विनोद द. मुळे

उच्चशिक्षित, नोकरदार मुलगा-सून किंवा मुलगी-जावई आपापल्या नोकरी-व्यवसायांमध्ये आणि घरी त्यांची लहान मुलं आजी-आजोबांकडे सोपवलेली, ही परिस्थिती सर्रास दिसणारी. मुलांची नोकरीत बदली झाली, की या ज्येष्ठ नागरिकांचीही त्यांच्याबरोबर ते जातील तिथे ‘बदली’ होते, तर काहीवेळा ‘तुम्ही घरात आहात तर मुलांना सांभाळाच,’ हे न सांगता त्यांच्यावर थोपवलं जातं. यात वयस्कांच्या इच्छेचा, क्षमतेचा आणि मनाचा विचार केला जातो का?..

Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
family members
मनातलं कागदावर: साधू या सूरतालाशी लय!
Savitri jindal property and net worth
भारतातील सर्वांत श्रीमंत महिलेचा भाजपात प्रवेश; पती निधनानंतर सांभाळला कोट्यवधींचा उद्योग! संपत्ती वाचून व्हाल थक्क

चित्र- एक. स्थळ- इंदोर (मध्य प्रदेश). आमच्या शेजारी एक कुटुंब राहायचं. त्यांचा मुलगा रोज सकाळी कॉलनीजवळच असलेल्या मैदानावर क्रिकेटच्या सरावाकरिता जायचा आणि तीन-चार तासांनी घरी परतायचा. अकरा-बारा वर्षांचा तो मुलगा पांढरा शुभ्र ड्रेस घालून, डोईवर कॅप लावून अन् हातात बॅट फिरवत ऐटीत पुढे चालायचा आणि त्याच्या मागे त्याचे आजोबा क्रिकेटची चामडी बॅग- ज्यात स्टंपस्, पॅड इत्यादी ठेवलेलं असायचं, ती खांद्यावर घेऊन मागून चालत जायचे. घरी परतताना दोघांचेही खांदे हमखास पडलेलेच असत! नातवाचे खेळून दमल्यामुळे आणि आजोबांचे वय झालं असतानाही ते ओझं उचलावं लागत असल्यामुळे. ज्या दिवशी आजोबांना काही कारणानं नातवाला मैदानावर सोडायला जाणं जमत नसे, त्या दिवशी मात्र चित्र वेगळं असायचं. आजोबांचा मुलगा आपल्या मुलाला चक्क कारनं सोडायला जात असे! 

चित्र- दोन, स्थळ- कोची (केरळ). माझ्या मुलाची नोकरी कोचीला असल्यामुळे मी आणि पत्नी काही दिवसांकरिता त्याच्याकडे गेलो होतो. आमच्या शेजारी एक दाक्षिणात्य कुटुंब राहायचं. ते दोघं नवरा-बायको नोकरी करत. सकाळी आठला ते घर सोडत अन् दुपारी पाचला परतत. त्यांना दोन मुलं होती. मोठा पाच-सहा वर्षांचा आणि धाकटा तीन-चार वर्षांचा. नवरा-बायको नोकरीला गेले की त्या दोन्ही मुलांचा सांभाळ त्यांचे सत्तरीच्या घरातले आजोबा करत. सकाळचा नाश्ता, आंघोळ, शाळेकरिता तयार करणं, मुलं शाळेतून घरी आल्यावर त्यांचं जेवण, अभ्यास, असं सर्वकाही तेच बघत. मुलगा-सून घरी आले की अवघ्या दोन तासांकरिता आजोबांना सवड मिळे. मग मुलगा-सून दोघंच ‘इव्हिनिंग वॉक’ला जात. मग परत दोन्ही नातवांची जबाबदारी आजोबांकडेच! आजोबांचा धाकटा मुलगा आणि सून सिंगापूरला नोकरी करायचे अन् त्यांनाही दोन मुलं होती. तिकडे हीच दिनचर्या आजीची! मागच्या दोन वर्षांपासून वयाच्या सातव्या दशकात हे आजोबा भारतात आणि आजी सिंगापूरला मुलगा आणि सुनेबरोबर. शिवाय त्याला ‘कर्तव्य’ हा भारदस्त, पण गोंडस शब्दसुद्धा होता! या चित्राला पुढे काहीच दिवसांनी एक नवीन किनार मिळाली. आम्ही कोचीहून परतलो, त्यानंतरही हे आजोबा माझ्या संपर्कात होते. एक दिवस त्यांना सहज फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितलं, की ते आता त्यांच्या मूळच्या घरी- चेन्नईला एकटेच असतात. कारण काय तर, त्यांच्या सुनेनं नोकरी सोडली होती आणि ती आता घरीच असायची. त्यामुळे ‘मुलांकडे कोण बघणार’ हा प्रश्न सुटला होता. म्हणून मग आजोबांची बोळवण झाली चेन्नईला! आजी मात्र अजूनही सिंगापूरलाच असतात. तिथे अजून लहान नातवंडांची काही सोय झाली नव्हती. मला एकदम, ‘गरज सरो अन् वैद्य..’ ही म्हण आठवली!

