अल्का गरुड
स्त्रीवादी चळवळीतील अनेकविध आयाम समजून घेताना देवकी जैन यांचं नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. देवकी यांनी स्त्री-समाजशास्त्रांतर्गत ‘स्त्री-अर्थशास्त्र’ अशी नवी ज्ञानशाखाच निर्माण केली. स्त्रियांचं अर्थकारण व स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्प आता रुळतो आहे. देवकी यांनी त्यांना अभिप्रेत असलेला अर्थशास्त्रीय स्त्रीवाद सर्व भारतीय समाजामध्ये तसेच आफ्रिकेपासून अमेरिकेपर्यंत मांडला. त्यांच्याकडे असलेल्या भक्कम सैद्धांतिक पायामुळे त्यांच्या चिंतनाला सर्व प्रमुख जागतिक संघटनांमध्ये प्रतिष्ठा प्राप्त झाली.
१९३३ मध्ये दक्षिण भारतातील एका सुखवस्तू घरात त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील ग्वाल्हेर व म्हैसूर संस्थानात दिवाण म्हणून काम करत होते. घरामध्ये मुली ‘कॉन्व्हेंट’ शाळेत शिकत होत्या. पण कर्मठ तमीळ ब्राह्मण कुटुंबातील बंधनंही त्यांच्यावर आपसूक आली होती. वयाच्या अठराव्या वर्षी त्या काळाप्रमाणे त्यांच्यासाठी वर संशोधन सुरू झालं असलं तरीही घरात मुलगे व मुली यामधील क्रूर भेदभावाचा अनुभव त्यांना आला नाही, असं त्या नमूद करतात.
त्यांचे मोठे भाऊ उच्चशिक्षणासाठी अमेरिकेला गेले असताना तेथील सांस्कृतिक, सामाजिक घडामोडींविषयी देवकींना सविस्तर पत्रं लिहीत. भारतात आल्यावर विशेष कार्यक्रमांना घेऊन जात. त्यांच्या भावानेच त्यांना बंगळुरूला ‘क्वेकर्स’ आयोजित परिसंवादाला नेलं. तेव्हापासून महात्मा गांधीजी आणि त्यांच्या विचारधारेविषयी देवकींना कुतूहलपूर्ण रस निर्माण झाला.
१९५५ मध्ये त्यांचे वडील कामानिमित्त लंडनला गेले असताना देवकींना बरोबर घेऊन गेले होते. ‘सुयोग्य वर’ शोधण्याचा एक छुपा हेतू होताच. पण देवकींच्या ठायी उच्च शिक्षणाची व स्वातंत्र्य अनुभवण्याची अदमनीय इच्छा होती. त्यांनी वडिलांकडून आठवडाभर लंडनला राहण्याची परवानगी घेतली. गॉथिक स्थापत्यशास्त्र, पुस्तकांच्या भल्यामोठ्या थैल्या सायकलला लटकवीत जाणारे विद्यार्थी अशा ‘ऑक्सफर्ड’च्या दर्शनाने त्या चकित झाल्या. ‘ऑक्सफर्ड’मध्ये प्रवेश न मिळाल्याने त्यांनी ‘रस्किन महाविद्यालया’मध्ये समाजशास्त्राच्या अध्ययनासाठी प्रवेश घेतला. राहण्या-जेवण्यासाठी कॅफेमध्ये भांडी विसळण्याचं काम केलं. ‘रस्किन’मधले त्यांचे सारे सहकारी कष्टकरी वर्गातले होते. त्या त्यांच्यातीलच एक बनून गेल्या. तेथील स्त्री-पुरुष तळागाळातील कष्टकरी वर्गामधले असूनही त्यांची अतिशय स्वतंत्र मनोवृत्ती व निखळ प्रेम देवकींना जाणवलं. त्यांच्या मैत्रीखातर त्या बीअर प्यायल्या व भूक भागवण्यासाठी महाविद्यालयाच्या स्वयंपाकघरात रांधलेले पाव, सॉसेजेस, बेकन व बीफही खाल्लं.
