मोनिका गजेंद्रगडकर

‘‘चित्रकारांची पेंटिंग्ज असणारी आर्ट म्युझियम्स पाहणं आणि विविध चित्रशैली न्याहाळत चित्रकारांच्या भावविश्वाचा आपल्या क्षमतेनुसार शोध घेत राहणं हे माझं पर्यटन! चित्रांमागची दृष्टी, कलाविचार जाणून घेत कला आणि कलावंत यांचा अनुबंध अजमावण्यात निर्मितीशील आनंद असतो. तशीच कसली तरी अस्वस्थतेची हुरहुरही असते! अत्युत्कट निर्मितीमागे कलाकाराच्या मनातली न दिसणारी वादळं असतात का? हा प्रश्न वारंवार विचारणारी, विचारप्रवण करणारी..’’

Itishree thinking about What do I really want is very important in relationship
इतिश्री : ‘मला नेमकं हवंय काय?’
Stree Vishwa Virtual trend of trad wife
स्त्री ‘वि’श्व : ट्रॅड वाइफ’चा आभासी ट्रेंड?
Loksatta Chaturang Fearless Concepts of fear by age
 ‘भय’भूती : भय अशाश्वतीचे
readers reaction on chaturang articles
पडसाद: शासनाने शिक्षणाकडे लक्ष द्यावे

माझ्याकडे माझ्या वडिलांचे (प्रसिद्ध लेखक विद्याधर पुंडलिक) अनेक गुणावगुण आले आहेत. त्यातला एक अवगुण म्हणजे प्रवास न आवडणं! प्रवासात भटकेगिरी असली तरी एक शिस्तही असते. लवकर उठून, वेळेत आवरून ते शहर वा देश बघायला बाहेर पडणं, त्यासाठी उन्हातान्हातून करावी लागणारी पायपीट, खाण्याबाबतच्या तडजोडी- या सगळय़ातून होणारी दमणूक माझ्या जात्याच ‘आळशी’ व्यक्तित्वाला झेपणारी नाही, हे मी वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून मान्य करून टाकलं होतं. परंतु या अवगुणावर मात करायला लागली ती माझ्या नवऱ्यामुळे, अभिजितमुळे!

बहुतेक जोडप्यांत (अलिखित नियम असल्याप्रमाणे!) परस्परविरोधी आवडनिवडीत अभिजितला प्रवासाची अत्यंत आवड निघाली. मी नाइलाजानं का होईना, प्रवास करू लागले आणि म्हणता म्हणता अस्सल प्रवासभोक्तीच होऊन गेले!  हळूहळू करत भारत निम्माअधिक पाहिला म्हणेपर्यंत विदेशभेटी सुरू झाल्या. पण तरीही पर्यटनासाठी लोकप्रिय असणाऱ्या देशांपेक्षा ‘ऑफ बिट’ देश पाहणं आवडत गेलं. ज्या देशांना इतिहासाची पार्श्वभूमी आहे, आगळीवेगळी संस्कृती जिथं वेगवेगळय़ा रूपांमध्ये नांदत आली आहे, जिथं कला-कलावंत यांचे आविष्कार जतन करणारी म्युझियम्स आहेत, असे देश, – त्यातली शहरं मला भुरळ पाडत आली आहेत. रशियातलं सेंट पीटसबर्ग असेल, स्पेनमधलं मॅडरीड असेल, मेक्सिको, व्हिएन्ना.. पण तरीही अधिक आकर्षण वाटत गेलं, ते चित्रकारांची पेंटिंग्ज असणारी आर्ट म्युझियम्स पाहण्याचं.

व्हॅन गॉग, क्लॉड मॉने, रेम्ब्रॉ, पिकासो, देगा, पिसारो, लॉत्रेक, मातिस, अशा किती तरी जागतिक महान चित्रकारांच्या वेगवेगळय़ा शैलीतली मूळ चित्रं पाहणं आणि आपल्या कुवतीनुसार त्याचा आस्वाद घेणं.. विशेषत: त्या चित्रांमागची त्यांची दृष्टी, कलाविचार जाणून घेत कला आणि कलावंत यांचा अनुबंध अजमावणं, यात एक निर्मितीशील असा आनंद असतो. तो अनुभवणं- अशा प्रकारचं पर्यटन मला अधिक प्रिय वाटत आलं आहे.

