डॉ. स्मिता दातार
परदेशात राहाणाऱ्या मुलीचा फोन वाजला. हा फोन नेहमीच्या वेळी नसल्यानं मी जरा काळजीनंच फोन उचलला. लेकीचा आवाज रडवेला जाणवत होता. झालं असं होतं, की लेकीच्या सीनियर कलीगची नोकरी गेली होती. मी कशीबशी तिची समजूत घातली. रात्री निवांत बोलू, म्हणून फोन ठेवला. पण मग मलाच चैन पडेना..
कालपासून वृत्तपत्रात वाचलेल्या बातम्या आठवल्या. अमुकतमुक कंपनी अमक्यानं ‘टेक ओव्हर’ केली, त्यानं हजारो लोकांना कामावरून कमी केलं, अमुक कंपनी तमक्या कंपनीत विलीन झाली, त्या कंपनीनं टेक ओव्हरच्या वेळी पूर्वीच्या लोकांना घरी बसवलं.. बरोबर आहे, लेकीला तिच्या सहकाऱ्याची काळजी वाटत असणारच, पण जास्त काळजी स्वत:च्या नोकरीची वाटत असावी हे मी ताडलं. कुठल्याही दु:खद घटनेनंतर माणूस स्वत:ची त्या ठिकाणी कल्पना करतो आणि ते दु:ख आपलंच आहे असं समजून आणखी दु:खी होतो. माणसाचा स्वभाव आहे तो! पण हार-जीत हा जगाचा नियम आहे. सुखाची आणि दु:खाची पारडी सारखी वर-खाली होत असतात. कुणीतरी कुणाला तरी सतत ‘टेक ओव्हर’ करत असतं. मोठा प्राणी लहान प्राण्यांना भक्ष्य करतो, मोठा मासा लहान माशाला गिळतो. नात्यांमध्येदेखील नवी पिढी जुन्या पिढीला ‘टेक ओव्हर’ करत असते. हेही एक प्रकारचं ‘टेक ओव्हर’च असतं! त्या वेळी आपण कुठल्या बाजूला आहोत? सुपात की जात्यात? त्यावर आपलं आनंदाचं माप ठरतं. ‘टेक ओव्हर’ कुणी कुणाला केलं, हे तेव्हा महत्त्वाचं असतं.
मला माझे आधीचे दिवस आठवले. माझा धो धो चालणारा दवाखाना मला खूप कमी दिवसांत निर्णय घेऊन बंद करावा लागला होता. तो निर्णय आमच्याच हॉस्पिटलच्या भल्यासाठी होता. कारण मी हॉस्पिटल ‘टेक ओव्हर’ केल्यानं आमच्या प्रॅक्टिसला फायदा होणार होता. हॉस्पिटलमध्ये अनुशासन निर्माण व्हायला, रुग्णांची काळजी घ्यायला घरातलं माणूस मिळणार होतं. त्या वेळी माझ्या या ‘टेक ओव्हर’च्या प्रक्रियेत माझे जुने पेशंट दुखावले. मलाही वाटलं, की इतके दिवस आपण खतपाणी घालून फोफावलेलं, जपलेलं रोपटं आपण आपल्याच हातानं खुडतोय. खूप दिवस अस्वस्थ होते मी. शिवाय मी तिथे नाही याचा इतर डॉक्टरांना फायदा होणार होता! शेवटी ‘कुछ पाने के लिये, कुछ खोना पडता हैं’ असं म्हणून हा निर्णय काळजावर दगड ठेवून घेतला आणि काही दिवसांनी जाणवलं, की हा निर्णय बरोबर होता. मला एका मोठय़ा परिघात काम करण्याची नवीन संधी मिळाली होती. असाच एक किस्सा पुन्हा माझ्या आयुष्यात घडला. मी गंभीर आजारी पडले. अथक उपचारांनी त्यातून सहीसलामत बाहेरही पडले. त्या वेळी आयुष्याकडे थांबून बघायला वेळ मिळाला. थेट आयुष्याच्या डोळय़ात डोळे घालून विचारलं, ‘बा आयुष्या, पुन्हा माझ्या वाटय़ाला आला आहेस, तर तुझ्या मनात माझ्यासाठी काहीतरी चांगलंच असलं पाहिजे. इतके दिवस मी माझं आयुष्य आखायला बघत होते. पण ते माझ्या हातात नाहीये, त्यालाही मर्यादा आहेत, याची तू जाणीव करून दिलीस. मग चल, ये, पुन्हा आपण नवी सुरुवात करू. नाऊ यू टेक ओव्हर!’
