राखी चव्हाण

rakhi.chavhan@.expressindia.com

Fossils of massive prehistoric snake found in Gujarat
हिंदू पुराणातील ‘वासुकी’ तो हाच का? गुजरातमध्ये सापडले जगातील सर्वात मोठ्या सापाचे जीवाश्म; का आहे हे संशोधन महत्त्वाचे?
caste politics in uttarakhand
ब्राह्मण ते ठाकूर, दलित ते मुस्लिम; उत्तराखंडमध्ये जातीय समीकरणावरच निकालाचे गणित
anil kakodkar pune, indian nuclear physicist anil kakodkar
भारतातील संशोधन ‘नावापुरते’ असे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर का म्हणाले?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल

महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू असोत, पुरातन वस्तू असोत की वन्य प्राण्यांचे अवशेष, ते जतन करण्यासाठी लीना झिलपे-हाते यांनी ‘हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटी’ सुरू करून संवर्धनाचे मोलाचे काम सुरू केले आहे.

कुटुंबाचा वारसा पुढे नेतो तो वारसदार! माणसाच्या मनावर हा पगडा अजूनही घट्ट बसलेला आहे. हा वारसा तो खरंच पुढे नेतो का हा भाग अलाहिदा, पण गेल्या १५ वर्षांपासून राज्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा जतनाच्या कार्यात ‘दोन हातांनी’ स्वत:ला झोकून दिलंय. शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध पद्धतीनं केल्या जाणाऱ्या या जतन कार्यातून अनेक वास्तू, शिल्प, वस्तूंना त्यामुळे नवसंजीवनी मिळाली आहे. समृद्ध अशा भारतीय संस्कृतीच्या खाणाखुणा जपण्याचे कार्य उपराजधानी नागपूरची लेक करत आहे. वारशाप्रती असणारी तिची ओढ, त्याच्या संवर्धनातील तिचे कौशल्य सातासमुद्रापल्याड जाऊन पोहोचले आहे. ती आहे, लीना झिलपे-हाते.

भारतीय संस्कृती ही जगातील पुरातन संस्कृतींपैकी एक! अतिशय समृद्ध वारसा भारताला मिळाला आहे. जतनाअभावी या समृद्ध वारशाचे अवशेषच आपल्याजवळ शिल्लक राहिले असून ते अभिमानाने मिरवण्याचा करंटेपणा आपण करतो आहोत. पुढच्या पिढीला हे अवशेष देखील बघायला मिळतील का? असा प्रश्न पडला तेव्हा लीनाने संवर्धनाची ही धुरा आपल्या खांद्यावर घेतली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जीर्ण झालेली आणि कीड लागलेली शाल संवर्धनासाठी तिच्या हातात पडली, तेव्हा राष्ट्रपित्याच्या आठवणीही जपता आल्या नाहीत, या भावनेने तिचे डोळे पाणावले. केंद्र सरकारची एकमेव संस्था ‘राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण’ (एनआरएलसी ) लखनौ येथे आहे. या संस्थेपर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठा’तून मास्टर्स इन फाईन आर्ट (एमएफए)ची पदव्युत्तर पदवी तिने घेतली. त्यावेळी पुरातत्त्वशास्त्र वा आर्किओलॉजी हा विषय अभ्यासाला होता. या विषयाने तिला चांगलीच ओढ लावली. त्यातला मोहोंजोदडो हडप्पा संस्कृतीचा उल्लेख लीनाच्या मनाला स्पर्शून गेला. पुरातन संस्कृती कशी असेल, या संस्कृतीत वापरल्या गेलेल्या वस्तू कशा असतील, असे अनेक प्रश्न तिच्या मनात निर्माण झाले. हा गुंता सोडवण्यासाठी त्या विषयाच्या मुळाशी जाणे आवश्यक होते आणि म्हणूनच तिने प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती व पुरातत्त्व शास्त्रात पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केला. एवढय़ावरच न थांबता मूर्तिशास्त्र, मानववंशशास्त्र, वस्तुसंग्रहालयशास्त्र या विषयांचाही अभ्यास केला. या विषयाचा खोलवर अभ्यास केला, इतका की केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारितील राष्ट्रीय सांस्कृतिक संपदा संरक्षण संस्थेची (एनआरएलसी-लखनौ) तिला फेलोशिप मिळाली. येथून सुरू झालेल्या तिच्या प्रवासाने मग कुठे ‘थांबा’च घेतला नाही.