शास्त्रीय गाणं ऐकत गेलं नि ते जरी समजलं नाही तरी ‘कानसेन’ होता येतं, तसं चित्रांतलं सौंदर्य चित्रकलेच्या अंगानं समजलं नाही तरी चित्र पाहात गेलो की ती आपल्या नजरेला खूप काही दाखवू लागतात. हळूहळू चित्रकाराच्या नजरेतूनही ती चित्रं उलगडत आपल्याशी ‘बोलू’ लागतात. म्हणूनच माझं हे कलेसाठी केलं जाणारं पर्यटन मला समृद्ध करणारं वाटतं. चित्रकार आपल्याला त्याच्या चित्रांतून, रेषा-रंगांतून, फटकाऱ्यांतून काय दाखवू पाहतो आहे? त्याच्या चित्रांतून सामाजिक, सांस्कृतिक संदर्भ, त्या देशाचा इतिहास, धार्मिकता, सामाजिक व्यवहार कसे आविष्कृत होतात? पोट्र्रेटसारख्या शैलीतून माणसाकडे पाहण्याची दृष्टी कशा प्रकारे व्यक्त होते? हे अजमावणं, हा सगळा शोध आपल्या क्षमतेनुसार घेत राहणं निखळ निर्मितीशील आनंदाचं असतं.

  ‘मौज’ प्रकाशनगृहामध्ये संपादनाचं काम सुरू केल्यानंतर अनेक चित्रकारांच्या चित्रशैलीचा आस्वाद घेणं सुरू झालं. गेली काही वर्ष ज्येष्ठ चित्रकार प्रभाकर कोलते हे ‘मौज’ दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठासाठी चित्रकार निवडत आले आहेत. त्यांच्याकडून वेगवेगळय़ा चित्रकारांच्या कलादृष्टीबद्दल, जीवनाबद्दल त्यांच्याशी केलेल्या गप्पांमधून जसजसं समजत गेलं, तसतशी ही चित्रं पाहण्याची ओढ बळावत गेली. मग बऱ्याच चित्रकारांचे अल्बम्सही पाहण्यात येत गेले होते. याच काळात कधी तरी ज्येष्ठ लेखिका नि चित्रकार वासंतीबाई मुझुमदार यांनी मला न्यूयॉर्कच्या ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’ची एक छोटी डायरी भेट दिली. क्लॉड मॉने या चित्रकाराच्या हिरव्या निळसर रंगातल्या वॉटर लिलीजचं सुंदर तैलचित्र या डायरीच्या मुखपृष्ठ आणि मलपृष्ठावर पसरलेलं होतं. ते पाहून न्यूयॉर्कच्या ‘म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट’ (मोमा), ‘म्युझियम ऑफ मेट्रोपॉलिटन आर्ट’ (मेट), ‘गूगेनहेम म्युझियम’ या म्युझियम्सना भेट द्यायचीच, हे स्वप्न मी उराशी बाळगून होते. दरम्यान, पॅरिसचं ‘लुव्र’, स्पेनचं ‘एल. प्रादो’, लंडनची ‘नॅशनल आर्ट गॅलरी’, सेंट पीटसबर्गचं ‘हरमिटाज’ अशी आर्ट म्युझियम्स पाहून घेतली आणि डोळे तृप्त करून घेतले.  तिकडच्या बहुतेक म्युझियम्सची गॉथिक शैली सुरुवातीलाच भव्यतेचा अनुभव देते. लांबलचक पायऱ्या चढून उंच प्रवेशद्वाराच्या कमानीखालून आत पावलं टाकली, की ही भव्यता डोळय़ांत मावेनाशी होते. वक्राकार जिने, पायऱ्यांवर अंथरलेले पर्शियन गालिचे, चकाकत्या लोलकांची झुंबरं, स्टेन ग्लासच्या पेंटिंग केलेल्या खिडक्या, कोरीव काम असलेल्या कमानी, गोलाकार उंच खांब, जागोजागी उभे केलेले ग्रीक पुतळे- सगळा माहोल तुम्हाला भारून टाकतोच, पण त्या देशाच्या कलाविषयक जाणिवांच्या समृद्धतेचा प्रत्यय देऊन जातो. प्रत्येक देशाला एक संस्कृती असते. त्या संस्कृतीचं जतन, तो एक वारसा आहे ही जाणीव ठेवून, त्या देशातले कलावंत, साहित्यिक, शिल्पकार, संगीतकार यांच्या कलांचं जतन किती संवेदनशील राहून तुम्ही करू पाहता, याचा थक्क करणारा अनुभव ही म्युझियम्स देत राहतात. त्यांची ती कलेप्रतिची संवेदनशीलता, आस्था पाहून अंतर्मुख व्हायला होतं. ही म्युझियम्स म्हणजे एका अर्थानं त्या त्या देशांचा सांस्कृतिक दस्तावेजच. अभिजात कलांचं चिरंतनत्व या म्युझियम्समधून सिद्ध होतं आणि पिकासोचं वाक्य आठवून जातं- ‘Give me a museum,  I will fill it!’

