डॉ. आनंद नाडकर्णी

रचा, सहकाऱ्यांबरोबरचा, सहचारिणीबरोबरचा असो किंवा फक्त स्वत:बरोबरचा. फोटोंपेक्षा रेखाटनं काढत रेंगाळणं, कूर्मगतीनं का होईना, पण शक्य तिथे पायीच फिरणं, रस्ते शोधत आपलं आपण भटकणं, यात प्रवासाची खरी मजा आहे. शहरं, माणसं वाचण्याची, प्रत्येक वेळी नवं काही अनुभवण्याची संधीच!..’

hormonal imbalance in marathi
Health Special: संप्रेरकांचे असंतुलन (हार्मोनल इम्बॅलन्स) म्हणजे काय? त्यावर उपाय काय?
how to make kaju curry at home
Recipe : घरच्याघरी बनवा ढाबा स्टाईल ‘काजू करी’! जाणून घ्या अचूक प्रमाण अन् कृती….
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Loksatta explained Many birds are on the verge of extinction but why is this happening
कित्येक पक्षी नामशेषत्वाच्या मार्गावर… पण असे का घडत आहे?

माझ्या लहानपणी सर्वसाधारण मराठी घरांमध्ये प्रवास घडायचा तो सुट्टय़ांमुळे अथवा धार्मिक, कौटुंबिक कारणांमुळेच. आमचं कुटुंबही याला अपवाद नव्हतं. आम्ही राहायचो खानदेशमध्ये जळगावला. मुंबईहून येणाऱ्या पाहुण्यांना स्थळदर्शनासाठी घेऊन जाण्याची यादी तयार असायची. मेहरुणच्या तलावापासून ते अजिंठय़ाच्या लेण्यापर्यंत. माझे वडील महाविद्यालयामध्ये केमिस्ट्री शिकवायचे. प्रॅक्टिकल परीक्षा घेण्यासाठी एप्रिल-मे महिन्यांत त्यांना दोन-तीन आठवडे महाराष्ट्रात वेगवेगळय़ा ठिकाणी जायला लागे. आई आणि मी त्यांच्याबरोबर कधी कधी जायचो. पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, रत्नागिरी या शहरांशी माझी ओळख झाली ती अशी. त्या शहरात गेलो की प्रसिद्ध ठिकाणं पाहून व्हायची. कोल्हापूरबद्दल आईबाबांना खास ममत्व होतं. त्या दोघांचं कॉलेजचं शिक्षण झालं, प्रेम जमलं, लग्न झालं ते तिथेच. रंकाळा तलाव, खासबाग, महाद्वार अशा अनेक ठिकाणांशी त्यांच्या आठवणी जोडलेल्या होत्या. राजाराम कॉलेजच्या जुन्या परिसरात त्यांच्याबरोबर फिरायला मला मस्त वाटायचं. तर इतक्या प्राथमिक अवस्थेतले प्रवास करणारा मी मोठय़ा प्रवासाला निघालो ते थेट अमेरिकेच्या. अकरावीनंतर असायचं ‘एफ.वाय.’चं वर्ष. ते झाल्यावर आलेल्या सुट्टीत, ‘इंटर सायन्स’च्या वर्षांच्या आधी चक्क अडीच महिने मी अमेरिका-कॅनडामध्ये घालवले. पहिल्यांदाच विमानात बसलो ते एअर इंडियाच्या जम्बोजेट ‘सम्राट विक्रमादित्य’मध्ये. मुंबई ते न्यूयॉर्क. माझ्या भावानं अमेरिकेत ‘डॉक्टरेट’पर्यंतचं शिक्षण पूर्ण करून ‘डय़ू-पॉन्ट’ या प्रसिद्ध कंपनीच्या संशोधन केंद्रात नोकरीला सुरुवात केली होती. आई-वडील आणि मी, असं सारं कुटुंबच त्यानं अमेरिकावारीसाठी आणलं आणि माझ्या पर्यटनाचा दणदणीत शुभारंभ झाला! वर्ष होतं १९७५. त्या काळातली अमेरिका आधुनिक तर होतीच, पण आजच्यापेक्षा बरीच शांत-निवांत होती. माझा भाऊ दर आठवडय़ाला सोमवारपासून शुक्रवापर्यंत नोकरी करायचा. दर शुक्रवारी सायंकाळी आम्ही त्याच्या वोक्सवॅगन ‘रॅबिट’ गाडीमधून निघायचो. शनिवार-रविवारला जोडून तो सुट्टी काढायचा. अशा प्रकारे आम्ही संपूर्ण ईस्ट कोस्ट आणि कॅनडामधले टोरॅन्टो, मॉन्ट्रियल, क्वेबेक असे इलाखे पाहिले.