‘रस्किन महाविद्यालया’तील वातावरण हे केवळ राजकीय स्वरूपाचं होतं असं नव्हे, तर खोलवर वसाहतवादाविरोधी होतं. तेथील टॉम बोयासारख्या मित्रांसोबत असणं हे वसाहतवादाविरोधी लढ्याचं, वंशवाद व वसाहतींमधील तरुणांच्या क्रांतिकारी चैतन्याविषयी त्यांचं पहिलं प्रशिक्षण होतं. कामगार व कामगार संघटनावाद तसेच साम्राज्यवाद आणि वैश्विक राजकारण या दोन गोष्टींची जाणीव त्यांना ‘रस्किन’ महाविद्यालयामधील संबंधाने मिळाली.
त्यानंतर ‘ऑक्सफर्ड’च्याच ‘सेंट अॅन्स महाविद्यालय’मधून तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र व अर्थशास्त्र शिक्षणक्रमासाठी प्रवेश घेतला. तेथे पीटर डी., जेनेफर हार्ट व आयरिस मर्डटहॉक या तीन पराकोटीच्या बुद्धिमान स्त्रियांचं त्यांना मार्गदर्शन मिळालं. एखाद्या विद्यार्थ्याला व चौकस सहकाऱ्याला मिळणारा प्रेमादर देवकींना मिळाला.
‘ऑक्सफर्ड’वरून परत आल्यानंतर परंपरागत संकेतांनुसार वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्याऐवजी, काही काळ व्यावसायिक नोकरी करू देण्याची त्यांनी वडिलांना विनंती केली. मिनू मसानी यांच्या अर्थशास्त्रीय संशोधनात त्या काम करू लागल्या. त्यानंतर दिल्लीला आय.सी.यू. (Indian cooperative union )मध्ये संशोधन सहाय्यक होत्या. या संस्थेत काम करत असताना भूदान पदयात्रेत भाग घेऊन विनोबा भावे यांच्याशी बोलून त्या चळवळीविषयी त्यांनी साद्यांत माहिती मिळवली. त्यानंतर दिल्ली येथे ‘मिरांडा हाऊस’ या स्त्रियांसाठीच्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. ‘मिरांडा हाऊस’ हे बौद्धिकदृष्ट्या अधिक सशक्त, राजकीयदृष्ट्या जिवंत होतं. अमर्त्य सेन किंवा सुखमोय चक्रवर्ती यांसारख्या बुद्धिवाद्यांबरोबर सैद्धांतिक चर्चा करण्यात त्यांना मजा वाटत असे. विद्यापीठीय अध्यापनातील त्यांची सुरुवातीची कारकीर्द ही बऱ्यापैकी पारंपरिक धर्तीवर, तत्कालीन ‘ऑक्सफर्ड’ शैलीवर आधारित होती. लिंगभावाच्या समस्यांना तेथे जागा नव्हती. त्यांचा त्या वेळचा दृष्टिकोन पाहता त्या खऱ्या अर्थाने स्त्रीवादापासून फार दूर होत्या.
दिल्लीत असताना त्यांचा परिचय लक्ष्मीचंद जैन या निष्ठावंत गांधीवादी विचारवंतांशी झाला. त्याचं रूपांतर प्रेमात झालं. घरच्यांच्या कडव्या विरोधाला न जुमानता १९६६ मध्ये देवकी त्यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. लक्ष्मीचंद दिल्लीतील ६० ते ७०च्या दशकांमधील अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होतं. बौद्धिक, सार्वजनिक ध्येयधोरण किंवा संस्था या साऱ्या अवकाशांमध्ये त्यांची व्याप्ती होती.
१९७५ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी (यू.एन.) ‘आंतरराष्ट्रीय महिला वर्ष’ घोषित केलं होतं. त्यानिमित्त भारतातून प्रकाशित होणाऱ्या ‘इंडियन विमेन’ या ग्रंथाचं संपादन करताना त्यांनी झोकून देऊन काम केलं. स्वत:च्या ताकदीचा शोध लागलेल्या, ग्रामीण भागातील खडतर पितृसत्ताक समाजातील स्त्रिया या पुस्तकाच्या पानापानांतून आढळत होत्या. स्वत:पेक्षा कितीतरी प्रमाणात वंचित असलेल्या जिवांचं जगणं समोर आल्यावर त्यांना जाणवलं, अजून शिकण्यासारखं पुष्कळ होतं.
