कर्करोग होणे म्हणजे त्याच्याशी सामना करणाऱ्या रुग्णासाठी ती अनेकदा दीर्घकाळ आणि सातत्यपूर्ण चालणारी उपचारांची प्रक्रिया असते. कारण कर्करोग बरा झाला तरी त्या व्यक्तीला पुन्हा पूर्वीसारखे आत्मविश्वासाने जगण्यासाठी लागणारे शारीरिक, मानसिक बळ मिळवणे गरजेचे असते. त्यासाठी मदत करते ती ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ ही उपचारपद्धती. ऑक्टोबर महिना जगभरात ‘स्तन कर्करोग जागरूकता महिना’ म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने या उपचारपद्धतीविषयी ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्ट डॉ. श्रेयसी घाटकर यांचा लेख.

जगभरात दरवर्षी ऑक्टोबर महिना हा ‘स्तन कर्करोग जागरूकता महिना’ म्हणून साजरा केला जातो. या मोहिमेचे प्रतीक म्हणून गुलाबी रंगाची रिबन वापरली जाते. हा महिना स्तनांच्या कर्करोगाविषयी जागरूकता वाढविण्याचा आणि कर्करोगाशी लढा देणाऱ्या रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी असतो. कर्करोगाशी सामना करणाऱ्या रुग्णांचा प्रवास निदान होण्यापुरता मर्यादित नसतो, तर ती काही काळ चालणारी, सातत्यपूर्ण उपचारांची प्रक्रिया असते. कर्करोगातून बरे होणे म्हणजे फक्त वैद्याकीय उपचार नव्हे, तर शरीराची हालचाल, कार्यक्षमता आणि दैनंदिन जीवनशैली पुन्हा पूर्वीच्याच कार्यक्षमतेने जगण्याचाही भाग असतो. त्यामुळे कर्करोग उपचारातील एक अत्यावश्यक आणि प्रभावी घटक म्हणून ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ महत्त्वाची भूमिका बजावते.

‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ ही कर्करोगग्रस्तांना पुन्हा पूर्वीचे आयुष्य जगायला मदत करणारी एक विशेष शाखा आहे, जी या व्यक्तींना भेडसावणाऱ्या शारीरिक, मानसिक आव्हानांवर मात करण्यास साहाय्य करते. सामान्य व्यायाम पद्धतींपेक्षा वेगळी, अशी ही ‘फिजिओथेरपी’ प्रत्येक रुग्णाच्या निदान, उपचाराच्या टप्प्यांनुसार आणि आरोग्य स्थितीनुसार वैयक्तिकरीत्या आखली जाते. या माध्यमातून रुग्णांना स्वत:च्या शारीरिक हालचालीत लवचीकता आणून, पुन्हा स्वावलंबी जीवन जगण्यास मदत होते. कर्करोगावर वेळीच उपचार केले, तर रुग्णाचा जीव वाचू शकतो. परंतु त्यानंतर रुग्णांना होणाऱ्या वेदना, जाणवणारा अशक्तपणा, थकवा, सूज आणि शरीररचनेतील बदल यांसारख्या दीर्घकालीन परिणामांचा सामना करावा लागू शकतो. अशा वेळी ऑन्कोलॉजिस्ट आणि सर्जन यांच्या सान्निध्यात राहून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्ट’ कर्करोग उपचारातील गुंतागुंत आणि दुष्परिणाम कमी करून त्यांना दीर्घकाळ प्रभावी, सुसह्य उपचार मिळवून देण्यासाठी मदत करतात.

लवकर उपचारांचे महत्त्व

अनेकांचा असा गैरसमज असतो की स्तनांचा कर्करोग असणाऱ्या रुग्णांना पुन्हा पहिल्यासारखे दैनंदिन आयुष्य जगायला लावू शकणारी प्रक्रिया फक्त कर्करोग उपचार पूर्ण झाल्यावरच सुरू होते. प्रत्यक्षात, ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ निदानाच्या टप्प्यापासूनच सुरू केली जाऊ शकते. रुग्णाने आपल्या आजाराची लवकर दखल घेतल्याने उपचारांच्या दुष्परिणामांवरही नियंत्रण ठेवता येते आणि उपचारादरम्यान शारीरिक वेदना सहन करण्याची क्षमताही वाढते. शस्त्रक्रियेपूर्वी केले जाणारे ‘पूर्व-पुनर्वसन’ (प्रीहॅबिलिटेशन) रुग्णांना शस्त्रक्रियेमुळे येणाऱ्या ताणावर मात करण्यासाठी मदत होते. उपचारादरम्यान शरीराची सहनशक्ती वाढवता येते. शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपी ही वेदना, तीव्र थकवा, स्नायूंचा अशक्तपणा, लिम्फीडेमा (सूज), शस्त्रक्रियेनंतरची ताठरता आणि तोल बिघडणे यांसारख्या समस्यांवर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

