|| भानू काळे

‘‘आजचा सुशिक्षित पुरुष बहुतांशी पूर्वापार समजुतीसारखाच, कु टुंबात अधिक पैसे मिळवणारा, कु टुंबाच्या रक्षणकत्र्याची भूमिका घेणारा आहे.पण आपल्याला मुलगाच व्हावा,आग्रह तो धरत नाही; किंबहुना मुलगीच व्हावी, असं अनेक पुरुषांना वाटतं. त्या दृष्टीनं तो समानताही मानतो. मुलांच्या संसारात न गुरफटणारा, उतारवयात एकटा पडणारा, असा आजचा पुरुष मला दिसतो. पण स्वत:चं अपुरेपण स्वीकारून स्त्री-पुरुषांच्या परस्परस्वीकाराकडे जाण्याची त्याची नक्कीच तयारी दिसते…’’  

Ashish patil shared experience of those who perform lavni and dance in women's clothes sometimes being raped
स्त्री पात्र निभावणाऱ्या पुरुषांना वेगळ्या नजरेने पाहिलं जातं; ‘लावणीकिंग’ आशिष पाटीलने सांगितला अनुभव, म्हणाला, “काहीजणांवर बलात्कार…”
medical treatment, pregnant minor, hospital , police complaint issue
अल्पवयीन गर्भवतीच्या उपचाराकरता इस्पितळाने पोलीस तक्रारीचा आग्रह धरणे अयोग्य…
Loksatta vyaktivedh economics Nobel Prize Standards Daniel Kahneman
व्यक्तिवेध: डॅनिएल कानेमान
Rohit Sharma Wife Ritika Sajdeh Real Lifestyle
रोहित शर्माची पत्नी म्हणून नव्हे तर रितिका सजदेहची ‘ही’ ओळख दाखवते तिची शक्ती; काम ते नातं, कसं आहे आयुष्य?

प्रामाणिकपणे सांगायचं तर मी वाढलो त्या वातावरणात एक पुरुष म्हणून स्वत:कडे पाहण्याचा कधी प्रसंगच आला नव्हता; कायम एक व्यक्ती म्हणूनच स्वत:कडे पाहत आलो. माझ्या लहानपणी ‘बोलकी बाहुली’ चित्रपटातील ‘आई आणखी बाबा यांतील, कोण आवडे अधिक तुला’ हे

ग. दि. माडगूळकरांचं गाणं खूप लोकप्रिय झालं होतं. गाणं गोड होतं, पण ‘आई दिसते गोजिरवाणी, परंतु भित्री भागुबाई’ किंवा ‘कुणी न देती पैसा-दिडकी, घरात बसल्या आईला’ अशा ओळी त्या वेळेलाही अगदीच बाळबोध वाटल्या होत्या. आमच्या घरात तसे आई-बाबा नव्हतेच. कामगार नेते असलेले वडील कमावते नव्हते, तर आईच कमावती होती; तीच घर चालवत होती. भित्री तर ती कधीच नव्हती. ती मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होती आणि आज अगदी अविश्वसनीय वाटणारी गोष्ट म्हणजे माझ्या जन्मानंतर केवळ अकराव्या दिवशी ती कामावर रुजू झाली होती! वडीलही जेव्हा घरी असत, तेव्हा घरकामात मदत करत, चहा करत, भांडी विसळत. आम्ही सगळेच, अगदी आमचा घरगडीसुद्धा, त्यांना कायम ‘कॉम्रेड’ म्हणूनच हाक मारायचो, यातच सगळं आलं. 

पुरुष म्हणून वेगळेपण न जाणवण्याचं आणखी एक कारण म्हणजे घरात आम्ही पाच भाऊ, पण बहीण नाही. घरातील एकमेव स्त्री म्हणजे आई. स्त्री म्हणून तिनं कधीच कुठल्या सवलतीची अपेक्षा केली नव्हती. साहजिकच आम्हा भावांनाही एक पुरुष म्हणून कधीच कुठली वेगळी वागणूक मिळाली नाही. मित्रांच्या घरी गेल्यावरच कायम घरात असणाऱ्या आईनं किंवा बहिणीनं जेवण वाढणं, शाळेचा डबा भरून देणं, युनिफॉर्मला इस्त्री करून देणं असले लाड बघितले. ज्यांना बहीण होती, त्यांचा त्या वेळी हेवा वाटायचा. विशेषत: रक्षाबंधनाच्या किंवा भाऊबीजेच्या दिवशी. ‘माझे पाच पांडव आहेत,’ असं आई अभिमानानं म्हणायची. पण ‘मला एकतरी मुलगी हवी होती, कारण बहीण असली तर भावांमध्ये माया टिकते,’ असंही तिच्या तोंडून ऐकलं होतं. पुरुषपणाची एक मर्यादा अधोरेखित करणारंच ते मत होतं.