‘एनआरएलसी’ने पहिलीच मोठी जबाबदारी तिच्यावर सोपवली. महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्य़ातील मगन संग्रहालयात महात्मा गांधी यांच्या नियमित वापरातील वस्तू आहेत. त्यांची शाल, काठी, चष्मा, ताम्रपत्र असे बरेच काही. संग्रहालयात त्यांची आठवण जतन करून ठेवणे येथपर्यंत ठीक, पण त्याच्या संवर्धनाच्या अर्थाने सुरक्षिततेचं काय? त्यांची शाल हातात घेतली तर गळून पडेल, अशा अवस्थेत आली होती. एवढी महत्त्वाची जबाबदारी कशी पार पाडायची ही भीती होती. जीर्ण झालेली ही वस्तू तिला पुन्हा ‘जिवंत’ करायची होती.  या एका ध्येयाने तिने कामाला सुरुवात केली. शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध प्रक्रियेतून हा अनमोल ठेवा तिने पूर्वस्थितीत आणला.  गांधीजींची काठी, त्यांचा चष्मा पुढच्या अनेक पिढय़ा पाहू शकतील अशा रीतीने त्यांचं सवर्धन केलं. ही पहिली परीक्षा ती उत्तीर्ण झाली. त्यानंतर साताऱ्याचे ‘श्री छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय’, औंध येथील कलासंग्रहालयातील वस्तू ज्या काही वर्षांत कदाचित कायमच्या नाहीशा झाल्या असत्या, अशा वस्तूंचे रुपडे बदलण्यात ती यशस्वी ठरली. ज्या शहरात ती वाढली, त्याच शहराने तिची परीक्षा घेण्याचे ठरवले. उपराजधानी नागपुरात ब्रिटिशकालीन मध्यवर्ती संग्रहालय (ज्याची ओळख ‘अजब बंगला’ या नावाने आहे) आहे. मध्य भारतातील या एकमेव ब्रिटिशकालीन संग्रहालयात तत्कालीन ब्रिटिश राज्यकर्त्यांनी मोठमोठी दगडी शिल्पे आणि बरेच काही आणले. इंग्रज गेले आणि या संग्रहालयाची वाताहत सुरू झाली. गर्भवती स्त्रियांची नऊ महिन्यांची अवस्था या ठिकाणी शिल्पातून मांडली होती आणि ते पाहण्यासाठी दूरदुरून लोक येत. तेही जतनाअभावी नाहीसे झाले.

मध्य भारतातील संग्रहालयात वस्तू जतनासाठी असणारी प्रयोगशाळा बंद पडली होती. कित्येक वस्तू जतन, संवर्धनाअभावी नाहीशा झाल्या होत्या. अशा अवस्थेत लीनाने या संग्रहालयातील वारसा संवर्धनाची जबाबदारी हातात घेतली. प्रयोगशाळा नाही, वस्तूंचे जतनकार्य करावे अशी जागा नाही. त्या स्थितीत लीनाने काम सुरू केले. संग्रहालयाच्या वरच्या मजल्यावर एक अडगळीची खोली होती. त्या खोलीला स्वच्छ करून तिने प्रयोगशाळा उभारली. संवर्धन प्रक्रिया करताना त्याला विशिष्ट तापमानाची गरज असते, नाही तर प्रक्रियेसाठी लागणारी रासायनिक द्रव्ये आणि इतर साहित्य खराब होऊन संवर्धन कार्यात अडथळे येतात. श्वासही घ्यायला कठीण होईल, अशा या खोलीत तिने संवर्धनासाठी लागणारी वातावरणनिर्मिती केली. या अडगळीच्या खोलीतला तिचा प्रवास अनेक वर्षे सुरू होता. खोली अडगळीची असल्याने प्रकाश नाही, वारा नाही. उन्हाळ्यात कुलर लावावा तर त्याचा संवर्धन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता होती. अशावेळी घामाच्या धारा अंगावर झेलत तिच्या कार्याची घोडदौड तिने सुरूच ठेवली.