मी आणि माझा भाऊ- विकासदादा या ट्रिप्स प्लॅन करायचो. ‘ट्रिपल ए’ म्हणजे ‘अमेरिकन ऑटोमोबाइल असोसिएशन’ची नकाशे-वही बरोबर असायची. छापलेला गूगल मॅप म्हणा त्याला! अमेरिकी जनजीवनाची झलक आम्हाला दाखवायचा दादाचा एक मित्र सुभाषदादा (वैद्य). तिथे शाळा कशा चालतात, डाऊनटाऊनमध्ये कृष्णवर्णीय वस्त्या कशा असतात, केशकर्तनालयांची खासियत काय असते, असे बारकावे तो सांगायचा. अशा प्रकारे वीकेंड्सना ‘मॅक्रो’- म्हणजे भरीव पर्यटन आणि इतर दिवशी ‘मायक्रो’ पर्यटन असा आमचा शिरस्ता होता. क्वेबेकपासून मायामीपर्यंतचा प्रवास तर घडलाच; पण वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, बोस्टन, फिलाडेल्फिया ही शहरं अनुभवता आली. व्हर्जिनिया हे राज्य तसं जवळचं होतं, आम्ही राहात असलेल्या डेलवर राज्यापासून. तिथेही खूप भटकलो. एखाद्या शहराला भोज्यासारखं शिवायचं नाही. तिकडचे लोक, संस्कृती, वातावरण, खाणं-पिणं, या गोष्टी चौकसपणे शोधण्यात गंमत आहे हे मला कळू लागलं. त्याचबरोबर सतत स्वत: अभ्यास करून ट्रिप्स आखल्या, तर त्यांना ‘पर्सनल टच’ असतो, ही जाणीव जागी झाली; परंतु अशी खर्चीक हौस पुरवण्यासारखी परिस्थिती पुढची अनेक वर्ष, वेगवेगळय़ा कारणांमुळे निर्माण झाली नाही. गेली पंचवीस वर्ष मात्र नित्यनेमानं, प्रवासाची व्याप्ती आणि सातत्यदेखील वाढत गेलं. त्यात मोठा वाटा माझ्या पत्नीचा म्हणजे सविताचा. माझ्या डोक्यात कल्पना येतात प्रवासाच्या. मी त्याप्रमाणे तपशीलवार आखणी करतो, संशोधन करतो; पण कार्यवाही हा तिचा प्रांत! गेल्या काही वर्षांत ही बाजू सांभाळून घेणाऱ्या मित्रांचा संचही तयार झाला आहे, कारण आमच्या ट्रिप्समधला पहिला प्रकार आहे भरपूर मित्रमंडळींबरोबर प्रवास करण्याचा. उत्तरांचल, बांधवगड असू दे, की श्रीलंका, भूतान, मालदीव्हज्, इटली, ऑस्ट्रिया.. आम्ही ग्रुप तयार करतो. त्यामध्ये खूप मजा असते. खऱ्या अर्थानं मैत्री फुलते, नाती जुळतात. आमच्या प्रवास सर्किटवरच्या मित्रांची एक यादीच आता तयार झाली आहे.

दुसरा प्रकार आहे फक्त चार जणांनी करायच्या ट्रिपचा. आम्ही दोघं आणि आमचं अमेरिकेतलं मित्र जोडपं- मधुरा-मुकुंद मिळून आम्ही ही सवय विकसित करतो आहोत. स्पेनमध्ये आम्ही बारा-तेरा दिवस ‘बाय-रोड’ फिरलो. ठिकठिकाणच्या घरांमध्ये राहिलो, हॉटेलमध्ये नाही. फिरायचं ते रस्त्यांवरून हा आमचा मंत्र! टर्की असो की स्वित्र्झलड.. हा आग्रह कायम असतो.

तिसरा प्रकार आहे फक्त आमच्या दोघांच्या फिरण्याचा. पूर्वी यात मुलं असायची. नुकतीच आम्ही केरळमधल्या वायनाड भागाची एक छान सफर केली. कोचीची ऐतिहासिक परंपरा समजून घेण्यासाठी फक्त त्या शहराची ट्रिप आखली. अशा गमती आम्ही करत असतो. गेली दहा-बारा वर्ष मला प्रवासामध्ये रेखाचित्रं काढायची सवय लागली आहे. फक्त स्केचेस काढण्याचं निमित्त घेऊन मी आणि सवितानं कोलकाता शहराची पाच दिवसांची ट्रिप आखली.
फोटो काढण्यापेक्षा मला चित्र काढायला आवडतं. आपण वातावरणाशी जोडले जातो पटकन. गुरुवाय्युरच्या देवळाच्या परिसरात होतो. ‘फक्त हिंदूंनाच प्रवेश’ ही पाटी वाचून मी आत दर्शनाला जाण्याचा बेत रहित केला. अद्वैत वेदान्ताचा अभ्यास मला माझ्या धर्माची विशालता शिकवणारा आहे. सविता दर्शनाला गेली आणि मी मंदिराचं चित्र काढायला लागलो. अशा वेळी माणसं जमतात, निरीक्षण करतात. चित्र काढताना मी मधूनच त्यांच्याशी बोलतो, मधूनच माझी तंद्री लागते. या मंदिराचं चित्र पूर्ण केलं, तसे तिथले एक ज्येष्ठ पत्रकार मला म्हणाले, ‘‘यू गॉट द बेस्ट दर्शन ऑफ देम् ऑल!’’ त्यांची ओळखसुद्धा चित्र काढताना झाली.

