लग्नापूर्वीच, लग्न म्हणजे काय इथपासून लग्नामधील सेक्सची जबाबदारी याची जाणीव संबंधित दोघांनाही करून देणे आवश्यक आहे. बहुतेक नवविवाहितांचे संसार मोडण्यात ही जबाबदारी दुर्लक्षित केलेली किंवा झिडकारलेली असते. मग कोर्टात आरोप-प्रत्यारोपांचे रान उठवले जाते. ते टाळता येऊ शकते.
म नीषा आणि मनीष यांच्या लग्नाला आता सहा वष्रे होत आली होती. या सहा वर्षांमध्ये जसा पाहिजे तसा, खरं म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी चालेल, या दोघांचा संबंधच आला नव्हता. किंबहुना प्रयत्न करायलासुद्धा मनीषची तयारी नसायची. मनीषा पूर्ण हताश होऊन, सर्व उपाय(?) करून, थकून, शेवटचा पर्याय म्हणून धाडसाने मनीषला एका ‘सेक्सॉलॉजिस्टकडे’ घेऊन आली होती. तिला मनीषचे मन तयार करायला किती कष्ट पडले हे तिचे तिलाच ठाऊक, हेही तिने त्याच्यासमोरच बोलून दाखवले.
मनीषला पहिल्यापासूनच मनीषाबरोबर सेक्स करायचा प्रयत्न करणे हेसुद्धा चमत्कारिक(!) वाटत होतं. काय गंमत होती बघा, ज्या मनीषाला त्यानेच पसंत करून मागणी घातली होती आणि जिने मोठय़ा आनंदाने एका राजिबडय़ाबरोबर संसार करायला आपली संमती दिली होती, त्या दोघांच्या आयुष्यात पुढे असे काही घडेल, खरे म्हणजे ‘असे काही’ घडणार नाही, असे स्वप्नातही त्यांना, विशेषत: तिला, वाटले नव्हते.
सुरुवातीचे संकोचाचे दिवस सरल्यानंतरही मनीष कुठलाच पुढाकार घेत नव्हता याचे मनीषाला प्रचंड आश्चर्य वाटत होते. तिला जरी स्त्रीसुलभ कामलज्जा वाटली तरी मनीषला मात्र पुरुषसुलभ कामातुरता वाटायलाच पाहिजे, असे तिचे ठाम मत होते. पण नंतर कधीच तसे ‘काही’ घडले नाही, घडतही नव्हते. या ना त्या कारणाने मनीष सुरुवातीला ‘सेक्स’ला आणि नंतर तिलाही टाळू लागला. ऑफिसची कामे सांगून त्याचे टुरिंगला जाणे नित्याचे झाले होते. नाइलाजाने आठवडय़ातून एक दिवस घरी यायचा, मग झोपेत आणि उरलेल्या कामात वेळ घालवून दुसऱ्या दिवशीच्या भटकंतीला जायचा. असे कित्येक वष्रे चालले होते. जेव्हा जरा जास्त काळ घरी असायचा तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरून त्याला किती त्रासदायक वाटतंय हे मनीषाच्या लक्षात यायचे. सेक्स तर जाऊ दे, तो तिच्याबरोबर वेळही घालवत नव्हता. किरकोळ बोलणं घडायचं तेसुद्धा मनीषानेच विषय काढून सुरुवात केल्यानंतर!
काही वर्षांपूर्वीपासूनच मनीषावर तिच्या घरच्यांचे, मित्रपरिवाराचे, ‘गोड बातमी’साठीचे दडपण वाढले होते. मुळातच ‘तसे काही’ घडत नसल्याने आणि आता या दडपणाने मनीषाला तोंड दाबून बुक्क्यांचा मार मिळत होता.
