माधवी टिळवे

मन करा रे प्रसन्न। ‘माझी आजी गांधीजींच्या शाळेत शिकायला जाते,’ माझा पाच वर्षांचा नातू सगळय़ांना सांगत असे. त्याचं असं झालं, १६ डिसेंबर २०२१ या दिवशी ‘लोकसत्ता’ या दैनिकात ‘कॅलिग्राफी’ कोर्सबद्दलची जाहिरात आली होती. बोरिवली येथील ‘कोरा केंद्र’ या संस्थेतर्फे १९ डिसेंबर २०२१ ते १६ जानेवारी २०२२ या दरम्यानच्या पाच रविवारी हा कोर्स शिकवणार होते.

मुलासाठी, रितेशसाठी त्या कोर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मी ‘कॅलिग्राफी’ शिकवणाऱ्या वक्कार सरांना फोन केला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘१६ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती जिला चित्रकलेची आवड आहे, ते या क्लासला प्रवेश घेऊ शकतात.’’ तेव्हा मी त्यांना म्हटले, ‘‘माझा मुलगा कॉम्प्युटरवर कलात्मक काम करतो; परंतु त्याला हाताने ड्रॉइंग काढायची आवड नाही; पण मला मात्र हाताने ड्रॉइंग काढायला आवडते, पण आता माझी सत्तरी होऊन गेली आहे.’’ हे ऐकून ते म्हणाले, ‘‘काही हरकत नाही. तुम्हाला आवड असेल तर जरूर तुम्ही हा कोर्स करू शकता.’’
रितेशही म्हणाला, ‘‘आई, तुला शिकायची आणि शिकवायचीही आवड आहे. तर मग तूच या कोर्सला प्रवेश घे. तू शिकलीस तर तू इतरांनाही शिकवशील.’’ असे म्हणून त्याने कोर्सच्या फीचे पैसे भरूनही टाकले. १९ डिसेंबर २०२१ रविवारी दुपारी साडेअकरा वाजता रितेश, त्याचा पाच वर्षांचा मुलगा ओजस आणि मी ‘कोरा केंद्र’ संस्थेत गेलो. क्लासच्या िभतीवरील महात्मा गांधींचे चित्र पाहून नातू म्हणाला, ‘‘आजी, तू गांधीजींच्या शाळेत जाणार?’’ म्हणजे आजीने नातवाला शाळेत सोडायला जायचे तर आजीलाच शाळेत सोडायला नातू आला होता.

अशा रीतीने मी कॅलिग्राफीच्या कोर्सला प्रवेश घेतला. आमच्या क्लासमध्ये ७ स्त्रिया आणि ३ पुरुष शिकायला आले होते. वयाच्या
७२ व्या वर्षी मी शिकायला आले हे पाहून सर्वानी टाळय़ा वाजवून माझे अभिनंदन केले. कोर्समध्ये शिकविण्यात आलेल्या गोष्टींमध्ये – इंग्रजी, मराठी लिप्या, वेगवेगळय़ा पद्धतीने वेगवेगळी साधने वापरून कशा काढाव्यात. भेटकार्ड बनविणे, लग्नपत्रिकेवरील डिझाइन बनवणे, साडी पेंटिंगचे डिझाइन कसे करावे, टीशर्टवरचे डिझाइन कसे काढावे, दारावरची नेमप्लेट निरनिराळय़ा प्रकारे कशा तयार कराव्यात हे सारं काही शिकवलं गेलं आणि मी त्याचं प्रात्यक्षिक घरी करून बघू लागले.

आमच्या घरासाठी बनविलेल्या नेमप्लेटवर आधी पेन्सिलने डिझाइन काढले. थोडय़ा भागावर फेव्हिकॉल लावून त्यावर वाळू पसरवली. वाळू चिकटल्यावर त्यावर रंगात ब्रश बुडवून माझे ‘टिळवे’ असे आडनाव लिहिले. ती नेमप्लेट पाहून मला खूप आनंद झाला.कोर्स संपताना आम्हाला प्रशस्तिपत्रके दिली तेव्हा ‘कोरा केंद्र’ संस्थेचे प्रमुख आले होते. ते माझ्यासंबंधी बोलताना सर्वाना म्हणाले, ‘‘तुम्हाला आवडअसेल तर तुम्ही कोणत्याही वयात शिकू शकता. कलेला वयाचे बंधन नाही.’’ मला प्रशस्तिपत्रक दिल्यावर माझा या कोर्सबद्दलचा अनुभव सांगताना मी म्हणाले, ‘‘या कोर्समध्ये सरांनी खूपच छान शिकवले. मला मी ७२ वर्षांची नसून २७ वर्षे वयाची आहे असे वाटते.’’ खरं तर मी पहिल्यापासूनच काही ना काही शिकून घ्यायला उत्सुक असायची. १९७० मध्ये बी.एस्सी (होम सायन्स) केलं होतंच. त्यानंतर अ‍ॅक्युप्रेशरचा कोर्स, चुंबक चिकित्सा अभ्यासक्रम केला होता; पण २०११ मध्ये वयाच्या ६१ व्या वर्षी चित्रकलेचा दोन महिन्यांचा कोर्स केला तो मला विशेष आनंद देऊन गेला. मला वाचन, लेखन करायला आवडते. माझ्या मनातले विचार मी शब्दरूपाने माझ्या लेखनात, कवितेत उतरवते. त्यामुळे माझे मन विधायक विचाराने भरलेले राहाते. नकारात्मक विचार मनात आले तरी त्याची तीव्रता कमी होते. कोणाचा वाढदिवस, लग्न वगैरेप्रसंगी मी त्या प्रसंगाला अनुरूप अशा कविता करून, स्वत:च्या हाताने भेटकार्ड बनवून देते. याशिवाय मला माहीत असलेल्या आणि मी अनुभवलेल्या गोष्टी लिहून काढते, ज्यांना उपयोगी पडू शकतील त्यांना त्या सांगते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे करत असताना अ‍ॅक्युप्रेशर, आहार-विहार यासंबंधी माहिती देऊन उपचारही करते. मला जी झेपतील ती कामे मी आवडीने करते. ‘कामात बदल हीच विश्रांती’ हे ध्यानात ठेवून स्वार्थ आणि परमार्थ साधल्याने वयाच्या ७२ व्या वर्षीही शारीरिक, मानसिकदृष्टय़ा सक्षम राहिले. मी माझ्या भूतकाळातील वाईट घटना उगाळत न बसता तसेच भविष्यकाळाची चिंता न करता वर्तमान काळातील प्रत्येक क्षण सत्कारणी लावण्याचा प्रयास करते, आनंदी आयुष्य जगते.
शेवटी मला इतकेच सांगायचे आहे,
मन करा रे प्रसन्न। सर्व सिद्धिचे कारण।
ritesh.tilve@gmail.com