कवीच्या जवळ जाता आलं!

‘आभाळमाया’ सदर उत्तरोत्तर अधिकाधिक वाचनीय आणि पुरवणीचे प्रमुख आकर्षण वाटावे इतके आकर्षक होत चालले आहे. सदराचे इतके यथार्थ आणि विविध अर्थवलये मनात निर्माण करणारे नाव क्वचितच कुणाला सुचले असेल. ‘आभाळागत माया तुझी आम्हावर राहू दे’ ही लोकप्रिय ओळ, काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांना विलक्षण आवडलेली ‘आभाळमाया’ ही ‘दूरदर्शन’वरून प्रसारित झालेली मालिका, हे त्या शब्दामागून लाडिकपणे लगट करत येणारे संदर्भ मराठी मनाला सुखवतात. ‘श्रीयुत आकाश’ हा कुसुमाग्रजांचा ललित लेख आठवतो, विख्यात तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती तर आभाळाला ‘माय बिलव्हेड’ म्हणत. ‘‘अंगणात मला खुर्चीवर नेऊन बसवा, मला आभाळाचे दर्शन घ्यायचे आहे.’’ असे मरणापूर्वी काही क्षण ते म्हणाल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात आहे. ‘आभाळ’ या शब्दात आभा आहे आणि नसूनही असण्याचा चिरंतन आभास आहे. आईवडिलांच्या मनात मुरलेल्या, उरलेल्या आणि अवचितपणे कधीही पृष्ठभागावर येणाऱ्या आठवणी आभाळासारख्याच असतात. त्यासाठी आईवडील कोणी असामान्य किंवा प्रसिद्ध व्यक्ती असण्याची गरज नाही.

१३ एप्रिलच्या अंकातील मु. वा. कांत यांचा ‘आनंदाची ओल, मातीत या’ हा लेख अप्रतिम वाटला. याचे कारण माझ्यासारख्या सर्वसामान्य वाचकाला त्यांचे वडील चार-पाच प्रसिद्ध गीतांमुळे माहीत असले तरी बहुतांश अपरिचितच होते. वा. रा. कांत यांच्या पत्नीचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर या लेखकाला सुचलेल्या चार ओळी मला त्यातील कारुण्याने आणि वडिलांचा कवितेचा वारसा त्यांच्यात किती सहज उतरला आहे याची जाणीव झाल्यानेही व्याकुळ करून गेल्या. वडिलांनी त्या काळच्या शिरस्त्याप्रमाणे दुसरा विवाह केला नाही हेही विशेष महत्त्वाचे वाटले. मुंबई-पुणे-नाशिक याला अलीकडे ‘ गोल्डन ट्रँगल’ म्हणतात त्याच्या बाहेर मराठवाडय़ात सुरुवातीची वर्षे गेल्याने असेल कदाचित पण वा. रा. कांत यांच्या कवितेला मिळायला हवी होती तेवढी लोकप्रियता लाभली नाही. सरकारी पुरस्कारांबाबत न बोललेलेच बरे! मालाडला लिंक रोडवर बस वळताना ‘वा. रा. कांत चौक’ ही पाटी नजरेत भरते आणि ‘बगळ्यांची माळ फुले..’सारखी गीते आपण गुणगुणायला लागतो. त्या गाण्यांच्या पाठीमागे असलेल्या प्रतिभावंत कवीची थोडी अधिक ओळख आणि जवळीक झाल्याचा आनंद या लेखाने दिल्याबद्दल या सुपुत्राला धन्यवाद.