१९७७ मध्ये आणीबाणी संपवण्याकरिता केलेल्या चळवळीत त्यांनी सक्रिय भाग घेतला. त्यानिमित्ताने गावोगावी फिरल्या. त्या काळात त्यांना जाणवलं की कोणतंही क्षेत्र असो, प्रत्येक दिवशी तासनतास हाताने काम करून कौशल्य व शारीरिक कष्टांमध्ये पुरुषांच्या तुलनेत कोणतीही कमतरता नसताना स्त्री कामगारांना अगदी कमी वेतन मिळत असे. स्वयंपाक व मुलांचे संगोपनही त्या करत. दलाल व मध्यस्थांकडून त्यांचं शोषण होत असे. तेथे भेटलेल्या स्त्रियांकडून त्यांना खऱ्या अर्थाने लिंगभावाचं भान आलं. कोणत्याही सैद्धांतिक पंडितांपेक्षा त्यांचा ‘स्त्रीवाद’ या बायांकडून त्या शिकल्या. त्यातून त्यांच्या संशोधनाच्या व लिखाणाच्या मध्यवर्ती संकल्पना आकाराला आल्या.
‘अंगमेहनतीच्या कामात स्त्रियांची भूमिका’ या विषयातील त्यांचं वाढतं आकर्षण व संख्याशास्त्रातील त्यांचा विशेष अभ्यास यामुळे त्यांच्या संशोधनाला एक वेगळी दिशा मिळाली. स्त्रियांच्या कामामध्ये असणाऱ्या सहभागाचे सरकारी आकडे गंभीररीत्या कमी दिसत होते. बहुतेक वेळा स्त्रियांकडून होणाऱ्या आर्थिक योगदानाची माहिती धड संकलित केली नव्हती. भूमिहीन पुरुष मजुरांच्या कामाच्या सहभागापेक्षा स्त्रियांचा सहभाग किती तरी प्रमाणात अधिक होता. या निष्कर्षाने ‘घरातला प्रमुख मिळवता कर्तापुरुष असतो’ या संख्याशास्त्रीय गृहीत अवलोकनाला आव्हान दिलं. आयुष्यभर करावं असं कार्य त्यामुळे उभं राहिलं. अर्थव्यवस्थेत स्त्रिया बजावत असलेल्या असंख्य भूमिकांविषयी आकलन करून घेणं आणि त्यांच्या व्यामिश्र सहभागाविषयी पुरेशी आकडेवारी मिळवण्यासाठीच्या पद्धती विकसित करणं, हे ते काम होतं.
प्रत्यक्ष घटनास्थळांवर जाऊन केलेल्या अभ्यासक्रमांमुळे अगणित समस्यांनी त्यांचं लक्ष वेधून घेतलं. स्त्री कामगारांची भलीमोठी संख्या, त्यांच्या कामाशी सरसकट जोडलेले त्याचे कनिष्ट सांपत्तिक व सामाजिक मूल्य, कामाच्या ठिकाणी होणारं, लैंगिकतेसकट सर्व प्रकारचं शोषण! हे अनुभव ऐकताना त्या स्वत:ला प्रश्न विचारू लागल्या. मुख्य धारेतील योजनांचं आरेखन बनवताना या स्त्रिया व त्यांच्या समोरची लक्षणीय आव्हानं आस्थापूर्वक विचारात घेतली जात आहेत का? संख्याशास्त्राच्या प्रक्रियेत त्यांचं मोजमाप होत आहे का? सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) त्यांचं योगदान पुरेशा वस्तुनिष्ठतेनं गणलं जात आहे का?
त्यांच्या समस्यांना राज्यातील आर्थिक व महसूल आदी संसाधनांकडून पुरेसा प्रतिसाद दिला जातो आहे का? परदेशातील त्यांच्या अनेक दौऱ्यांमध्ये ‘तिसऱ्या जगातील स्त्रीचं प्रतिनिधित्व’ करताना त्यांना एक अस्वस्थ करणारा परंतु सर्वस्वी अपेक्षित आकृतिबंध जाणवत होता. या बैठकांमध्ये कायम तंत्रज्ञांचा समावेश असे, ते प्रामुख्याने पुरुष असत, वसाहतवाद्यांचे घर असणाऱ्या उत्तर गोलार्धाचे रहिवासी. १९८० मध्ये होणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेची तयारी करण्यासाठी कोपेनहेगन येथे त्या गेल्या होत्या. त्यांच्याबरोबर दक्षिण गोलार्धातील इतर स्त्रियाही होत्या.
