हेमा होनवाड
आज कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या गोष्टींमुळे बदलाचा वेग त्सुनामीसारखा झाला आहे. त्यामुळेच शाळा नावाच्या कारखान्यांतून फक्त स्पर्धेसाठी तयार होणारी मुले शिक्षणाचा खरा अर्थ समजू शकतील का, हा प्रश्न आहे. अर्थात काही शाळा, पालक,मुलांनी वेगळ्या वाटेवर जात अनेक प्रयोग केले आहेत. त्यामुळे शाळेत ‘ढ’ असणाऱ्या किंवा नापास होणाऱ्या मुलांनाही जगण्याचा खरा अर्थ कळतो आहे. ‘तरुवर बीजापोटीं। बीज तरुवरा शेवटी’ असं तुकोबा म्हणतात. त्यामागे बीज आणि वृक्ष यांचं असलेलं अतूट नातं, जे मुलं आणि पालक, समाजात असतं. त्याच नात्यातून तयार झालेल्या विविध प्रयोगांवरचं हे सदर दर पंधरवड्याने…
‘‘ए आज्जी, मला सफरचंद चिरून देशील?’’ उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी पत्ते खेळण्यात दंग असलेल्या तिसरीतल्या छोट्या मीराचा गोड प्रश्न ऐकून मला झालेला आनंद आणि आश्चर्य लपवता येणं शक्यच नव्हतं. एक नऊ वर्षांची छोटी मुलगी वेफर्स, चिप्सची मागणी न करता चक्क सफरचंदाची मागणी करतेय, तिची १३ वर्षांची ताई एका क्रोशाच्या सुईवर ‘हेअर बॅण्डस्’ विणत बसली आहे, आई-बाबा आतमध्ये शांतपणे आपापली कामं करत आहेत. आम्ही कालच त्यांच्या घरी आलो, तरी त्या एकाच दिवसांत आमच्याशी त्यांची छान गट्टीही झाली! ही एखाद्या दिवशी घडणारी गोष्ट नव्हती, तर ही त्या घराची ‘जीवनशैली’ होती. ही जादू नव्हती, तर या दोघींची शाळा आणि आई-बाबा हातात हात घालून मुलं पोषक पदार्थच खातील याकडे कटाक्षानं लक्ष देतात हे त्यामागचं गुपित होतं.
असंख्य शाळा, शिक्षक व मुलांशी माझा नेहमी संपर्क असल्यानं हे अवघड काम सोपं करणारी मोठ्ठी माणसं, जाणीवपूर्वक मुलांच्या शरीर-मनासाठी कोणतं खाद्या योग्य याचा खोलवर विचार करतात आणि त्याचा आग्रह धरतात हे पाहून आनंद झाला. कारण केवळ शहरातच नव्हे तर शहरापासून दूर ग्रामीण भागातही मुलांना चिप्स, बिस्किटं, शीतपेयं यासारख्या खाऊसाठी हट्ट करताना आणि आईवडिलांना त्यांचे हट्ट सहज पुरवताना मी नेहमी पाहते.
‘‘अन्नाद् भवन्ति भूतानि!’’ हे तर चिरंतन सत्य आहे. पुरातन काळात जेवढं खरं होतं तेवढंच आजही! ज्याला इंग्रजीमध्ये ‘ट्रॅश’ म्हणजे ‘कचरा’ म्हणतात तो खाऊन शरीर-मन सुदृढ राहणं कसं शक्य होईल? मुलं काय खातात, कसं वागतात, इतरांना सामावून कसं घेतात, हे सगळं शिकण्याशी जोडलेलं आहे. शिकण्याचा आणि खरं तर जगण्याचा मूळ हेतूच स्वत:ला जाणणं नाही का? तो जाणण्याचा प्रवास प्रत्येकाचा वेगवेगळ्या वाटेनं चालतो. चालण्याचा ज्याचा-त्याचा वेग फक्त त्यांच्याचसारखा असतो.