तर माझ्या या प्रकारच्या पर्यटनातलं न्यूयॉर्क हे अमेरिकेतलं शहर माझ्या आवडीचं. या शहराला ठसठशीत चेहरा आहे. ‘टाइम्स स्क्वेअर’, ‘स्टॅच्यू ऑफ लिबर्ट’, ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ वगैरे पर्यटकांची आवडीची ठिकाणं इथं असली, तरी मला सेंट्रल पार्कजवळचा ‘म्युझियम माइल्स’ हा रस्ता जास्त भुरळ घालतो. ‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट ’(मोमा) वगळता, ‘मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट’ (मेट), ‘गूगेनहेम म्युझियम’, ‘गटे इन्स्टिटय़ूट’, ‘न्यूयॉर्क सिटी म्युझियम’, ‘लॅटिन आर्ट’, ‘ऑस्टो जर्मन आर्ट’, ‘आफ्रिकन आर्ट’, वगैरे अनेक म्युझियम्स या रस्त्यावर आहेत.

एका बाजूला सेंट्रल पार्कचा हिरव्यागार झाडीचा विस्तीर्ण प्रदेश. झाडांच्या महिरपीखालच्या सावल्यांतून जाणारा लांबच लांब फुटपाथ पकडून ‘मेट’च्या दिशेनं चालत राहण्यातही मजा येते. फुटपाथच्या बाजूला अधेमध्ये ज्यूस बार, बर्गर-सँडविच बार असतात. ग्लासातला फळांचा ताजा रस घुटकत पार्कच्या या निवांत फुटपाथवरून चालताना सेंट्रल पार्कमधली चैतन्यपूर्ण गजबज जाणवू लागते. त्यातली भटकंती तर किती प्रकारची! गुलाबी चेरी ब्लॉसम गालांवर फुललेल्या गोऱ्याचिट्ट गोबऱ्या मुलांना बाबागाडीत टाकून भटकणारे आई-बाबा, श्वानप्रेमी तर अगणितच. झाडांच्या उबदार सावलीत पुस्तकं वाचत आपला एकटेपणा असा नि:शब्दतेत साजरा करणारेही अनेक. कुणी भाडय़ानं सायकल घेऊन सायकिलग करतंय, कुणाची घोडागाडीतून रपेट चाललीये, कुणी  तळय़ाकाठी राजहंस निरखतंय, कुणाचं तळय़ावरच्या इंद्रधनुष्यी पुलावर प्रणयाराधन चालू आहे, कुणी चित्रकार इझलवरच्या  कॅनव्हासवर चित्र रेखाटतोय, तर कुणी लेखकराव दाट झाडाच्या छत्रीखाली बसून एकांताची गाणी लिहतोय.. ‘म्युझियम माइल्स’ रस्त्यावरचं सेंट्रल पार्कचं हे मिनिएचर अरण्य मंत्रमुग्ध करून टाकणारं कुणा अज्ञात चित्रकाराचं जिवंत लँडस्केपच वाटतं!  ‘मेट’ म्युझियम जसं जसं जवळ येतं, तशी या परिसरातली गजबजही कलात्मक होऊन जाते. ‘मेट’च्या पायऱ्यांजवळ अनेक स्ट्रीट गायक-वादक दिसू लागतात. सॅक्सोफोन, बँजोचे स्वर कानांवर पडू लागतात. रस्त्यावरचे पोस्टर्स, पेंटिंग्जचे स्टॉल्स वाहू लागतात. ‘मेट म्युझियम’च्या परिसरातल्या कारंज्याच्या कट्टय़ावर आपण अवचितपणे बसतोच रस्त्यावरचे रोमियो पाहत. आपली कला सादर करणारे स्ट्रीट आर्टिस्ट अधिकच लक्ष वेधून घेऊ लागतात. गेल्याच वर्षी तिसऱ्यांदा ‘मेट’ला भेट द्यायला आलो होतो. कारंज्याजवळ टेबल टाकून टाइपरायटर घेऊन बसलेल्या विशीतल्या गोऱ्या तरुणाकडे लक्ष गेलं. टाइपरायटरवर त्याने अडकवलेली पाटी दिसली- ‘पोएम स्टोअर! हा कविता विकतो? स्वत:च्या? गंमत वाटून पुढे सरसावले. त्याच्याभोवती ४-५ जणांचं कोंडाळं. विचारल्यावर म्हणाला, ‘‘तुम्ही मला कोणताही विषय सांगा. मी त्यावर पाच मिनिटांत कविता करून देतो.’’ एका कवितेचे दहा डॉलर! पाहिलं तर लोक त्याला विषय देत होते आणि विषयाच्या यंत्रात घातल्यासारख्या ‘इन्स्टंट’ कविता बाहेर पडत होत्या. त्याच्या प्रतिभेचा (?) हा व्यापार पाहून मीही गंमत करून घेतली. त्याला ‘नियती’ हा विषय दिला. डोळे मिटून तो काही क्षण बसला आणि त्याची कविता टाइपरायरवर टाइप करून माझ्या हाती आली. खाली त्या तरुणाची झोकात सही! मला म्हणाला, ‘तुमचा विषय आव्हानात्मक होता!’ मनात हसू आलं. पठ्ठय़ानं १०-१२ कविता तयार करून ठेवल्या असाव्यात. त्यातले शब्द इकडेतिकडे फिरवून द्यायचे! मनात आलं, आपल्याकडे अशी ‘पोएम स्टोअर्स’ निघाली तर? ८०० रुपयांना एक कविता! लोक विकत घेतील? तेवढय़ात माझ्या मुलाचे- कुणालचे कान गिटारवादनानं टवकारले गेले. कुणाल गिटार वाजवत असल्यानं त्याचं लक्ष कोपऱ्यात उभं राहून गिटार वाजवणाऱ्या तरुणाकडे गेलं. तोही असाच तरुण, कोवळा. म्हणाला, ‘‘म्युझिकमध्ये ग्रॅज्युएशन करतोय. वीकेंडला असं वाजवून फीसाठी पैसे जमवतो.’’ जाता जाता त्यानं कुणालला गिटारचे धडेही दिले- १५ डॉलरमध्ये! तर ‘म्युझियम ऑफ मेट्रोपॉलिटन आर्ट’च्या प्रांगणात हे दोन आश्वासक, नव्या पिढीचे कलाकार भेटले. आपली कला पोहोचवण्याची ही त्यांची केवढी कल्पकता म्हणायची!  ‘मेट’मध्ये न शिरता आम्ही ‘गूगेनहेम म्युझियम’ला गेलो. त्याची वास्तुरचना लक्षवेधी आहे. घाट चढत जावा तशी चक्राकार वळणं घेत गॅलरीत पोहोचायचं. एक गॅलरी सर्वस्वी नव्या चित्रकारांच्या चित्रकृतींची होती, तर दुसरी गॅलरी प्रसिद्ध चित्रकारांच्या मोजक्या चित्रकृतींची. पिकासोचं ‘Fernande with a Black Mantilla’ हे त्याच्या मैत्रिणीचं चित्र पाहून जीव हरखून गेला. पूर्ण काळय़ा रंगाच्या पार्श्वभूमीवरचं हे चित्र. काही भागातले ख्रिश्चन फ्यूनरलच्या वेळी डोक्यावरून स्कार्फ (Mantilla) घेतात, तसा घेतलेली त्याची मैत्रीण. या चित्रातलं पिकासोचं रंगलेपन पाहण्यासारखं आहे. तिच्या गळय़ाभोवतीच्या स्कार्फच्या घडय़ा आणि तिचा त्यातला नाजूक, पण दु:खी चेहरा!  देगाच्या ‘डान्सर्स इन ग्रीन अँड यलो’ या चित्रानंही ‘गूगेनहेम म्युझियम’ कायम लक्षात राहील असं वाटलं. देगाची बहुतेक चित्रं बॅले डान्सर्सची असतात. या चित्रात बॅलेचे झगे घातलेल्या, विंगेत उभ्या असणाऱ्या तरुणी आहेत. रंगमंचावर बॅले करण्यासाठी उत्सुक असलेल्या. रंगमंचाकडे आतुरतेनं पाहणाऱ्या. त्यांच्या अवघ्या देहबोलीतली लय, ऐट, लगबग देगानं पकडली आहे. इथंच व्हॅन गॉगचं ‘माऊंटन्स ऑफ सेंट रेमी’ हेही चित्र आहे. १८८९ मधलं. ज्या काळात व्हॅन गॉगची मानसिक स्थिती बिघडल्यानं तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. त्याही स्थितीत त्याचं चित्रं काढणं चालूच होतं. हॉस्पिटलच्या आजूबाजूचा निसर्ग हा त्या काळातली त्याची प्रेरणा होता. ऑलिव्हची झाडं, आल्प्स पर्वताच्या रांगा त्याच्या या चित्रात त्यानं चितारल्या आहेत. ‘गूगेनहेम म्युझियम’पेक्षा ‘मेट म्युझियम’ तुलनेनं भव्य आहे. एखाद्या आलिशान राजवाडय़ात आपण वावरतो आहोत असं वाटतं. यातली दालनंही मोठी आहेत. काही महत्त्वाच्या चित्रकारांची स्वतंत्र दालनं आहेत. सतराव्या शतकातली डच पेंटिंग्ज इथं पाहता येतात.