‘दक्षिण गोलार्धातील स्त्रियांसाठी उत्तरेकडील सहकारी एक पालकत्वाची भूमिका घेतात, काहीसं आश्रितांप्रमाणे समजतात असं त्यांचं निरीक्षण होतं. त्यांचे शोधनिबंध, विश्लेषण आणि अनुमाने यातून त्यांची हीच भूमिका व्यक्त होते. दक्षिणेकडे दारिद्र्य व अशिक्षितता आहे. कालबाह्य संस्कृती व रूढींनी त्या जखडलेल्या असून आधुनिक संस्थांकडे तारणहार म्हणून पाहात आहेत.’ या सर्वांमागे सांस्कृतिक व राजकीय वर्चस्वाचा, उच्चत्वाचा दावा अनुस्यूत आहे, असं निर्भीडपणे सांगत देवकींनी स्त्रीवादाला जागतिक स्तरावर घेऊन जात वर्णवादाचे, राजकीयतेचे नवे आयाम दिले. कोणीतरी घालून दिलेल्या चौकटीमधून विचार करणं नाकारत एक नवी चौकट आकाराला येत होती. एका बाजूने गरीब स्त्रियांची परिस्थिती आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या देशातील ढोबळ आर्थिक व राजकीय रचनेला जोडणारी अन्न, कर्ज, धार्मिक मूलतत्त्ववाद या समस्यांचा त्यांच्यावर झालेला परिणाम. या प्रकल्पाचं शीर्षक होतं, ‘नव्या युगाच्या स्त्रीसाठी विकासपर्याय.’
त्यांच्या कामामुळे त्या विनोबा भावे, नेल्सन मंडेला, डेसमंड टुटू, हेन्री किसिंजर, अमर्त्य सेन यांच्यासारख्या जगभरातील काही विचारवंत व नेत्यांच्या संपर्कात आल्या. आयरिस मर्डहॉक, जेनेफर हार्ट, ग्लोरिया स्टायनॅम, ज्युलीयस न्यरेरेसारख्या उल्लेखनीय व्यक्तींबरोबर त्यांची चांगली मैत्री झाली. ग्लोरियांबरोबर त्यांनी स्त्रीवादी संकल्पनांवर काम केलं. कमीत कमी अन्याय असणाऱ्या जगाची उभारणी करण्यासाठी स्थापन झालेल्या ‘साउथ कमिशन’मध्ये देवकींनी सामील व्हावं यासाठी तंजानियाचे पहिले राष्ट्रपती ज्युलियस न्यरेरे आग्रही होते. दक्षिण आफ्रिकेमधील नेल्सन मंडेला, डेसमंड टुटू व फातिमा मेरेनिस्सीसारख्या राजकीय विचारवंतांबरोबर त्यांनी खांद्याला खांदा लावून काम केलं. ‘फोर्ड फाउंडेशन’च्या मदतीने भारतीय व पाकिस्तानी स्त्रियांच्या प्रतिनिधी मंडळाची स्थापना केली.
देवकींच्या स्त्री चळवळींविषयक अनुभवांचं, विशेषकरून आर्थिक धोरणांच्या संकल्पना, तसेच संस्थांची उभारणी करणे आदी गोष्टींचं स्त्रियांकडून स्वागत झालं. मग त्या स्त्रिया लोकसभेतील असोत, एच.आय.व्ही. वा एड्सशी झुंजणाऱ्या असोत वा संशोधन केंद्रे स्थापन करणाऱ्या असोत. अनौपचारिक अर्थव्यवस्थेत कामगार असणाऱ्या गरीब स्त्रियांच्या समस्यांमध्ये देवकींचं जीवन खोलवर गुंतलं होतं. त्यांना त्यांच्या कामाचं मोल पुरेपूर कसं मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्या अर्थशास्त्रात संशोधन करून, स्त्री समाजजीवनाचा साद्यांत अभ्यास करणाऱ्या विश्लेषक होत्या. नवे प्रबंध व सिद्धांत मांडून स्त्रीवादाला नवा आयाम देणाऱ्या कृतिशील विचारवंत होत्या. म्हणूनच स्त्री चळवळीत त्यांचे नाव महत्त्वाचे ठरले आहे.