– वंदना धनेश्वर

सिकलसेल, थॅलेसेमियाच्या रुग्णांसाठी किंवा अपघातातील प्रचंड रक्तस्राव वा अन्य काही गोष्टींमुळे रक्ताची सातत्याने गरज भासत असते. मात्र जागरूकतेचा अभाव आणि गैरसमजामुळे एकूणच रक्तदानाचे प्रमाण कमी आहे, स्त्रियांमध्ये तर ते खूपच कमी आहे. खरं तर स्त्रियाही रक्तदानासाठी पुढे येतात, मात्र अनेकदा शारीरिक कारणांमुळे त्या रक्तदान करू शकत नाहीत. ‘राज्य रक्त संक्रमण समिती’नुसार गेल्या वर्षी फक्त १ लाख ३० हजार स्त्रियांनी रक्तदान केले आहे. कोणती आहेत त्यामागची कारणे आणि रक्तदान वाढवण्यासाठी काय करायला हवे?

माझी आई नोकरी करायची. विद्याुत मंडळात कर्मचारी असलेल्या आईने ४० वर्षांच्या सेवेनंतर निवृत्ती घेतली, तेव्हा ती अधिकारीपदावर पोहोचली होती, पण मला समज आली तेव्हापासून आठवतंय की तिला मी कधीही नाश्ता करून ऑफिसला जाताना बघितलेलं नाही. पहाटेचा चहा, नंतर ऑफिसला गेल्यावर चहा, दुपारी दीड वाजता जेवण, मग संध्याकाळचा चहा एवढंच. संयुक्त कुटुंब असल्यामुळे रात्री घरी आल्यानंतर सर्वांचा स्वयंपाक बनवून मगच जेवायचं, असा तिचा रोजचा शिरस्ता. जेवल्यानंतर आम्ही सहज झोपी जायचो. मात्र रांधलेलं उरलं असेल का? किंवा कमी पडलं असेल तर आई काय करत असेल? या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची तसदी माझ्या पिढीने घेतली नाही.

हिवाळ्यात कुटुंबासाठी तिने बनवलेले डिंक, उडीद-मेथी लाडू, उन्हाळ्यातली नाचणीची खीर, सातूचं पीठ आम्ही आनंदाने मटकावलं, पण यापैकी एकही जिन्नस तिने कधी स्वस्थ बसून खाल्लेला मी बघितलेलं नाही. घरातली कामं करता करता व्यायाम होतोच असा तिचा ‘समज’ होता. माझ्या जन्माच्या वेळी आईला प्रसवकळा सुरू व्हायच्या थोडा वेळ आधी तिने रात्रीच्या उरलेल्या भाताला फोडणी देऊन तो खाल्ला होता, असं तिने एकदा मला बोलण्याच्या ओघात सांगितल्याचं आठवतंय…

वयाच्या पन्नाशी-साठीच्या मागेपुढे असणाऱ्या बहुसंख्यांनी स्वत:च्या आईला याच पद्धतीने जगलेलं पाहिलं असेल याची मला खात्री आहे. आई नोकरदार किंवा गृहिणी इतकाच काय तो फरक. सगळ्या क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने वा आघाडीवर असणाऱ्या स्त्रिया एका क्षेत्रात मागे पडलेल्या दिसतात, ते म्हणजे रक्तदान. यामागे अर्थातच अनेक कारणे आहेत, त्यातील महत्त्वाचं म्हणजे वर उल्लेखलेली जीवनशैली.

