डॉ. गीतांजली राणे-घोलप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१९७५ नंतर महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली. गेल्या ४७ वर्षांत त्यामुळे झालेल्या काही बदलांमुळे तरुणांच्या विचारांत, कृतींत थेट नसली तरी अप्रत्यक्षपणे तरी स्त्री-पुरुष समानता दिसते आहे का, त्यांच्यात ही चळवळ किती झिरपली हे जाणून घेण्यासाठी यंदाच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने ‘लोकसत्ता चतुरंग’नं सर्वेक्षणाचा एक छोटा प्रयत्न केला. स्त्री-पुरुष समानतेविषयीचे रोजच्या जगण्यातले अनेक मुद्दे घेऊन एक प्रश्नावली तयार केली आणि ती लोकांकडून ऑनलाइन भरून घेतली. वरवर साध्या वाटणाऱ्या या प्रश्नांच्या उत्तरांनी लोकांचे विचार प्रतिबिंबित केले. हा विषय दैनंदिन जगण्यात कसा बेमालूम गुंतलेला आहे आणि स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्यासाठी किती सूक्ष्म बाबी लक्षात घ्यायला हव्यात, हे या सर्वेक्षणानं  समोर आणलं..

स्त्रीवादी चळवळ आपल्यासाठी नवीन नाही. प्रत्येक विचार करणारी, अभ्यासापलीकडचं वाचणारी व्यक्ती या चळवळीविषयी थोडंबहुत जाणून असतेच. पण मुद्दा आहे तो या चळवळींनं समाज म्हणून आपल्याला काय दिलं याचा आढावा घेण्याचा. या  चळवळीविषयी समाजातील विविध वयोगटांतील व्यक्ती कसा विचार करतात हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता चतुरंग’नं एक सर्वेक्षण केलं. एकूण १६८ व्यक्तींनी ऑनलाइन प्रश्नावलीद्वारे या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला. त्यात ६४ टक्के स्त्रिया आणि ३६ टक्के पुरुषांचा सहभाग होता आणि २५ ते ३५ या वयोगटातल्या स्त्री-पुरुषांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होता. हे सर्वेक्षण प्रातिनिधिक नाही. तरीही आजची पिढी या विषयाचा कसा विचार करते यांचा अंदाज बांधणं शक्य आहे. त्याचा हा आढावा- या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या व्यक्तींपैकी ३१ टक्के व्यक्ती या पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या, ३० टक्के व्यक्ती पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलेल्या, तर १६ टक्के व्यक्ती पदव्युत्तर पदवीनंतर आणखी काही पदवी किंवा पदविकेचं शिक्षण घेतलेल्या होत्या. याचाच अर्थ यातील

७७ टक्के व्यक्ती उच्चविद्याविभूषित होत्या. त्यामुळे सर्वेक्षणातून हाती आलेल्या निष्कर्षांवरून उत्तम शिक्षण घेतलेली तरुण पिढी या विषयाबद्दल कोणत्या दिशेनं विचार करते याचा अंदाज येतो असं म्हणायला हरकत नाही.    ‘स्त्रीमुक्ती’, ‘स्त्रीवाद’, ‘फेमिनिझम’ हे शब्द ऐकल्यावर तुमच्या मनात सकारात्मक भावना निर्माण होते की नकारात्मक, हा प्रश्न सर्वेक्षणात सहभागींना विचारण्यात आला. या प्रश्नाला ८६ टक्के व्यक्तींनी ‘सकारात्मक’ असा प्रतिसाद नोंदवला, तर १४ टक्के व्यक्तींनी ‘नकारात्मक’ असा प्रतिसाद नोंदवला, त्यातील ८६ टक्के व्यक्ती या २० ते ४० वयोगटातील होत्या, तर १४ टक्के व्यक्ती ४० च्या वरील वयोगटातील होत्या.

