डॉ. ओमकार भाटकर
चित्रपट हे लिंगभावाविषयी संवेदनशील संस्कृती निर्माण करण्याचं प्रभावी साधन ठरू शकतं तसंच तो तरुण पिढीला जागतिक समानुभूतीचा दृष्टिकोन देऊ शकतो, हे दाखवून देणारा ‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूस’ (मावा) आणि सोमय्या विद्यापीठाच्या ‘दृष्टी फिल्म फोरम’च्या समन्वयातून तयार झालेला ‘समभाव इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग फिल्म फेस्टिवल २०२५’ नुकताच पार पडला त्यानिमित्ताने…
मुंबईतील एका सभागृहातील काळोख्या शांततेत चित्रप्रतिमांमधून एक जग उलगडत गेलं… कुणी शांतपणे पुकारलेलं बंड…, हिमतीने अंगीकारलेली ओळख…, निर्धाराने मागे टाकलेलं मौन… यांचं हे जग होतं. मग त्यानंतरचे दोन्ही दिवस त्याच सभागृहात त्यावरची चर्चा आणि चिंतनाचा स्वर घुमत राहिला… निमित्त होतं, चित्रपट साक्षरता निर्माण करणं आणि सद्सद्विवेकबुद्धीने वापर केल्यास चित्रपट हे लिंगभावाविषयी संवेदनशील संस्कृती निर्माण करण्याचं प्रभावी साधन ठरू शकतं हे उपस्थितांच्या ध्यानात आणून देण्याचं काम करणारा ‘समभाव इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग फिल्म फेस्टिवल २०२५’ हा चित्रपट महोत्सव.
‘मावा’ अर्थात ‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूस’ आणि मुंबईतील सोमय्या विद्यापीठाच्या ‘दृष्टी फिल्म फोरम’च्या समन्वयातून ‘के. जे. सोमय्या’ महाविद्यालयाच्या ‘कालिदास’ सभागृहात नुकताच ‘समभाव इंटरनॅशनल ट्रॅव्हलिंग फिल्म फेस्टिवल २०२५’ आयोजित करण्यात आला होता. ‘समभाव’मध्ये विभिन्न सामाजिक ओळखींचा आवाज धारदारपणे पडद्यावर उमटलाच. पण त्यांचा प्रभाव पडद्याच्याही पलीकडे नेण्याची या महोत्सवाची आकांक्षा होती. एखादा चित्रपट सजगपणे पाहणं म्हणजे काय, हा मूलभूत प्रश्न या महोत्सवाने उपस्थित तरुण प्रेक्षकांना विचारला. नेदरलँड्स कॉन्स्युलेटचे थिएरी व्हॅन हेल्डन यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात म्हटल्यानुसार, ‘समभाव’ हा निव्वळ एक चित्रपट महोत्सव नसून ती एक चळवळ आहे.
चित्रपटाची भाषा
आजची तरुण पिढी चित्रपट अगदी वेगळ्या नजरेनं पाहते. एखाद्या सिनेताऱ्याच्या करिश्म्याला भुलण्याचा जमाना मागे पडतो आहे. त्याऐवजी चित्रपटनिर्मितीच्या प्रक्रियेविषयी अधिक सजग रस दिसून येतो. विद्यार्थी प्रतिनिधी दीपाली महाजन हिने याकडे नेमकेपणाने निर्देश केला. ती म्हणाली, आता चित्रपट ‘नोलान’चा असतो, ‘राजामौली’चा असतो. लोक ‘वांगा’च्या चित्रपटांविषयी चर्चा, मीमांसा करताना दिसतात. ‘जेन झी’ ही चित्रपटांकडे निव्वळ मनोरंजनाचं साधन म्हणून नव्हे, तर एक कला म्हणून पाहते हेच यातून दिसतं.
