डॉ. मृण्मयी भजक

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्थळ : दौलताबादचा किल्ला. आमचा दहा महिन्यांचा मुलगा ऋतुज, आम्ही दोघं आणि माझे सासरे, गड पाहायला गेलो होतो. सकाळीच गड चढायला सुरुवात केली होती. अर्ध्याहून जास्त गड चढून झाला होता. शेवटचा पल्ला राहिला होता, पण तोच थोडा अवघड वाटत होता. मी, माझा नवरा हर्षल आणि सासरे आळीपाळीनं मुलाला कडेवर घेत होतो. चढण जास्त असल्यानं दम लागत होता. सगळेच तसे दमले होते; पण हर्षलच्या प्रोत्साहनामुळे आम्ही पुढे चालत होतो. एका क्षणी मात्र, ‘बास, आता पुढे नको जाऊ या,’ असं सांगून मी दमून खालीच बसले. हर्षल म्हणाला, ‘‘आपलं ठरलंय ना, मग  मोहीम फत्ते करायचीच.’’ त्यानं अशा आविर्भावात सांगितलं, की उत्साह आला, पण पुढचा रस्ता जास्त निमुळता होता. आताशा ऊनही अगदी डोक्यावर आलं होतं. मी ना ना चा पाढा चालूच ठेवला होता आणि ‘एवढय़ा लहान बाळाला घेऊन कशाला चढायचा गड?’ असा एक हुकमी पत्ता बाहेर काढला. खरं तर गड पूर्ण चढायचा ही आम्हा दोघांचीही इच्छा! पण अर्ध्या वाटेत दमलेली मी आणि वाट कितीही अवघड असली तरी मार्ग काढणारा तो. अखेर काही तरी ठरवून त्यानं बाळाला कांगारू बॅगमध्ये बसवून छातीशी घेतलं आणि तो अवघड वाटणारा शेवटचा पल्ला आम्ही  पार केला. गड चढल्यावर मात्र किती समाधान वाटलं म्हणून सांगू. अशा अनेक अवघड वाटा एकमेकांच्या साहाय्याने पूर्ण केल्या, करत आहोत.

मी डॉक्टर, तो इंजिनीअर. आमचं लग्न ठरलं, तेव्हा माझ्या डॉक्टरी पेशापेक्षा माझी कला क्षेत्रातील आवड त्याला ठाऊक होती. मला याच क्षेत्रात खऱ्या अर्थाने करिअर करायचं होतं आणि ठरवल्याप्रमाणे हळूहळू मी सूत्रसंचालन क्षेत्रात आले आणि माझ्या कामाच्या वेळा अनियमित झाल्या. त्याची कामाची वेळ म्हणजे जवळजवळ बारा तास! शनिवार,रविवार त्याच्या सुट्टीचे दिवस! पण नेमके शनिवार, रविवार हेच माझ्या जाहीर कार्यक्रमांचे दिवस! अशी आम्हा दोघांची व्यग्र करणारी व्यग्रता; पण त्याच्या पुढाकारानंच एकमेकांसाठी वेळ काढणं, दोन दिवस कुठे तरी फिरून येणं या गोष्टी आवर्जून करायला लागलो आणि रोजच्या रहाटगाडग्यात काही शीतल शिंतोडे आम्ही वेळोवेळी अनुभवू लागलो.

त्याची एक गोष्ट माझ्यासाठी महत्त्वाची आहे, ती म्हणजे तो त्याच्या कामात कितीही व्यग्र असला तरी घरी कुणी आजारी असलं की सगळी कामं बाजूला सारून आपुलकीनं आणि मुख्य म्हणजे विनातक्रार हजर असतो. त्याचं त्या वेळी फक्त असणं खूप महत्त्वाचं असतं. माझ्या कामाचं स्वरूप ‘शो मस्ट गो ऑन’ अशा प्रकारचंच असतं बऱ्याचदा. त्यामुळे अनेकदा भावनिक होण्यापेक्षा व्यावहारिक व्हावं लागतं. मुलाचं आजारपण हा त्यातला एक भाग. अशा वेळी मात्र तो फार हळवा होतो. ऋतुज लहान असताना, त्याच्या लसीकरणाची वेळ आली की इंजेक्शन देताना मी आत आणि ते बघवत नाही म्हणून हर्षल बाहेर असंच चित्र असे.  मी माझ्या मुलाची फक्त आई आहे; पण बाबा आणि मित्र, किंबहुना बाबा कमी मित्र जास्त ही भूमिका हर्षलचीच. मुलाला वाढवताना माझे आई, वडील आणि सासू, सासरे ही आमची सपोर्ट  सिस्टीम आहेच. त्याचाही फायदा होतोच.