 ‘केवळ तुमच्या वैयक्तिक अनुभवांवरून आताच्या समाजात स्त्री-पुरुष समानता आहे, असं तुम्हाला जाणवतं का?’ या प्रश्नावर सर्वाधिक म्हणजे ६० टक्के लोकांनी ‘नाही’ असा प्रतिसाद नोंदवला, तर समानता आहे असं वाटणाऱ्या आणि निश्चितपणे सांगता येत नाही असं म्हणणाऱ्या लोकांचं प्रमाण हे जवळपास सारखंच, म्हणजे अनुक्रमे २१ टक्के आणि १९ टक्के इतकं होतं. या प्रश्नाबाबत काही सहभागींशी चर्चा केली असता एक मुद्दा प्रकर्षांनं समोर आला, तो म्हणजे समानता नक्की कशाला म्हणायचं, याचीच व्याख्या अजून स्पष्ट नाही. काहींच्या मते अर्थार्जन करणं, घरातली कामं वाटून घेऊन करणं म्हणजे समानता, असा अर्थ होता, तर काहींच्या मते पुरुषांनी मुलांचा अभ्यास घेणं, स्त्रियांनीही पुरुषांप्रमाणेच कुठेही एकटीनं प्रवास करणं हा समानतेचा अर्थ होता.

‘तुम्ही तुमच्या घरात साधारणपणे कोणती कामं करता?’ या प्रश्नाला सर्वेक्षणात सहभागींपैकी ५० टक्के जणांनी घराची स्वच्छता, भांडी घासणं, कपडे धुणं, स्वयंपाक, अशी सर्व कामं करत असल्याचं सांगितलं. हे उत्तर देणारा वयोगट हा २२ ते ३३ वर्ष या दरम्यानचा होता आणि विशेष म्हणजे यात पुरुषांचं प्रमाणही लक्षणीय होतं. या प्रश्नाच्या माध्यमातून एक सकारात्मक चित्र समोर आलं. सध्याच्या २० ते ३८ या वयोगटातल्या सुशिक्षित तरुण-तरुणींना कोणतंही काम करताना ‘हे काम स्त्रीचं’ किंवा ‘हे काम पुरुषाचं’अशी वर्गवारी डोक्यात नसते असं जाणवलं. याचा अर्थ समाज हळूहळू का होईना, पण घरातल्या कामांच्या संदर्भात तरी स्त्री-पुरुष समानतेच्या वा लिंगनिरपेक्ष दिशेनं वाटचाल करतो आहे, असं म्हणायला हरकत नाही. 

‘एखाद्या घरातले स्त्री-पुरुष दोघंही शिकलेले आणि कमावते असतील, तर घराची जबाबदारी कुणाच्या खांद्यावर असावी असं वाटतं?’ या प्रश्नावर सहभागींपैकी ९७.७ टक्के जणांनी ‘स्त्री-पुरुष दोघांनी जबाबदारी वाटून घ्यावी’ असं मत मांडलं. ‘स्त्री घर उत्तम सांभाळू शकते म्हणून तिनंच सांभाळावं’ असाही पर्याय या प्रश्नासाठी दिलेला होता. तो पर्याय १.७ टक्के लोकांनी निवडला. अपवाद म्हणजे फक्त ०.६ टक्के व्यक्तींनी ‘पुरुषांनी घर सांभाळावं’ हे उत्तर निवडलं, त्यांच्या मते,आत्तापर्यंत  स्त्रियाच घर सांभाळत आलेल्या आहेत,  स्त्रियांची तारेवरची कसरत काय असते, हे पुरुषांना समजावं म्हणून त्यांनी घराची जबाबदारी घेतली पाहिजे. या प्रश्नाच्या माध्यमातूनही स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भातील संकुचितपणा कमी होताना दिसत आहे असं म्हणण्यास वाव आहे.  या सर्वेक्षणात सहभागी व्यक्तींपैकी ६८ टक्के व्यक्ती या अर्थार्जन करणाऱ्या होत्या, तर ३२ टक्के व्यक्ती या अर्थार्जन करणाऱ्या नव्हत्या. या ३२ टक्के व्यक्तींपैकी २० टक्के व्यक्ती अद्याप शिक्षण घेत आहेत. केवळ १२ टक्के व्यक्ती या आर्थिकदृष्टय़ा इतर व्यक्तींवर अवलंबून असलेल्या आहेत.

‘तुम्हाला लहानपणापासून घरातून किंवा आजूबाजूच्या वातावरणातून स्त्रीनं कसं वागावं/ पुरुषानं कसं वागावं किंवा स्त्रीनं कोणती कामं करावीत आणि पुरुषांनी कोणती कामं करावीत याचं प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष शिक्षण मिळत गेलं होतं का?’ या प्रश्नावर लक्षणीय म्हणजे ७७ टक्के व्यक्तींनी ‘हो’ असा प्रतिसाद नोंदवला, तर उर्वरित २३ टक्के लोकांनी ‘नाही’ असा प्रतिसाद नोंदवला. आधीच्या काही प्रश्नांवरून दिसणाऱ्या सकारात्मक चित्रापेक्षा वेगळं चित्र या प्रश्नाच्या उत्तरामधून समोर आलं. विशेष म्हणजे ज्या प्रतिसादकांनी आधीच्या काही प्रश्नाची उत्तरं स्त्री-पुरुष समानतेच्या अनुषंगानं सकारात्मक अशी दिली आहेत, त्यांच्यामधील २२ टक्के लोकांनी या प्रश्नाला मात्र ‘हो’ असा प्रतिसाद दिला. असा विरोधाभास का हे जाणून घेण्याचा प्रयत्न केल्यावर अनेकांनी, ‘हा आमचा पूर्वानुभव आहे’ असं नमूद केलं.

