डॉ. विभूती पटेल

भारतातील स्त्री अभ्यासाला शैक्षणिक विषयात बदलणाऱ्या आणि स्त्री मुक्ती चळवळीची वचनबद्ध कार्यकर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. नीरा देसाई. त्यांनी स्त्रियांसाठी पहिली अभ्यास परिषद ‘एसएनडीटी’ विद्यापीठात भरवली. अनेक राज्यांतील ‘स्त्री अभ्यास केंद्रां’ना आधार दिला. उदारमतवादी मानवतावाद, गांधीप्रणीत व्यावहारिकता आणि मार्क्सवादी विचारसरणीमधून त्यांची सामाजिक न्यायाची कल्पना निर्माण झाली होती. त्यांच्या कार्याचा हा आढावा.

महाराष्ट्रातील स्त्रीमुक्ती चळवळीचे हे ५० वे सोनेरी वर्ष आहे आणि म्हणूनच भारतातील स्त्रीमुक्ती चळवळीची धुरा वाहणाऱ्या डॉ. नीरा देसाई ऊर्फ नीराबेन यांना आदरांजली वाहणं महत्त्वाचं आहे. गेल्या तीन पिढ्यांच्या स्त्री कार्यकर्त्यांना त्यांनी स्त्री अभ्यासाचं अमृत पाजलं आणि म्हणूनच त्यांना ‘स्त्री अभ्यासाची जननी’ असा किताब दिला जाणंही तितकंच स्वाभाविक आहे.

त्यांचा जन्म एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबामध्ये झाला. या कुटुंबाने स्वातंत्र्य चळवळीमध्ये हिरिरीनं भाग घेतला होता. शाळेत असतानाच उषा मेहता या स्वातंत्र्य चळवळीतील खंद्या कार्यकर्तीचा सहवास त्यांना लाभला होता. (उषा मेहता यांनी गुप्त पद्धतीने ‘भारताचा आवाज’ हे रेडिओ स्टेशन चालवलं होतं.) नीरा देसाई महात्मा गांधीजींबरोबर, ‘मंकी ब्रिगेड’ किंवा ‘माकडसेने’मध्ये सामीलही झाल्या होत्या. महाविद्यालयात असताना १९४२च्या ‘चले जाव चळवळी’मध्ये त्या अनेकदा पकडल्याही गेल्या होत्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळामध्ये त्यांनी एम.ए. केलं. तोपर्यंत त्या समाजवादी विचारांकडे आकर्षित झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या पीएच.डी.च्या अभ्यासामध्ये समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र या विषयांचा आधार घेऊन भारताच्या इतिहासामध्ये स्त्रियांची भूमिका काय राहिली याचा मागोवा त्यांनी घेतला. त्यावर आधारित Women In Modern India हे पुुस्तक १९५७ मध्ये प्रकाशित झालं. या पुस्तकाचं चांगलं स्वागत झालं कारण वैदिक काळापासून आधुनिक काळापर्यंत झालेल्या स्त्रियांच्या प्रवासाचा तो आराखडा होता. कमलादेवी चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये या विश्लेषणाला ‘स्त्रीवादी’ असं संबोधलं होतं. १९५० मध्ये नीरा देसाई यांनी जे निरीक्षण केलं होतं ते १९७०च्या दशकामध्ये प्रत्यक्षामध्ये येऊ घातलं होतं. याचा अर्थ त्या त्यांच्या काळाच्या फार पुढे होत्या.

विद्यार्थीदशेमध्ये त्यांच्यावर लॅटीन अमेरिकेतील दोन विचारवंत पावलो फ्रेअर आणि इव्हान एल्लिच यांचा प्रभाव पडला होता. अनुभवातून आलेले आणि जाणिवा उंचावलेले ज्ञान हा या दोघांच्या विचारप्रणालीचा भाग आहे. याचा वापर त्यांनी शिक्षणात करण्याचा प्रयत्न केला. १९७० नंतरच्या काळामध्ये सामाजिक चळवळीचा अभ्यास करताना त्यांनी स्त्रियांच्या हक्कांचा सातत्यानं पाठलाग केला.

त्यांची बौद्धिक कामगिरी तीन मुख्य विचारधारांवर आधारित होती. उदारमतवादी मानवतावाद, गांधीप्रणीत व्यावहारिकता आणि मार्क्सवादी विचारसरणीमधून निर्माण झालेली सामाजिक न्यायाची कल्पना.

