अनेक कंपन्या नोकरीची आमंत्रणं घेऊन घरापर्यंत आलेल्या असतानाही त्यांनी मात्र सरकारी नोकरी स्वीकारली. पण तेथे नुसतीच नोकरी न करता तिला एका आव्हानात बदललं. नागरी अणू ऊर्जा करारादरम्यान देशहिताला कोणताही धक्का पोहचू नये यासाठी आपल्या मतांवर ठाम राहून अमेरिकेलाही झुकायला भाग पाडले. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांचा प्रेरणादायी प्रवास.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

माझं शिक्षण मध्य प्रदेशात खरगोण या गावांत झाले. मी शाळेत जाऊ लागलो, त्या वेळेस भारत स्वतंत्र झाला होता, पण राज्यात होळकरांचे संस्थानी वातावरण कायम होते. गावात साधारणत: २५ ते ३० हजार लोकवस्ती असेल. यात आमची २०० मराठी कुटुंबे होती. आपल्या मुलांवर मराठी संस्कृतीचे संस्कार व्हावेत यासाठी ही सर्व मंडळी प्रयत्नशील असायची. म्हणूनच गावात गणेशोत्सव, रंगपंचमी, दसरा असे मराठमोळे सण साजरे केले जायचे. गावात मराठी कुटुंबे कमी होती तरी त्यांच्यासाठी मराठी माध्यमाची प्राथमिक शाळा मात्र होती. तीन खोल्यांच्या या शाळेत पाचवीपर्यंतचे वर्ग शिकविले जायचे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी उभारलेल्या आंदोलनादरम्यान माझ्या वडिलांना अटक करण्यात आली होती. त्यांना तुरुंगवासासाठी पोर्तुगालला नेण्यात आले होते. यामुळे माझी आई हीच माझे वडीलही झाली होती. कुटुंब चालविण्यासाठी तिला काही तरी काम करणे गरजेचे होते. पण केवळ काम न करता त्यातून काही नवीन सामाजिक कार्यही घडेल याकडेही तिचा कल होता. म्हणून तिने त्या काळी माँटेसरी पद्धतीच्या पूर्व प्राथमिक शिक्षिकेचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या काळात लोक लहान मुलांना सहसा शाळेत पाठवीत नसत. त्यात बालवाडी ही संकल्पनाच नवीन असल्याने तेथे पाठविणे म्हणजे कठीणच. पण ते आव्हान आईने खरगोण या छोटय़ा गावात पेलले. आईने बालवाडीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेले असल्यामुळे मुलांच्या मानसिकतेपासून सर्वच गोष्टींचा तिचा अभ्यास चांगला होता. परिणामी मला खूप समृद्ध शिक्षण मिळाले. प्राथमिक शाळेत मी हुशार असल्यामुळे मला ‘डबल प्रमोशन’ मिळाले. म्हणजे पाचवीपर्यंतचे शिक्षण मी चार वर्षांत पूर्ण केले. पुढे माध्यमिक शिक्षणासाठी मी िहदी शाळेत नाव घातले. तेथे मी इतर मुलांच्या तुलनेत एक वर्ष लहान होतो. माझे शालेय शिक्षण पूर्ण होण्याच्या सुमारास माझ्या वडिलांची सुटका झाली व ते भारतात परत आले. मला पुढे शिक्षण घ्यायचे होते. पण त्या काळी खरगोणला केवळ इंटपर्यंतचेच शिक्षण होते. यामुळे आईने माझ्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला.