चित्रपटप्रेमाच्या या संस्कृतीमुळेच सिनेमॅटोग्राफी, स्क्रीनप्ले, कलरग्रेडिंग यांसारखे शब्द दैनंदिन बोलण्यात सहज वापरले जातात. चित्रपटाकडे अधिक अभ्यासू नजरेनं पाहण्याची तयारी त्यातून दिसून येते. अलीकडच्या काही वर्षांत विद्यापीठांमधून फिल्म थिअरी, व्हिज्युअल कल्चर यांसारखे विषय शिकवले जाऊ लागले आहेत. त्यामुळे सुझन सॉन्टाग, आंद्रे बाजैं आणि जाईल्ज डेल्यूज यांसारख्या विचारवंतांच्या जगाशी विद्यार्थ्यांची ओळख होऊ लागली आहे. चित्रपटांची स्वत:ची अशी एक भाषा असते, व्याकरण असतं असं हे विचारवंत आपल्याला समजावतात. चित्रपटाची ही भाषा वैशिष्ट्यपूर्ण छायाचित्रणातून, संपादनातून व ध्वनिरचनेतून साकारते. चित्रपट सजगपणे पाहण्यासाठी ही भाषा आत्मसात करावी लागते. लो अँगल शॉटने व्यक्तिरेखेला सामर्थ्य मिळतं, लाँग टेकमधून असह्य ताण निर्माण करता येतो व तापदायक कटमधून व्यक्तिरेखेच्या मानसिकतेचं दुभंगलेपण प्रतीत होतं.
‘समभाव’ने ही वाढती बौद्धिक उत्कंठाच खुबीने जोखली. चित्रपटाचं व्याकरण समजून घेणं ही निव्वळ शैक्षणिक गरज नाही तर प्रेक्षक म्हणून ती आपली नैतिक जबाबदारीही आहे. एखाद्या दृश्यात कॅमेरा नेमका कुठे पाहतोय हे आपल्याला कळलं नाही तर आपण पुरुषी नजरेबद्दल कसं बोलणार? पुरुषसत्ताक प्रतीकात्मकता टाळून केलेली दृश्यात्मक निवड जर आपल्याला कळली नाही तर आपण सक्षमीकरणाच्या ‘नॅरेटिव्ह’चं कौतुक कसं करणार?
अद्याप बरंच काम बाकी आहे. इंग्रजीत या संदर्भात बरंच प्रभावी लिखाण उपलब्ध असलं तरी इंग्रजी न जाणणारे असंख्य वाचक जागतिक पातळीवरील या चर्चेपासून दूरच आहेत. बाजैं आणि डेल्यूजचे अनुवाद मराठी-हिंदीत सहजपणे कुठे उपलब्ध आहेत? अरुण खोपकर यांच्यासारख्यांनी फिल्म थिअरीविषयी मराठीत उत्तम लिहून ठेवलं असलं तरी चित्रपट समीक्षाविचार विविध भारतीय भाषांमध्ये जोरकसपणे उपलब्ध होण्यासाठी अधिक प्रयासाची गरज आहे. ‘समभाव’मध्ये अत्यंत चोखंदळपणे आयोजित केली जाणारी चर्चा आणि परिसंवाद या दिशेने प्रयत्नशील दिसतात. इथे वक्ते जागतिक फिल्म थिअरीची बोजड भाषा इतकी सोपी करून सांगतात की चित्रपट संपल्यावरही प्रेक्षकांना हा संवाद साद घालत राहतो.
चोखंदळ निवड
या महोत्सवातील चित्रपटांची चोखंदळपणे निवड करताना दाखवलेली धडाडी कौतुकास्पदच म्हणावी लागेल. सरधोपट मांडणी करणाऱ्या ‘नरेटिव्ह्ज’ना इथे जागा नव्हती. दीपालीच्या शब्दात सांगायचं तर, ‘अस्वस्थ असणाऱ्यांना धीर देणाऱ्या आणि खुशाल असणाऱ्यांना अस्वस्थ करणाऱ्या’ चित्रकृती या महोत्सवासाठी निवडलेल्या होत्या. हे निव्वळ टाइमपाससाठीचे चित्रपट नव्हते, तर प्रदर्शन संपल्यानंतरही पिच्छा पुरवणाऱ्या या कलाकृती होत्या.
