सोयरे सहचर : ‘जटायू’चे भाऊबंद! | Premsagar Mestri Companion Jatayu vulture Conservation Vulture Conservation Day amy 95 | Loksatta

सोयरे सहचर : ‘जटायू’चे भाऊबंद!

‘निसर्गाच्या अन्नसाखळीतला गिधाड अत्यंत महत्त्वाचा, स्वच्छता राखणारा घटक. संवर्धनाची तितकीच गरज असलेला.

सोयरे सहचर : ‘जटायू’चे भाऊबंद!

‘निसर्गाच्या अन्नसाखळीतला गिधाड अत्यंत महत्त्वाचा, स्वच्छता राखणारा घटक. संवर्धनाची तितकीच गरज असलेला. जवळपास ३० वर्ष निसर्ग संरक्षणाबरोबर गिधाडांचं संवर्धन करण्याच्या प्रयत्नांत मला खूप वेगवेगळे अनुभव मिळाले. काही खडतर, काही सुखद. पण या प्रवासात मी या भव्य, डौलदार पक्ष्याच्या आणखी जवळ जाऊन पोहोचलो..’ नुकत्याच साजऱ्या झालेल्या ‘गिधाडे संवर्धन दिना’च्या निमित्तानं सांगताहेत निसर्गप्रेमी व गिधाडसंवर्धक प्रेमसागर मेस्त्री.

आम्ही महाडला टिपणीसांच्या वाडय़ात राहात होतो. त्यांची खूप झाडंझुडुपं असलेली पाऊण एकराची बाग चवदार तळय़ाजवळ होती. मुंबईहून सुट्टीसाठी आलेली त्यांची नात, रूपाताई पर्यावरण विज्ञानाचा अभ्यास करत होती. बागेतल्या पक्ष्यांची नावं ती मला सांगे. ती परत गेल्यावर मी मला स्केचिंगची आवड असल्यानं, मला दिसलेल्या नव्या पक्ष्याचं निरीक्षण करून स्मरणात ठेवून स्केच करत असे आणि ते पोस्टकार्ड तिला पाठवत असे. ती उलटटपाली मला त्याचं नाव आणि माहिती पाठवे. मी तिला अशी चाळीस पोस्टकरड पाठवली होती. जवळजवळ १५० पक्ष्यांची ओळख रूपाताईनं मार्टिन वूडकॉकच्या पुस्तकातल्या हातानं पेंट केलेल्या पक्ष्यांच्या चित्रांतून करून दिली. या पुस्तकामुळे माझं पक्षीप्रेम वाढीस लागलं.

बांधकाम व्यावसायिक असलेल्या माझ्या आजोबांबरोबर मी १० ते १५ दिवस रायगडावर मुक्कामाला जात असे. कारण टकमक टोकाजवळची गिधाडं पाहायला आवडत असत. मोरासारखं सुंदर रूप नसलेला, राजहंसासारखा डौल नसलेला, मानेवर पिसं नसणारा, तसा कुरूपच म्हणावा असा पक्षी म्हणजे गिधाड. पण हा माझा आवडता पक्षी आहे. त्याच्या मजबूत पंखांचं प्रचंड आकर्षण अजूनही मला आहे. एखादा मजूर सोबतीला घेऊन टकमक टोकाजवळ आम्ही बसत असू. तिथून खाली रांगेत बसलेल्या गिधाडांपैकी एखाद्याला दगड मारला की ते उडत असे. त्याच्या बलवान पंखांची सावली पाहाणं हा माझा आवडता खेळ होता. त्याचं भ्रमण आणि पुन्हा जागेवर येऊन बसणं या निरीक्षणात मी रमून जाई. लहानपणी मला तीव्र इच्छा होती, ती म्हणजे एकदा तरी गिधाडाच्या घरटय़ात बसायला मिळावं!