दुष्परिणामांवर नियंत्रण

स्तनांच्या कर्करोगाच्या उपचारामध्ये साधारणत: शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडिएशन आणि हार्मोनल थेरपीचा समावेश असतो आणि प्रत्येक उपचारांचे काही विशिष्ट दुष्परिणाम आढळतात. शस्त्रक्रियेनंतर रुग्णांना जखमेच्या ऊतींमुळे खांद्यामध्ये कडकपणा येऊ शकतो व हालचाल मर्यादित होऊ शकते. ‘लिम्फीडेमा’ (हाताची सूज) आणि ‘अॅक्सिलरी वेब सिंड्रोम’ (दंड किंवा काखेत ताण जाणवणाऱ्या वेदनादायक पट्ट्या हालचाल मर्यादित करू शकतात.) हे त्रास इतके वाढू शकतात की कपडे घालणे, केस विंचरणे यांसारखी दैनंदिन कामेही कठीण होतात. मात्र, वेळेवर आणि योग्य पद्धतीने घेतलेली फिजिओथेरपी रुग्णांची कार्यक्षमता पूर्वीप्रमाणेच हळूहळू वाढायला मदत होते.

उदाहरण द्यायचं झालं तर सुमनर्ताइंचं देता येईल. त्या शाळेत इंग्रजीच्या शिक्षिका होत्या. स्तन कर्करोगाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांच्या उजव्या हाताला तीव्र वेदना आणि खांद्यात कडकपणा आला. फळ्यावर लिहिणं, वहीत तपासणं आणि खडू धरून उभं राहणं त्यांच्यासाठी अशक्य होत होतं. त्या खूप खचल्या होत्या. ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्टने त्यांना खांद्याचे हालचाल करण्याचे सौम्य व्यायाम, हात उचलण्याचे स्ट्रेचिंग आणि स्नायू मजबूत करणारे व्यायाम शिकवले. सुरुवातीला त्रास झाला, पण त्यांनी सातत्य ठेवलं. काही आठवड्यांत हाताची हालचाल सुधारली, वेदना कमी झाल्या, आणि आत्मविश्वास परत आला. अखेर सुमनताई पुन्हा वर्गात उभ्या राहिल्या आणि फळ्यावर सहज लिहू लागल्या, या फिजिओथेरपीमुळे त्यांना पुन्हा त्यांच्या आवडत्या कामाकडे परत जाता आलं.

‘केमोथेरपी’ किंवा ‘इम्युनोथेरपी’दरम्यान सर्वात वारंवार केली जाणारी तक्रार म्हणजे थकवा, जो सतत खोलवर जाणवणारा, आणि विश्रांती घेतल्यावरही कमी न होणारा असतो, मात्र योग्य पद्धतीने केलेले व्यायाम आणि संतुलित आहारामुळे थकवा कमी होऊन हळूहळू शारीरिक शक्ती पुन्हा भरून निघण्यास मदत होते. याशिवाय, काही रुग्णांना केमोथेरपीमुळे हात-पायांच्या तळव्यांमध्ये झिणझिण्या, बधिरपणा, मुंग्या येणे किंवा जळजळ जाणवू शकते. ज्यामुळे चालणे, शरीराचा तोल राखणे किंवा हातात पेन धरण्यासारखी साधी कामे करणेही कठीण होते. अशा परिस्थितीत ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ रुग्णांना सुरक्षितपणे हालचाल करण्यास आणि आत्मविश्वास परत मिळविण्यास मदत करतात.