आम्ही मुंबईत आलो त्या वेळेस येथे शालेय शिक्षणास ११ वष्रे लागत. मध्य प्रदेशात दहावी म्हणजे मॅट्रिक. तसेच तेथील निकाल महाराष्ट्राच्या तुलनेत उशिरा लागत असल्यामुळे निकालाची वाट पाहावी तर तोपर्यंत इथले प्रवेश संपले असते आणि माझे वर्ष वाया गेले असते. मग एका ओळखीतून मी रुपारेल महाविद्यालयाचे उपप्राचार्य नाना भिडे यांना भेटलो. त्यांनी खरी अडचण सांगितली. तेव्हा त्यांनी विचारलं किती गुण मिळतील. मी म्हटलं माहीत नाही. प्रथम श्रेणी येईल का या त्यांच्या प्रश्नाला मी होय असे उत्तर दिले. मग ते म्हणाले, ‘मी तुला तात्पुरता प्रवेश देतो. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालास तर प्रवेश मिळेल, नाही तर महाविद्यालय सोडावे लागेल.’ या अटीवर माझे महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाले. वर्गातील इतर मुलांपेक्षा मी दोन वर्षांनी लहान होतो. याचे कारण म्हणजे मी नऊ वर्षांत मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केले. महाराष्ट्रात ११ वष्रे लागली असती. प्राथमिक शिक्षण मराठीत, माध्यमिक िहदीत आणि आता महाविद्यालयीन शिक्षण थेट इंग्रजीमध्ये सुरू झाले. यामुळे थोडे दडपण होते, पण माझा अभ्यास चांगला सुरू झाला. दोन वर्षांनी इंटर्नचा निकाल लागला. आता पुढे काय करायचे हा प्रश्न होता. मला मूलभूत विज्ञानात शिक्षण घ्यायची इच्छा होती. निकाल लागल्यावर मी भिडेसरांकडे गेलो. त्यांनी माझे अभिनंदन करत पुढे काय करणार असा प्रश्न विचारला. मी त्यांना सांगितले, बीएस्सी करायचे आहे. यात मुख्य विषय भौतिकशास्त्र असेल आणि द्वितीय विषय गणित असेल. त्यावेळेस त्यांनी मला व्हीजेटीआयमध्ये अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेण्याची सूचना केली. तसेच बीएस्सी करायचेच झाले तर मुख्य विषय गणित असावा असे सुचवले. सुरक्षित करिअरच्या दृष्टीने त्यांचे म्हणणे योग्यही होते. मला ते फारसे पटले नसले तरी, त्यावेळी वडिलधाऱ्यांशी फारसा वाद घालण्याची पद्धत नव्हती. अखेर मी अभियांत्रिकीचा अर्ज भरण्यास तयार झालो आणि मला प्रवेशही मिळाला. त्यावेळेस व्हीजेटीआयमध्ये अभियांत्रिकी पदवी शिक्षण तीन वर्षांचे होते. त्यामुळे तेथे माझे एक वर्ष आणखी वाचले आणि एकूण शिक्षण कालावधीत वाचलेल्या तीन वर्षांचा फायदा पुढे नक्कीच झाला.
त्या काळी अभियांत्रिकी क्षेत्राला खूप वाव होता. पण मला ठरावीक साच्यातील अभियांत्रिकीचे काम करण्यात फारसा रस नव्हता. अनेक कंपन्या घरी पत्र पाठवून अर्ज मागवत असत. त्यातील काही ठिकाणी मी अर्जही केले. त्याचदरम्यान मला मुंबईत भाभा अणू संशोधन केंद्र असल्याची माहिती मिळाली. तेथे रोज नवीन काहीतरी करण्याची संधी मिळते या भावनेने मी अर्ज केला. मी सरकारी नोकरी स्वीकारणार म्हणून रागाने माझ्या मित्रांनी माझे मुलाखतीचे पत्र लपवले. त्यामुळे मी ठरलेल्या दिवशी मुलाखतीला जाऊ शकलो नाही. दोन दिवसांनी जेव्हा मित्रांनी मला ते पत्र परत दिले, तेव्हा मी तेथे गेलो आणि त्यांना पत्र दाखवले. त्या वेळेस तेथील लोक मला ओरडले. पण मीही त्यांना ठामपणे म्हणालो, मी ठरल्या दिवशी आलो नाही ही माझी चूक मी मान्य करतो. पण मला तुम्ही संधी द्यावी. तेव्हा तेथील अधिकाऱ्याने माझे नाव त्या दिवशीच्या मुलाखतीच्या यादीत दाखल केले. मुलाखत झाली, निवडही झाली. तेथे सुरू झालेल्या प्रशिक्षणाचा मी खऱ्या अर्थाने आनंद घेत होतो. त्या अभ्यासक्रमात मी पहिला आलो. प्रशिक्षणात जो कुणी पहिला येईल त्याला त्याच्या आवडीचे काम प्राधान्याने देण्याची बीएआरसीमध्ये प्रथा आहे. त्यावेळेस माझी रिअ‍ॅक्टर डिझाइनमध्ये जाण्याची इच्छा होती. मी माझी आवड सांगायच्या आत तेथील प्रमुख सुब्रह्मण्यम यांनी तुझ्यासाठी आम्ही वेगळा विचार केला आहे असे सांगितले, तेव्हा मी थोडा विरोध केला. पण