं फळ होतं.

पारिजातचं जगणं हा केवळ व्यक्तिगत विजयापेक्षा जास्त मोठा विजय आहे, कारण जिराफ संवर्धनासाठी तो एक आशेचा किरण आहे. जिराफ, एक प्रजाती म्हणून, IUCN (international union for conservation of nature – आंतरराष्ट्रिय निसर्ग संवर्धन संघटना) द्वारे असुरक्षित म्हणून सूचिबद्ध आहे. आफ्रिकेतील लोकसंख्या वाढणं, अधिवास नष्ट होणं, शिकार करणं या कारणांमुळे तेथील जिराफांची संख्या सतत कमी होते आहे. गेल्या तीन दशकांत त्यांची संख्या जवळपास ३० टक्क्यांनी कमी झाली आहे. म्हणून प्रत्येक जिवंत जिराफ हा या प्रजातीच्या चिकाटीचा व कणखरपणाचा पुरावा आहे. पारिजात हे भारतात यशस्वीरीत्या माणसांनी संगोपन केलेलं दुसरं जिराफ बछडं आहे.

पारिजातच्या या प्रवासाकडे मागे वळून बघताना मनात समाधान, आनंद अशा भावना उचंबळून येतात. तिच्या संगोपनासाठी जे सामुदायिक प्रयत्न झाले त्याबद्दल अभिमान वाटतो. या अनुभवाने सुयोग्य, तपशीलवार तयारीचं महत्त्व अधोरेखित केलं. आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यापासून आणि हाताच्या संगोपनासाठी योग्य उपकरणं मिळवण्यापासून ते कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यापर्यंत. प्रत्येक तपशिलाने महत्त्वाची भूमिका बजावली. तिच्या वजनातील प्रत्येक ग्रॅमची वाढ आणि तिच्या उंचीतील वाढणारा प्रत्येक सेंटिमीटर संपूर्ण टीमच्या अथक प्रयत्नांचं मूर्त प्रतीक आहे.

नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या या बछड्याचं नामकरण डिसेंबर २०२३ मध्ये, आसामच्या मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी केलं. त्यांनी जेव्हा या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली तेव्हा या बछड्याला पारिजात नाव दिलं, जे सौंदर्य आणि आशेचं प्रतीक आहे. पारिजातच्या या प्रवासाने प्राणिसंग्रहालयाच्या प्रयत्नांकडे लोकांचं लक्ष वेधलं आणि वन्यजीव संरक्षणाची व्यापक गरज अधोरेखित केली.

आज, पारिजात तिच्या प्रजातींसाठी राजदूत म्हणून शब्दश: आणि लाक्षणिक दोन्ही प्रकारे उंच उभी आहे. योग्य काळजी आणि वातावरण दिल्यास जिराफ प्रजातीच्या होणाऱ्या भरभराटीची क्षमता पारिजात दर्शवते. ती जसजशी मोठी होत जाईल तसतशी जिराफ प्रजातीच्या ती भावी पिढ्यांसाठी महत्त्वाची ठरेल अशी आशा आहे.

(पारिजातचं संगोपन हा माझ्यासाठी वैयक्तिकरीत्या एक अविस्मरणीय प्रवास होता. जिराफांचं संवर्धन आणि संरक्षण या क्षेत्रातील माझाही अनुभव अधिक समृद्ध झाला. आसाम राज्य प्राणिसंग्रहालयातील पारिजातचं यशस्वी संगोपन ही केवळ तिच्या जगण्याची कथा नाही. तर तो जिराफ आणि जगात त्यांचं स्थान सुनिश्चित करण्यासाठी काम करणाऱ्या लोकांच्या भविष्याबद्दल आशेचा किरण आहे.)

(लेखक जिराफांचं संवर्धन आणि संरक्षण या क्षेत्रात गेल्या १५ वर्षांपासून कार्यरत आहेत.)

tushkul@hotmail.com

अनुवाद – डॉ. अंजली देशपांडे

Story img Loader