रायगड परिसरात १९८८ ते ९० च्या काळात २ ते ४ हजार एवढय़ा मोठय़ा संख्येनं गिधाडांचा अधिवास होता. कारण त्यावेळी भरणारा महाड इथला गुरांचा बाजार. या बाजारात लांबून येणारी गुरं प्रवास न झेपल्यानं मृत्यू पावत आणि गिधाडांना खाद्य मिळे. बाजार दुसरीकडे हलवल्यामुळे आणि रस्ता रुंदीकरणात झाडं तोडल्यामुळे गिधाडांची संख्या घटली.

मी १९९६-९७ चं दुसरं पक्षीमित्र संमेलन महाडला घेतलं होतं. त्यात सहभागी झालेल्या ६५० लोकांना वाईच्या गणपती मंदिरामागच्या ठाणेली लेण्यांच्या कपारीत राहाणारी लांब चोचीची गिधाडं दाखवली होती. तसंच चिरगावची उंच झाडावर राहाणारी पांढऱ्या पाठीची गिधाडंही दाखवंली होती. १९९७ पर्यंत गिधाडांची संख्या बऱ्यापैकी होती. १९९९ मध्ये एका इंग्रजी वर्तमानपत्रात आलेल्या एका बातमीनं मला अस्वस्थ केलं. ‘आर.एस.पी.बी.’ (रॉयल सोसायटी फॉर प्रोटेक्शन ऑफ बर्डस) या संस्थेनं ९८ टक्के गिधाडं नाहीशी झाली आहेत असा अहवाल जाहीर केला, ज्यात पांढऱ्या पाठीच्या गिधाडांचा उल्लेख होता. ती आमच्या महाडमधल्या चिरगावमध्ये वस्ती करत. मग मी आणि माझे निसर्गप्रेमी मित्र, आम्ही गिधाडांची शोध मोहीम सुरू केली, कारण गिधाडं वाचवणं खूप गरजेचं आहे. (आम्ही ‘सीस्केप’तर्फे (सोसायटी ऑफ इको एन्डेंजर्ड स्पिसीज काँझव्र्हेशन अँड प्रोटेक्शन) ‘निसर्ग वाचवा’ मोहीम ३० वर्षांपासूनच सुरू केली होती.) वाघ, गरुड, गिधाडं हे पर्यावरणाचा तोल सांभाळणारे महत्त्वाचे घटक आहेत. गिधाड हा मृत जनावरांवर उपजीविका करणारा, पर्यावरण स्वच्छ राखणारा अन्नसाखळीतला महत्त्वाचा दुवा आहे. विषाणूंवर ताबा मिळवणारा एकमेव पक्षी आहे. त्याच्या विष्ठेतलं ॲसिड बुरशी घालवतं.

एकेकाळी रायगड जिल्हा गिधाडांसाठी नंदनवन म्हणून ओळखला जायचा. मात्र गेल्या २५-३० वर्षांत हे चित्र पालटलं आहे. २००० ते २००४ मध्ये आम्हाला रायगड जिल्ह्यातल्या चिरगाव या ठिकाणी पांढऱ्या पाठीच्या गिधाडांच्या कॉलनीचा शोध लागला. १९९९ ते २००० या काळात आमचं सर्वेक्षण सुरू होतं. १६८ गावांमध्ये आम्ही हे केलं. चिरगाव इथे गिधाड अभ्यास, संशोधन आणि सर्वेक्षण केंद्र सुरू केलं आहे. भारतातून ९७ टक्के गिधाडं संपुष्टात आली आहेत. देशात त्यांच्या नऊ प्रजाती आढळतात. लाल डोक्याचं अर्थात ‘राज गिधाड’ रायगडमधून संपुष्टात आलं आहे. हिमाचल प्रदेशाच्या पायथ्याशी, तसंच मध्य प्रदेश, नागपूरमध्ये थोडय़ा संख्येनं आढळतं. लांब चोचीचं गिधाड कोकणात सह्याद्रीच्या कपारीत आढळतं. सुरगड, कोलाड, पाटणूस, रायगड, वारंगी, नाणेमाची, वाकी, शिवथरघळ इथे त्यांचं अस्तित्व आहे.