आमच्या आयुष्यातला एक अटीतटीचा निर्णय घेण्याचा प्रसंग अगदी तस्साच्या तस्सा डोळय़ासमोर आहे. पुण्यातील काचेची चकचकीत इमारत, अनेक मल्टिनॅशनल कंपन्यांची ऑफिसेस असलेल्या रस्त्यावरची. त्या इमारतीखाली, हर्षलच्या जेवणाच्या सुटीत, दुपारच्या टळटळीत उन्हात आम्ही दोघे उभे होतो; एका महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी. त्याला सहकुटुंब अमेरिकेला जाण्याची संधी मिळाली होती आणि सूत्रसंचालक म्हणून माझं करियर नुकतंच सुरू झालं होतं. माझ्यासाठी माझी ती स्वप्नपूर्ती होती. त्यामुळे ‘अमेरिकेत जाऊन मी काय करणार?’ हा जगाच्या दृष्टीने वेडपटपणाचा प्रश्न मला पडला होता. आणि अमेरिकेला जाण्याचा माझा निर्णय डळमळत होता. ‘अमेरिकेला जायची आयती संधी मिळतेय त्यात विचार कसला काय करायचा? आणि करियर ते कसलं? सूत्रसंचालनातलं?’ हा जगाचा विचार; पण माझ्या वेडपटपणाची दखल घेणारा एकच माणूस होता, तो म्हणजे माझा नवरा हर्षल. त्या दुपारच्या उन्हात, अजिबात रोमॅंटिक नसलेल्या वातावरणात तो म्हणाला, ‘‘मला खात्री आहे, की तू जगात कुठेही गेलीस तरी काही न काही तरी चांगलं करशीलच.’’ हे वाक्य म्हणजे एक डायलॉग समजून मी हसले आधी. मग ते वाक्य तो खरंच मनापासून आणि विचारपूर्वक बोलला आहे, हे जेव्हा कळलं तेव्हा आपल्यापेक्षाही आपल्यावर जास्त विश्वास असलेल्या नवऱ्याकडे मी बघत राहिले आणि क्षणात अमेरिकेला जाण्याचा निर्णय झाला. आज हा प्रसंग आठवताना ‘भर उन्हात चांदणं बरसणं’ वगैरे काय म्हणतात ते हेच असावं असं वाटतं.

पुढे अमेरिकेत गेल्यावर, नवख्या ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळात माझे एकपात्री प्रयोग असोत किंवा भारतात आल्यावर माझ्या पुस्तकाचं प्रकाशन, आमचा हँडी कॅम घेऊन हा आपणहून कॅमेरामन झालाय. विविध कार्यक्रम करण्यासाठी प्रोत्साहनच दिलंय.  करोनाकाळात, माझ्या कंपनीच्या एका डिजिटल कार्यक्रमात एडिटरनं ऐन वेळी माघार घेतली. ठरलेल्या वेळेत कार्यक्रम प्रसारित करणं आवश्यक होतं. अनेक मान्यवरांना आमंत्रणं गेली होती. माझी अवस्था त्याच्या लक्षात आली आणि तो माझ्या मागे उभा राहिला. माझ्यासोबत रात्रभर जागून एडिटिंग आणि इतर तांत्रिक कामं केली. त्यामुळे कार्यक्रम वेळेत जाऊ शकला आणि आमचा जीव अक्षरश: भांडय़ात  पडला. एखादा कार्यक्रम रात्री फार उशिरा संपल्यावर मला घ्यायला येणं असो किंवा परगावच्या, आडगावच्या कार्यक्रमांसाठी माझ्या सोबत असणं असो, तो नेहमीच माझ्या बरोबर असतो. इतकंच नाही तर रोज घरी रात्रीचं जेवण झाल्यावर टेबल आवरणं असो वा घरी पाहुणे आल्यावर किंवा पार्टी असल्यावर पडेल ते काम करणं असो, तो बरोबरीनं काम करतो. हल्ली आपण सगळेच खूप वेगवेगळय़ा पातळय़ांवर वावरत असतो. हे करताना,  विचारप्रक्रियेत, निर्णय घेताना सहचर बरोबर असला की जगणं सुकर आणि समृद्ध होत जातं. आमचं सहजीवन तसंच आहे.

drmrunmayeeb@gmail.com

तुमच्या संसाराच्या रोलर कोस्टर राइडमध्ये इतर वाचकांनाही सामावून घ्या. आपले ८०० शब्दांतले अनुभव आम्हाला पाठवा chaturangnew@gmail.com या ईमेल आयडीवर.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cool moonlight summer function trek travel ysh
First published on: 08-01-2022 at 00:53 IST