चित्र- तीन, स्थळ- पोर्ट ब्लेअर (अंदमान). दोन-तीन वर्षांनी आमच्या मुलाची बदली कोचीहून अंदमानला झाली. तेव्हा आम्ही त्याच्याकडे जवळजवळ पाच-सहा महिने राहून आलो. आमच्या शेजारी एक कुटुंब राहात असे. त्यांना एक दोन-तीन वर्षांचा मुलगा होता. हेही पती-पत्नी रोज सकाळी नऊच्या सुमारास घरून नोकरीकरिता निघत आणि संध्याकाळी चारच्या सुमारास परतत. या काळात त्या लहानग्याकडे आजी बघायची. आजींचं वय सत्तरच्या जवळ होतं अन् त्यांना होता गुडघेदुखीचा त्रास. बाई नातवाला सांभाळून अगदी वैतागून जात, पण कुणाला सांगायची सोय नव्हती. साहजिकच दोन-तीन वर्षांचं ते मूल एखाद्या मृगशावका- सारखं दिवसभर इकडेतिकडे धावे. मग आजींना त्याच्यामागे दुखऱ्या गुडघ्यांनी धावावं लागे. या आजींचं आणखी एक शल्य होतं. आजींना या वयात आपला जोडीदार आपल्या जवळ हवा असं वाटायचं. मुलगा-सुनेचं जग, त्यांचे मित्रमैत्रिणी वेगळे होते. त्यात आजी रमणं शक्य नव्हतं आणि खरं सांगायचं तर त्यांना त्या जगात स्थानही नव्हतं. आजोबांसह सर्व सुहृद, नातेवाईकही गावी. आजोबांना अंदमानात आवडायचं नाही म्हणून त्यांनी कायम गावीच राहायचं ठरवलं होतं. हातात मोबाइल असो किंवा कितीही व्यग्रता असो, आजींना एकटेपणा जाणवे. कातरवेळी त्यांना एक प्रकारची भीती वाटे. वेळ आणि संधी मिळताच आजी आमच्याकडे येऊन बसत. माझ्या पत्नीकडे आपलं दु:ख व्यक्त करत. आम्हाला आजींची कीव यायची, पण आम्ही काहीच करू शकत नव्हतो.  

चित्र- चार, स्थळ- हैदराबाद. माझ्या मोठय़ा भावाकडे त्याला भेटायला म्हणून आम्ही राहायला गेलो होतो. भावाच्या घराला लागूनच एक आजी-आजोबा राहायचे. एक-दोन दिवसांतच माझ्या लक्षात आलं, की त्या घरात आजी-आजोबांव्यतिरिक्त सात-आठ वर्षांचा एक मुलगा आणि त्याच्यापेक्षा एक-दोन वर्षांनीच लहान अशी त्याची बहीणही आहे. आजी-आजोबांचा मुलगा आणि सून हैदराबादहून पाच-सहा तासांच्या अंतरावर असणाऱ्या एका जिल्ह्याच्या गावी एका अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘लेक्चरर’ पदावर नोकरीला होते.  त्यांची ही दोन मुलं त्यांनी चांगलं शिक्षण मिळावं म्हणून आजी-आजोबांकडे ठेवली होती. माझ्या लक्षात आलं, की त्या आजी-आजोबांनी तारुण्यात आपल्या जीवाचं रान करून आपल्या मुलांना उच्च विद्याविभूषित केलंच होतं, पण आता, जेव्हा त्यांना वृद्धापकाळात मुलाच्या आणि सुनेच्या मायेच्या उबेची गरज होती, तेव्हा नातवंडांकडे बघायची जबाबदारी त्यांना पत्करावी लागत होती. मुलांचे गणवेश टिपटॉप आहेत की नाही, बुटांना पॉलिश आहे की नाही, हे सर्व दोघं पाहायचे, नातवंडांना स्कूल बसच्या थांब्यापर्यंत सोडायला जाणं आणि आणणं हेही त्यांनाच करावं लागायचं. कधी कधी या कामांत आजी-आजोबांची त्रेधा- तिरपिट उडायची, पण कुणाला सांगायची सोय नव्हती. शेवटी आपलेच दात आणि आपलेच ओठ! मुलगा-सून ‘वीकेंड’ला घरी आले की, मात्र आजी-आजोबांना वगळून त्यांचं चौकोनी कुटुंबच ‘हॉटेलिंग’ला बाहेर पडायचं.

