|| किरण येले
‘टायटॅनिक’ चित्रपटात नायक नायिके ला बोटीच्या एका टोकाशी हात पंखांसारखे पसरून उभं करतो. ते दृश्य अनेक स्त्रियांना भावलं, आपलंसं वाटलं, असं एका सर्वेक्षणात समोर आलं होतं. याच सर्वेक्षणात पुरुषांनी सागितलेलं त्यांचं आवडतं दृश्य मात्र वेगळं होतं. हे छोटंसं उदाहरणही किती बोलकं  आहे! आपल्याला पंख पसरायला प्रोत्साहन देणारा आणि आपल्या मागे उभं राहून, दिखावा न करता पाठबळ देणारा जोडीदार स्त्रियांना हवाहवासा वाटतो, असं त्यातून ध्वनित होतं. स्त्रियांना पुरुषाकडून हेच हवं असतं का? तसं असेल, तरी मग पुरुषाला स्त्रीकडून नेमकं  काय हवं असतं, हा प्रश्न उरतोच…      

‘पुरुषाला नेमकं काय हवं असतं बाईकडून?’

teacher demanded physical relations after seeing student alone in classroom
नागपूर : वर्गात एकट्या विद्यार्थिनीला पाहून शिक्षकाने…
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
student gave secret message to math teacher
विद्यार्थ्यांनी घेतली गणिताच्या शिक्षकाची परीक्षा! विद्यार्थ्यांची ‘ही’ युक्ती पाहून शिक्षक झाले थक्क! पाहा Video…

बरोबर… या प्रश्नाला ८५ टक्के स्त्रिया अगदी ‘शरीर’ हेच उत्तर देतात. याला कारण त्यांना तसेच अनुभव आलेले असतात. पण १५ टक्के स्त्रिया वेगळं उत्तर देतात, कारण त्यांना वेगळे अनुभव आलेले असतात. कोणते अनुभव, ते सांगण्याची गरज नाही. वाईट वागणाऱ्या पुरुषांची चर्चा इतकी होते, की चांगले वागणारे पुरुष नाहीतच, असं वाटू लागतं. इथे ‘पुरुष’ हा शब्द, मी ‘पुरुष’ याच अर्थानं म्हणतोय. बाई दिसताच त्यांच्याही नकळत नजर बदलणाऱ्या आणि लाळ घोटणाऱ्या नरांना मी ‘पुरुष’ मानत नाही. ते ‘पुरुष’ नसतातच, कारण त्यांना ‘पौरुषत्व’ म्हणजे काय आणि ते कुठे असतं हेच माहीत नसतं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आमच्या वर्गात एक राजबिंडा आणि श्रीमंत मुलगा होता. अनेक मुली त्याच्या मागे लागत. त्यांना फिरवण्यात आणि भोगण्यात त्याला कमालीचं कर्तृत्व वाटे. मुलींबरोबर फिरताना त्याच्या चेहऱ्यावर पौरुषत्व गाजवल्याचा भाव असे. कँटीनमध्ये सगळ्या मुलांना सांगताना त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू अगाध पुरुषीपणा (खरे तर न:पुरुषीपणा) पसरू लागे आणि ऐकणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावर षंढत्वाची भावना झाकोळत जाई. ‘बाई भोगणं’ म्हणजेच ‘पौरुषत्व’ ही रूढ व्याख्या आपण सगळेच आपल्या महाविद्यालयाच्या काळातून ऐकत  आलोय आणि त्यानंतरही ऑफिसमध्ये, ट्रेनमध्ये, बाईविषयी होणाऱ्या चर्चेतून तीच भावना, तोच विचार सगळीकडे ऐकत आहोत. इंटरनेटवर आलेल्या पॉर्न साईट्सनी तर ‘जो जास्त वेळ भोगतो तो खरा पुरुष’ हा विचार अधिक दृढ केला. पण खरंच बाईला असा पुरुष हवा असतो का? बाईला नेमकं काय हवं असतं पुरुषाकडून?

पुरुषाला काय हवं असतं बाईकडून, या प्रश्नाचं उत्तर मघाशी तुम्ही ज्या वेगात दिलंत त्या वेगात या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येणार नाही. अगदी अनेक बायकांनाही कळत नसतं आपल्याला नेमकं काय हवंय पुरुषाकडून? युरोपात एका संस्थेतर्फे एक सर्वेक्षण केलं गेलं, ज्यात स्त्री-पुरुषांना एक प्रश्न विचारला गेला आणि मिळालेल्या उत्तराचं परीक्षण केलं गेलं. प्रश्न होता, ‘टायटॅनिक’ सिनेमातील तुम्हाला अतिशय आवडलेलं किंवा स्मरणात राहिलेलं मुख्य दृश्य कोणतं? वाचकहो, इथे तुम्हीही थोडा वेळ इथे थांबा आणि ‘टायटॅनिक’ पाहिला असेल, तर या प्रश्नाचं उत्तर स्वत:लाच द्या.