यादरम्यान, तिच्या संवर्धन कार्यात अनेक अडथळे आणण्याचा प्रयत्न झाला, पण तिने पाऊल मागे घेतले नाही. या संग्रहालयात इतिहासाची गाथा सांगणाऱ्या मोडी लिपित असलेल्या पोथ्या होत्या. वाळवीमुळे त्यांची पाने गळून पडलेली. हातातही घेता येणार नाही इतकी जीर्ण झाली होती, त्या पोथ्यांना तिने नवसंजीवनी दिली. अजिंठा आणि वेरुळच्या लेण्या पाहायला जगभरातील पर्यटक भारतात येतात. या लेण्यांच्या दुर्मीळ चित्रकृती मोजक्याच प्रमाणात शिल्लक आहेत. आजवर जिथेजिथे या चित्रकृती ठेवल्या, त्या त्या ठिकाणी त्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या असा इतिहास आहे. महाराष्ट्रातील अजिंठा तसेच मध्य प्रदेशातील बाघ लेण्यांमधील नऊ दुर्मीळ चित्रकृती नागपूरच्या मध्यवर्ती संग्रहालयात आहेत. ऊन, पाऊस, वाऱ्याचा परिणाम झाल्याने त्यांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. जवळजवळ ७५ टक्के त्या मृतवत झाल्या होत्या. एनआरएलसीच्या माध्यमातून लीना आणि तिच्या चमूने हे काम हाती घेतले तेव्हा या चित्रकृती जिवंत करणे कठीण होते. मात्र, एनआरएलसीचे संचालक डॉ. बी.व्ही. खरबडे यांचा लीनावर पूर्ण विश्वास होता. ‘तू हे नक्कीच करशील.’ असे म्हणून ही जबाबदारी तिच्या हातात सोपवून ते लखनौला निघून गेले. संचालकांनी दाखवलेला हा विश्वास तिने सार्थ ठरवला. मृतवत झालेल्या कलाकृती तिने जिवंत केल्या आणि आज त्या संग्रहालयात आहेत. ब्रिटिशांनी संग्रहालयात मोठमोठी शिल्पे आणली होती. ही शिल्पे संग्रहालय प्रशासनाने संग्रहालयाच्या आवारात ठेवली होती. ऊन, वारा, पाऊस झेलत वर्षांनुवर्षे ती तशीच पडून राहिल्याने त्यांचा रंग बदलला. काही शिल्पांवर अतिशय प्राचीन लिपी होती, पण वाचता येईल अशी तिची अवस्था नव्हती. त्या मूळ स्थितीत आणण्यासाठी त्यावर एका विशिष्ट पद्धतीच्या कागदाचा वापर करून त्या घासून काढाव्या लागल्या आणि नंतर त्यावर रासायनिक प्रक्रिया करावी लागली. माणूस एक दिवस, दोन दिवस जास्तीत जास्त आठवडाभर हे काम करू शकेल, पण लीनाने महिनोन् महिने या शिल्पांना घासून त्यांना मूळ स्थितीत आणले. दुर्मीळ वस्तूंच्या जतनाचे, त्यावर शास्त्रोक्त व तंत्रशुद्ध प्रक्रिया करून संवर्धन करण्याचे काम अतिशय जिकिरीचे आहे. त्यात थोडेही कमीजास्त झाले तर त्याचा दुष्परिणाम होतो. मात्र, लीनाच्या हातून आजवर कधी असे झाले नाही. उलट दिवसेंदिवस तिच्या कामातील अचूकतेने अनेकांचे लक्ष वेधले.