त्यांनी मला संशोधन आणि विकास विभागात काम करण्याची सूचना केली व त्याबाबत चांगले मार्गदर्शनही केले. रोज नवनवीन शोध घेण्याची सुरुवात झाली. त्या वेळेस भारत आणि कॅनडाचे सहकार्य जोमात चालू असल्यामुळे येथील अभियांत्रिकी पदवीधरांना कॅनडामध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळत असे. तशी संधी मलाही आली. पण नुसते प्रशिक्षण घेण्यापेक्षा चांगल्या संस्थेत जाऊन नवीन शिक्षण घेऊन भारतीय बनावटीचे रिअ‍ॅक्टर तयार करण्यात रस होता. यामुळे मी माझा मानस त्यांना कळविला. त्यांचा नकार आला. पण मी ठाम राहिलो. त्यावर त्यांनी धोरणात बदल करून मला परदेशात पाठवले. मग मी नॉटिंगहॅम विद्यापीठात पुढचे शिक्षण घेतले. तेथून परतल्यावर मी ‘हेव्ही वॉटर रिअ‍ॅक्टर’वर सुरू असलेले माझे काम पुन्हा सुरू केले. त्यानंतर माझ्यावर ‘ध्रुव’ या भारतीय बनावटीच्या रिअ‍ॅक्टरच्या निर्मितीचे काम सोपविण्यात आले. ‘ध्रुव’चे काम यापूर्वी अनेकांनी सुरू केले होते. त्यात अनेक ज्येष्ठ लोकही होते. पण ते काम हाती घेण्यापूर्वी मी माझी स्वत:ची रचना तयार करून मगच कामास सुरुवात करीन असे सांगितले. ते मान्यही झाले. त्याप्रमाणे ‘ध्रुव’ची रचना झाली आणि ते रिअ‍ॅक्टर कामही करू लागले. ‘ध्रुव’ आज जगातील संशोधनासाठी असलेल्या मोठय़ा अणुभट्टय़ांत महत्त्वाचे स्थान राखून आहे. हे काम करताना मला व्यवस्थापन कौशल्ये शिकण्याची गरज वाटू लागली. ते शिकण्यासाठीही अर्धवेळ अभ्यासक्रम करण्याची मुभा मागितली. पण तशी मुभा देण्याचे धोरण तेव्हा नव्हते. तसेच इंजिनीअर्सना पीएच.डी.साठी प्रोत्साहन देण्याचे धोरणही संस्थेत नव्हते. या धोरणांवर मी नाराजी व्यक्त केली. नंतर त्या धोरणांमध्ये बदल झाले, पण मी त्याचा फायदा घेऊ शकलो नाही.
याच दरम्यान कल्पकम येथील अणू ऊर्जा केंद्रातील दोन्ही रिअ‍ॅक्टर बंद पडले. मग ते रिअ‍ॅक्टर दुरुस्त करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवण्यात आली. त्यात बीएआरसीबरोबरच एनपीसीआयएल, मद्रास अणू ऊर्जा केंद्र आदी संस्थांमधील मंडळी पण सहभागी होती. त्या वेळेस आपले आणि कॅनडाचे संबंध चांगले नव्हते. तरीही काहींनी व्यक्तिगतरीत्या कॅनडाच्या तज्ज्ञांकडून आम्ही तयार केलेल्या दुरुस्ती आराखडय़ाबाबत मतं मागविली. तेव्हा त्यांनी ही दुरुस्ती होणे शक्यच नाही असे मत दिले. आता या कामाची जबाबदारी घेण्यास कोणीच तयार नव्हते. कल्पकम येथील केंद्र संचालकांनी मात्र माझ्या कामाला पाठिंबा दर्शविला. अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत दुरुस्तीस आवश्यक साधनांची निर्मिती व जुळवाजुळव करून काम पूर्ण केले आणि रिअ‍ॅक्टर दुरुस्त होऊन सुरू झाले. त्यानंतर अणू विज्ञानाच्या क्षेत्रात तंत्रज्ञान विकासाच्या अनेक कार्यक्रमात माझा प्रत्यक्ष सहभाग होता व अनेक बाबतीत लक्षणीय यश पण लाभले. आपल्यावर र्निबध लादलेल्या अमेरिकेसारख्या देशांना भारतीय अणू तंत्रज्ञानाकडे लक्ष द्यावे लागले. आंतरराष्ट्रीय र्निबधांमुळे आपण वीजनिर्मिती क्षमतेत मागे पडत होतो, पण तंत्रज्ञानात आपल्याला कुणी रोखू शकत नव्हते. आपण संपूर्ण भारतीय बनावटीचे ५०० मेगाव्ॉट क्षमतेचे हेव्ही वॉटर रिअ‍ॅक्टर तयार केले होते, ज्याचा वापरही सुरू झाला होता. तसेच ५०० मेगाव्ॉटच्या प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टरचे काम पण जोमात सुरू झाले होते. याची दखल अनेक स्तरावर घेण्यात आली. भारतीय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी आलेले अमेरिकी तज्ज्ञ सिक फ्रेड हेकर यांनी त्याबाबतची माहिती अमेरिकन काँँग्रेसच्या एका समितीपुढे दिली. यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरून देवाण-घेवाणीबाबत चर्चा सुरू होऊन अनेक पावले उचलली गेली; अर्थात यामागे व्यापारी व राजकीय कारणेही होतीच.