तर या प्रश्नाला बहुतांश पुरुषांनी ‘टायटॅनिक’ बोट समुद्रात बुडताना ९० अंश कोनात उभी राहते आणि मग तुटते, हे दृश्य सांगितलं, तर काहींनी मोटारमधील नायक-नायिकेच्या प्रणयाचं दृश्य सांगितलं. पण हाच प्रश्न जेव्हा स्त्रियांना विचारला, तेव्हा बहुतांशी स्त्रियांनी एक प्रसंग आवडल्याचं सांगितलं, तो प्रसंग म्हणजे ‘टायटॅनिक’मध्ये चालू असलेल्या पार्टीमधून नायक नायिकेला बाहेर काढतो, ‘टायटॅनिक’च्या डेकवर घेऊन जातो आणि तिथे बोटीच्या टोकावर उभं करत, तिचे दोन्ही हात पंखासारखे पसरवत तिच्या मागे उभा राहतो. बहुतांशी स्त्रियांना हेच दृश्य का आवडलं असावं? का लक्षात राहिलं असावं? तुम्ही नीट विचार केलात, तर असं का घडलं हे लक्षात येईल. या दृश्यात नायक नायिकेला बोटीवरच्या सगळ्या गर्दीतून, म्हणजे जगाच्या गर्दीतून बाहेर काढत तिला बोटीच्या डेकवर आणतो. तिला बोटीच्या टोकावर उभं करून तिच्या मागे उभा राहतो आणि तिचे दोन्ही हात हवेत हळुवार पसरवतो, पक्ष्याच्या पंखांसारखे. तो तिला अनुभव देतो आकाशाचा, त्या आकाशात मोकळं उडण्याचा. या वेळी तो तिच्या पुढे उभा राहात नाही, की तिच्या काळजीनं शेजारीही उभा राहात नाही. तिच्या मागे उभा राहून तिच्याही नकळत तिला सावरून धरतो. तो तिला पंख देतो. हे दृश्य सगळ्या स्त्रियांच्या लक्षात राहिलं कारण त्यांना तसा पंख देणारा, ते समजून घेणारा पुरुष हवा असतो. बाईला पुरुषाकडून पंख हवे असतात. (आता इथेही मी ‘बाई’ हा शब्द ‘बाई’ याच अर्थानं वापरतोय.) कुणी देतो का तिला असा पंख देण्याचा अनुभव? तिला कधी येतो का असा पंख मिळाल्याचा अनुभव? होय… तिच्या लहानपणी तिला अनुभव आलेला असतो पंखांचा. प्रत्येक स्त्रीच्या मनात आदर्श पुरुष म्हणून बापाची प्रतिमा असते ती यासाठीच, की लहानपणापासून बाप तिची काळजी घेत असतो. तिला जोजवत असतो. पण ही परिस्थिती कायम राहात नाही, कारण मुलगी तरुण झाल्यावर अनेक वेळा या परिस्थितीत अचानक बदल घडतो. कालपर्यंत काळजी करणारा तिचा बाप तिच्या जाण्यायेण्यावर आणि वागण्यावर नियंत्रण आणू पाहातो. फुटू फुटू पाहणारे तिचे पंख तो कापू लागतो. यामागे बापाला बाहेरील पुरुषसत्ताक जगापासून मुलीला वाचवण्याच्या काळजीबरोबरच भीती असते ती समाजाची. मुलीच्या बाबतीत ती तरुण झाल्यावर अशी बदलणारी स्थिती, मुलांच्या बाबतीत मात्र बदलत नाही. आईचं प्रेम त्यांच्या लहानपणी जसं होतं तसंच ते कायम टिकून राहातं. अगदी लग्नानंतरही ती त्याची काळजी तशीच घेत राहते (आणि यातूनच काही वेळा असमंजसपणामुळे सासूसुनेत वाद होतात. दोघी आपापल्या पद्धतीनं त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न करू लागतात आणि त्यातूनच कधी कधी त्याच्यावर आपला हक्क गाजवण्याचा व दाखवण्याचा प्रयत्न करू लागतात) यामुळेच पुरुषाला कुणीतरी सतत सांभाळण्याची, जपण्याची, त्याच्या आतला अहंकार जोजवण्याची इतकी सवय लागते, की आई वा बाई नसेल तर त्याच्या जगण्यात एक भयानक पोकळी येते. लग्नानंतर बाई त्याच्या आयुष्यात येते. पहिली काही वर्षं ती बाई असते, पण नंतर हळूहळू त्याची काळजी घेणारी ब-आई होते. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, की लग्नानंतर नवऱ्याचा मृत्यू झाल्यावर स्त्री एकटी जगू शकते, पण बायको मृत झाल्यावर अनेक पुरुष एकटे नीट जगू शकत नाहीत. कारण ते संपूर्णत: तिच्यावर विसंबून असतात. अनेक पुरुष बायको गेल्यावर काही काळातच जातात.