‘तुमच्या घरात तुमच्या पिढीत लहानपणापासून मुलगा आणि मुलगी असा भेद प्रत्यक्ष वा नकळत केला जात होता, असं तुम्हाला वाटतं का?’ या प्रश्नावर मात्र ६० टक्के प्रतिसादकांनी ‘नाही’, तर ४० टक्के प्रतिसादकांनी ‘हो’ असं उत्तर दिलं. ‘एखाद्या घरातले पुरुष जर स्वयंपाक किंवा घरकाम करत असतील तर ती कौतुकाची गोष्ट वाटते का?’ या प्रश्नाला ६१ टक्के व्यक्तींनी ‘हो’ असं उत्तर दिलं तर ३९ टक्के व्यक्तींनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. यात ‘हो’ असं उत्तर देणाऱ्यांमध्ये ४० टक्के पुरुषांचा सहभाग होता. तर ‘नाही’ असं उत्तर देण्यामध्ये स्त्रियांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर होता. म्हणजे अनेक पुरुषांना स्वत: स्वयंपाक किंवा घरकाम करण्याचं कौतुक वाटतं, परंतु सर्वच स्त्रियांना पुरुषांनी घरकाम करणं ही विशेष कौतुकाची बाब वाटत नाही.

‘तुमच्या घरातल्या स्त्रिया आर्थिक व्यवहार, बँकांचे व्यवहार, गुंतवणुकीचे व्यवहार इत्यादी स्वत:चे स्वत: शिकून  करतात का?’ या संदर्भातील प्रतिसाद हा सकारात्मक होता. ७१ टक्के प्रतिसादकांनी या प्रश्नाला ‘हो’ असाच प्रतिसाद दिला. तर ‘अजिबातच करत नाहीत’ हा प्रतिसाद ५ टक्के लोकांनी नोंदवला. विशेष म्हणजे उर्वरित २४ टक्के लोकांनी ‘घरातील स्त्रियांना बँकेच्या किंवा आर्थिक व्यवहारांची पूर्ण कल्पना नाही, परंतु त्या शिकण्याची इच्छा प्रदर्शित करतात’ असा प्रतिसाद दिला. बऱ्याच स्त्रिया आर्थिक व्यवहार आणि गुंतवणूक वगैरे बाबतीत अनभिज्ञ असतात, असा समज समाजात वारंवार व्यक्त केलेला आढळतो. तो पाहता या सर्वेक्षणात दिसलेलं वरील चित्र सकारात्मकच आहे. ‘स्त्रियांनी अर्थार्जन करायलाच हवं असं तुम्हाला वाटतं का?’ या प्रश्नालादेखील सकारात्मक प्रतिसाद ८८ टक्के लोकांनी दिला. ज्या १२ टक्के प्रतिसादकांनी ‘कुटुंबाची आर्थिक गरज असेल तर अर्थार्जन करावं’ हा पर्याय निवडला होता, त्यांच्यापैकी काहींशी बोलल्यावर असं लक्षात आलं, की हे प्रतिसादक प्रामुख्यानं ३५ ते ४० या वयोगटातले होते आणि त्यात स्त्रियांची संख्या जास्त होती.