‘स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन कमिटी’ अर्थात ‘राज्य रक्त संक्रमण समिती’कडे दररोज आपल्या राज्यातील सर्व रक्तकेंद्रांचा अहवाल सादर केला जातो. या अहवालामध्ये रक्त केंद्रात जमा होणाऱ्या रक्ताचा दैनंदिन तपशील, सर्व रक्तगटांचा, रक्तघटकांचा उपलब्ध साठा आदींची नोंद ठेवली जाते. या समितीने दिलेल्या अलीकडच्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये, राज्यातील रक्त केंद्रांचं एकूण रक्तसंकलन हे २१ लाख ६२ हजार युनिट्स (एक युनिट म्हणजे ३५० मिली. किंवा ४५० मिली.) इतकं झालं. या रक्तसंकलनापैकी पुरुष रक्तदात्यांची संख्या होती २० लाख ३२ हजार इतकी तर स्त्री रक्तदात्यांची संख्या होती १ लाख ३० हजार. टक्केवारीच्या भाषेत बोलायचे झाल्यास २०२४ मध्ये रक्तदान करणाऱ्या पुरुषांचा टक्का होता ९३.९८ आणि स्त्री रक्तदात्यांचा टक्का होता ६.१ इतका. स्त्रिया रक्तदानात मागे आहेत, या विधानाच्या समर्थनार्थ ही टक्केवारी पुरेशी बोलकी ठरावी.

रक्तदानात पुरुषांचा टक्का अधिक असण्याच्या कारणांमध्ये, त्यांना मासिक पाळीचा अडसर नसणं आणि पारंपरिक पुरुषप्रधान मानसिकता यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. पुरुष अधिक कष्ट करतात त्यामुळे चौरस-पौष्टिक आहाराची त्यांनाच अधिक गरज असते, या कैक वर्षं जुन्या पिढ्यांच्या विचारसरणीमधून आजही कित्येकांकडे मुलग्यांच्या जन्मापासूनच त्यांच्या पालनपोषणाकडे, आहार-विहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. विशेषत: ग्रामीण पातळीवर तर नक्की. शिवाय पुरुषांनी स्वत:च्या आरोग्याला प्राथमिकता देणं हे जितकं सहज स्वीकारलं जातं तितकं स्त्रियांनी स्वत:साठी वेळ काढणं आजही स्वीकारलं जात नाही. मासिक पाळी, गर्भारपण तसेच योग्य आहार न घेतल्याने रक्तदानासाठी आवश्यक हिमोग्लोबिनची पातळी स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा कमी असते.मात्र ती जाणिवपूर्वक वाढवणे गरजेचे आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे बळावलेले विविध आजार, रस्ते अपघात, अन्य काही अपघात अशा विविध कारणांमुळे रक्त आणि रक्तघटकांची मागणी सतत वाढत असते. मात्र रक्ताचा तुटवडा सर्वत्रच भासतो. रक्तदानाचं महत्त्व पटवून देण्यातल्या मर्यादा, स्वेच्छिक रक्तदान कार्यक्रमांची पुरेशा प्रमाणात आणि नियोजनबद्ध अंमलबजावणी न होणे, रक्तदानाबद्दलचे गैरसमज, रक्तदान शिबिरांसाठी अपुऱ्या पायाभूत सुविधा, प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता ही रक्ताच्या मागणी-पुरवठ्यातील तफावतीची काही कारणे. विशेष म्हणजे वेगवेगळ्या उत्पन्न श्रेणीमधील लोकांमध्ये रक्तदानाच्या बाबतीत तफावत असल्याचं, जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO सांगते.

‘लॅन्सेट’च्या एका अहवालानुसार, भारतातील रक्ताची मागणी ही पुरवठ्यापेक्षा अधिक आहे. विविध रक्तप्रकार, रक्ताशी संबंधित आजार जसे की, रक्तक्षय, सिकलसेल, थॅलेसेमिया अशा रुग्णांसाठी तर रक्तदाते कमी असणं ही किती आव्हानात्मक परिस्थिती आहे याचा आपण केवळ अंदाजच लावू शकतो. ही सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता स्त्रियांनीही गैरसमज टाळून रक्तदानात सक्रिय योगदान देणं, त्यासाठी स्वत:च्या आरोग्याकडे सातत्याने लक्ष देणं किती आवश्यक आहे, याची कल्पना आली असेलच.