मनीषलाही त्याच्या घरच्यांचे दडपण सतावत होतेच, पण काय करायचे हे सुधरत नसल्याने तो वेळ मारून नेत होता, काळ पुढे जाऊ देत होता. माझ्या सल्ल्याप्रमाणे वागायचे त्याने मनीषाकडे  मान्य केले होते.(अर्थात तो कितपत त्याला साथ देईल हा प्रश्नच होता!). पण आम्हा थेरपिस्ट आणि काउन्सेलर मंडळींकडे ‘सर, याला काउन्सेिलग करा’ असे म्हणून कोणालाही आणले तर त्या व्यक्तीवर अशा काउन्सेिलगचा काहीही परिणाम होत नसतो हे संबंधितांनी लक्षात ठेवले पाहिजे. काउन्सेिलग करून घेण्यासाठी ती व्यक्ती स्वत: प्रवृत्त व्हायला पाहिजे. तरच सुधारणा होऊ शकते, अन्यथा नाही.
पुढील प्रत्येक भेटीत मनीष त्यांचे प्रयत्न व्यवस्थित चालले आहेत, असे मनीषासमोरच मला सांगत होता. मनीषाही काही गोष्टींना दुजोरा द्यायची. पण काही दिवसांतच तिने मला एकटे येऊन सांगितले की, मनीष माझ्यासमोर सर्व कबूल करायचा, पण प्रत्यक्षात काहीच करीत नव्हता. मी चकितच नाही तर थक्क झालो. मी तिला म्हटले, ‘अगं, तू त्याच्यासमोर मग दुजोरा का देत होतीस?’ तिने ओशाळून सांगितले की, मनीषचा इगो दुखवायला नको म्हणून. व्वा! मनीषाला काय म्हणावे हेच मला कळेना! मला वाटले मनीषपेक्षा हिलाच काउन्सेिलगची खरी गरज आहे.
नेमकी त्याच काळात अशीच एक केस आली.  आनंद आणि आनंदीची. मनीष-मनीषा केसमधील मनीषसारखाच आनंदकडूनही पुरेसा प्रयत्न होत नव्हता. शेवटी सेक्स-काउन्सेिलग काय किंवा सेक्स-थेरपी काय यातील यश हे संबंधित जोडपं चार िभतींच्या आत किती प्रयत्न करतं यावरच अवलंबून असतं. आम्ही केवळ मार्गदर्शक, शिक्षक, गुरू एवढीच भूमिका निभावत असतो.  
आनंद-आनंदी केस ही जरा वेगळी एवढय़ाचसाठी होती की, वाट पाहून पाहून आनंदीने माझ्यासमोरच आनंदला ठणकावले की, घरी वारंवार उपाशी ठेवलं गेलं तर माणूस हॉटेलची वाट धरतो हे लक्षात ठेव. सेक्स हा माझा लग्नसिद्ध अधिकार आहे आणि तो तू नाकारता कामा नये. नाही तर तू लग्नच करायला नको होतं. तू माझा हा अधिकार नाकारलास तर मला माझं आयुष्य आनंदात घालवायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेव. आनंदीचं हे धारिष्टय़ आणि मनीषाची सोशिकता या दोन्ही गोष्टींनी मला अंतर्मुख केले. खरे तर या दोन्ही केसेस सेक्स-काउन्सेिलग काय व सेक्स-थेरपी यांच्या साहाय्याने सुटायला पाहिजे होत्या. पण पुढाकार मनीष व आनंद दोघा नवऱ्यांकडून घेतला जात नव्हता ही फॅक्ट होती. (अर्थात इथे आम्हा सेक्सॉलॉजिस्टना ‘होमोसेक्शुआलिटी’चा विचारही करावा लागतो. मनीष व आनंद दोघांकडून अर्थातच अशी हिस्टरी मिळाली नव्हती. मी त्यांना एकेकटय़ांना विचारूनसुद्धा! पण कमीजास्त प्रमाणात त्याचे अंश असू शकतातही!).
खरं म्हणजे अशा केसेस पाहिल्या की विवाहपूर्व काउन्सेिलग किती आवश्यक असते हे सर्वाच्याच लक्षात येईल.  
