कनेक्ट व्हायला हवे..
११ मेच्या ‘चतुरंग’मधील नीरजा यांचा लेख वाचला, ‘डिस्कनेक्ट होण्याच्या काळात’. त्यावरून आठवलं.. आमचाही एक ‘व्हॉट्सअॅप’ ग्रुप होता शालेय मित्रांचा. सुरुवातीला कसं सगळं छान छान चालू होतं.. मेसेजेस, वाढदिवसाच्या शुभेच्छा, मग हळूहळू राजकीय पोस्ट्स सुरू झाल्या. आमचाच पक्ष कसा चांगला, आमचाच नेता ग्रेट करत करत विरोधी विचारांवर चिखलफेक सुरू झाली. दरम्यान एका शिक्षकांचा वाढदिवस आला. कोणाला तरी कुठून तरी समजले. आमच्या ग्रुपवर त्याने ते जाहीर केले, सरांना शुभेच्छा दिल्या आणि अचानकच त्या मित्राने सरांना ग्रुपवर अॅड केले. का तर? सरांनाही समजेल, आपण शुभेच्छा दिल्याचे. दुसऱ्या दिवशी सरांना पुन्हा ग्रुपमधून बाहेर काढण्याची जबाबदारी कोणी घेईना. सरही आपणहून जाईनात.
आता राजकीय चर्चा अधिक तावातावाने होऊ लागल्या. ‘भक्त मंडळींच्या’ जोडीला सर आले. जोरदार आरोप-प्रत्यारोप होऊ लागले. अरेला कारे इथपर्यंत प्रकरण गेले. सरांचादेखील एकेरीवर उल्लेख होऊ लागला. त्यांना फक्त शिव्या देणे बाकी राहिले होते. खरं तर या सर्व गोष्टींना सरदेखील जबाबदार होते. हा शालेय मित्रांचा ग्रुप, आपल्या विद्यार्थ्यांमधील भांडण, वाद मिटवणे हे खरं तर त्यांचं काम, पण तेच त्याला खतपाणी घालू लागले. हे एक राजकीय व्यासपीठ असल्यासारखे वागू लागले. एका मर्यादेनंतर आम्ही काही मित्रांनी तो ग्रुप सोडून नवीन ग्रुप बनवला. त्यावर आता काही अपवाद वगळता कोणीही राजकीय पोस्टस टाकत नाही. त्यामुळे सर्वानाच बाकी गोष्टींवर मनमोकळेपणाने व्यक्त होता येते. तुमच्या लेखाच्या उत्तरार्धात वर्णन केलेली परिस्थिती.. आता अधिकाधिक बिकट होत जात आहे. आणि ते केवळ बघत राहाणे हेच आपल्या हातात आहे. मनाने डिस्कनेक्ट होत चाललो आहोत हेच खरे, पण अशाही परिस्थितीत आपल्याही विचारांची काही माणसं अजून आहेत या विचाराने दिलासा मिळतो. डिस्कनेक्ट होण्याच्या काळात कनेक्ट व्हायला हवे असे वाटले म्हणून हा पत्रप्रपंच
– सुनील शिरवाडकर
संवेदनशील विचार
२५ जूनच्या ‘तळ ढवळताना’ या सदरात लेखिका नीरजा यांनी समाजाच्या दृष्टिकोनातून संवेदनशील विषयाला हात घातला आहे. लेखिकेने उल्लेखिल्याप्रमाणे कन्यादानाने मिळणाऱ्या तथाकथित पुण्याच्या हव्यासापोटी आत्तापर्यंत सर्वानी यावर मौन पाळलेले आहे का? असो. परंतु हा विषय येथे महत्त्वाचा नाही.