रक्तदानातला स्त्रियांचा टक्का वाढण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी करता येतील –

कायद्याचं शिक्षण घेणारी अंकिता जाधव म्हणते, ‘‘मासिक पाळीतील रक्तस्रावामुळे शरीरातलं रक्त कमी होतं. त्यामुळे स्त्रियांनी रक्तदान करू नये असं आई सांगायची. म्हणून मी कधी रक्तदान केलं नाही.’’

अंकिता आणि तिच्यासारख्या अनेकींचा हा गैरसमज आहे. वास्तविक, स्त्री-पुरुषांमधल्या या नैसर्गिक फरकामुळेच स्त्रियांसाठी रक्तदानाची अट ही दर चार महिन्यांची आहे. अर्थात त्या बरोबरीने वाढता रक्तदाब, मासिक पाळीचे पाच दिवस, गर्भावस्था, स्तन्यदा माता, नजीकच्या काळात झालेल्या शस्त्रक्रियेचा अपवाद वगळता सर्व स्त्रिया रक्तदान करू शकतात. मात्र त्यासाठी त्या स्त्रीच्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी कमीतकमी १२.५ ग्रॅम प्रति डेसीलिटर असायला हवी आणि वजन ४५ किलोपेक्षा अधिक तसेच वय १८पेक्षा जास्त हवे या पूर्वअटी आहेत.

नियमित रक्तदानाच्या लाभाबद्दल ‘ब्लड ट्रान्सफ्युजन’ अधिकारी डॉ. शुभांगी चांडगे यांनी सांगितले, ‘‘रक्तदानाच्या ६० ते ९० दिवसांनंतर शरीरात लाल रक्तपेशी तयार होतात. कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. शरीरातील अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होण्यासाठी लोहाची पातळी योग्य असणे गरजेचे असते. ही पातळी संतुलित राखण्याचे काम रक्तदानामुळे साध्य होते. हृदयविकाराचा धोका कमी होतो.’’ याशिवाय एक फायदा असा की, रक्तदानाच्या निमित्ताने केली जाणारी आरोग्य तपासणी ही कदाचित गंभीर आजारांच्या बाबतीत ‘खतरे की घंटी’ ठरू शकते. वयाची अठरा वर्षं पूर्ण झाल्यानंतर रक्तदानासाठी गेलेल्या अर्चना देवगिरीकर-पिसू या आपल्या मैत्रिणीचं हिमोग्लोबिन कमी भरलं. मात्र रक्तदानाचा ठाम निश्चय केलेल्या अर्चनाने पुढील काही दिवसांत स्वत:च्या आहारावर लक्ष केंद्रित केलं. हिमोग्लोबिन वाढवणाऱ्या अन्नघटकांचा, पूरक पदार्थांचा आहारात समावेश केला. व्यायामासाठी वेळ काढला. विशेष म्हणजे यात सातत्य राखलं. त्यामुळे लग्न, प्रसूतीनंतरची काही वर्षं वगळता गेल्या अनेक वर्षांपासून अर्चना नियमित रक्तदाती आहे. अर्चनासारखीच सकारात्मक वृत्ती प्रत्येकीने ठेवल्यास, जीवनशैलीत बदल घडवल्यास त्यादेखील रक्तदानात महत्त्वाचा वाटा उचलू शकतील.

सकारात्मक मानसिकता हे कृतिशीलतेचं मूळ आहे. रक्तदानाची केवळ इच्छा असून उपयोग नाही. त्या दृष्टीने केले जाणारे प्रयत्न, त्यातलं सातत्य अंतिमत: प्रत्यक्ष कृतीत बदलेल. स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देणं, संतुलित आहार, ऋतुमानानुसार मिळणाऱ्या भाज्या, फळाचं नियमित सेवन, व्यायाम याकडे स्त्रियांनी आवर्जून लक्ष द्यायला हवं. हिमोग्लोबिन, लोहाची पातळी व्यवस्थित राखण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करायला हवेत.