नागरी अणू ऊर्जा करारातील आव्हाने
अणू ऊर्जा केंद्रातील प्रवास करत करत मी तेथील संचालक झालो. पुढे अणू ऊर्जा आयोगाचा अध्यक्षही झालो. भारतात अणू ऊर्जा क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञान चांगल्या प्रकारे विकसित होत असतानाच आंतरराष्ट्रीय र्निबधांमुळे वीजनिर्मितीमध्ये मात्र भारताची गती कमी आहे हे जाणवले. मात्र तंत्रज्ञान विकासात भारत पुढेच जात आहे हे जगाला समजल्यावर जगाने भारताकडे लक्ष देण्यास सुरुवात केली. भारत हा विकासाकडे झपाटय़ाने प्रगती करणारा देश असल्यामुळे तेथे विजेची गरजही मोठय़ा प्रमाणावर आहे. ती भरून काढण्यासाठी प्रामुख्याने कोळसा आणि तेल या दोन माध्यमातून वीजनिर्मितीवर भर वाढत आहे. यामुळे अणू ऊर्जेवर भर देणे आपल्याला आवश्यक होते. यासाठी तीनस्तरीय कार्यक्रमही आखण्यात आला. पण हा कार्यक्रम मोठय़ा कालावधीचा असल्यामुळे त्यातून आताची गरज भागणे शक्य नव्हते. यासाठी अणू ऊर्जा निर्मितीसाठी युरेनियमचा मुबलक पुरवठा आवश्यक होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून युरेनियम विकत घेण्यासाठीची व्यवस्था होणे गरजेचे होते. भारतावरील आतापर्यंत याबाबत असलेले आंतरराष्ट्रीय र्निबध सैल झाले तरच आपल्याला युरेनियम मिळणार होते. याचबरोबर अमेरिकेसारखे बलाढय़ देशही भारताशी नागरी अणू व्यवसाय करण्यासाठी उत्सुक होते. पण त्यातील त्यांच्या अटी खूपच जाचक होत्या. त्या जाचक अटी काढून मगच करार व्हावा अशी माझी इच्छा होती. आंतरराष्ट्रीय स्तरावरून आम्ही जे घेऊ ते आयएईएसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांच्या निरीक्षणाखाली असण्यास आपली आडकाठी नव्हती. पण देशांतर्गत विकास कार्यक्रमांवर कुणाचेही र्निबध येता कामा नये ही त्यातील महत्त्वाची भूमिका होती. हा वाद खूप काळ चालला. अमेरिकेसारख्या देशाने भारताचे कौतुक केले म्हणून ‘आकांक्षा पुढती गगन ठेंगणे’ या उक्तीप्रमाणे अनेकांना आपण खूप काही मिळवले असे वाटले आणि त्यांनी करारावर स्वाक्षऱ्या करण्याचा आग्रह धरला होता. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय दबावही वाढत होता. पण मी माझ्या मतांवर ठाम होतो. याचा परिणाम इतका झाला की एका बाजूला अमेरिका- भारत व्यापार परिषदेच्या लोकांनी त्यांच्या एका सभेत नमूद केले की, ‘भारतासोबत करार व्हायला हवा, पण तेथे काकोडकर नावाचा ६०० पौंडांचा एक गोरिला बसला आहे तो काही ऐकत नाही. पण त्याने जे काही मुद्दे मांडले आहेत ते योग्यही आहेत,’ तर दुसऱ्या बाजूला देशातील प्रसारमाध्यमांनी अणू ऊर्जा विभाग सरकारच्या अखत्यारीत आहे की सरकार चालवते अशी टीकेची झोडही उठवली. पण देशहित अबाधित राखत हा करार झाला. यामुळे आपल्याला युरेनियम मुबलक प्रमाणात उपलब्ध होऊ लागला. देशाचा तीनस्तरीय कार्यक्रम थोरियमपासून वीजनिर्मिती करण्यापर्यंत घेऊन जातो. त्या दिशने आपले काम सध्या सुरू आहे. ते तसेच सुरू राहिल्यास आपण अणू ऊर्जानिर्मितीच्या माध्यमातून ऊर्जा स्वातंत्र्य मिळवू शकतो.