परस्परांना छेद देणाऱ्या अनेकविध ओळखींचं दर्शन इथं घडलं. लिंगभाव, जाती तसंच समलिंगी आणि उभयलिंगी यांच्याविषयीच्या एकमेकांत गुंफलेल्या या धाग्यांमधून जगणं कधीच एकमितीय नसतं याचीच साक्ष पटली. शोयच्या ‘प्रोजेक्ट प्रियो’मधून देशभरातील क्वीअर (समलिंगी आणि उभयलिंगी) आणि ट्रान्स (पारलिंगी) जीवनानुभवांचं बहुभाषिक वैविध्यपूर्ण दर्शन घडलं, तर नैरिता दासगुप्ताच्या ‘नाइट क्वीन’ने साडी नेसण्याची व स्त्रीसारखे पोशाख परिधान करण्याची इच्छा बाळगणाऱ्या एका मध्यमवयीन विवाहित पुरुषाचा प्रवास मोठ्या हिमतीने मांडला.
संरचनात्मक हिंसाचार समोर ठेवणंही महोत्सवाने टाळलं नाही. तिहेरी तलाकविरोधातील वास्तव चळवळीपासून प्रेरित ‘रिहा’ने चित्रपट हे हस्तक्षेपाचं प्रभावी माध्यम असल्याचं दर्शवलं. बलात्काराची तक्रार दाखल करण्यासाठी शरीरावर जखमांच्या दृश्य खुणा असल्या पाहिजेत असं म्हणणारे जपानमधील बलात्कारविषयक कायदे किती जुलमी आहेत हे ‘ब्लॅक बॉक्स डायरीज’ या जपानी डॉक्यु-फीचर पटाने अधोरेखित केलं.
वैयक्तिक पातळीवरील संघर्षातून समाजातील व्यापक दुभंगलेपणाचा शोधही काही चित्रपटांनी घेतला. ‘अॅनिव्हर्सरी’मध्ये शहरी एकाकीपणा, जवळिकीची ओढ तसंच करिअरच्या ओझ्याखाली दुरावणारं दाम्पत्य यावर प्रकाश टाकण्यात आला. महोत्सवाने पुरुषत्वाचे बारकावे उलगडणारी दृष्टीही समोर ठेवली. पुरुषत्वातील हळवेपण व दुबळेपणा दाखवण्यातही महोत्सवातील चित्रपट संकोचले नाहीत अशी प्रतिक्रिया महोत्सवात सहभागी झालेल्या भाविका गांधी हिने व्यक्त केली. ‘वेणी’ या चित्रपटात नवरा आपल्या सासूची वेणी घालायला शिकतो. या ‘प्रतीकात्मकते’कडे निर्देश करीत ती म्हणाली की, दिशाभूल करणाऱ्या चित्रपटांपेक्षा असे अर्थपूर्ण चित्रपट पाहायला हवेत. कामेच्छा व्यक्त करण्याच्या हिमतीचा शोध घेणारा बंगाली चित्रपट ‘इफ’पासून राजकीय विचारप्रणालीमुळे एखादं दाम्पत्य कसं दुरावू शकतं हे दर्शविणाऱ्या ‘वी द पफकॉर्न्स ऑफ इंडिया’पर्यंत अनेक चित्रपटांनी आपल्या वैयक्तिक दु:खवेदना वास्तवत: राजकीय असतात असं विधान केलं.