– गजानन गुर्जरपाध्ये, दहिसर, मुंबई</p>

बोलीचं सौंदर्य जपलं जावं

राजन गवस यांनी ‘शुद्ध लेखन’ या लेखातून एका महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. मी जरी मुंबईत लहानाचा मोठा झालो असलो तरी बोली भाषांवर प्रचंड प्रेम करतो. रस्त्यात वा कुठेही कोणी दोन माणसं ‘वेगळं’ मराठी बोलायला लागली की लगेच माझे कान टवकारतात, मन भरून येतं ते ऐकून! आपण त्यांच्याकडे पाहिलं की ते बोलणारे बिचारे लगेच थांबतात. त्यांना काहीतरी चुकल्यागत वाटते. मला माझ्या हातून गुन्हा घडल्यागत वाटतं. मग मी त्यांना गवस म्हणतात तसंच काहीसं समजावून सांगतो. तेव्हा कुठे त्यांना बरं वाटतं. पण हे असं का असावं? अजून एक, मी स्वत: मराठी माध्यमात शिकलेल्या व हट्टाने आपल्या मुलांना मराठीत शिकवल्यावर एक जाणवतं ते आजूबाजूची सर्व मराठी लोकांची मुलं जेव्हा इंग्रजीत फाडफाड बोलतात तेव्हा पुन्हा संभ्रम तयार होतो. गावाकडच्याच काय शहरातल्या मुलावर तोच न्यूनगंडाचा आघात होत असतो जो गवस यांनी लिहिलय. हेच लोक मराठीचा खून करून वर ती मेली म्हणून गळे काढतात.

– सुनील पाटील

ज्येष्ठांना समजून घ्यावेच, मात्र..

डॉ. ऊर्जिता कुलकर्णी यांचा ‘शांततेचं गढूळ सावट’ हा लेख वाचला. लेख चांगला आहे. आज बहुतांश घरातील ही वस्तुस्थिती आहे हे खरे. मात्र काही बाबतीत माझे मत जरा वेगळे आहे. वृद्धावस्था म्हणजे दुसरे बालपण असे आपण म्हणतो. पण लहान मुलांच्या आपल्याकडून किंवा कुणाकडूनही असलेल्या अपेक्षा या त्यांच्या नैसर्गिक, शारीरिक, मानसिक गरजेनुसार निरागस असतात. त्यामध्ये तुलना, असूया, स्पर्धा, ईष्र्या असे कुठलेच कंगोरे नसतात. ते वाढत्या वयानुसार येतात. त्यामुळे ‘बाललीला’ नजरेसमोर आणून घरातील ज्येष्ठांना समजून घेताना काही गोष्टी त्यांना शांतपणे, स्पष्टपणे समजावून सांगणे पण गरजेचे आहे.

आज जी पिढी ८०-८५च्या घरात आहे, ती पिढी त्यांच्या वडीलधाऱ्या पिढीसोबत दीर्घकाळ राहिलेली नाही कारण त्याआधी एकूण आयुष्यमानच कमी होतं. म्हणजे वयाच्या पस्तिशी चाळिशीपासून ही पिढी स्वतंत्रपणे सगळ्या गोष्टी करत आली आहे. त्यामुळे ‘मी म्हणेन ते बरोबर किंवा मी करेन ते बरोबर, किंवा इतके वर्ष मीच नाही का केलं..’ अशी भूमिका नकळत का होईना होत गेली जिला आपण आज रिजीडनेस किंवा हटवादीपणा म्हणतो, असे मला वाटते. आणि तिथे सगळं बिघडतं. निवृत्तीनंतरही कार्यरत असणारी, डोळसपणे संसारातून निवृत्ती स्वीकारणारी मंडळी तुलनेने कमी आहेत. ज्येष्ठांचे अगदी मनापासून काळजीपूर्वक सर्व करत असतानाच, ‘माझंही वय वाढत आहे, मलाही त्यामुळे शारीरिक मर्यादा येताहेत, माझ्याही कामाच्या जबाबदाऱ्या वाढत्या आहेत, मला माझ्या तरुण मुलांसाठीही ‘सपोर्ट सिस्टीम’ बनायचं आहे’ हे सांगितले पाहिजे. म्हणजे मग घरातील शांततेचं गढूळ सावट कमी होण्यास मदत होईल.