डच चित्रकार म्हटलं की रेम्ब्राँचं नाव येतंच तोंडावर. त्याचं सेल्फ पोट्र्रेट आठवतं, तसं ‘द अ‍ॅनाटॉमी लेसन ऑफ डॉ. निकोलस टल्प’ हे प्रसिद्ध चित्रही आठवतं. ‘मेट’मध्ये त्याचं ‘अ‍ॅरिस्टॉटल विथ अ बस्ट ऑफ होमर’ हे चित्र आहे. ‘इलियड’ आणि ‘ओडिसी’ या महाकाव्यांचा कवी होमरच्या अर्धपुतळय़ावर हात ठेवलेला तत्त्ववेत्ता अरिस्टॉटल या चित्रात आहे. होमरकडे पाहतानाची अ‍ॅरिस्टॉटलच्या चेहऱ्यावरची आढय़ता रेम्ब्राँनं फार सूचकतेनं आणली आहे.  युरोपियन पेंटिंग्जच्या कलेक्शनमध्ये मला अत्यंत ओढ लावणाऱ्या क्लॉड मॉनेची पेंटिंग्ज दिसली आणि जीव वेडावून गेला. एका गॅलरीच्या अर्धवर्तुळाकार भिंतीवर मॉनेचा वॉटर लिलीचा भला मोठा कॅनव्हास आहे. तरल नीलम, शेवाळी, राखाडी छटा मॉनेच्या चित्रांचं वैशिष्टय़च. त्याला छेद देणारं काळय़ा डोहासारख्या पाण्यावर तरंगणाऱ्या कमळांचं एक चित्रंही मला फार आवडतं. वॉटर लिलीच्या जलाशयावरचा जपानी पूल. हा तर मॉनेचा आवडता. शिवाय ऊन-सावल्यांचा लपंडाव. हिरवळीवर सांडलेलं चकचकीत ऊन, त्यावरच्या झाडांच्या सरकत्या सावल्या कधी दोन बाजूच्या किनाऱ्यांवरचे सोनसळी झाडांचे पिसारे नि त्यातून गेलेला तकतकीत तलम निळय़ा रंगाचा जलाशय.. ‘ऑन द बोट’ या त्याच्या चित्रावरून नजर हटत नाही. पाण्यावर तरंगणारी पांढरी बोट आणि जलाशयातली झाडांची प्रतिरूपं. या निसर्गासाठी, या वॉटर लिलीजसाठी मॉनेनं काचेचं घर बनवून घेतलं होतं. त्याभोवती बाग उभी केली होती. व्हजिर्नियाच्या वेलींपासून टय़ूलिप, जपानी चेरीपर्यंतची अनेक फुलझाडं त्यात होती. एका बाजूला तळं नि त्यावर तरंगणारी त्याची निरागस कमळं. काचेच्या घरातून न्याहाळता येणारी निसर्गाची अनंत रूपं हीच मॉनेची प्रेरणा. निसर्गात जाणवणाऱ्या अनेक भावछटा, त्यातली निरागसता, प्रेम, विशुद्धता, प्रसन्नता.. 

