नावडत्या आणि आवडत्या राणीच्या गोष्टी आटपाट नगरातून आज आपल्या जगातही पोहोचल्या आहेत. नावडती राणी तर उपेक्षित आयुष्य जगतेच, पण तिच्या मुलांनाही अनेकदा बेवारस, अर्थहीन आयुष्य जगणं भाग पडतं..
नुकतंच प्रसिद्ध झालेलं ते पुस्तक वाचून संपवलं आणि मनाचा अस्वस्थ प्रवास सुरू झाला. पुस्तक अगदी नवकोरं. अनेक कारणांनी गाजलेलं. एका प्रसिद्ध कलावंताच्या मुलाने मांडलेली ही व्यथा.. वडील-मुलाचे  बहुपदरी भावबंद उलगडणारी! पित्याकडून नव्हे तर त्याच्या दुसऱ्या पत्नीकडून झालेली अवहेलना. ध्रुवाची आधुनिक कथाच म्हणा ना!
बहुपदरी भावबंद उलगडणारी! पित्याकडून नव्हे तर त्याच्या दुसऱ्या पत्नीकडून झालेली अवहेलना. ध्रुवाची आधुनिक कथाच म्हणा ना! 
उत्तानपाद नावाच्या राजाच्या दोन राण्या.. अर्थात एक आवडती आणि एक नावडती, नावडतीचा पुत्र ध्रुव, पित्याच्या मांडीवर हक्काने बसलेल्या आवडतीच्या पुत्राला पाहून, ध्रुव पित्याच्या मांडीवर बसला, तेव्हा चिडलेल्या आवडतीनं, त्याला भर दरबारात मांडीवरून ओढून काढलं, आणि शिक्षा म्हणून  ध्रुवबाळाला आईसह वनवासी केलं. ध्रुवबाळाची ही कहाणी शालेय वयात वाचताना, गहीवरलेलं मन, आता नव्याने फिरून एकदा गहिवरलं, ते त्या महान कलावंताच्या उपेक्षित (गुणी) मुलासाठी..
या गहिवरात अनेक प्रश्नचिन्हं दडली होती. आवडत्या ‘दुसरी’मुळे, नावडत्या मुलाची उपेक्षा करणारा पिताही दोषी नाही का? उत्तानपादासारखा बलशाली राजा स्त्रीहट्टापुढे इतका का झुकला, की पुत्राविषयी ममत्व वाटूनही, त्याने त्याला वनवासी करावं? आधुनिक उत्तानपादानं, म्हणजे या पुस्तकातल्या महान कलावंत पित्यानं (कला क्षेत्रातल्या राजाने) दुसऱ्या पत्नीच्या दबावामुळे पहिलीच्या मुलांचा अधिक्षेप केला. इतका  की दुसरीच्या घराला कुबेराची पालखी आणि पहिलीच्या घराला आणि मुलांना सतत गरिबीची हालाखी. तरीही ‘पहिली’ पतिव्रताधर्म आचरतेच आहे आणि मुलं पित्याची भलावण ‘परिस्थितीशरण’ एवढीच करून, त्याला सर्व गुन्हे माफ करतात. का? तर ती भारतीय संस्कृती(?) आहे म्हणून.
या पाश्र्वभूमीवर चार वर्षांपूर्वी पुण्यातून प्रसिद्ध होणाऱ्या एक प्रसिद्ध दिवाळी अंकातला आजतागायत स्मरणात असलेला लेख आठवला. असाच! पण लेखिकेचा अवघा उद्वेग बाहेर पडलेला आणि होय, पित्याच्या ओंजळीत दोषाचे दान फेकणारा. बराच निर्भय आणि निषेध नोंदकही.. गेल्या शतकावर अक्षरमोहर उठवलेला प्रसिद्ध मराठी साहित्यिक. त्याच्या नावडतीला पाच मुलं, आवडतीला तीन मुलं. नावडतीची एक कन्या (पुढं नावारूपाला आलेली विदुषी) मॅट्रिकच्या परीक्षेची फॉर्म फी मागायला आईच्या सांगण्यावरून दुसऱ्या घरी जाते. अनेक वेळा दार ठोठावूनही दुसरी राणी पहिलीच्या मुलांना काही द्यायचं नाही आणि देऊ द्यायचंही नाही, म्हणून दार उघडतही नाही. मुलगी हताश होऊन मागे फिरते, भरल्या डोळय़ांनी घराकडे मागे वळून पाहते. घराच्या गच्चीवरती तो बाप नावाचा साहित्यिक मख्खपणे उभा असतो. लेखाचा हा सारांश. सविस्तर लेख अनेक भावनांना आवाहन करणारा होता, आणि उद्वेग आणणाराही..! पण माझ्या मनाला नावडतीच्या त्या लेकीनं विचारांचा कल्लोळ उभा केला. आणि आटपाट  नगरीच्या कहाण्यांच्या दुनियेत घेऊन गेला.