त्या वेळी थोडा काळ माझं आयुष्य थांबलं होतं. मात्र तेव्हा मिळालेल्या निवांत वेळेमुळे आपण लिहू शकतो याचा शोध लागला. मी माणसं आणि पुस्तकं वाचत गेले आणि लिहीत गेले. मला वाट दाखवणारे गुरू भेटले, खूप मेहनत केली, करतेय आणि त्यातूनच माझ्या सहा पुस्तकांचा, एकांकिकांचा, लघुपटांचा जन्म झाला. आयुष्य फक्त थांबलं होतं, ते संपलं नव्हतं, हे लक्षात आलं. आयुष्य कधी संपत नसतं. ते नदीसारखं प्रवाही असतं. ते लहानशा स्रोतातून जन्म घेतं. खाचखळगे ओलांडतं. कधी उंचावरून प्रपात होऊन कोसळतं, परत संथगतीनं वाहायला लागतं, कधी ते मार्ग बदलतं, कधी आशा-निराशेचे भोवरे तयार होतात, त्यात आयुष्य गरगरत राहातं, कधी लुप्त होतंय की काय असं वाटता वाटता पुन्हा खळाळतं आणि मार्गस्थ होतं.आपल्याला आयुष्याच्या प्रवाहात आपलंच प्रतिबिंब डोकावून पाहता आलं पाहिजे. म्हणूनच या ‘टेक ओव्हर’ला शांत चित्तानं आणि नव्या उमेदीनं सामोरं गेलं पाहिजे. कारण आयुष्यात नेहमीच तुमच्या मनासारखं घडेल असं नाही.
ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना सैन्यात जायचं होतं, पण त्यांची निवड होऊ शकली नाही. त्यांना दु:ख झालं. नाउमेद न होता त्यांनी विज्ञानाची कास धरली आणि एक दिवस असा आला, की भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी त्यांना भारताचे राष्ट्रपती म्हणून सलामी दिली! कधीकाळी सैन्यात भरती होऊ इच्छिणारा एक माणूस आता तिन्ही सैन्यदलांचा प्रमुख म्हणून सन्मान स्वीकारत होता.अशा अनेक यशस्वी माणसांच्या कहाण्या आपण वाचत, ऐकत असतो. मात्र आपली वेळ आली की आपण गर्भगळीत होतो. नुकतंच जग एका अस्थिर काळातून प्रवास करून पुढे गेलं. या काळात खूप उलथापालथ झाली. पण काहींनी या संकटातही संधी शोधल्या,सगळेच यशस्वी होतील असं नाही, पण धडपडणारे या प्रवाहात तरंगू तरी नक्की शकतात.
अनिश्चितता हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. ताणतणाव येतच राहाणार. प्रश्न आहे आपण त्याला सामोरे कसे जातो याचा. येणाऱ्या आव्हानांसाठी आपण स्वत:ला किती तयार ठेवतो याचा. माझ्यासाठी मी एकच गोष्ट लक्षात ठेवते, की आयुष्याचंच आयुष्य क्षणभंगुर आहे! म्हणून आला क्षण सुंदर करायचा असेल तर आयुष्याला थेट भिडता आलं पाहिजे. आव्हानं आली तर न डगमगता त्यातून मार्ग काढला पाहिजे. त्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती, डोळस प्रयत्न आणि सकारात्मक विचारांची कास धरली तर कुठलंही ‘टेक ओव्हर’ सहज पार पडेल. कवी गुरु ठाकूर यांच्या या ओळी हे ‘टेक ओव्हर’ करताना मी मनात ठेवते-
‘संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर’.
drsmitadatar@gmail.com