रीमा ही ३८ वर्षांची संगणक प्रोग्रामर होती. तिचं काम सततच्या टायपिंगवर अवलंबून होतं. तिला स्तनाचा कर्करोग झाला आणि केमोथेरपीनंतर तिला बोटांच्या टोकांमध्ये झिणझिण्या व बधिरता जाणवू लागली, ज्यामुळे टायपिंग करणे अत्यंत कठीण झाले. ही समस्या तिच्या कामगिरीवर आणि आत्मविश्वासावर परिणाम करत होती. वैद्याकीय आन्कोलॉजिस्टने योग्य औषधोपचार सुरू केले आणि ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्टने हाताच्या व्यायामांचा, सूक्ष्म हालचालींचा, तसेच सेन्सरी रिअॅज्युकेशन तंत्रांचा समावेश असलेला व्यायाम दिला. नियमित थेरपी आणि संयमामुळे रीमाच्या हातांची संवेदना आणि कौशल्य हळूहळू सुधारले, ज्यामुळे ती पुन्हा आत्मविश्वासाने आपल्या कामावर परतली.

‘रेडिएशन’ थेरपीनंतर

‘रेडिएशन थेरपी’नंतर ऊतींमध्ये ताठरता किंवा कडकपणा (फायब्रोसिस) निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे वेदना आणि हालचालींवर मर्यादा येतात. उदाहरणार्थ, डोके व मानेच्या कर्करोग रुग्णांमध्ये तोंड उघडण्याची मर्यादा (ट्रिस्मस) निर्माण होऊ शकते, तर जनन-मूत्र संस्थेशी संबंधित कर्करोग असलेल्या रुग्णांना खोकताना, शिंकताना किंवा चालताना नकळत लघवी(युरीनरी इन्कॉन्टिनन्स)होते.

स्मिता, ४५ वर्षांची गृहिणी, स्तनाचा कर्करोग शस्त्रक्रिया व रेडिएशन दिल्यानंतर, लिंफेडीमा झाल्यामुळे त्रस्त होती. तिच्या हाताला सूज, जडपणा, कपडे घट्ट होणे आणि शरीराच्या पोश्चरमध्ये बदल होऊ लागला. या शारीरिक बदलांमुळे तिचा आत्मविश्वास कमी झाला आणि घरकाम करणे, लोकांमध्ये वावरणे अवघड वाटू लागले. ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्टने तिला लिंफ ड्रेनेज मसाज, हलके व्यायाम, श्वसन तंत्र, आणि कॉम्प्रेशन स्लीव्हचा योग्य वापर शिकवला. इंटरमिटंट न्युमॅटिक कंप्रेशन (IPC) हाही उपचार केला गेला, यात फुगवता येणारा स्लीव्ह आणि पंप वापरून सुजलेल्या भागावर हलका दाब दिला जातो, ज्यामुळे लसिका द्रवाची हालचाल होऊन सूज कमी होते. वैद्याकीय तज्ज्ञांच्या योग्य मार्गदर्शनाखाली ही थेरपी घेतल्याने सुजेवर प्रभावीपणे नियंत्रण येऊ शकले. या सर्वामुळे स्मिताने पुन्हा आत्मविश्वासाने आपली घरगुती कामांना आणि दैनंदिन आयुष्याला सहज सुरूवात केली. लोकांमध्ये पूर्वीसारखी आनंदाने मिसळू लागली.

विविध कर्करोगानुसार वेगवेगळ्या विशेष फिजिओथेरपी पद्धती उपलब्ध आहेत.

स्तन कर्करोगासाठी: खांद्याचे हॅबिलिटेशन आणि लिम्फएडिमाचे व्यवस्थापन

डोके व मानेच्या कर्करोगासाठी: गिळण्याचे व्यायाम

पेल्विक (श्रोणि प्रदेश किंवा ओटीपोटाचा खालचा भाग) कर्करोगासाठी: तेथील स्नायूंच्या बळकटीकरणासाठी व्यायाम

हाडांच्या ट्युमरसाठी: चालण्याचे पुन:प्रशिक्षण ( gait retraining)