मोठय़ा पातळीवर घेतली जाणारी कामाची दखल आणि सन्मानापेक्षाही सर्वसामान्यांनी  दिलेली कौतुकाची थाप खूप समाधान देऊन जाते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वस्तू जेव्हा तिने मूळ रूपात  आणल्या, तेव्हा आंबेडकरांच्या अनुयायींनी तिला दिलेली कौतुकाची थाप आजही तिला ऊर्मी देते. उपराजधानीजवळच चिचोली येथील संग्रहालयात डॉ. बाबासाहेबांनी आयुष्यभरात वापरलेल्या सुमारे ४०० वस्तू आहेत. ‘नागपूर सुधार प्रन्यास’ने हा वारसा लीनाच्या हाती सोपवला. डॉ. आंबेडकरांचा सदरा, त्यांचा कोट, पेटी, टाईपरायटर अशा बऱ्याच गोष्टी. संवर्धनानंतर पालटलेल्या रूपांच्या छायाचित्राचे छोटेसे प्रदर्शन तिने भरवले. आपल्या बाबासाहेबांना उपराजधानीची लेक वस्तुरूपातही जिवंत ठेवत आहे, हे पाहून अनेकांनी कौतुक केले.

येथूनच येनकेनप्रकारेण तिच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न होऊ लागला. राजकारण कुठे आणि कसं आड येईल हे सांगता येत नाही. वरिष्ठ आणि शासकीय पातळीवरच्या राजकारणाला कंटाळून तिने हे काम अर्धवट सोडले. परंतु त्यामुळे तिचे काम थांबलेले नाही उलट देशभरात अनेक ठिकाणी तिला संवर्धन कार्यासाठी बोलावले जाते. अगदी राष्ट्रपती भवन त्यातून सुटलेले नाही. राष्ट्रपती भवनात अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत आणि त्यांच्या संवर्धन कार्याची जबाबदारी लीनाने पार पडली आहे. सरकारी काम आणि त्यात येणारे अडथळे यातून मुक्त होत स्वतंत्रपणे काम करण्याचा निर्णय तिने घेतला. ‘हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटी’ तिने स्थापन केली आणि पहिले काम तिला वनखात्याने दिले. यापूर्वीही तिने वनखात्यातील पेंढा भरलेल्या वन्यप्राण्यांचे जतन व संवर्धनाचे कार्य केले होते. त्यातूनच सोसायटी स्थापन केल्यानंतर तिला वनखात्याने त्यांच्याकडे असणाऱ्या रानगव्याचे शीर संवर्धनासाठी दिले. अतिशय खराब अवस्थेत असलेली ही ‘ट्राफी’ तिने मूळ रूपात परत आणली. त्याचा परिणाम म्हणजे वनखातेही जागे झाले आणि आता राज्यातील वनखात्याच्या सर्व विभागात धूळ खात पडलेल्या वन्यप्राण्यांच्या ‘ट्राफी’च्या संवर्धनाचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

कामानिमित्त ती भारतातच नव्हे तर भारताच्या बाहेरही फिरते. सिंगापूरच्या संग्रहालयात फिरत असताना तिने संग्रहालयाच्या संचालकांशी संवाद साधला. तिचं योगदान लक्षात घेऊन त्यांनी तिच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्याचे ठरवले आणि तिनेही सहजगत्या होकार देत त्यांना संवर्धनाचे धडे दिले.

एखादी वस्तू, हस्तलिखित किंवा दस्तावेज वस्तुसंग्रहालयात किंवा कलासंग्रहालयापर्यंत पोहोचले की त्याच्या जतनाची जबाबदारी तिथेच संपते आणि ती आपोआप जतन होते, असाच सर्वसाधारण समज आहे. मात्र, कलाकृती तिच्या निर्मितीच्या क्षणापासूनच वेगवेगळ्या प्रकारच्या परिणामांना सामोरी जात असते. जीर्ण झालेली वस्त्रे शेकडोवेळा धुतलेली असतात. देखण्या कोरीव दगडी शिल्पांचे क्षाराच्या अस्तित्वामुळे अपघटन होते. कलात्मक लाकडी शिल्पांना वातावरणातील आर्द्रतेमुळे भेगा पडतात. हा ऐतिहासिक, कलात्मक, सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी लीनासारख्या तरुणी जेव्हा काम म्हणून नाही तर जबाबदारी म्हणून ते करतात, तेव्हा त्यांना नवसंजीवनी मिळते.