पांढऱ्या पाठीची गिधाडं उन्हात पंख पसरून बसली आणि उडू लागली की त्यांची पांढरी पाठ दिसते. पंख काळे असतात. ही उंच झाडांवर घरटी करतात. राज गिधाड सर्वप्रथम मेलेल्या प्राण्याचा डोळा फोडतं. त्यानंतर हृदय व इतर निवडक मऊ, मांसल भाग खातं. त्याचं पोट भरल्यावर मग इतर गिधाडं फोडून ठेवलेल्या प्राण्याचं कातडं ओढून बाजूला करतात आणि खाद्यावर तुटून पडतात. राज गिधाडाइतकी अणकुचीदार चोच इतर गिधाडांची नसल्यामुळे आता आम्हीच त्यांना ढोर फाडून देतो. गिधाडांची पचनशक्ती खूप मजबूत असते. सडलेलं, कुजलेलं मांस ते सहज पचवतात. त्यांना आठवडय़ातून एकदा खाद्य मिळालं तरी चालतं. काही गिधाडे मांस पोटभर न मिळाल्यास हाडं गिळतात. ज्या वेळी खाद्य मिळतं, त्या वेळी ती गिळलेली हाडं बाहेर टाकून देतात आणि मांस खाऊन पोट भरतात. गिधाडांच्या जगभरात २३ आणि भारतात ९ प्रजाती आहेत. गिधाडांचे आयुष्यमान ३५ ते ४० वर्षांचं असतं. एक जोडी वर्षांला साधारण एक अंडं घालून त्या पिल्लाचा सांभाळ करते. यांपैकी ५० टक्के पिल्लं मोठी होतात. गिधाडं नष्ट होण्याची कारणं म्हणजे जनावरांसाठी होत असलेला डायक्लोफिनॅक औषधाचा वापर, हरवलेला अधिवास, पर्यावरणाचा ऱ्हास, खाद्याची कमतरता आणि मानवी हस्तक्षेप. यामुळे गिधाडांचं जगणं आव्हानात्मक होत आहे आणि संख्या झपाटय़ानं कमी होते आहे. निसर्ग वादळासारख्या आपत्तीमुळे झाडं मोडून पडली, घरटी आणि पिल्लंही पडली. २००० नंतर ‘गाडगे महाराज ग्राम स्वच्छता योजना’ आली. त्यामुळे गावं स्वच्छ झाली, पण गावाबाहेर असलेल्या ढोरटाक्या नष्ट करण्यात आल्या. या ढोरटाकीमध्ये मेलेली जनावरं टाकण्याची व्यवस्था होती. त्यामुळे गिधाडांना खाद्य मिळे. पण ग्रामस्वच्छतेसाठी लोक मेलेली गुरंढोरं जमिनीत पुरू लागले. आता ‘सीस्केप’च्या वतीनं आम्ही गावकऱ्यांना ढोरटाकीची आवश्यकता पटवून देतोय.

गिधाडांची संख्या वाढावी म्हणून उंच झाडांची संख्या वाढली पाहिजे. देवराई म्हणजे देवाचं राखीव जंगल, असं म्हणून यातली झाडं गावकरी तोडत नाहीत. ‘निसर्ग’ वादळ झाल्यानंतर मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ‘वनदेवतेची पूजा’ असा नवा सांस्कृतिक उत्सव साजरा केला. गावातले म्हातारेकोतारे, लहान मुलं, सगळय़ांना घेऊन जंगलात जाऊन दोन मोठय़ा वृक्षांची पूजा केली. या लोकांना शास्त्रीय भाषेपेक्षा भावनिक भाषा अधिक समजते. झाडं जगवणं, वाढवणं किती महत्त्वाचं आहे, हे सांगितलं. गिधाडांच्या विणीच्या काळात जंगलात जाऊ नका असंही गावागावांत जाऊन लोकांना पटवलं. कारण गिधाड हा अतिशय लाजरा पक्षी आहे. त्याला माणसांच्या येण्याजाण्यानं व्यत्यय येतो. गिधाडाच्या पिल्लाला तीन महिने चोचीत भरवायला लागतं. या काळात त्यांना खाद्य मिळालं नाही, तर कुपोषणामुळे पिल्लं दगावतात.