बाहेर समाजात मात्र पुरुषी वर्चस्व जाणवायचं. मुलीपेक्षा मुलाला नेहमी झुकतं माप देताना ‘तो माझं नाव लावणार आहे,’ असं समर्थन केलं जायचं. ‘वंशाचा दिवा’सारख्या संकल्पनांचंच हे एक रूप. बहुतेक घरांत गृहिणीला महत्त्व नव्हतं. वडील म्हणजेच ‘पोलीस खातं’ आणि ‘सुप्रीम कोर्ट’देखील असायचं. पण त्या वेळी त्याचं कारणही लक्षात आलं होतं. लग्न ठरवतानाच शक्यतो मुलीपेक्षा अधिक शिकलेला, अधिक कमावणारा मुलगाच जावई म्हणून स्वीकारला जाई. तेव्हा वरचढपणाची जाणीव हीच जर अहंकाराची व्याख्या असेल, तर पुरुषी अहंकार हा कुटुंबात लग्नापासूनच रुजलेला होता. उपरोक्त गाण्यामधील ‘धडा शीक रे तू बैलोबा, आईहूनही मोठ्ठे बाबा, म्हणून आया तयार होती, बाबांसंगे लग्नाला!’ या शेवटच्या कडव्यात हेच मांडलं होतं.  

पुढे लग्नानंतर  माझ्या पत्नीनं, वर्षानं-

स्त्री-अभ्यास केंद्रात दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम केला, तेव्हा पुरुषी वर्चस्वाची इतरही काही कारणं आमच्या चर्चेत येऊ लागली. उदाहरणार्थ, कार्ल माक्र्सनं मालमत्ता हक्काशी (‘राइट ऑफ प्रॉपर्टी’शी) जोडलेला त्याचा संबंध. पण पुरुषसत्तेची यापेक्षा अधिक मूलभूत कारणं शेतकरी नेते शरद जोशी यांचं चरित्र लिहिताना उलगडली. त्यांच्या मते, जगातील पहिला व्यवसाय असलेल्या शेतीमध्ये एका दाण्याचे शंभर दाणे बनायची शक्यता जेव्हा मानवाला दिसली, जेव्हा जगातील पहिलं संपत्तीनिर्माण झालं, तेव्हाच शेतीतील प्रदीर्घ काळ चाललेली लूटही सुरू झाली. लुटारूंपासून संरक्षण करण्यासाठी निसर्गत: अधिक ताकदवान असलेल्या पुरुषांना सततच संघर्षाच्या तयारीत राहावं लागलं. पुरुषांसाठी आक्रमकता, कठोरपणा, शौर्य, क्रौर्य वगैरे लढाईसाठी आवश्यक गुण अत्यावश्यक ठरले. स्त्रियांकडे पालनपोषणाचं व लढाईत मारल्या जाणाऱ्या पुरुषांची जागा भरून काढण्यासाठी पुरुषांचं पौरुष जागतं ठेवण्याचं काम येत गेलं. स्वसंरक्षण आणि प्रजनन या आदिम प्रेरणांचा हा आपत्कालीन आविष्कार होता. लुटीचा कालखंड वाढत गेल्यानं त्याला स्थैर्य लाभलं. या श्रमविभागणीत स्त्रीइतकाच पुरुषावरही अन्याय झाला. नाजूक हालचाली करणाऱ्या, हळव्या पुरुषाला ‘बायल्या’ म्हणून हिणवलं जाऊ लागलं. खूपदा नको असलेलं, न पेलणारं, ‘कठीण कठीण कठीण किती’ असं ओझं पुरुष पिढ्यानुपिढ्या वाहात आला आहे.

पुढे ‘बुरखा ते ब्रा-दहन’ या प्रवासात परिस्थिती पालटत गेली. शारीरिक श्रमांची जागा बहुतांशी यंत्रांनी आणि बौद्धिक सामथ्र्यानं घेतली. स्त्रियांना अधिकाधिक वाव मिळत गेला. उदाहरणार्थ, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र. ऋजुता, सोशिकता, नीटनेटकेपणा, चिकाटी, एकाच वेळी अनेक गोष्टींचं भान ठेवण्याचं कसब हे स्त्रियांमध्ये अधिक आढळणारे गुण आधुनिक युगात अधिक उपयुक्त ठरत गेले. त्यातून पारंपरिक श्रमविभागणी शिथील होत गेली. बाळंतपणासाठी स्त्रियांना दिली जाते त्याचप्रमाणे अनेक प्रगत देशांत शिशुसंगोपनासाठी पुरुषांनाही रजा मिळायला लागली.