अठराव्या वाढदिवसाला पहिल्यांदा रक्तदान केल्यानंतर आजवर १३ वेळा रक्तदान केलेली साक्षी तिवारी म्हणते, ‘‘पहिल्यांदा रक्तदान केल्यानंतर मानसिक समाधान मिळालं. अशा समाधानासाठी मी स्वत:कडे नियमित लक्ष देण्याचं ‘टार्गेट’च डोळ्यासमोर ठेवलंय. त्यामुळे रक्तदानाचा आनंद तर मिळतोच, परंतु त्यामुळे माझ्या संपूर्ण आरोग्याचाही विचार केला जातो.’’

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. वैशाली खडके म्हणतात, ‘‘पूर्वी स्वयंपाकासाठी लोखंडाची भांडी वापरली जायची. त्यामुळे आहारातून लोह मिळायचं. आजकाल नॉनस्टिक भांड्यांचा वापर वाढलाय. आहार-विहार-जीवनशैलीमध्ये स्त्रियांनी जाणीवपूर्वक बदल करायला हवेत. दैनंदिन कामात थकवा जाणवत असेल, दम लागत असेल तर तज्ज्ञांचा लगेच सल्ला घ्यायला हवा. ’’

पुण्याच्या गौरी सदावर्ते-श्रीगिरी या मैत्रिणीला रक्तदानाबद्दल माहिती आहे. ते का करावं याबद्दलही तिला पुरेशी जाणीव आहे. मात्र इच्छा असूनही कामाच्या रगाड्यात तिला आजवर रक्तदान करता आलेलं नाही. अर्थात गौरी स्वत:च्या मुलीला मात्र रक्तदानासाठी कायम प्रोत्साहन देते. स्त्रियांनी स्वत:च्या आरोग्याकडे लक्ष देण्याचे मनावर घेतल्यास संपूर्ण कुटुंब सदस्यांनी तिला सक्रिय पाठबळ द्यायला हवं. स्त्री स्वत:साठी वेळ काढत असेल तर कौटुंबिक जबाबदाऱ्यांची, दैनंदिन कामांची सदस्यांमध्ये वाटणी करायला हवी. स्व-आरोग्याची काळजी घेण्याच्या या प्रवासात कुटुंबदेखील सोबत आहे या विश्वासाने स्त्रियांना हुरूप येऊ शकतो.

जागरूकतेचा अभाव हेदेखील स्त्री रक्तदान कमी असण्याचं प्रमुख कारण असल्याचं, मराठवाड्यातील ‘दत्ताजी भाले रक्त केंद्रा’च्या वैद्याकीय संचालक डॉ. मंजूषा कुलकर्णी सांगतात. त्यांच्या केंद्रातर्फे स्त्रियांचा रक्तदानातला टक्का वाढवण्यासाठी किशोरवयीन तरुणींसाठी आरोग्य मार्गदर्शन कार्यशाळा, व्याख्याने, शिबिरे, नवरात्रात महिला मंडळांमध्ये स्त्री आरोग्याबद्दल जागृती, हिमोग्लोबिन चाचणी उपक्रम हाती घेण्यात येतात. त्यांचे कार्यालयीन सहकारीदेखील विविध औचित्याने स्वत:च्या निवासी भागात समुपदेशन कार्यक्रमासाठी पुढाकार घेतात. स्त्रियांचं स्वत:च्या आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष आणि रक्तदान जागृती क्षेत्रात सामूहिक प्रयत्नांचा अभाव याबद्दल त्या खंत व्यक्त करतात. रक्तदान हा जसा आरोग्याशी निगडित विषय आहे तसाच तो सामाजिक जाणिवेशीदेखील निगडित आहे. त्यामुळेच सामूहिक प्रयत्नांप्रमाणेच त्याला वैयक्तिक प्रयत्नांचीदेखील जोड मिळण्याची गरज डॉ. मंजूषा व्यक्त करतात.