मोठी माणसं काय बोलतात यापेक्षा ती कशी वागतात हे मुलं एखाद्या टिपकागदासारखं टिपत असतात आणि त्यांच्या नकळत ते त्यांच्यामध्ये रुजत जातं. मोठ्यांचं वागणं जर ‘एकदा एक बोलणं आणि एकदा एक बोलणं आणि शेवटी तिसरंच करणं’ असं असेल तर तेही मुलांच्या नजरेतून सुटत नाही. छोटे आणि मोठे यांचा हा एकत्र प्रवास सोपा कधीच नव्हता. पण जेव्हा ‘शाळा’ नावाची संस्था अस्तित्वात आली तेव्हा शिकणं हे सहज, नैसर्गिक न राहता कृत्रिम, सतत तुलना करायला, चढाओढ करायला, एकमेकांवर कुरघोडी करण्याला प्रवृत्त करणारी ‘व्यवस्था’ झालं. त्यामुळे चित्र बदलू लागलं.
‘मी आत येऊ का?’ असं विचारण्याची तसदीही न घेता कृत्रिम बुद्धिमत्ता जसजशी समाजमनात, शिक्षणात घुसत गेली तसतसं झपाट्यानं सगळंच चित्र पालटत गेलं. या बदलाच्या धबधब्याला तोंड कसं द्यायचं हे माणसाला अजून उलगडलेलं नाही. भविष्याचा अंदाज घेणंही सामान्य माणसाला अवघड झालं आहे. अशा काळात
‘Learning to learn, learning to do, learning to live together and learning to be!’ शिकायला शिकणं, हाताने (सगळ्या प्रकारचं) काम करणं, सगळ्यांबरोबर (गुण्यागोविंदानं) जगायला शिकणं, आणि मी कोण? हे समजण्यासाठी स्वत:ला वेळ देणं; हे सगळं शाळा नावाच्या कारखान्यांमध्ये मुलांना उपलब्ध करून देणं शक्य नाही. मुलं कशी शिकतात यावर संशोधन वेगानं सुरू आहे, त्यावर आधारित बदलही माणूस करतो आहे, पण त्या बदलाच्या ‘त्सुनामी’च्या वेगाला पुरं पडणं काही अजून जमत नाहीय आपल्याला.
आजपासून १० वर्षांनी समाजाची आणि शिक्षणाची काय परिस्थिती असेल याचा नीट अंदाज आज बांधता येत नाही, हे वास्तव आहे. बदल हाच निसर्ग आणि समाजाचा स्थायिभाव आहे असं जरी असलं तरी जे चाललं आहे त्याचा परिणाम माणसाला खरोखर उन्नतीकडे घेऊन जातो आहे का? उन्नती कशाला म्हणायचं? आता आपण जे करतो आहोत त्याचा लेखाजोखा, त्यावर संशोधन, त्यावर आधारित बदल आणि काही काळाने पुन्हा लेखाजोखा आणि पुन्हा बदल असं हे चक्र अव्याहत चालत आलं आहे आणि अजूनही चालू राहणार आहे.
‘जेव्हा मला सगळ्या प्रश्नांची उत्तरं सापडली तोपर्यंत त्यांनी सगळे प्रश्न बदलले होते.’ हे वचन सर्वश्रुत आहेच. आज किती खरं ठरलं आहे हे वचन! बहुसंख्य लोक प्रवाहाबरोबर पोहणं पसंत करतात. कारण ते सोपं असतं. तसं करताना फारसा विचार करावा
लागत नाही. सगळी करतात म्हणून आपणही तेच करायचं. प्रवाहाविरुद्ध पोहण्यासाठी जे आवश्यक ते धैर्य एक तर जवळ नसतं आणि ‘लोक काय म्हणतील?’ याची चिंता आणि त्या चिंतेच्या मुळाशी असते भीती! म्हणून तर शाळेच्या नावाखाली सुरू केलेले कारखाने नुसते सुरू राहिले एवढंच नव्हे; तर त्यांची चलती झाली आहे. पाठांतरावर आधारित गुण देऊन मूल्यमापन करताना प्रत्येक मुलाची वैयक्तिक गरज काय आहे, त्याची बलस्थानं काय आहेत, त्याला कशासाठी मदत लागणार आहे हे पाहणं बाजूलाच राहिलं, ‘मास एज्युकेशन’च्या नावाखाली शिकणं-शिकवण्याच्या पद्धतीचं सपाटीकरण झालं. ‘मास एज्युकेशन’ची जागा ‘मास कॉपिंइग’ने अर्थात हुबेहूब नक्कल करण्याने घेतली. एका मुख्याध्यापिकेला नियुक्त करताना, ‘‘शाळा चालतेच हो! कशी चलवायची ते तुमचं तुम्ही ठरवा’’असं सांगण्यात आलं होतं, म्हणजे आपल्याकडची शाळा चालवण्यामागची भूमिका सहज लक्षात यावी.