आजचा पुरुष मला कसा दिसतो? इथे एक स्पष्ट केलं पाहिजे. सगळेच पुरुष असे-असे असतात असं सरधोपट विधान कधीच करता येणार नाही. भारतासारख्या देशात इतकं प्रचंड वैविध्य आहे, की भारतासंबंधी केलेलं कुठलंही विधान खरं असल्याचं दाखवता येतं आणि त्याच वेळी त्याचा व्यत्यासदेखील सिद्ध करता येतो! बायकोला मारणारा प्राध्यापकही असतो आणि बायकोपुढे गोगलगाय बनणाराही असतो. तेव्हा माझी निरीक्षणं ही केवळ माझ्या बघण्यात आलेल्या काही पुरुषांची आहेत.  

बहुसंख्य सुशिक्षित मध्यमवर्गीय घरांमध्ये आजही पुरुषच अधिक पैसे कमावणारा आहे. स्वत:हून तो कुटुंबाच्या रक्षणकत्र्याची भूमिका घेतो. आपल्याला मुलगाच व्हावा असा त्याचा आग्रह नसतो, अनेक जणांना खरं तर मुलगीच व्हावी असं वाटतं. त्या अर्थानं आजचा पुरुष समानता मानणारा आहे. किंवा कदाचित म्हातारपणी मुलापेक्षा मुलगीच आपल्याला अधिक सांभाळेल,असं त्याला वाटतं. दीर्घकाळ शरीरश्रम करायची क्षमता (स्टॅमिना) किंवा तर्कशुद्ध आणि व्यापक परिप्रेक्ष्यात विश्लेषण करायची सवय, अशी काही सामर्थ्यस्थळंही त्याच्यात जाणवतात. अलीकडे पुरुषपणाच्या काही मर्यादाही जाणवतात. उदाहरणार्थ, विशिष्ट वयानंतर तो दुसऱ्या एखाद्या पुरुषाशी पूर्वीप्रमाणे जवळीक साधू शकत नाही; एक प्रकारचा संकोच आड येतो. विशेषत: पाश्चात्त्य देशांत. पाकिस्तानचे पंतप्रधान व एकेकाळी क्रिकेटपटू म्हणून इंग्लंडमध्ये प्रदीर्घ वास्तव्य केलेल्या इम्रान खान यांनी दोन समाजांमधील एक महत्त्वाचा तत्कालीन फरक म्हणून दोन पुरुषांमधील मैत्रीच्या अभावाची नोंद केली आहे. याउलट बायका सहजगत्या एकमेकींना अगं-तुगं करू लागतात, कौटुंबिक गप्पा मारतात, सुखदु:खाची देवाणघेवाण करतात. अनेकदा दोन प्रौढ मैत्रिणीही एकमेकींकडे राहायला जातात, पलंगावर लोळत तासंतास गप्पागोष्टी करतात. तसं करणारे पुरुष क्वचितच दिसतील. 

तथाकथित पुरुषी ‘चान्स घेणं’ सोडाच, आज कायदे असे आहेत की काही पुरुषांना स्त्रियांच्या सहवासात थोडं असुरक्षितच वाटू लागलं आहे. ‘मी टू’च्या युगात अभावितपणे किंवा सांत्वन करतानाही स्त्रीस्पर्श टाळणं त्यांना आवश्यक वाटतं. खूपदा चोरट्या स्पर्शातूनच सुरू होणारा रोमान्स आज जणू हरवूनच गेला आहे. माझ्या परिचयाचा एक पुरुष तर आपल्या केबिनमध्ये एखाद्या स्त्रीशी अधिकृत कामाच्या संदर्भातच, पण एकट्यानं बोलायचा प्रसंग आला, की केबिनचा दरवाजा कटाक्षानं उघडा ठेवतो.

एकटेपण हीदेखील आजच्या पुरुषाची मोठी समस्या आहे. तो वयात आलेल्या मुलांबरोबरची ‘जनरेशन गॅप’ मिटवू शकत नाही. पारंपरिक आर्थिक व्यवहार सांभाळणंही त्याला डिजिटल युगात जड जातं. निवृत्तीनंतरचं, स्वत:चं व्हिजिटिंग कार्ड गमावल्यानंतरचं रिकामपण त्याला खायला उठतं. पत्नीचं आधी निधन झालं तर पुरुष अधिकच केविलवाणा होतो. त्या मानानं बायका मुलांच्या संसारात अधिक रमतात.   