श्रावण महिन्यात वाचल्या जाणाऱ्या त्या ‘आटपाट नगराच्या’ कहाण्या. पराक्रमी राजा आणि त्याची रूपवती, गुणवती, सोज्वळ राणी आणि छोटा राजपुत्र. आटपाटनगर म्हणजेच सुखी नगर. ‘निर्मळ मळे, उदकाचे तळे’ ओलांडून कहाणी पुढे सरकते, तेव्हा कशी आणि का, कोण जाणे, राणी नावडती झालेली असते. राजाच्या आयुष्यात नवी, हुशार, धूर्त स्त्री येते. आणि ‘आवडती’ होते. पहिलीची मुलासह रानावनात हकालपट्टी होते. तिचं मूल भणंग आयुष्य जगत राहतं, मग ती पहिली राणी मुलाच्या उद्धारासाठी (?) कुठल्याशा देवीला शरण जाते. दहा मंगळवार उपास करते. ब्राह्मणाला केनीकुर्डुची भाजी करून जेवण घालते. उतत नाही मातत नाही. (कशाला उतेल मातेल?) घेतला वसा टाकत नाही. मग होतं काय? राजा मुलाचा स्वीकार करतो. (मोठे उपकार) पहिलीला महाली आणतो. साडी-चोळीने तिची ओटी भरली जाते. उपेक्षित राणी कृतकृत्य होते आणि साठा उत्तराची कहाणी सुफळ संपूर्ण होते. 
या कहाण्या प्रचलित असलेला काळ कित्येक वाटा वळणं घेत घेत, आधुनिक काळात येऊनही जुना झाला. पण कहाण्या संपल्या? आवडती आणि नावडतीची उपेक्षित मुलं, याचं अस्तित्व संपलं? याचं उत्तर होकारार्थी आलं असतं, तर? पण तसं अजिबातच घडलेलं नाही. संदर्भ बदलले. घटना बदलल्या. पण दुर्दैवी वस्तुस्थिती तशीच राहिली. किती तरी अशी उदाहरणं अद्यापही दिसतात. ‘आटपाट नगरं’ बदलली इतकंच काय ते! 
मी शिक्षण घेतलेल्या, सांगलीच्या कन्याशाळेत एक स्मार्ट, चुणचुणीत अशी आमची सहाध्यायी मैत्रीण होती. नादारीवर शिकणारी, अबोल, सदैव धास्तावलेली. तिची आई एका हॉस्पिटलमध्ये नर्स होती. दोघीच मायलेकी भाडय़ाच्या एका खोलीत राहत. ती एका प्रसिद्ध मराठी नटाची कन्या होती, तिला आणि तिच्या आईला ‘टाकून’ महाशयांनी दुसरी, अर्थात स्मार्ट, कलावती सहचरी (?) निवडली होती. मुंबईत त्यांचा त्यांच्या दोन मुलांसह ‘स्मार्ट संसार’ चालला होता. आवडतीची मुलं प्रसिद्धीच्या झोतात न्हाऊन निघत होती. तेव्हा सांगलीच्या शाळेतली ‘ती’ शक्यतो आडनाव सांगणं टाळत, आईसह दिवस अक्षरश: रेटत होती. 
आवडती-नावडतीच्या अशा कित्येक गोष्टी आजही कलाक्षेत्रातील उच्चभ्रूंच्या जगात उजळमाथ्याने वावरत आहेत. मात्र बऱ्याच ‘नकोशा’ राण्या आत्मसन्मान जागवून उभ्या राहिलेल्या आहेत. स्वत:च्या कमाईवर, पतीची म्हणजे मुलांच्या वडिलांची, याचना न करता, मुलांचं संगोपन करून मुलांचं क्षितिज मोठं केलेल्या ‘त्या’, आई म्हणून समर्थ ठरल्या, भले त्यांचं पत्नीपद असमर्थ ठरो! कदाचित त्यांनी घेतलेला वसा वेगळा झालाय.
पण! पण अशा राण्यांची संख्या किती? उर्वरित नकोशा राण्या आणि त्यांची कुठलाही अपराध नसताना नकोशी मुलं, यांच्या अस्वस्थ कहाण्यांनी, कोणा कलावंताच्या ‘पोरा’च्या, आत्मपर लेखनाच्या वाचनानंतर मनात फेर धरला. हा ‘फेर’ झुपूझ्रेचा आनंददायी नव्हता, तर दुर्दैवाचा ‘फेरा’ होता. एवढं मात्र सत्य..   
  संग्रहित लेख, दिनांक 15th Mar 2014 रोजी प्रकाशित  
 नावडत्या राणीची मुलं
नावडत्या आणि आवडत्या राणीच्या गोष्टी आटपाट नगरातून आज आपल्या जगातही पोहोचल्या आहेत. नावडती राणी तर उपेक्षित आयुष्य जगतेच, पण तिच्या मुलांनाही अनेकदा बेवारस, अर्थहीन आयुष्य जगणं भाग पडतं..

  First published on:  15-03-2014 at 01:25 IST  
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा.  मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News)  वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children of unpleasant queen