 ‘आज स्त्रीमुक्ती चळवळीची गरज आहे का?’ या प्रश्नाला ६७ टक्के व्यक्तींनी ‘हो’, २३ टक्के व्यक्तींनी ‘नाही’, तर १० टक्के व्यक्तींनी ‘सांगता येणार नाही’ असा प्रतिसाद नोंदवला. ज्यांनी ‘हो’ असा प्रतिसाद नोंदवला होता, त्यात मुख्यत्वे २० ते ३५ या वयोगटातल्या स्त्री-पुरुष दोघांचीही संख्या जवळपास सारखीच होती. याचा अर्थ सध्याच्या सुशिक्षित तरूण वर्गात प्रातिनिधिक स्तरावर स्त्री-पुरुष दोघांनाही स्त्रीमुक्ती चळवळीची गरज वाटत आहे. ‘स्त्रीमुक्ती चळवळीची गरज वाटत नाही’ असं म्हणणाऱ्यांपैकी काहींशी बोलल्यानंतर असं चित्र समोर आलं, की त्यातल्या काही जणांना ते ‘फॅड’ वाटतं, तर काहींना हा स्त्रियांनी पुरुषांवर वर्चस्व गाजवण्यासाठी केलेला प्रयत्न वाटतो. काही जणांनी मात्र स्त्रीमुक्ती चळवळ म्हणजे नेमकं काय, ही संकल्पनाच आपल्याला स्पष्ट झालेली नाही, असं सांगितलं. ज्यांनी ‘सांगता येणार नाही’ असं उत्तर दिलं आहे त्यातील बहुतेकांना स्वत:ला स्त्री मुक्ती चळवळ म्हणजे काय हे माहिती आहे, परंतु त्याचे निश्चित फायदे किंवा तोटे, अथवा यामुळे निश्चितपणे स्त्रियांना फायदा होईल का, हे स्पष्ट नाही, असं मत समोर आलं.

‘तुम्ही केवळ स्त्री आहात किंवा पुरुष आहात म्हणून आजवर काही तोटा झाला आहे का?’ या प्रश्नाला ४९.४ टक्के प्रतिसादकांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं, तर ३७.२ टक्के प्रतिसादकांनी ‘हो’ असं उत्तर दिलं. या ३७ टक्क्यांपैकी २० टक्के पुरुष आणि १७ टक्के स्त्रिया आहेत. यातही काय प्रकारचा तोटा झाला, हे जाणून घेण्याचा प्रातिनिधिक स्वरूपात प्रयत्न केला असता, पुरुषांना स्त्रियांसाठी आरक्षित असलेल्या अनेक योजनांमध्ये सहभागी होता येत नसल्याची खंत होती, तर स्त्रियांना विशेषत्वानं ज्या गोष्टी ‘पुरुषांनी करायच्या’ म्हणून ठरवल्या गेल्या आहेत, त्या करताना तोटा झाला होता. उदा. एका प्रतिसादक स्त्रीला गिर्यारोहणात करिअर करायचं होतं, परंतु केवळ मुलगी असल्यामुळे तिच्या घरातून तिला विरोध करण्यात आला. 

 ‘तुमच्या जोडीदारानं किंवा तुमच्या घरातल्या पुरुषानं घरकाम केलेलं तुम्हाला चालतं का?’ हा प्रश्न जाणीवपूर्वक फक्त स्त्रियांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला ८५.२ टक्के स्त्रियांनी ‘हो’ असं उत्तर दिलं, तर ७.४ टक्के स्त्रियांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं. ज्यांनी ‘नाही’ असं उत्तर दिलं आहे त्या ३५ वर्षांच्या पुढील वयोगटातल्या होत्या. त्यातल्या काहींना ‘नाही’ असं उत्तर देण्याचं कारण विचारलं असता त्यांनी ‘घरातल्या पुरुषानं किंवा जोडीदारानं घरकाम करणं हा आपल्या संस्कृतीचा भाग नाही’ असं प्रातिनिधिक मत नोंदवलं. विशेष म्हणजे यातील काही स्त्रियांनी याच सर्वेक्षणामधील ‘स्त्रियांनी अर्थार्जन करावं का?’ या प्रश्नाला ‘गरज असेल तरच करावं’ असा प्रतिसाद नोंदवला होता. ज्या ७ टक्के स्त्रियांनी ‘सांगता येणार नाही’ असा प्रतिसाद नोंदवला, त्यांच्यापैकी काहींनी आपण याबद्दल कधी विचारच केला नसल्याचं स्पष्ट केलं. स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भात समाजात असलेली सद्य:स्थिती जाणून घेण्याचे हे सर्वेक्षण म्हणजे एक छोटा प्रयत्न होता. तो सर्वागीण आणि सर्वंकष नाही मात्र या विषयाबद्दल लोक सध्याच्या काळात कसा विचार करत आहेत, हे मोठय़ा प्रमाणावर जाणून घेण्यासाठीची दिशा या सर्वेक्षणानं निश्चितच दिली.

rane.geet@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Directional survey women liberation movement maharashtra changes gender quality ysh
First published on: 05-03-2022 at 00:02 IST