स्त्री-पुरुषांमधील फरक दुर्लक्षित करणारी ‘युनिसेक्स’ चळवळ आज जोरात आहे. तशी ब्युटी पार्लर्स, तशा फॅशनचे कपडे सगळीकडे दिसतात. पुरुष मॉडेल्स आणि सिनेमानट यांची छाती अगदी वॅक्सिंग केल्यासारखी गुळगुळीत दिसते. जन्मत: स्त्री-पुरुषांत फारच थोडा जनुकीय फरक आहे हे मान्य आहे; गर्भाच्या बांधणीसाठी जी गुणसूत्रं एकत्र येतात, त्यांपैकी लिंग ठरवण्यासाठी केवळ एकच गुणसूत्र कामाला येतं; म्हणजेच स्त्री-पुरुषांमधील फरक हा जास्तीत जास्त दोन-अडीच टक्क्यांचा आहे हेही खरं. पण तो थोडासा फरकही लक्षणीय आहे. उदाहरणार्थ, विचार करायच्या पद्धतीतील फरक. तो मला बहुधा प्रथमच जाणवला वडील एकदा बंगळूरुला गेले होते तेव्हा. आयुष्यात कधी नव्हे ते त्यांनी तिथे दोन साड्या घेतल्या. एक त्यांच्या बहिणीसाठी आणि तेवढ्याच किमतीची एक माझ्या आईसाठी. दोन्ही तशा चांगल्याच होत्या, पण त्यावरून आई-वडिलांत जोराचं भांडण झालं होतं. वडिलांच्या दृष्टिकोनातून त्यांचं वागणं समानतेला धरून आणि म्हणून योग्य असंच होतं; पण आईचं म्हणणं होतं, ‘तुमची ती समानता हाच खरा अन्याय आहे. मी तुमची पत्नी आहे आणि म्हणून मला जास्त भारीची साडी तुम्ही घ्यायला हवी होती.’ प्रेमाची साक्ष पटवून घेताना प्रत्यक्ष कृतीपेक्षा इतरही काही मापदंड स्त्री लावत असते!

तो फरक स्पष्ट करणारं ‘मेन आर फ्रॉम मार्स, विमेन आर फ्रॉम व्हीनस’ हे जॉन ग्रे या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाचं पुस्तक १९९२ मध्ये प्रकाशित झालं आणि स्त्रीहक्कांची चळवळ ऐन भरात होती त्या काळातही सलग १२१ आठवडे ते ‘बेस्टसेलर्स’च्या यादीत राहिलं. ‘सीएनएन’च्या यादीनुसार नव्वदच्या दशकातील ते सर्वांत लोकप्रिय पुस्तक होतं. स्त्री-पुरुषांमधील वेगळेपण स्पष्ट करताना ‘पुरुषांना प्रश्न सोडवण्यात रुची असते, तर स्त्रियांना त्या प्रश्नांविषयी कोणाशीतरी बोलायला अधिक आवडतं’ असं म्हणत लेखकानं स्त्रियांसाठी ‘आउटकम’पेक्षा ‘प्रोसेस’ अधिक महत्त्वाची असते, असं सूत्र मांडलं. या सूत्राची व्याप्ती त्यानं शृंगारापासून सर्वच स्तरांपर्यंत नेली व त्याची ती मांडणी जगभर अनेक मानसशास्त्रीय अभ्यासांना गती देणारी ठरली.

हे भिन्नत्व वंशसातत्यासाठीदेखील अत्यावश्यक आहे. समानतेपेक्षा वेगळेपण अधिक आकर्षण निर्माण करतं आणि समागमाची वारंवारिता आवश्यक तेवढी हवी असेल, तर त्यासाठी हे वेगळेपणदेखील प्रकर्षानं जाणवेल इतकं असावंच लागेल. हे भिन्नत्व जपलं जावं, समानतेच्या ध्यासात लंबकानं दुसरं टोक गाठू नये. समानता म्हणजे सारखेपणा नव्हे.  उद्याचा पुरुष कसा असेल? मला वाटतं गृहिणीपदाचा तो मनापासून सन्मान करणारा असेल. डिजिटल युगात जगण्यासाठी आवश्यक ते कौशल्य त्यानं आत्मसात केलं असेल. मुलांमध्ये तो भावनिकदृष्ट्या कमी गुंतलेला असेल. वृद्धाश्रमात जायची त्याची तयारी असेल. स्त्री आणि पुरुष, दोघांतही काही अपुरेपण निसर्गत:च आहे आणि म्हणून परस्परस्वीकारच त्यांना अधिक सुखकर माणूसपणाच्या दिशेनं नेईल हे त्याला पटलेलं असेल. याला छेद देणारी काही उदाहरणं नक्कीच सापडतील, पण ही संभाव्यता सुशिक्षित मध्यमवर्गाच्या बहुतांश हिश्श्याला लागू पडणारी असेल.    

bhanukale@gmail.com