चित्र- पाच, स्थळ- सोलापूर. या चित्रातली पात्र अगदी माझ्या परिचयातली. नात्यातलीच म्हणा ना! सेवानिवृत्तीला अगदी मोजकेच महिने उरलेल्या एका शाळेतल्या शिक्षिका. घरच्या करत्या-धरत्या त्याच. यजमानांचं नुकतंच निधन झालेलं. घरी मुलगा आणि सून. तेही नोकरीत. बाईंची लग्न झालेली मुलगी पुण्याला उच्च शिक्षणासाठी होती. तिचं सासर साताऱ्याचं. या मुलीची अगदी दोन-अडीच वर्षांची एक मुलगी होती. सासू-सासरे मुलीला नीट सांभाळणार नाहीत, या भीतीपोटी तिनं त्या चिमुकलीला आपल्या आईकडे सोलापूरला ठेवलं होतं. तिच्या देखभालीसाठी एक पूर्ण वेळ बाई ठेवली होती, पण छोटी मात्र आजीचा पदर सोडत नसे. शाळेतून आल्यावरही आजीला शाळेचं इतकं काम असे, की घरी आल्यावर त्यांना लॅपटॉप घेऊन बसावं लागतच असे. अशा वेळी आजीचा मुलगा आणि सून भाचीला सांभाळत. एकीकडे मुलीचा आग्रह आणि दुसरीकडे जावयाची भीती, या विचारातून आजी जास्तीत जास्त धावपळ करत.

ही प्रातिनिधिक चित्रं. मी स्वत: बघितली ती. यातली स्थळं आपल्याच देशातली, वेगवेगळय़ा प्रांतातली. पात्रांची बोलीभाषा वेगळी आणि कदाचित काही प्रमाणात संस्कृतीही वेगवेगळय़ा. मात्र साम्य एकच, अन् तोच या गोष्टींमधला गाभा वाटला मला. तो म्हणजे नोकरी करणारी जोडपी, त्यांची लहान मुलं आणि नातवंडांना सांभाळणारे आजी-आजोबा. असे आजी-आजोबा, ज्यांना वृद्धापकाळामुळे नातवंडांच्या मागे जास्त पळता येत नाही.. ज्यांना आपला वृद्धापकाळ आपल्या मनाप्रमाणे जगता येत नाही.. ज्यांनी आपल्या पाल्यांना लहानाचं मोठं करण्याकरिता नाना तऱ्हेचे कष्ट घेतले असतील आणि खस्ता खाल्ल्या असतील.. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या गोष्टींमधल्या आजी-आजोबांना आपल्या जीवनाची इिनग खेळून झाल्यावर दुसरे कशी गोलंदाजी वा फलंदाजी करतात हे निवांतपणे बसून बघण्याऐवजी परत एक इिनग खेळावी लागत होती अन् तीही बऱ्याचदा अनिच्छेनं!

आता काही लोक अशी शंका व्यक्त करतील, की ‘कदाचित आजी-आजोबांनीच नातवंडं हवीत म्हणून आपल्या मुलांकडे धोशा लावला असेल का? आता सांभाळा म्हणावं!’ या प्रश्नाचं निश्चित उत्तर देणं कठीण आहे. हे खरं आहे, की समाजात अनेक कुटुंबांत जोडप्यांना ‘पाळणा कधी हलणार?’ असं विचारून त्रस्त करून सोडलं जातं. पण आजची स्वत:च्या पायांवर उभी असलेली, उच्चशिक्षित मुला-सुनांची पिढी केवळ वडीलधाऱ्यांची इच्छा आहे म्हणून मूल जन्माला घालेल, असं वाटत नाही. स्वत:च्या इच्छेचा आणि सुबत्तेचा विचार करून मगच हा निर्णय बहुतेक जोडपी घेतात, हे आपल्याच आजूबाजूला दिसतं. 

अनेकांच्या मनात असा प्रश्न डोकावला असेल, की ‘काय हरकत आहे जर आजी-आजोबांनी आपल्या नातवंडांना सांभाळलं तर?’ ..खरंच काहीच हरकत नाही. आणि अनेक आजी-आजोबा अगदी प्रेमाने नातवंडांना सांभाळतातही. पण एक मात्र नक्की, की हे सर्व सक्तीनं लादलेलं नसावं. त्यांना झेपत असेल तितकंच त्यांनी करावं आणि त्यातही त्यांना आनंद मिळत असेल तरच! नातवंडांच्या बाललीला पाहणं कोणत्या आजी-आजोबांना आवडणार नाही? आपल्या आयुष्यात आपण कमावलेलं शहाणपण या छोटय़ांपर्यंत पोहोचवता यावं, त्यांच्यावर संस्कार करता यावेत, असं आजी-आजोबांनाही मनातून वाटत असतंच. त्यामुळे आपलं कर्तव्य म्हणून ते मुला-सुनेला त्यांची मुलं सांभाळायला मदत करतीलच. पण त्यांच्या क्षमतेचा विचार करणं हे कुटुंबातल्या इतरांचंही कर्तव्य असलं पाहिजे. फक्त आपलीच सोय बघून चालत नाही. तसं होत असेल, तर तो आजी-आजोबांवर अन्यायच ठरेल नाही का?