गेली ३० वर्ष सातत्यानं आम्ही गिधाडांचं संवर्धन नैसर्गिक वातावरणात व्हावं यासाठी बेहडा, हिरडा, वनभेंडी, करंजा, अर्जुनवृक्ष, लोखंडी, हे सगळे उंच वाढणारे वृक्ष वाढवतो आहोत. याच झाडाखाली पडणाऱ्या बिया गोळा करून गावातल्या लोकांना हाताशी घेऊन नर्सरी तयार केली आहे. ही इथलीच मूळ झाडं असल्यामुळे जगतात आणि सुंदर वाढतात. या उंच झाडांवरच पक्षी घरटी बांधतात. आमचा हा प्रकल्प भारतातला एकमेव प्रकल्प आहे. अनेक परदेशी संशोधक, निसर्गवादी, या प्रकल्पाला भेटी देण्यास येतात.गिधाडांचे संवर्धन व्हावं यासाठी नारळ, आंबे आणि इतर बागायतदारांचं मन वळवावं लागलं. कारण या झाडांवर गिधाडं घरटी बांधतात. पण त्यांच्या विष्ठेमध्ये असलेल्या ॲसिडचा पिकावर दुष्परिणाम होतो म्हणून त्यांची घरटी काढून टाकली जात. त्यांना आम्ही नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न करतो, पण तेवढी आमची आर्थिक बाजू मजबूत नसल्यामुळे शासनानं याकडे लक्ष दिलं तर गिधाडांचं संवर्धन होईल.

माझ्या या उद्योगाला माझे आईवडील ‘लष्करच्या भाकऱ्या’ म्हणतात! शाळेत नोकरी करत होतो, तेव्हा पालकांच्या तक्रारी येत- ‘हे गुरुजी ढोर कापतात. आमची मुलं बिघडवतील.’ पूर्वी गावातले ७० ते ८० टक्के लोक माझ्याकडे वेगळय़ाच नजरेनं, म्हणजे वाईटच नजरेनं पाहात. गिधाडांना ढोर टाकून आलो की अंगाला घाणेरडा दर्प येई. अशा वेळी पैसे कमी असतील, तर येताना बसमधून आल्यास इतर प्रवासी ‘हा कुठून आलाय’ अशा नजरेनं पाहात आणि नाक बंद करून घेत. या सगळय़ा आतापर्यंतच्या प्रवासातले अनुभव खूप वेगवेगळे आहेत.

आमचं शेतकरी, सरपंच, गावकरी यांच्याशी नेटवर्क आहे. गावात ढोर मेलं की आमच्या सदस्यांना फोन येतो. मग वाहतुकीची व्यवस्था करून आम्ही तिथे प्रत्यक्षात जाऊन ढोर उचलतो आणि जिथे गरज असेल तिथे नेऊन टाकतो. ‘एम.एस.ई.बी.’च्या अधिकाऱ्यांकडे फोन नंबर दिले आहेत. शॉक लागून गुरं मेली तर ते कळवतात. ट्रॅफिक पोलीस अपघातात ढोर मेलं तर कळवतात. आमच्या ‘सीस्केप’च्या ग्रुपवर सर्व व्यवहार कळवले जातात. कामात पारदर्शकता येते. भाडय़ानं ६ एकर जमीन गिधाडांना खाद्य टाकण्यासाठी घेतली आहे. जशी देणगी येईल तसं भाडं भरतो. माझा ‘टुरिझम’चा व्यवसाय आहे, पण टाळेबंदीत काही कमाई झाली नाही. कारण ते पैसे मला गुरांच्या वाहतुकीसाठी वापरता येत. आता तर कर्ज काढून हे करतोय. अधूनमधून देणगी मिळाली तर आधार मिळतो. टाळेबंदीत कुठेही जाण्यास परवानगी नव्हती. गिधाडं उपासमारीनं मरतील की काय असं वाटत होतं. पण पोलिसांनी सहकार्य केल्यामुळे हे संकट टळलं.