– अंजली जयंत कुलकर्णी.

हिंमत बांधली गेली

राजन गवस यांचा ‘शुद्ध लेखन’ हा लेख वाचला. आनंद वाटला. मला मनातून वाटणारं तुम्ही मांडलं आहे. गावाकडल्या बोली भाषेचं खरंच मोठं नुकसान केलंय हो, या शुद्ध भाषेच्या दुराग्रहानं. अगदी हाच मुद्दा घेऊन मी दहा वर्षांपूर्वी ही कविता लिहिली होती. ईटीव्हीच्या ‘साहित्य दरबार’मधूनही ती आली आहे.

‘‘उच्चारातच मराठी मेली

व्याकरणाने गोची केली

गावाकडली माय मराठी झुरते काठावर

ज्ञानेश्वर जा रे वर्गावर.’’

इतर कडवे अशाच परंतु इतर प्रश्नांवर आधारित आहेत. हे ओघात आलं म्हणून सांगितलं. तुम्ही बाकी हिंमत बांधलीत अजून घट्ट अनेकांची. बस एवढंच सांगायचं होतं.

– मुकुंद राजपंखे, अंबाजोगाई.

शांततेच्या प्रयत्नांना बळ हवे

‘शांततेचं अद्भुत गाणं!’ हा नीरजा यांचा लेख म्हणजे दुर्मीळ झालेल्या शांततेचा अनुभव देताना विद्वेष काढून प्रेमाचा पूल बांधण्याचा विचार देणारा! युद्ध म्हणजे काय याचा अनुभव जुन्या पिढीने घेतला. आता हा विध्वंसक प्रकार होऊ  नये असे वाटते. तसेही अलीकडील वातावरणात सद्भावना, सामंजस्य कमी होत आहे. संताप, द्वेष, स्वार्थीपणा हे प्रकार वाढत आहेत. अशा वातावरणात शांततेचे गाणे गाताना प्रबोधनाची गरज आहे. असे चांगले प्रयत्न हाणून पाडले जाण्याची शक्यता जास्त. तरीही असे प्रयत्न करणाऱ्यांना बळ मिळणे आवश्यक आहे.

प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

पुरुषांनी आत्मपरीक्षण करावे

‘स्वत:मधला माणूस शोधताना’ हा सानिया भालेराव यांचा लेख अतिशय आवडला. सानियासारख्या आधुनिक मुलींना सलाम करावा वाटतो. त्यांचं लिखाण म्हणजे बुरसटलेल्या लोकांना एक चपराक आहे. याचप्रकारे विविध क्षेत्रांत कार्यरत स्त्रियांनी व्यक्त होत राहिले पाहिजे. आज पुरुषांनी आपला पुरुषार्थ नेमका काय असतो हे महिती करून घेणेसुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे.

– शशांक कुलकर्णी, जालना</p>

स्वच्छ मनाची अभिव्यक्ती

‘स्वत:मधला माणूस शोधताना’ हा लेख वाचला. ‘मीची गोष्ट’ हे सदर मी नेहेमीच वाचते पण आजचा लेख खास आहे. एक बाई  म्हणून मलाही असे अनुभव आले आहेत, पण लेखिकेने त्याचा कुठेही बाऊ  न करता ज्या स्वच्छ मनाने लिहिलं आहे ते फार आवडलं. नाहीतर हे बहुतांश वेळा एकतर्फी असतं. स्वत:चं मोठेपणा दाखवण्याचा प्रयत्न या लेखनात कुठंही नाही. ‘बाई म्हणजे माणूस’ हे तर मला फार आवडलं. माझ्या मुलीला हा लेख वाचून दाखवला. ती आता सातवीत आहे. तिच्याशी छान बोलता आलं. इतक्या सुरेख लेखाबद्दल ‘चतुरंग’चे आणि सानिया यांचे आभार.