या सगळ्याच्या कारणाचा विचार करता अनेक वेळा समाजव्यवस्था, तर काही वेळा शरीरातील संरचना असं उत्तर येतं. डिसेंबर २०१३ मध्ये नेदरलँडमध्ये स्त्रीपुरुषांच्या मेंदूच्या संरचनेचं सर्वेक्षण केलं गेलं. स्त्री आणि पुरुषांच्या मेंदूची संरचना एकसारखी असते का? त्यात फरक असतील तर ते कोणते आणि त्याचे काय परिणाम त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणतात, हा अभ्यासाचा विषय होता. सर्वेक्षणात एक हजार स्त्रीपुरुषांच्या मेंदूतील संरचनेचं निरीक्षण केल्यावर हाती लागलेला निष्कर्ष आश्चर्यजनक होता. असं लक्षात आलं, की स्त्री आणि पुरुष दोघांच्याही मेंदूची संरचना एकसारखी असली तरी स्त्रियांच्या मेंदूतील संदेशवाहिन्यांचं जाळं मेंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूस अधिक प्रमाणात असतं, तर पुरुषांच्या मेंदूमध्ये ते पुढील आणि मागील बाजूस अधिक असतं. पुरुषांचा मेंदू त्याचा डाव्या बाजूचा वापर अधिक प्रमाणात करतो, तर स्त्रियांचा मेंदू दोन्ही बाजूंचा वापर करतो. याचं कारण स्त्रियांच्या मेंदूमधील corpus collosum  मोठा असतो. corpus collosum  म्हणजे मेंदूच्या डाव्या आणि उजव्या भागांना जोडणारं पसरट वाहिन्यांचं जाळं. हा भाग मेंदूतील दोन भागांत संदेशवहनाचं काम करतो. स्त्रियांचा मेंदू पुरुषांच्या तुलनेत आकारानं लहान असतो, मात्र त्यातील वाहिन्यांचं जाळं पुरुषांच्या तुलनेत अधिक प्रमाणात असतं. या वाहिन्यांच्या पसरलेल्या जाळ्यामुळे सर्वसमावेशक चित्र आणि परिस्थिती या दोन गोष्टींचं आकलन पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया अधिक तत्परतेनं आणि चांगल्या प्रकारे करतात, तर परिस्थितीनुसार निर्णय आणि आकलनातून पुढील घटितांचा अंदाज घेणं, स्त्रियांच्या तुलनेत पुरुष चांगल्या प्रकारे करतात. पुरुषांमध्ये एका वेळी एकाच कामाचं आकलन आणि ते पूर्ण करण्याचं कसब असतं, तर स्त्रियांमध्ये एकाच वेळी अनेक कामं करण्याचं कौशल्य असतं.

तसंच स्त्रियांच्या मेंदूतील लिंबिक सिस्टीम ही पुरुषांच्या मेंदूतील लिंबिक सिस्टीमपेक्षा अधिक मोठी असते. त्यामुळे स्त्रिया अधिक भावुक असतात. त्यांच्याकडून प्रतिक्रिया तत्परतेनं येते. मात्र पुरुष प्रतिक्रिया देताना भावुक होत नाही, सावकाश प्रतिक्रिया देतात. भाषेच्या बाबतीतही स्त्रियांचा ओढा शब्द आणि आवाज याकडे अधिक असतो. त्यामुळेच शब्द आणि आवाजाचा साठा त्यांच्या स्मरणात मोठ्या प्रमाणात होतो. यामुळेच पत्रकार, स्वागतनीस, टेलीफोन ऑपरेटर, कॉल सेंटर, अशा वा येथील नोकरीसाठी स्त्रियांना प्राधान्य दिलं जातं. आणखी एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, की कुणीतरी काही विधान करतं, जसं की, ‘तुम्हाला मी चांगलं ओळखते…’ हे विधान पुरुषाला साधं वाटतं, पण एखादी स्त्री सांगते, ‘तुम्हाला कळलं नाही ती काय म्हणाली, पण मला कळलं!’ मेंदूतील या संरचनेच्या फरकामुळे शब्दातून जाणवणाऱ्या आवाजातील अनेकार्थ पुरुषांपेक्षा स्त्रिया चांगल्या प्रकारे समजू शकतात.