एरवी ‘नॉर्मल’ वाटणाऱ्या परिस्थितीतही कठीण प्रसंग आले आहेत. एकदा एक मृत बैल बराच वेळ गेल्यामुळे फुगला. त्याला फाडण्यासाठी हत्यार घुसवलं तर काय? बॉम्ब फुटावा असा मोठा आवाज झाला. त्याच्या पोटातल्या गॅसचा माझ्या चेहऱ्यावर मारा झाला. डोळे लालभडक झाले आणि १५ दिवस नाकातून, डोळय़ातून सतत पाणी वाहात होतं.घरची गाय मृत झाली की शेतकरी खूप भावूक होतात. तिची मरणोत्तर पूजा करतात, ओटी भरतात. जणू कुटुंबातला एक सदस्य गेल्याचं दु:ख सगळय़ांना होतं. एकदा एके ठिकाणी बैल मेल्याचं कळलं. आम्ही आणायला गेलो, तर त्या घरची बाई अक्षरश: हंबरडा फोडून रडू लागली आणि गिधाडांना बैल खाऊ द्यायचा नाही म्हणाली. रडून ती बेशुद्ध पडली. ती शुद्धीवर आल्यावर तिच्या शेतात बैल पुरला.

एकदा तर मी आणि माझे सहकारी मरणाच्या दारातून परत आलो जणू! त्याचं असं झालं, की मुसळधार पाऊस पडत होता. चांदोरे गावात ढोर मेल्याचं समजलं. ट्रान्सपोर्ट शोधून ते जंगलात गिधाडांसाठी नेऊन टाकायला रात्रीचे ११ वाजले. खूप थकून गेलो होतो. मुख्य रस्त्याला पोहोचलो आणि लक्षात आलं, की ढोराचं कातडं कापायचं राहून गेलं. तसेच मागे फिरलो. ढोर कापायला सुरुवात करणार तोच जवळून बिबटय़ाची डरकाळी ऐकू आली. टॉर्च मारला. तो झाडीत लपलेला दिसला. झाडीत दगड फेकले आणि तसेच सुसाट परत फिरलो. सकाळी जाऊन पाहातो तर काय, त्या ढोराचा बिबटय़ानं फडशा पाडला होता. अजूनही तो प्रसंग आठवला की अंगावर सरसरून काटा येतो. पण अशी संकटं आली तरी गिधाडांची वाढलेली संख्या मात्र खूप आनंद देते.

‘सीस्केप गिधाड अभ्यास संशोधन संवर्धन केंद्र’, स्थानिक गावकरी आणि रोहा वनविभाग यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे २०१९ मध्ये अवघी दोन ते चार असलेली घरटय़ांची संख्या आजमितीस ७० ते ८० झाली आहे. २२ ते २८ गिधाडांची त्या वेळची संख्या आता ३५० वर आहे. विशेष म्हणजे पिंजऱ्यांमध्ये ठेवून त्यांचं कृत्रिम प्रजोत्पादन करण्याच्या पद्धतीत वाढलेली गिधाडं निसर्गातल्या वातावरणात समरस होत नाहीत. त्यापेक्षा त्यांचा नैसर्गिक अधिवास वाचवणं आणि आवश्यक खाद्य पुरवणं, जखमी आणि अशक्त गिधाडांचा योग्य उपचारानं बचाव करणं, असे प्रयत्न गेली दोन दशकं आम्हाला यश देत आहेत.

मला परदेशात अनेक ठिकाणी या कामाच्या संदर्भात जाण्याचा योग आला. कधी शोधनिबंध वाचनाकरिता, तर गिधाडांसंदर्भात स्थलांतराच्या मार्गाचं निरीक्षण करण्यासाठी वा कधी स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांची संख्या मोजण्याकरिता आमंत्रण असतं. थायलंडमधल्या एका ठिकाणाचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. खाऊ दिनसॉर (Khao Dinso ) टेकडीवर पक्षीनिरीक्षणाकरिता एक ठिकाण निर्माण केलं आहे. तिथे काही टॉवर्स आहेत. ज्यामध्ये पक्ष्यांचं शास्त्रशुद्ध निरीक्षण करता येतं. अनेक निसर्ग अभ्यासक, निसर्गप्रेमी इथे १५-१५ दिवस मुक्कामासाठी येतात. राहाण्याची, जेवणाची उत्तम सोय आहे. निरीक्षणासाठी दुर्बिणी उपलब्ध करून दिल्या जातात.