अण्वस्त्र चाचणीतील सहभाग
अणू ऊर्जा ही एक विद्याशाखा आहे. त्याचा उपयोग विविध क्षेत्रासाठी केला जाऊ शकतो. कृषी, कर्करोगावर उपचार अशा क्षेत्रापासून ते संरक्षणापर्यंत अनेक क्षेत्रात अणु-शक्ती मोठी भूमिका बजावू शकते. आपले शेजारी देश चीन आणि पाकिस्तान यांचे मत्रीचे संबंध आणि त्यांची अण्वस्त्रनिर्मितीची क्षमता लक्षात घेता आपणही अण्वस्त्रनिर्मिती करून जगाला आपण सक्षम असल्याचे दाखवायचे, यातून अणू चाचणीचा विषय पुढे आला. पहिली चाचणी १९७४ मध्ये शांततामय उपयोगांसाठी करण्यात आली. त्यानंतर १९९८ मध्ये चाचण्यांची दुसरी फेरी पार पडून भारत अण्वस्त्रधारी देश म्हणून पुढे आला. हे सर्व करताना आपण आपल्या आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्या व करार यांना कुठेही बाधा येऊ दिलेली नाही. या दोन्ही चाचण्यांच्या मुख्य फळीत काम करण्याची संधी मला मिळाली. त्यातही अनेक आव्हाने होती. त्या आव्हानांवर भारतीय वैज्ञानिकांनी मात केली आणि जगासमोर देशाची शक्ती दाखवली.
निवृत्तीनंतर
सेवेत असतानाच निवृत्तीनंतर काय करायचे यावर मी विचार करत होतो. त्यावेळेस मला प्रकर्षांने जाणवले की आपल्याकडे मूलभूत विज्ञानात काम करणारी व्यक्ती त्याचे तंत्रज्ञानात रूपांतर कसे होईल हे सहसा पाहत नाही; तर तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणारी व्यक्ती देशात काय संशोधन झाले आहे हे न पाहता परदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञान विकसित करत असते. तंत्रज्ञान विकासाच्या या प्रक्रियेला विरोध असण्याचे कारण नाही. पण आपण आपले संशोधन करून त्यावर आधारलेले तंत्रज्ञान त्वरितपणे विकसित केल्यास त्याचा फायदा अधिक होईल. तसेच उद्योग आणि तंत्रज्ञान विकासक यांच्यातही फारसा समन्वय दिसत नाही. उद्योगांकडून अनेकदा परदेशी तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जाते. यामुळे या सर्वाचा समन्वय घडवून आणण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे वाटू लागले. अणुशक्ती विभागात होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूटची स्थापना ही या दृष्टीने टाकलेले पहिले पाऊल. तसेच आयआयटी, एनआयटी व इतर संस्थांच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने विचार करण्याची संधी पण या दृष्टीने महत्त्वाची होती. सध्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या माध्यमातून शिक्षण पंढरी, सायन्स व इनोव्हेशन अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर्स, शिक्षण आणि विकास एकत्रितपणे पुढे नेणारे सिलेज, विद्यार्थ्यांना छोटय़ा कारखान्यांत काम करण्यासाठी पाठय़वृत्ती असे उपक्रम पण चालू आहेत. शिक्षणबरोबर विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला चालना मिळाली पाहिजे. चांगले मार्गदर्शन पण मिळाले पाहिजे. ज्ञान व अनुभवांच्या आधारावर समस्यापूर्ती करण्याची क्षमता व त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या संधींचा स्वत:च्या व इतरांच्या विकासासाठी उपयोग करण्याची धमक निर्माण होणे महत्त्वाचे आहे.
मला स्वत:ला वेगवेगळ्या टप्प्यांवर योग्य मार्गदर्शक मिळाले नसते तर कदाचित माझी दिशाही चुकली असती. यामुळेच विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार योग्य दिशा दाखविल्यास देशाच्या विकासात खऱ्या अर्थाने ते सहभागी होऊ शकतील.
डॉ. अनिल काकोडकर
शब्दांकन – नीरज पंडित

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctor anil kakodkar
First published on: 14-03-2015 at 01:01 IST