दासबोधात समर्थ रामदास स्वामींनी राजकारण कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले आहे. त्यात ते म्हणतात, राजकारण बहुत करावे। परंतु कळोच नेदावे। परपीडेवरी नसावे। अंत:करण।।

लोकसंग्रह होण्यासाठी पुष्कळ कार्य करावे परंतु लोकांना कळू देऊ  नये. तसेच दुसऱ्याला छळण्याचा विचार मनात कधी नसावा. जीवनाचे समग्र मार्गदर्शन करणारा समर्थाचा दासबोध हा ग्रंथ घराघरांत असावा. शिवाजी राजांचे प्रजेवरचे प्रेम पाहून त्यांना हाच राजा प्रजेचे रक्षण करील असे वाटले. ‘देव, धर्म, गोब्राह्मण करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली’ ही भूमी आनंदवनभुवन होण्याचे स्वप्न रामदास स्वामींनी पाहिलं. त्यांनी संभाजीला पत्र लिहिले, त्यातही ते शिवाजी राजांचा आदर्श डोळ्यांसमोर असावा हेच संभाजीला सांगतात. शिवाजी राजाला रामदास स्वामी श्रीमंत योगी असे म्हणतात. कुठल्याही भौतिक सुखाची ओढ नसलेला शिवाजी राजा खरोखरच योगी होता. पाश्चात्त्य तत्त्ववेत्ता प्लेटो याच्या आदर्श राज्य शासन या ग्रंथात त्याने समाज सुखी होण्यासाठी शासन कर्ता ज्ञानी पाहिजे हे प्रतिपादन केले. या ग्रंथात प्लेटो म्हणतो, शासनकर्ता हा तत्त्वज्ञानाचा अभ्यासक पाहिजे. नीती हा धर्माचा पाया आहे हे जाणणारा पाहिजे, प्लेटो याला वाइज मॅन म्हणतो. हा कसा असावा याबद्दल तो म्हणतो, ‘ही श्ॉल नॉट टच गोल्ड’ म्हणजे त्याला पैशाची ओढ नसावी. तसेच ‘ही श्ॉल नॉट हॅव फॅमिली..’ त्याला कुटुंब नसावे. शिवाजी राजा हा आदर्श शासनकर्ता होता. राजबंद्यांचे मनोधैर्य वाढावे म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राजाची प्रार्थना केली. हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा.. हा राजा कसा तर, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू .. शिवाजी राजानंतर अनेक निश्चयाचे महामेरू या भूमीने पाहिले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जो क्रांतीचा यज्ञ पेटला होता त्यात अनेकांनी आपल्या जीवनाच्या समीधा घातल्या. देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी युवकांना साद घातली. त्या वेळी ते म्हणाले, ‘बी ए हिरो ऑलवेज से आय हॅव नो फिअर.’ खरोखरच निर्मोही, निर्भीड, निर्भय, निरहंकारी, निर्मळ, निश्चयी, मनाचा शासनकर्ताच सामान्य लोकांचा आधार आहे आणि तोच देश प्रगतिपथावर नेईल.

madhavi.kavishwar1@gmail.com   

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.