सामाजिक बदलांच्या दिशेने
महोत्सवासाठी अत्यंत चोखंदळपणे चित्रपट निवडले जाण्यामागे ‘मावा’ने गेली तीन दशकं ध्येयासक्तीने केलेलं काम आहे. ‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्युस’ अर्थात ‘मावा’ ही पुरुषसत्ताकतेच्या विरोधातील कामात पुरुष व मुलग्यांना गुंतवणारी भारतातील अग्रणी संघटना आहे. जिथे क्रमिक पुस्तकं वा वृत्तपत्रातील सदरं जाऊ शकणार नाहीत तिथवर पोहोचत गेली ३२ वर्षं ‘मावा’ने लिंगभावाच्या असमानतेस कारणीभूत ठरणारी, खोलवर रुजलेली मानसिकता बदलण्याचं काम केलं आहे. या संदर्भातील आकडेवारीतून हे स्पष्ट दिसतं. ‘मावा’ने आजवर देशभरात १२००हून अधिक तरुण संवादक तयार केले आहेत व या संवादकांनी आपल्या अवतीभोवतीच्या ६ लाख ५० हजारहून अधिक समवयस्कांना स्त्रिया तसंच लिंगभावदृष्ट्या अल्पसंख्याक असणाऱ्यांच्या मानवी हक्कांसाठी उभं राहण्यास प्रभावित केलं आहे.
‘समभाव’ महोत्सव हा याच धोरणाचा भाग असून महोत्सवाचं हे यंदाचं सातवं वर्ष आहे. देशातील ५३ शहरं व १८ ग्रामीण जिल्ह्यांतून तसंच शेजारच्या व दक्षिण आशियाई देशांपैकी नेपाळ, बांगलादेश, इंडोनेशिया, भूतान या देशांमधील प्रमुख शहरांमधून प्रवास करत सुमारे २५ हजारांहून अधिक तरुणांपर्यंत पोहोचलेला हा चित्रपट महोत्सव एक चळवळ बनला आहे. महोत्सवाचं उद्दिष्ट सुस्पष्ट आहे – ‘लिंगभावातील वैविध्य साजरं करण्यासाठी आणि भेद व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित व निर्भय मंच उपलब्ध करून देणं.’ या चित्रपटांना थेट महाविद्यालयांच्या आवारात आणून ‘मावा’ हे दाखवून देते की तरुण निव्वळ लोकसंख्याशास्त्रीयदृष्ट्या महत्त्वाचे नाहीत तर बदलांचे जनक आहेत. कारण या संवेदनशील वयातच जागतिक दृष्टिकोन तयार होत असतात, पूर्वग्रहांना आव्हान दिलं जातं आणि जन्मभरासाठी एखाद्या विचाराचा पुरस्कार करण्याची सुरुवात होऊ शकते.
‘समभाव २०२५’चं यश तिकीट विक्रीत मोजलं जाणार नाही, कारण मुळात त्यासाठी तिकिटं नव्हतीच. हा महोत्सव सगळ्यांसाठी खुला होता. किती मोठ्या संख्येनं इथं चित्रपट दाखवले गेले यातही त्याचं यश गणलं जाणार नाही. तर महोत्सवानंतर मिळणाऱ्या प्रतिसादात ते मोजलं जाईल. महाविद्यालयाच्या कँटीनमध्ये ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटावर अनेक दिवस वाद-चर्चा होत राहील हे या महोत्सवाचं यश असेल. चित्रपट विषयाचा एखादा विद्यार्थी आता कॅमेऱ्याला चित्रपट निर्मितीचं निव्वळ एक साधन मानणार नाही तर सत्य, न्याय आणि सौंदर्य मांडण्याचं शस्त्र मानेल हेही महोत्सवाचं यश असेल. ‘वेणी’ पाहिलेल्या एखाद्या तरुणाच्या अंतरात जाणता-अजाणता काही तरी बदलेल. सामर्थ्य आणि दुबळेपणा हे परस्परविरोधी नाहीत हे त्याला कळून चुकेल.
सजगपणे पाहायला शिकणाऱ्या पिढीसमोर आव्हानात्मक कला ठेवून ‘मावा’ निव्वळ चित्रपटांचं प्रदर्शन करण्यापलीकडचं काम करते आहे. अधिक विचारी, जबाबदार आणि समानुभूती असणाऱ्या नागरिकांचं प्रजासत्ताक तयार करण्याचं काम ‘मावा’ करते आहे.
भाषांतर – आशा कबरे-मटाले
omkar.bhatkar22@gmail.com