‘तस्मात् विचार करावा’ याचा बहुसंख्य शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि शासनाला या स्पर्धेच्या युगात विसर पडला. अर्थात याला अपवादही आहेतच. काही मोजक्या, विचार करणाऱ्या माणसांमध्ये प्रवाहाविरुद्ध पोहण्याचं धाडस होतं. जे चाललं आहे त्यापेक्षा वेगळं काही माझ्या पाल्याला हवं आहे आणि ते देण्याचा आटोकाट प्रयत्न करताना वेगळ्या वाटेनं जाण्याची त्यांची तयारी होती. हे निर्णय सोपे नसतात. अशा वेगळी वाट निवडणाऱ्या माणसांनी आपल्या देशात आणि परदेशात या विचारहीन प्रवाहात वाहून जाण्याचं नाकारलं, ठामपणे समाजाची टीका सहन करत ते उभे राहिले. त्यांच्यामुळे अनेक मुलं आनंदानं स्वत:ला भावेल अशा पद्धतीनं शिकली आणि वेगळ्या विचारांनी चालवलेल्या शाळांमध्ये इतर शाळांनी नाकारलेल्या, ‘ढ’ ठरवलेल्या मुलांनाही फुलण्याची संधी मिळाली.
अशा मुलांची, पालकांची आणि शाळांची ओळख आपण येत्या वर्षभरात करून घेणार आहोत. माझं मन, गेली ५५ वर्षं पालक, शिक्षक आणि मुलांच्या सहवासात न्हाऊन निघतं आहे आणि त्यांच्या सहवासामुळे मला जी एकच गोष्ट चांगली जमली आहे असं म्हणण्याचं मी धाडस करू शकते, ती म्हणजे शिकण्यातला आनंद अनुभवणं. आजही नवीन गोष्टी शिकण्याचा माझा उत्साह कायम आहे. कारण ही वेगळ्या वाटेने जाणारी लहान-मोठी माणसं प्रत्यक्ष, आणि पुस्तक रूपाने अप्रत्यक्षपणे मला भेटली आहेत. कशालाही, कोणालाही न घाबरता स्वत:चा शोध घेणं किती महत्त्वाचं आहे हे मी त्यांच्याकडून शिकले आहे. मला लाभलेली ती प्रेरणा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या लेखमालिकेतून करणार आहे.
आज नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये ज्यांना अधिक महत्त्व दिलं आहे, अनेक नामवंत शिक्षक-प्रशिक्षण संस्थांमध्ये ज्या विषयांना आज प्राधान्य दिलं जात आहे, ते विषय म्हणजे १) स्वत:च्या भावना ओळखणं, २) त्यांचा उद्रेक होण्याआधी भावनिक संतुलन साधणं, ३) सामाजिक जाणिवा जागृत करणं आणि ४) एकांगी, संकुचित विचारांतून बाहेर पडून स्वत:ची दृष्टी व्यापक करणं. हे संयुक्त राष्ट्राचे चार स्तंभ. आणि त्याचबरोबर भावनिक व सामाजिक जाणिवा सहजपणे शिकण्याची संधी काही मुलांना मिळाली, कारण त्यांच्या आई-वडिलांनी खूप विचारपूर्वक वेगळ्या वाटेनं चालण्याचा निर्णय घेतला. धाडसी निर्णय घेतले. आज हे विचार पटलेले अनेक पालक आपल्या मुलांना औपचारिक शाळेत न घालता, विविध प्रकारे शिकण्याच्या अनेक संधी उपलब्ध करून देतात.