नीरा देसाई या सौम्य स्वभावाच्या, मुलांची आवड असलेल्या, चिकित्सक, पण वितंडवाद न घालणाऱ्या, सावकाश, हळुवार बोलणाऱ्या आणि शेवटी स्वत:वर विनोद करत हसवणाऱ्या अशा होत्या. त्यांना एखादी संकल्पना आवडली तर त्या हिरिरीने दुसऱ्याला पटवून देत असत पण ते स्वत:चा मोठेपणा न दाखवता. त्या त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर व त्यांच्यासाठी काम करणाऱ्या लोकांबरोबर अतिशय सहृदयतेने वागत असत. त्या अतिशय आदरातिथ्य करणाऱ्या आणि स्नेहाळू होत्या. आपल्या मतांविषयी त्या नेहमीच ठाम असत. वरिष्ठांसमोर त्या आपली मतं निर्भीडपणे मांडत. त्यांनी स्त्री चळवळ व स्त्री अभ्यास यामध्ये नेहमीच पूल बांधले आहेत.

पहिली ‘स्त्रीवादी अभ्यास परिषद’ त्यांनी १९८१ मध्ये ‘एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठा’त भरवली. त्यांचं नेतृत्व प्रभावी होतं त्यामुळेच तज्ज्ञ मंडळी, शैक्षणिक क्षेत्रातील सहकारी, धोरणे आखणारे सरकारी अधिकारी आणि वेगवेगळ्या वैचारिक पार्श्वभूमी असणारे कार्यकर्ते यांची मोट त्या बांधू शकल्या. त्यांनी मोठ मोठ्या मोर्चांमध्ये सहभाग घेतला, परिषदांमध्ये आपल्या विषयांची मुद्देसूद मांडणी केली, विविध कार्यशाळांमध्येही कायम भाग घेतला. त्यासाठी कुणाचे निमंत्रणआले तर त्या नाकारत नसत.

माझा खासगी अनुभव असा आहे की, त्यांच्याबरोबर काम करणं खूप आनंददायक असे. आम्ही दोघींनी महिला वर्ष जाहीर झालं (१९७५) त्याला १० वर्षं झाल्याच्या निमित्ताने नैरोबीमध्ये जी ‘युनो’ची जागतिक परिषद झाली होती त्यासाठी भारताविषयीचा अहवाल तयार केला होता. स्त्रियांच्या हक्कांसंबंधी ज्या ज्या चर्चा या दहा वर्षांत घडून आल्या त्या अत्यंत बारकाईने आम्ही त्यामध्ये एकत्र केल्या होत्या. पुढे त्याचं पुस्तक झालं आणि ‘पॉप्युलर प्रकाशन’ने ते प्रसिद्ध केलं. त्याचं नाव होतं, ‘Indian Women: Change and Challenge’. त्याचप्रमाणे आम्ही दोघींनी मिळून १९४७ ते १९८८ या कालावधीतील भारतातील अनेक संशोधकाच्या अभ्यासांचे चिकित्सक पद्धतीने मूल्यांकन केलं. जवळजवळ ३ कपाटे भरून मजकूर आम्ही जमवला होता. त्यातून नवी चळवळ सुरू होईतोवर कोणत्या पद्धतीने स्त्री अभ्यास चालू होता याचा मागोवा आम्हाला घेता आला.

तीन महत्त्वाचे अहवाल तयार करण्यात डॉ. नीरा देसाई यांचा सहभाग होता. एकाचे नाव आहे,‘ ‘Towards Equality -1974’ दुसऱ्याचे नाव आहे ‘Shram Shakti Report 1988’, तिसऱ्याचे नाव आहे ‘National Perspective Plan for Women 1988-2000’. १९८५ मध्ये त्या ‘एसएनडीटी’तून निवृत्त झाल्या. त्यानंतर त्या अधिकच उत्साहाने काम करू लागल्या. पश्चिम भारतातील स्त्रीवादी कार्यकर्त्यांचा परिचय करून देण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी अंगावर घेतले. सुमारे १७ वर्ष त्यांनी असंख्य स्त्रीवादी कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्याचे एक पुस्तक तयार झाले. अनुभवांचे अतिशय काटेकोर विश्लेषण झाल्यामुळे या जाडजूड पुस्तकाला विद्वत्तेचे परिमाण लाभले आहे. त्याचे नाव आहे, ‘Feminism as Experience: Thoughts and Narratives,’ हे पुस्तक ‘स्पॅरो’ने २००७ मध्ये प्रसिद्ध केलं.

नीरा देसाईंच्या इंग्रजी आणि गुजराती लिखाणातला मुख्य विषय होता तो लिंगभाव आणि सबलता. वर्ग, जाती, वांशिकता या एकमेकांना भेद देणाऱ्या परिस्थितीतून येणारे असुरक्षित्व आणि सीमांतता. या सर्वांचा विचार करतच स्त्रीवादी विचारव्यूह तयार होऊ शकेल असे त्यांचे स्पष्ट मत होते. अनेक तरुण, विद्वान मुलींबरोबर त्यांनी प्रशिक्षण पुस्तिका तयार केल्या होत्या. ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी त्या अतिशय उपयुक्त ठरल्या होत्या. तीन पिढ्यांतील विद्वान स्त्रियांसाठी त्या मार्गदर्शक, तत्त्वचिंतक आणि मैत्रीण म्हणून जगल्या.