‘म्युझियम ऑफ मॉडर्न आर्ट’ (मोमा) मात्र न्यूयॉर्कच्या गजबजाटात आहे. आधुनिक अशा इमारतीत. आपला आनंद बेबंदपणे साजरा करत. फेर धरून नाचल्यासारख्या, हातात हात गुंफलेल्या वस्त्रहीन स्त्रिया मानिसनं ज्या ‘डान्स’ या चित्रात रेखाटल्या आहेत, ते चित्र वा पिकासोचं वसंत ऋतूत दगडांवर बसून मनमोकळय़ा गप्पा मारणाऱ्या स्त्रियांचं ‘थ्री विमेन अ‍ॅट द स्प्रिंग’ हे चित्र, पोन्टॉइज या खेडय़ातल्या घरांचं पिसारोचं ‘द हरमिटेज अ‍ॅट पोन्टॉज’ हे चित्र पाहता पाहता मी एकदम एका चित्रापाशी थबकले. ‘पेंटिंग-४’ नावाच्या चित्रापाशी. खाली चित्रकाराचं नाव होतं- ‘वासुदेव गायतोंडे, भारतीय चित्रकार, १९६२’. जागतिक चित्रकारांच्या चित्रांमध्ये भारतातल्या, महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या, गिरगावातल्या एका चाळीत आयुष्य गेलेल्या चित्रकाराला मिळालेलं हे मानाचं स्थान पाहून मन थरारून गेलं. डोळय़ांत आपसूक पाणी जमा होताना उरात अभिमान दाटून आला. अमूर्त शैलीचा आणि झेन तत्त्वज्ञानाचा प्रभाव असलेला हा भारतीय वंशाचा जागतिक कीर्ती लाभलेला चित्रकार, ज्याचं चित्र आपल्याकडे चाळीस कोटींच्या बोलीनं विकलं जातं! मार्क रोथको या चित्रकाराला गायतोंडे यांनी हे चित्र पाठवलं होतं. गायतोंडे यांचं आपल्या चित्राबाबतचं भाष्य लिहिलं होतं- ‘झेन तत्त्वज्ञानाच्या अभ्यासामुळे मला निसर्ग समजू लागला. माझी चित्रं म्हणजे या निसर्गाची शुद्ध आणि साधी प्रतिबिंब आहेत!’ बदामी रंगाच्या समुद्रावर उभ्या असणाऱ्या बोटींची प्रतिबिंबं ‘मोमा’तल्या या चित्रात तरळताना दिसत आहेत. आभाळाची निळसर छटा मालवून गेलीये आणि ती सोनेरी झाली आहे. क्षितिजरेषाही धूसर होऊन गेली आहे. चित्रात भरून असलेली नि:शब्दता हुरहुर लावणारी. निसर्गाचं मूकपणे बोलणं. किती वेळ मी गायतोंडे यांच्या या चित्रापाशी उभी होते. चित्रातली शांतता स्वत:मध्ये प्रतिबिंबित होत झिरपते आहे जशी.. ती अनुभवत. पुढची चित्रं मला दिसतच नव्हती!  म्युझियम पाहून कॅफिटेरियाच्या सुंदर परिसरात एका बाकावर बसून राहिले. डोळय़ांत पाहिलेल्या चित्रांच्या प्रतिमा येऊन जशा चिकटून बसल्या आहेत असं वाटत होतं.

अनेक चित्रकारांच्या चित्रांतून केलेला, झालेला माझा हा प्रवास. अपूर्व असा आनंद देणारा आणि कसली तरी अस्वस्थतेची हुरहुरही मनाला व्यापून टाकणारा. व्हॅन गॉगनं स्वत:च्या डोक्यात गोळी मारून केलेला आत्मनाश, मॉनेची निसर्गकुंचल्यात पकडणारी दृष्टी हरवून जाणं, देगाचं दृष्टिहीन, अस्वस्थपणे रस्त्यावरून भटकणं.. कोणता शाप या तीव्र संवेदनशील कलावंत मनांना मिळालेला असतो? या शापामुळेच होत जाते का इतकी उत्कट निर्मिती? पाऊलो कोएलो लिहितो, ‘Tears are words that need to be written’ वाटतं, या कलावंतांच्या अश्रूंचे ही चित्रं म्हणजे शब्द असतात का?

माझी भटकंती संपून जाते. पण अशी मात्र चालूच राहते. कलावंतांच्या निर्मितीच्या प्रदेशातून. व्हॅन गॉगच्या गव्हाच्या सोनेरी शेतातून मॉनेच्या जपानी पुलावर हलकी पावलं टाकत, पिकासोच्या सनफ्लॉवर्सना न्याहाळत, लॉत्रेकच्या नाइट क्लबमधला डान्स अनुभवत.. गायतोंडे यांच्या चित्रातल्या शांततेकडे घेऊन जात!