आपल्या दिघी, अलिबाग, भोर, जेजुरी , सोलापूर, नागपूर, खंडाळा, लोणावळा या ठिकाणी गिधाडं, ससाणे, करकोचे, गरुड आणि इतर अनेक पक्षी स्थलांतर करताना दिसतात. अशा ठिकाणी संशोधनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या, तर अनेक तरुणांना त्याचा फायदा घेऊन परदेशात शास्त्रीय संशोधनाची संधी आणि नोकऱ्या उपलब्ध होतील.

या लेखाच्या माध्यमातून मला वाचकांना सांगावंसं वाटतं, की ज्यांना आपल्या गावात गिधाडं दिसतात, त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. तिथे आपण गिधाड शास्त्रीय संशोधन केंद्र निर्माण करू. जंगलतोडीमुळे ओसाड झालेली जंगलं असतील तर कळवावं, ती पुरुज्जीवित करता येतील. गावातल्या स्त्रियांना, वनसमितीला रोजगार निर्माण होईल.

निसर्गाविषयी आस्था निर्माण व्हावी म्हणून मी शालेय विद्यार्थ्यांना सायकल प्रवास करून जंगल वाचन, पक्षी निरीक्षण करायला नेतो. आताची ‘सीस्केप’मधली तरुण मुले ही अशा शालेय निसर्ग सहलींमधून पुढे आलेली आहेत. हे निसर्गप्रेम त्यांना पर्यावरण संतुलन, गिधाडे संवर्धन अशा निसर्ग वाचवण्याच्या कामांना उद्युक्त करतं. रामायणात असलेलं जटायूचं स्थान गिधाडास मिळायला हवं असं मला मनापासून वाटतं. ‘गिधाडे संवर्धन दिन’ १६, १७, १८ सप्टेंबरला (नाणेमाची) महाड, (म्हसळा) श्रीवर्धन, सुधागड (पाली) इथे साजरा केला जातो. यानिमित्तानं माझ्या गिधाडप्रेमाचा प्रवास सांगताना गिधाडं आणि इतर पशुपक्षी आपले सर्वाचेच सोयरे सहचर व्हावेत अशीच सदिच्छा करतो.

premsagarmestri@gmail.com
प्रेमसागर मिस्त्री- ०८०१०८१८७५७

शब्दांकन- प्रतिभा वाघ
plwagh55@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
घर चालवणारीची आत्महत्या..

संबंधित बातम्या

गेले लिहायचे राहून.. : कायदे जिंकलेले, कायदे हरलेले!
सहजपणातलं दत्तक नातं..
संशोधिका : मज्जासंस्थेचं चिकित्सक संशोधन!
सोयरे सहचर : मन शांतवणारे मित्र!
जगण्याची ‘आत्मचरित्री’ ओळख!

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“तुम्ही जन्मत:च हिंस्र विकृत आहात की…” सुमीत राघवनच्या आरे कारशेडवरील ‘त्या’ वादग्रस्त ट्वीटनंतर नेटकऱ्याबरोबर रंगले ट्विटर वॉर
विश्लेषण: नागरिकत्व सुधारणा कायद्यात तामिळी निर्वासितांचा मुद्दा का आला? द्रमुकचा कायद्याला तीव्र विरोध का?
विश्लेषण : शाहरुख खानने मक्कात जाऊन केलेला ‘उमराह’ काय आहे? त्यात आणि हजमध्ये काय फरक?
१० वर्षाच्या मुलीच्या पोटात आढळले तब्बल अर्धा किलो केस; सिटीस्कॅन केलं अन् डॉक्टरांसह घरच्यांनाही बसला धक्का
“तो नेता काँग्रेसचा असूनही नितीन गडकरी म्हणाले की ती चांगली माणसं”, नाना पाटेकरांचं नागपुरात वक्तव्य