शेकडो तरुण संशोधक आणि कार्यकर्त्या स्त्रियांसाठी स्त्री अभ्यासासाठी समर्पितपणे काम करण्याची जिद्द त्यांनी निर्माण केली. स्त्री अभ्यासासाठी भरणाऱ्या देशव्यापी परिषदांमध्ये त्या सर्व तरुण विद्यार्थ्यांशी अतिशय आत्मीयतेने गप्पा मारत आणि त्यांनी विचारलं तर सल्लेही देत.

१९७४ मध्ये एस.एन.डी.टी. विद्यापीठामध्ये त्यांनी स्थापन केलेलं स्त्री अभ्यास संशोधन केंद्र हे इतर ठिकाणी नंतर निर्माण झालेल्या संशोधन केंद्रांसाठी आदर्श ठरलं. ‘युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट कमिशन’तर्फे अनेक विद्यापीठांमध्ये अशी केंद्रे स्थापन केली गेली. नीरा देसाई यांनी ग्रामीण विकासासाठीही केंद्र स्थापन केलं होतं. ‘SPARROW’ची स्थापना १९९० मध्ये झाली. त्यावेळीही त्यांनी खूप मदत केली होती. तसेच त्यांनी अनेक राज्यांतील ‘स्त्री अभ्यास केंद्रां’ना आधार दिला. एवढेच नव्हे तर ‘मानवी हक्क आणि कायदा’ या मुंबई येथे स्थापन झालेल्या केंद्रालाही आधार दिला.

प्रोफेसर नीरा देसाई आणि पती प्रोफेसर ए.आर.देसाई हे दोघे एकमेकांचे खऱ्या अर्थाने सोबती होते. त्यांच्या घराचे दरवाजे नव्या कल्पना, नवे विचार, नव्या मित्र मैत्रिणी, आणि अभ्यासक अशा सर्वांना खुले असत. त्यांच्या घरात जोरजोरात चर्चा रंगत. वादविवादाचे त्यांच्याकडे स्वागत असे. ते दोघे अभ्यास मंडळे चालवत असत. त्यामध्ये त्या त्या वेळी चर्चेत असलेले विषय ते आवर्जून मांडत आणि चर्चांना उत्तेजन देत. त्यापैकी खालील सहा विषय हे डॉ. नीरा देसाई यांचे खास आवडते होते.

समाजशास्त्रज्ञ म्हणून पितृसत्ता कशा तऱ्हेने रोजच्या जगण्यामध्ये दिसून येते. समाज स्तरावरील सर्वांत खालच्या पायरीवरील स्त्रिया दैनंदिन जगण्यामध्ये काय योगदान देत असतात. मौखिक इतिहास. त्यांना तो महत्त्वाचा वाटे. तसेच ज्यांच्या परिस्थितीचे विश्लेषण करायचे त्यांनी स्वत: त्यामध्ये भाग घ्यावा, असा त्यांचा आग्रह असायचा. सिद्धांत व त्याचा व्यावहारिक उपयोग यामध्ये जोडसंबंध असणं महत्त्वाचं आहे असं त्यांचं मत होतं. म्हणूनच ‘स्त्री अभ्यास’ व ‘स्त्री चळवळ’ ही बरोबरीने चालावी असं त्यांना नेहमीच वाटे.

आपली बौद्धिक चौकट व विचारव्यूह ही हळूहळू वासाहतिक विचारांपासून मुक्त होऊन भारतीय मातीमध्ये रुजावी असे त्यांचे प्रयत्न होते. स्त्री अभ्यास हा एक नवा शैक्षणिक विषय मानला जावा, त्याला प्रस्थापितांमध्ये मान्यता मिळावी असे त्यांचे प्रयत्न होते. त्यांनी स्त्री कार्यकर्त्यांबरोबर नेहमीच एकजूट दाखवली. वैचारिक बांधणीसाठी मदत केली. त्याच वेळी स्त्री हक्कांसाठी लढणाऱ्या संघटनांची सामूहिक बांधिलकी मान्य केली.

विचार आणि आचार, जो स्थानिक पातळीवरही असेल आणि वैश्विक पातळीवरही तेवढाच महत्त्वाचा असेल हे तत्त्व त्यांनी पाळलं. आमच्यासारख्यांना त्यांनी शैक्षणिक पातळीवर स्त्री अभ्यासाचा वापर करण्यासाठी तसेच चळवळीमध्येसुद्धा त्या तत्त्वांचा वापर करण्याची प्रेरणा दिली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आठवणीसाठी पुष्पा भावे या स्त्रीवादी प्राध्यापिकेने २३ सप्टेंबर २००९ला उद्घाटन केलेल्या ‘नीरा देसाई मेमोरिअल लायब्ररी’ची ‘स्पॅरो’ या संघटनेने केलेली स्थापना म्हणजे पुढच्या पिढीसाठी उघडे केलेले वैचारिक दालनच होतं.

अनुवाद छाया दातार
chhaya.datar1944@gmail.com