कोचीच्या ऐतिहासिक सिनेगॉगमध्ये कॅमेरा वापरायला मनाई आहे. मला मात्र चित्र काढायला परवानगी मिळाली. तासाभराची उपासनाच झाली. या प्रार्थनास्थळामधल्या जुन्या नक्षीदार फरशा नजरबंदी करणाऱ्या आहेत आणि लटकणारी तऱ्हेतऱ्हेची झुंबरं.. चित्र पूर्ण झालं तेव्हा मला ते संपूर्ण ‘ज्यू-टाऊन’ अंतरंगामध्ये रुजल्याचा अनुभव आला. प्रवासाचा चौथा प्रकार आहे ‘सोलो ट्रिप’! मी एकटाच प्रवास आखतो. दिवसभर चित्रं काढायची, फिरायचं, लोकांशी बोलायचं. संध्याकाळी वाचन, संगीत ऐकणं, चित्रांवर हात फिरवणं. अशा वेळी मी आणि परिसर एकात्म होतात. हंपीच्या अवशेषांमधून मला विजयनगरचा इतिहास दिसायला लागतो. विद्यारण्य आणि हरीहर-बुक्कु जाणवायला लागतात. माझ्या दोन्ही पायांमध्ये लहानपणापासूनच्या पोलियोचा दोष राहून गेल्यामुळे माझ्या चालण्यावर काही बंधनं येतात. वयाप्रमाणे ती काहीशी वाढली आहेत; पण तरीही मी माझ्या गतीनं पायी प्रवासाचा आनंद घेतो. श्रीलंकेमध्ये सिगीरिया हा भला मोठा पहाड आहे. आमचा मोठा ग्रुप होता. मी सर्वाना सांगितलं की, ‘मी प्रयत्न करणार आहे चढायचा. माझ्यासाठी तुम्ही थांबू नका.’ अशा वेळी सविता माझ्याबरोबर राहतेच. चार-पाच तासांनी तो प्रवास पूर्ण करून आम्ही बसमध्ये चढलो, तेव्हा इतर सर्वानी टाळय़ा वाजवून पावती दिली! वायनाडमधल्या एडक्कल गुहा मी अलीकडेच चढलो, उतरलो. माझ्या कूर्मगतीमुळे मी वातावरणाच्या जास्त जवळ जातो असा माझा अनुभव आहे! रोम शहरामध्ये व्हॅटिकनचा विशाल परिसर पालथा घालताना हाच अनुभव आला होता.

प्रवास केल्यानंतर काही ठिकाणं खूपच डोक्यात उतरतात. त्यांच्यावर लिहिलं जातं. जैसलमेरजवळचा खुलदरा, टर्कीमधला कॅपेडोचिया या अशा काही जागा. अलीकडे बांधवगडच्या प्रवासातून ‘जंगलजाण’ या नावानं सात-आठ कविताच बाहेर पडल्या. हा सारा त्या त्या अनुभवांमधला बोनस असतो. सगळेच प्रवास काही विनाअडचण होत नाहीत. कधी विमान चुकतं, कधी बॅगा हरवतात, कधी पैसे लंपास होतात.. या साऱ्या अडचणींना तोंड देताना प्रवास आपल्याला काहीना काही शिकवत असतो. गाढवपणा करायचा आणि मग तो निस्तरायचा असे दोन्ही धडे शिकण्यासाठी प्रवासासारखा शिक्षक नाही!

जबरदस्त प्लॅनिंग केल्यावरही आकस्मिकाला जागा ठेवायची असते, हेसुद्धा प्रवास शिकवतो आणि अनेकदा ते आकस्मिक विलक्षण स्मित करणारंसुद्धा असू शकतं! फत्तेपुर सिक्रीच्या विशाल परिसरामध्ये संध्याकाळी तानसेनच्या हवेलीच्या छतावरून ‘ईद का चाँद’ दिसतो.. कन्याकुमारीच्या तटावरच्या एकाच खडकावरून चंद्रोदय आणि सूर्यास्त सामोरा येतो.. अंदमानमध्ये पोर्ट ब्लेयरजवळच्या सुभाष बेटावरच्या गाईड अनुराधादेवी आणि हरणं, यांच्यामधली दोस्ती अचानक अनुभवायला मिळते.. अनोळखी माणसांकडून मिळणारी माणुसकीची साथसुद्धा जेव्हा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या सामान्य माणसांकडून मिळते तेव्हा गहिवरून येतं.