फुफ्फुस कर्करोगासाठी: श्वासोच्छ्वास सहजता आणि थकवा कमी करण्याचे प्रशिक्षण

पूर्व-पुनर्वसन ( Prehabilitation) पासून ते उपशामक काळजी ( Palliative Care) पर्यंत, ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ प्रत्येक टप्प्यावर रुग्णांना साथ देते. या प्रक्रियेत सुरक्षितता नेहमीच प्राधान्यक्रमावर ठेवली जाते, विशेषत: हाडांमध्ये कर्करोग पसरलेला ( bone metastasis) असल्यास किंवा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची अवस्था नाजूक असताना ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्ट’ जागतिक पुनर्वसन मानकांनुसार, पुराव्यांवर आधारित वैयक्तिक कार्यक्रम तयार करतात, जे शारीरिक हालचालींना प्रोत्साहित करतात आणि एकाच वेळी संभाव्य हानीपासून संरक्षण करतात.

आत्मविश्वास व पुन्हा जीवनाची उमेद

जेव्हा कर्करोगाचं निदान होतं, तेव्हा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घाबरून जातात. त्यांना वाटतं की रुग्णाने व्यायाम केल्यास त्याचे दुष्परिणाम होतील किंवा प्रकृती आणखी बिघडेल. त्यामुळे रुग्ण जास्तीत जास्त आराम करायला लागतात. हळूहळू ते रोजच्या हालचाली, शारीरिक क्रिया आणि दैनंदिन कामांपासून दूर राहू लागतात. त्यामुळे ते आपल्या कुटुंबापासून, कामापासून आणि आवडीच्या गोष्टींपासूनही दुरावतात. हीच गोष्ट त्यांच्या शरीराच्या हालचालींसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अडथळा ठरते. ऑन्कोलॉजिस्टचा योग्य वैद्याकीय सल्ला आणि ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्टकडून दिलेल्या योग्य व्यायाम मार्गदर्शनानुसार, सुरक्षित अशा एरोबिक आणि रेझिस्टन्स प्रकारच्या व्यायामांचा समावेश केल्याने रुग्णांना दैनंदिन कामं सुरळीतपणे करता येतात. ऑन्कोलॉजी फिजिओथेरपिस्ट केवळ स्नायू मजबूत करत नाहीत, तर रुग्णांचा आत्मविश्वास वाढवतात, चिंता आणि नैराश्य कमी करतात, शरीराबद्दलची सकारात्मक भावना निर्माण करतात आणि उपचारानंतर शारीरिक हालचालींबाबतची भीती दूर करतात. ते या कठीण प्रवासात रुग्णांचे विश्वासू आणि आधार देणारे एक विश्वासू सोबती बनतात.

शेवटी, ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ ही फक्त शारीरिक उपचारांची प्रक्रिया नाही, तर ती आत्मविश्वास परत मिळविण्याची आणि पुन्हा जीवनाची उमेद मिळविण्याची प्रक्रिया आहे. जेव्हा एखादा रुग्ण कर्करोग शस्त्रक्रियेनंतर पूर्वीप्रमाणे पुन्हा हात वर करतो, वेदनांशिवाय चालतो, किंवा रेडिएशननंतर खोल श्वास घेतो, ही केवळ शारीरिक प्रगती नसते, तर तो जीवन पुन्हा नव्याने जगण्याचा आनंद असतो. हा आशेचा असा प्रवास आहे, ज्यामध्ये कर्करोगग्रस्त रुग्ण पुन्हा आपल्या प्रियजनांना मिठी मारू शकतात, वेदनांशिवाय जगू शकतात आणि दैनंदिन जीवनातील छोट्या पण अर्थपूर्ण क्षणांचा आनंद पुन्हा अनुभवू शकतात. गुलाबी रंगाची फित आणि कर्करोग जागरूकता मोहिमांपलीकडे, हा आनंद हीच खरी उपचारयात्रा आणि विजयाची खरी व्याख्या आहे.

कर्करोगातून बरे होणे म्हणजे फक्त वैद्याकीय उपचार नव्हे, तर शरीराची हालचाल, कार्यक्षमता आणि दैनंदिन जीवनशैली पुन्हा पूर्वीच्याच कार्यक्षमतेने जगण्याचाही भाग असतो. त्यामुळे कर्करोग उपचारातील एक अत्यावश्यक आणि प्रभावी घटक म्हणून ‘ऑन्कोलॉजी फिजिओथेरपी’ महत्त्वाची भूमिका बजावते.