पाच महिन्यांपूर्वी नाशिक येथे एका लग्नाला उपस्थित राहण्याचा योग आला. हा प्रेमविवाह असल्यामुळे वधुवराची एकमेकांशी चांगल्या प्रकारे ओळख होती. मनेही एकरूप झाली होती. विचार एकरूप झाले होते. ते दोघेही आई-वडिलांच्या मनाखातर वैदिक पद्धतीने विधिवत लग्न करण्यास तयार झाले होते, परंतु त्यांना कन्यादानाचा विधी अजिबात मान्य नव्हता. दोघांच्याही आईवडिलांनी त्यांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु वधुवर दोघेही या विधीस तयार होईनात. शेवटी भटजींनीसुद्धा त्यांना समजावयाचा प्रयत्न केला. या दोघांचे एकच म्हणणे, की मुलगी ही काही वस्तू नाही दान करायला. त्यामुळे आम्हाला हा विधी नको आहे. त्या भटजींनी अखेरचा प्रयत्न म्हणून त्यांना सांगितलं, की जर कन्यादान केलं नाही तर तुम्हाला गर्भाधानाचा अधिकार मिळणार नाही. त्यावर त्या दोघांनी सुंदर उत्तर दिलं, ‘हे अधिकार देणारे कोण? आणि जी जोडपी न्यायालयात जाऊन लग्न करतात त्यांना कोण देतो हा अधिकार? त्यांनाही मुलं होतातच ना?’ यावर सर्वानी अखेर माघार घेऊन कन्यादान विधी वगळून हा लग्न समारंभ पार पडला.
याच लग्नामध्ये आणखी दोन गोष्टी वाखाणण्याजोग्या व सकारात्मक घडल्या त्या म्हणजे वधुवरांसाठी मंचावर बसण्यासाठी पाट मांडले होते. त्यावर भटजींनी तांदळाने छान रांगोळी काढली होती, परंतु वधुवरांनी त्यावर बसण्यास नकार दिला. त्यांचे म्हणणे असे होते, की आम्ही तांदूळ खातो. त्याला असे पायदळी कसे तुडवता येईल? त्यांनी ते तांदूळ काढायला लावले व नंतरच ते त्या पाटावर बसले. तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अक्षता मुळीच वाटायच्या नाहीत. लग्न लागल्यावर मंचावर वधुवरांना भेटायला ज्या वेळी लोक येतील तेव्हा त्यांनी आशीर्वाद म्हणून तेथे ठेवलेल्या गुलाब पाकळ्या वधुवरांच्या डोक्यावर टाकाव्यात म्हणजे सभागृहात सर्वत्र अक्षता अथवा फुलांच्या पाकळ्यांचा सडा पडणार नाही आणि अन्नाची नासाडी किंवा घाण होणार नाही. किती चांगला विचार करते ही नवीन पिढी! खरोखरच जुन्या पिढीने अशा नवीन विचारांचं स्वागतच करायला हवं! विचारात काळानुरूप बदल व्हायलाच हवा! कारण काळानुरूप प्रत्येक गोष्टीचे संदर्भ बदलत असतात आणि जो बदलतो तोच प्रगती करतो, पुढे जातो. नाही का?
– लक्ष्मीकांत अंबेकर, सीवूड्स, नवी मुंबई</p>
कठोर आत्मपरीक्षणाची गरज
मेघना वर्तक यांचा ‘नाण्याची दुसरी बाजू’ हा लेख वाचला. मुलांना उच्च शिक्षणासाठी अभिमानाने परदेशात पाठविणारे कोण? तिथे पाठविल्यावर तो नोकरी शोधणार आणि तिथेच स्थायिक होणार हे गृहीतच आहे. मग लग्न आणि मग परदेश प्रवास. त्याचा आनंद, अभिमान हेच पालक मिरवतात. घी बघितला, आता बडगा. पालक निवृत्त झाले. वय झाले. जवळ कोणी नाही. सारखे मुलामुलीकडे जाणे होत नाही. या सर्व गोष्टींचा स्वीकार हे लोक का नाही करत, की वृद्धावस्थेत ही वेळ येणार आहे. याचा त्यांनी विचारच केलेला नसतो. या लोकांनी शांत मनाने निवृत्त होऊन समाजासाठी काम करावे. समाजातून एखादा श्रावण मिळतोच व उर्वरित आयष्य सुलभ होते. आता आपण दधिची आहोत हे समजावे.
आम्हाला कुणाचा उपयोग नाही, आमच्याकडे कुणी बघत नाही, आमची कदर नाही आदी या वर्गात मोडणाऱ्यांना समुपदेशनाची गरज आहे. कठोर आत्मपरीक्षणाची गरज आहे व आनंदाने वानप्रस्थाश्रम घरच्या घरी स्वीकारण्याची आवश्यकता आहे; कुठलाही मोह न बाळगता. ही नाण्याची तिसरी बाजू आहे.
– रवीन्द्र संगवई, नागपूर</p>