शिक्षणाची एक अपवादात्मक वेगळी वाट उमा ब्रह्मेच्या आई-वडिलांनी चोखाळली. ब्रह्मे या उभयतांनी पुण्यातील आपली स्थावर जंगम मालमत्ता विकून, आपल्या निष्ठेनं चालू असलेल्या कामाला रजा देऊन उमा सात वर्षांची झाल्यावर तिला उत्तम शिक्षण मिळावं या हेतूनं ‘ओरोविल’ (पॉन्डीचेरी) येथे स्थलांतर केलं आणि तेथील शाळेत तिचं शिक्षण केलं. आई-वडील हे दोघंही शिक्षण क्षेत्रात कार्यरत होते. आज उमा ५५ वर्षांची आहे. तिच्या शब्दांत सांगायचं तर ‘माझ्यावर कोणताही विषय शिकण्याची जबरदस्ती कधीही केली गेली नाही. मी अतिशय आनंदानं मला जे आवडेल ते शिकत गेले. तिथं कायमस्वरूपी स्थलांतर केल्यामुळे मला शाळेची फीसुद्धा भरावी लागली नाही. आज माझी मुलंही त्याच शाळेमधून शिकून बाहेर पडली आहेत आणि यशस्वी समाधानी जीवन जगताहेत.’
हे सर्वसामान्यांना शक्य होणार नाही, हे जरी मान्य केलं तरी या धाडसाकडे उघड्या डोळ्यांनी आपण पाहू शकतो आणि निदान भीतीला तरी तडीपार करू शकतो. प्रवाहपतित होण्याची गरज आहे का? हा प्रश्न स्वत:ला विचारू शकतो.
मीरा आणि तिची ताई असो की ब्रह्मे कुटुंबीय, या अपवादात्मक छोट्याशा प्रयोगांचा उल्लेख मी या लेखात केला, कारण या प्रयोगाची नोंद इतरत्र कुठेच केली जाणार नाही. हा प्रयोग एका कुटुंबापुरता मर्यादित आहे. त्यामुळे तो एखाद्या विद्यापीठातील संशोधनाचा विषयही ठरू शकणार नाही. पण हे घडलं आहे. हा अनुभव मुलांच्या शिकण्याच्या उपजत आणि प्रबळ इच्छेवरचा विश्वास दृढ करून गेला आणि आपली प्रणाली किती तोकडी आणि सपाट आहे हे पुन्हा प्रकर्षानं जाणवलं. आता आलेल्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे आपल्या आशा थोड्या पालवल्या आहेत. वाट बघूया सकारात्मक बदलाची. मुलांसाठी, शिक्षकांसाठी आणि समाजासाठी!
लेखिका एम.ए., बी.एड. असून त्यांनी अमेरिकेच्या विद्यापीठातील, संस्थांतील मानसशास्त्राचे विविध अभ्यासक्रम पूर्ण केले आहेत. १९८९९९ दरम्यान पुणे येथील ‘म.ए.सो. बाल शिक्षण मंदिर इंग्रजी माध्यमाची शाळा’च्या त्या संस्थापक, प्राचार्य होत्या. २०१८१९ दरम्यान इंग्रजी, बालभारती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती विभागाच्या त्या अध्यक्ष होत्या. शिरिषा साठे यांच्याबरोबर त्यांनी लिहिलेल्या ‘विधायक शिस्त’ या पुस्तकाला ‘शिक्षणतज्ज्ञ कुमुद बन्सल पुरस्कार’ ही मिळाला आहे. त्यांनी ‘समरहील’, ‘धोका शाळा’ ही पुस्तके भाषांतरित केली असून त्यांचे शिकणे आणि शिकवणे या विषयावरील अनेक लेख शैक्षणिक मासिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. तसेच शैक्षणिक प्रशिक्षण या विषयावर त्या राज्यातच नव्हे तर भारतभर सातत्याने कार्यशाळा,प्रशिक्षण शिबिरे घेत असतात. विद्यार्थ्यांशी कायमस्वरूपी मैत्री हा त्यांचा विशेष आहे.
hemahonwad@gmail.com