– स्वाती खेडकर, मुंबई

खणखणीत नाणे

तृप्ती तोरडमल यांनी त्यांचे बाबा मधुकर तोरडमल यांच्यावर ‘रंगभूमीवरील अमीट छाप’ हा अतिशय समर्पक लेख लिहिलाय. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास या लेखात सुंदर उलगडला आहे. मुळात ‘चतुरंग’ने यावर्षी ‘आभाळमाया’ सदर सुरू केले, आईवडिलांबद्दल मुलांना लिहायला प्रवृत्त केले तो अतिशय स्तुत्य प्रयोग आहे. माझ्यासारखे वाचक त्यामुळे एकदम खूश आहेत. कारण मुलं आणि आईवडील यांच्यातील ते खणखणीत नाणे ठरत आहे. या सदरात मुलं जे लिहितात, ते आईवडिलांवर असणाऱ्या सच्च्या प्रेमातून येतं. त्यातून वाचकांना त्यांच्या खऱ्या भावना कळतात. या लिखाणात असतो तो फक्त राजहंसाचा निरक्षीर विवेक. तेव्हा ‘चतुरंग’चेही आभार.

– उषा आठल्ये, मुंबई

अवघड विषयांची संवेदनशील हाताळणी

‘अवघड प्रसंगांचं भान’ हा डॉ. राजन भोसले यांचा लेख एका नाजूक विषयाला अत्यंत संवेदनशीलतेनं हाताळतो. अनेक दाम्पत्याच्या आयुष्यात उद्भवत असलेल्या या प्रसंगाला कशा प्रकारे सामोरे जावे हे न कळल्यामुळे त्या मुलांच्या मानसिकतेवर आयुष्यभर होत असलेला भीषण परिणाम त्यांनी नीट समजावून सांगितलाय. निरागस मुलांवर होत असलेला परिणाम वाचून अंगावर काटा आला, दाम्पत्याने तो प्रसंग वाचून आपल्या वागण्यातही बदल करणे आवश्यक आहे. ‘स्वत:मधला माणूस शोधताना’ हा लेखही मनाला खूप भावला, विचारप्रवर्तक वाटला. एका स्त्रीला तिचं माणूसपण शोधण्यासाठी किती प्रकारची संकटं-संघर्ष यांना सामोरे जावे लागते हे वाचून सखेद आश्चर्य वाटलं. तिच्या आई आणि आजीने समर्थपणे साथ दिली म्हणूनच ती प्रगती करू शकली. परंतु पुरुष म्हणून हे सगळं खरंच आमच्या लक्षात येत नाही, हे खरं.

– गणेश शंकर  भांडारकर

पत्र लिहिणाऱ्यांसाठी

वाचकहो, चतुरंग पुरवणीमधील लेखांवर तुम्ही भरभरून प्रतिक्रिया पाठवत असता त्याबद्दल धन्यवाद.

आपली पत्रे ‘चतुरंग’मध्ये प्रसिद्ध होण्यासाठी काही सूचना-

पत्र मराठीतून (देवनागरी) असतील तरच ती प्रसिद्ध केली जातील. इंग्रजीमध्ये लिहिलेल्या पत्रांचा समावेश केला जाणार नाही. लेख छान आहे, आवडला, पटला, अशी एका शब्दांची, वाक्यांची पत्रे प्रसिद्ध केली जाणार नाहीत. एखाद्या लेखावर मत मांडणारी, चर्चा घडवून आणणारी पत्रे आम्हाला निश्चितच प्रसिद्ध करायला आवडतील. इमेलवरील पत्र पीडीएफ तसेच ओपन, आरटीएफ किंवा डॉक्स फाईल्स मध्ये असावे. हस्तलिखित पत्रं पाठवण्यासाठी आमचा पत्ता :

ईएल १३८, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, महापे, नवी मुंबई – ४००७१० किंवा chaturang@expressindia.com अथवा chaturangnew@gmail.com