एकदा नर्मदेच्या तीरावरच्या अहिल्याबाईंच्या माहेश्वर नगरीत होता आमचा ग्रुप. एका कुटुंबानं चालवलेल्या माहेश्वरी साडय़ांच्या दुकानातून महिला वर्गाची खरेदी सुरू होती. दुसऱ्या दिवशी होती होळी. ‘‘उद्या इथे पुरणपोळी कुठून मिळणार!’’ आमच्यातलं कुणी तरी म्हणालं. दुकानदार वडील आणि मुलगा म्हणाले, ‘‘आमच्याकडे या!’’ आम्ही जवळपास सोळा-अठरा जण होतो; पण त्यांनी आग्रहच धरला. साग्रसंगीत जेवण झालं, तूप-दुधाचा वर्षांव झाला! पैसे घ्यायला ठाम नकार दिला त्यांनी. त्या मुलाचं लग्न ठरलं होतं. त्याचा आम्ही आहेर केला एका पाकिटात पैसे घालून. आमच्यातल्या काही जणांबरोबर तेव्हापासून त्यांची मैत्री टिकून आहे.

आमचा काश्मीरचा ड्रायव्हर संजय. त्याची आज पठाणकोटला ट्रॅव्हल एजन्सी आहे. आम्ही संपर्कात असतो. आमचा बालीचा गाईड वनाता. आमच्या टूरच्या शेवटी त्यानं पैसे घ्यायला नकार दिला होता. माझ्या पाया पडून म्हणाला होता, ‘‘हिंदू धर्माबद्दल माझं ज्ञान किती वाढवलं तुम्ही!’’ त्याच्या मुलांना बक्षीस दिलं आम्ही आणि परत आल्यावर चक्रवर्ती राजगोपालाचारींचं इंग्रजी महाभारत आणि रामायण पाठवलं त्याला.. किती अनुभवांनी तुडुंब भरून वाहते आहे ही पोतडी!

लोक मला विचारतात, की कामातून वेळ काढून तुम्ही विश्रांती घेता की नाही? त्यांना ठाऊक नसतं, की दर चार-सहा महिन्याला आम्ही प्रवासाला निघत असतो. आमच्यासाठी प्रवास म्हणजे ‘रिलॅक्सेशन’ आणि काम म्हणजे तणाव असं सरधोपट समीकरण उरलेलंच नाही. जगण्याच्या क्षणांबरोबरचा ठहराव पर्यटनात जरा जास्त असतो हे खरं आहे; पण तिथेही कामासाठीच्या खूप कल्पना सुचतात. कधी कधी तर सहकारी बरोबर असतील प्रवासात तर संपूर्ण योजनाच तयार होतात आणि कामाच्या रगाडय़ात असतानासुद्धा ट्रिपसाठीच्या नियोजनाची हिरवळ दिवसाला ताजी बनवत जाते.

माझ्या परिघाबाहेरचं जग दाखवतो मला माझा प्रवास! त्यातून माझे जगाबद्दलचे पूर्वग्रह खिळखिळे होतात. सगळीकडे आपल्यासारखी भलं-बुरं वागणारी माणसंच राहतात हे कळतं. निसर्गाची रूपं अनेक, पण पर्यावरणाचा गाभा एक, हे अनुभवायला येतं. ध्वनी, रुची, दृश्य या साऱ्यांच्या छटा सामोऱ्या येतात. माझ्यातला हट्ट कमी होतो. जिथे जावं तिथलं होऊन जावं, निदान काही क्षणांपुरतं.. हा संदेश मला प्रवास देतो. त्यामुळे मी वेगवेगळय़ा ठिकाणचं जेवण जेवतो, रीतिरिवाज समजून घेतो.. त्या साऱ्यांवर शिक्के नाही मारत सुटत. माणसामाणसांची वैश्विक वीण अनुभवायला मिळणं हा केवढा मोठा फायदा.. आणि त्यामुळे होणारी खुराडय़ातल्या, संकुचित ‘मी’ची सुटका.. क्या बात हैं!

ही लज्जत पुन:पुन्हा अनुभवण्यासाठी रेषामैत्रीतून आलेली चित्रं, फोटो, आठवणींची उजळणी, सहवासाची रेंगाळणारी चव.. पेरणी पुढच्या प्रवासाची!