आपले ‘मन’ हे एक  ‘प्रोजेक्टर’ आहे. त्यात खूप ‘ऊर्जा’ आहे. त्या ऊर्जेचा वापर मी सकारात्मक विचारांसाठी करते आणि आनंदी राहते. त्याचाच उपयोग पुढच्या आयुष्यात झाला. माझ्या पतीचं फेब्रुवारी २०११मध्ये अचानक निधन झाले. आयुष्यात पोकळी निर्माण झाली. पण आमच्या उभयतांच्या आयुष्यात सुरुवातीपासूनच सकारात्मक विचारांचा पाया असल्यामुळे वास्तव स्वीकारून या परिस्थितीतून मी स्वत:ला सावरलं. मला माझ्या छंदानं, पर्णाविष्कार कलेने मोलाची साथ दिली आणि माझी प्रगतीच होत गेली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृत्तपत्रलेखन, दिवाळी अंकातूनही मी लेखन करत असते. वाचनाचीही मला खूप आवड आहे. मला दोन मुलगे आणि एक डॉक्टर मुलगी आहे. त्यांच्याकडे कामानिमित्त जात असते. तेही मुलाबाळांना सुट्टीत औरंगाबादला घेऊन येत असतात. मी औरंगाबादला एकटीच रहाते. पण सगळ्यांत मिळूनमिसळून असल्याने एकटेपणा जाणवतही नाही. मी वाळलेल्या पाना फुलांपासून कलाकृती (शुभेच्छा पत्र, बुकमार्क, पेपरबॅग, फ्रेम्स, फ्लॉवर पॉट इत्यादी) बनवते. या कलाकृती सामाजिक संदेश देऊन सामाजिक जागृती करतात जसे पर्यावरण – ‘झाड लावा दारी चिऊताई येईल घरी.’ ‘बेटी बचाव-पूर्ण उमलू द्या कळी, उमलण्याआधी नको, तिचा बळी.’ रक्तदान, वीज बचत, अवयवदान अशा अनेक सामाजिक विषयावर कलाकृती करून समाज जागृती कार्यात खारूताईचा वाटा उचलते. ‘बेटी बचाव’चे पोस्टर करून येथील हॉस्पिटलमध्ये मी स्वत: जाऊन लावले आहेत. पर्यावरण, ‘पाणी बचत’चे पोस्टर शाळेत लावले आहेत. माझा आणखी एक पाच वर्षांपासून सुरू असलेला उपक्रम म्हणजे ‘पर्णाविष्कार’ यातून ‘पर्णगणेश’ बसवते. त्याच्या भोवतीची पूर्ण आरास नैसर्गिक असते. ‘टाकाऊतून टिकाऊ पर्यावरणपूरक प्रकल्प’ म्हणून शिक्षक-विद्यार्थी मुद्दाम बघायला येतात. सौदी अरेबियन – ओमान तसेच बहरीन येथे तेथील महाराष्ट्र मंडळातर्फे माझ्या कार्यशाळा झाल्या. बहरीनमधील आपले भारतीय राजदूत  मोहनकुमार यांच्यापर्यंत माझी ‘पर्णगणेश’ कलाकृती पोहचली. त्यांनाही खूप आवडली.

या कलेचा प्रसार होऊन या कलेच्या माध्यमातून समाजजागृती व्हावी असा माझा सकारात्मक हेतू असल्यामुळे मी ठिकठिकाणी समरकॅम्प, शाळाशाळांतून महिला मंडळ बचत गट इ. माध्यमातून कार्यशाळा घेत असते. माझ्या परिसरातील सर्व मुलामुलींना ‘टाकाऊतून टिकाऊ’ सर्जनशील असं शिकवत असते. तसच निबंध लेखन, वक्तृत्व आदी साठी मदत करते. ते सर्व माझे बालमित्र आहेत. याचा एक आनंद देणारा अनुभव म्हणजे या वर्षी ‘फ्रेंडशिप डे’च्या दिवशी सकाळी माझ्या दारावर टकटक ऐकू आली, दार उघडलं, तर बघते काय? दारात छोटी छोटी आठ-नऊ वर्षांच्या मुलं-मुली ‘फ्रेंडशिप बँड’ घेऊन उभी. आजी तुम्हाला कोणता रंगाचा फ्रेंडशिप बँड बांधू? या प्रश्नानं मी खूप भांबावून गेले. मुलांच्या मनांत मी त्यांची ‘फ्रेंड’ ही भावनाच मला खूप सुखावून गेली. क्षणार्धात माझा हात फ्रेंडशिप बँडने भरून गेला. हा क्षण छोटा पण आनंद मोठा देऊन गेला.

– अपर्णा चांदजकर, औरंगाबाद</strong>

अखंड कार्यरत

येणारी परिस्थिती आणि अनुभव माणसाला घडवतात. भगवद्गीता सांगते, ‘उद्धरेत् आत्मनात्मानम्.’ आपला उद्धार आपणच करायचा असतो या वचनाचा प्रभाव पडला. कोकणात धार्मिक कुटुंबात जन्म आणि शिक्षण झालं. प्राध्यापक म्हणून नोकरी केली. गेली ३५ वर्षे पहाटे साडेपाच ते रात्री दहा अखंड कार्यरत राहिले. शिवण, विणकाम, भरतकाम, बागकाम, वाचन हे छंद भरभरून जपले. मुळात प्रोफेसर म्हणून काम केले असल्याने वाचनातून लेखन, भाषण हे पण जमले.

विविध व्याख्यानमाला – महाराष्ट्र आणि बृहन् महाराष्ट्रात यात विचार मांडले. मंदिरे, शाळा, कॉलेज, महिला मंडळे, ज्येष्ठ नागरिक संघ यामध्ये व्याख्याने दिली. भगवद्गीता आणि ज्ञानेश्वरी हे मूळ अभ्यासाचे विषय. जैमिनी अश्वमेध, गुरुचरित्र, अमृतानुभव, चांगदेव पासष्ठी, कविकालिदास, श्रीगणेशपुराण, साडेतीन शक्तिपीठे अशा ग्रंथांचा अभ्यास करून व्याख्याने देते आहे. धार्मिक ग्रंथात नेमके काय सांगितले आहे, त्याची उकल झाली की त्यांचा संदर्भ नव्या समाजजीवनात कसा करून घेता येईल, त्यावर भाष्य करताना ग्रंथात जे जसे आहे ते तसेच सांगण्याचे काम करत राहिले तर श्रोत्यांना ते आवडले. चरित्र, कथा, ललित लेख, चिंतनपर लेख इत्यादींवर दहा पुस्तके प्रसिद्ध झाली. गीता धर्म मंडळ, पुणे, ज्ञानेश्वरी या ग्रंथावर परीक्षा घेते. ते स्वाध्याय गेली २० वर्षे तपासते आहे. गीतापठण वर्ग घेते. गीता अभ्यासकांचे शिबीर घेण्याचा प्रयत्न केला.  स्वरूपिणी भगिनी मंडळ ही रजिस्टर संस्था गेली २२ वर्षे कार्यरत आहे. ब्राह्मण सभा डोंबिवलीचे अध्यक्षपद भूषवले. भेटलेली माणसे आणि संस्था यांच्यामुळे मला माझ्या आयुष्यात अखंडपणे कार्यरत राहता आले.

– प्रतिभा बिवलकर

मराठीतील सर्व भरभरून जगताना बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Article about living a beautiful life
First published on: 06-10-2018 at 01:00 IST