पण आताशा परिस्थिती सुधारत आहे. अनेक बाप आपल्या मुलींना आकाश मोकळं करून उडू देत आहेत. सासूवर्ग आपल्या सुनांना समजून घेत त्यांना आपली जागा घेऊ देत आहेत. पण पुन्हा प्रश्न उरतो, की पुरुषांना नेमकं काय हवं असतं बाईकडून? तुम्ही कधी कविता वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल, की कवयित्रीच्या कवितांमध्ये आई वा बाप क्वचित येतो, मात्र बहुतांश कवींच्या कवितेत ‘आई’ कधीतरी येतेच. का घडतं असं? तुम्ही पाहिलं असेल, की अनेक पुरुष लग्नानंतरही आईचा शब्द पडू देत नाहीत. किंवा अनेक पुरुषांना बायका ‘ममाज् बॉय’ चिडवतात. पण कुणा स्त्रीला उद्देशून तुम्ही ‘ममाज् गर्ल’ किं वा ‘डॅडीज् गर्ल’ असं चिडवताना पाहिलंय? नाही? का? फक्त ‘ममाज्  बॉय’च का?

आपण सारे पुरुषसत्ताक व्यवस्थेत वाढलो असलो आणि या व्यवस्थेत स्त्रीला दुय्यम दर्जा असला, तरी या व्यवस्थेत आईला देवीचं स्थान देण्यात आलं आहे. काही स्त्रिया आपल्या मुलावर माया करताना त्यांच्याही नकळत पुरुषसत्ताक व्यवस्थेमुळे मुलीपेक्षा मुलावर जास्त माया करतात. ही माया आणि काळजी मुलांच्या मनातील पुरुषपणा जोजवते. त्या पुरुषाला मोठा करते. प्रत्येक क्षणाला त्याला काय हवं, काय नको याची काळजी घेते. त्याच्या फक्त पडलेल्या चेहऱ्यावरून ओळखते, की आज काहीतरी घडलंय आणि डोक्यावर हात फिरवून आत्मविश्वास देते. संकटाशी लढण्याचं बळ देते. पुरुष घराबाहेर अनेक पातळीवर लढत असतात. या लढाईत अनेकदा त्यांना मात खावी लागते. अपमान सहन करावे लागतात. जिव्हारी लागतील अशा प्रसंगांना सामोरं जावं लागतं. (यामुळेच  तुम्ही पाहा, पुरुषांमध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त असतं.) साहजिकच त्या वेळेस पुरुषाचा ‘अहंकार’ आणि ‘स्वाभिमान’ याला जखम झालेली असते. आणि त्याच्या कोणत्याही जखमेवर लहानपणापासून फुंकर घालत असते ती त्याची आई. पुरुष मोठा झाल्यावर त्याच्या आयुष्यात पत्नी येते. अशा नेमक्या क्षणी, जी स्त्री, न सांगताही त्या पुरुषाची आई होते, त्या स्त्रीवर पुरुष जिवापाड प्रेम करू लागतो. कारण तिच्यात त्याला आई सापडलेली असते. पुरुषाला कधी त्याची काळजी करणारी, तर कधी त्याच्यातला पुरुषीपणा जोजवणारी स्त्री हवी असते. तुम्ही अनेकदा विजोड जोड्या पाहिल्या असतील. अनेक स्त्रियांना मी बोलताना ऐकलंय की, ‘‘कसं गं केलं त्यानं तिच्याशी लग्न? तो किती हँडसम आहे आणि ती कशी काळिबेंद्री आहे नं?’’ तर त्या पुरुषानं त्या स्त्रीचं शरीर पाहिलेलं नसतं. त्या ‘काळ्याबेंद्रया’ बाईत त्या पुरुषाला त्याची काळजी करणारी स्त्री मिळालेली असते. यामागे जितकं कारण पुरुषसत्ताक व्यवस्थेचं आहे, तितकंच कारण भावनिकतेचंही आहे.

खरं तर खऱ्या पुरुषाला ‘फक्त बाई’ नाही, तर ‘आईचं हृदय असलेली पत्नी’ हवी असते. आणि बाईलाही ‘बापाचं हृदय असणारा पती’ हवा असतो. याचं कारण, लग्न असो वा सहजीवन, या सगळ्यात शरीराचं नातं फक्त पहिली काही वर्षं राहतं, मग प्रवास होतो तो मनाकडे. जे शरीरात अडकून पडतात त्यांना मनापर्यंत पोहोचता येत नाही. जे स्त्री-पुरुष शरीर ओलांडून, ते उतरवून पुढे प्रवास करत राहतात ते मनापर्यंत पोहोचतात. शरीराचं नातं अल्पकाळच राहतं, मनाचं नातं कायम टिकतं, अगदी शरीर गेल्यानंतरही.

kiran.yele@gmail.com