क्रिकेटमध्ये बॅटिंगसाठी पहिल्यांदा येणाऱ्या खेळाडूला ओपनिंग बॅट्समन म्हटले जाते. तो अधिकाधिक धावा काढून डावाची जितकी चांगली सुरुवात करेल तितकी नंतरच्या खेळाडूंना प्रेरणा मिळते. स्त्री आरोग्याचंही तसंच आहे. स्वत:च्या कुटुंबातील स्त्री आरोग्याबाबत ‘ओपनिंग बॅट्समन’ होण्याची आपल्याला संधी आहे. कुटुंबीयांना आरोग्याच्या उत्तम सवयी लावणं, दैनंदिन जीवनशैलीत, आहार-विहारात जाणीवपूर्वक बदल करायला लावणं, त्यात सातत्य राखण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं इतकं तर आपण करूच शकतो.

हिमोग्लोबिनची कमतरता

रक्तक्षय वा अॅनिमिया म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणं. हिमोग्लोबिन हे लाल रक्तपेशींमध्ये असणारं एक प्रथिन आहे, जे ऑक्सिजनला शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. ती क्षमता कमी झाल्यास त्याचा सर्वच अवयवांवर परिणाम होतो, त्यात हृदयाचाही समावेशअसतो. ‘राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवाला’नुसार, १५ ते ४९ वयोगटांतील ५७ टक्के स्त्रियांमध्ये रक्तक्षय असतो. स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष, मासिक पाळी, प्रसूतीदरम्यान होणारा रक्तस्राव ही स्त्रियांमध्ये हिमोग्लोबिन कमी असण्याची प्रमुख कारणं आहेत. ते वाढवणं स्त्रीच्या आणि तिच्या कुटुंबाच्या हातात असतं.

हिमोग्लोबिन कसं वाढेल?

हिरव्या पालेभाज्या, बीट, गूळशेंगदाणा लाडू, चिक्की, राजगिरा लाह्या, ऋतुमानानुसार उपलब्ध फळं, सुकामेवा आहारात असायला हवं. एकूणच समतोल आहार व लोहयुक्त अन्नघटकांच्या सेवनाने रक्तामधील लोहाची पातळी नियमित होण्यास मदत होते.

हिमोग्लोबिन कमी झाल्यास

रक्तक्षय असल्याने प्रचंड अशक्तपणा येतो. थकवा जाणवतो, फिकट त्वचा, चक्कर येणं, श्वासोच्छ्वासाला त्रास वा डोकं दुखणं, हृदयाचे ठोके वाढणं, कामात लक्ष केंद्रित न होणं, केस गळणं ही लक्षणं दिसतात.

मातामृत्यू टाळण्यासाठी…

गर्भवती असताना आणि बाळंतपणाच्या वेळेस होणारा अतिरक्तस्राव हे मातामृत्यू (maternal mortality ) होण्यामागच्या चार प्रमुख कारणांपैकी एक महत्त्वाचं कारण आहे. या स्त्रियांना संक्रमणासाठी वेळेवर रक्त उपलब्ध झाल्यास त्यांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे मातामृत्यूचं प्रमाण कमी होऊ शकतं. ही गोष्ट लक्षात घेऊन स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुढाकार घेऊन रक्तदान केलं पाहिजे. आपण मुलगी किंवा स्त्री असल्यामुळे, मासिक पाळी आणि गर्भधारणेच्या कारणामुळे रक्तदान करू शकत नाहीत, हा समज दूर होणं गरजेचं आहे. त्याबाबतीत जनजागरण झाल्यास स्त्रियादेखील रक्तदानाच्या बाबतीत पुढाकार घेतील.

डॉ. किशोर अतनूरकर, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि स्त्री आरोग्य अभ्यासक

(लेखिका मराठवाड्यातील ‘दत्ताजी भाले रक्त केंद्रा’च्या अधिकारी आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

vandana.dhaneshwar@gmail.com