लग्न म्हणजे काय इथपासून लग्नामधील सेक्सची जबाबदारी याची जाणीव संबंधित दोघांनाही करून देणे आवश्यक आहे. बहुतेक नवविवाहितांचे संसार मोडण्यात ही जबाबदारी दुर्लक्षित केलेली किंवा झिडकारलेली असते. मग कोर्टात आरोप-प्रत्यारोपांचे रान उठवले जाते. जोडीदाराला कमीपणा दिला जातो. ‘इम्पोटन्स’, ‘फ्रिजिडिटी’ वगरे ब्रिटिश काळातील आणि आता आधुनिक सेक्सॉलॉजीतील कालबाह्य़ शब्द वापरले जातात. इगो दुखावून नाती फारच कडवट केली जातात. वकिलांची चलती आणि दाम्पत्याची फरफट बराच काळ होत राहते.
खरे म्हणजे नवविवाहितांचे सेक्सविषयक सर्व प्रॉब्लेम हे कोर्टापेक्षा सेक्सॉलॉजिस्टच्या कक्षात सोडवता येऊ शकतात. मात्र त्यासाठी संबंधित जोडप्याचे मन:पूर्वक सहकार्य आवश्यक असते. ते त्या जोडप्यातील कोण्या एकाकडून मिळत नसल्यास मात्र आपला सेक्सचा ‘लग्नसिद्ध अधिकार’ मिळवायला दुसरी व्यक्ती मुखत्यार असते. मग व्यथित जोडीदाराकडून घटस्फोट किंवा ‘समाजदेखलं जुजबी’ लग्न टिकवण्यासाठी विवाहबाह्य़ मत्रीसंबंध हे पर्याय निवडले जाऊ शकतात. आणि या साऱ्यासाठी त्या व्यथित जोडीदाराला दोष देण्यापेक्षा आपणच त्याला जबाबदार आहोत याची जाणीव संबंधित आडमुठय़ा जोडीदाराने ठेवणे आवश्यक आहे. क्वचित प्रसंगीच व्यथित जोडीदार सहनशीलतेचा मार्ग स्वीकारून सर्व काही आलबेल असल्याचा आव आणतो. पण अशांवर पुढे कामजीवनाच्या वैफल्याने, शून्यतेने व्यक्तिमत्त्वावर, मानसिकतेवर निश्चितच परिणाम होऊन स्त्रियांमध्ये ओव्हरीचे, पाळीचे त्रास, ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर व्याधीही उद्भवू शकतात. या कामनिराशेतून आत्मघातासारखेही प्रयत्न अशा ‘सहनशील’ व्यक्तीकडून होऊ शकतात. म्हणूनच कामजीवनात अशी सहनशीलता अनाठायीच नव्हे तर मूर्खपणाचीही असते हे अशांनी ध्यानात ठेवावे.
दाम्पत्यातील व्यक्तीसंबंधातील लाज, राग, संताप, चीड, तिरस्कार इथपासून सेक्सच्या विषयीची शरम, घृणा, अनभिज्ञता, भीती, काळजी यांसारख्या विविध कारणांचा समावेश नवविवाहितांच्या लैंगिक समस्यांमध्ये होतो. समिलगी आकर्षणाचा प्रभाव हेही कारण तसे विरळ नाही. परंतु या सर्व कारणांचा अभ्यास करून ती दूर करता येतात. यासाठी ‘सेक्सॉलॉजी’ या आधुनिक वैद्यकीय स्पेशिआलिटीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. ‘सेक्स व रिलेशनशिप’ काउन्सेिलग आणि ‘सेक्स थेरपी’ म्हणजे लैंगिक समस्या सोडवण्यासाठीचे मार्गदर्शक ट्रेिनग प्रोग्रम हेच महत्त्वाचे असतात. सरकारलाही याचे महत्त्व कळल्याने आणि संसार विस्कटून टाकण्यापेक्षा त्यांना तो सावरायला शिकवणे हे समाजस्वास्थ्याला उपकारक असते हेही जाणवल्याने फॅमिली कोर्टात ‘काउन्सेिलग’चे सेशन्स त्या जोडप्याला देण्यावर भर दिला जातो ही अत्यंत स्पृहणीय गोष्ट आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onलग्नMarriage
मराठीतील सर्व कामस्वास्थ्य बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Counselling about responsible sex in married life is must before couple gets married
First published on: 16-03-2013 at 01:01 IST