१८२९ मध्ये सती प्रथेविरोधात कायदा केला गेला तरीही स्त्रिया सती जातच होत्या. ४ सप्टेंबर १९८७ रोजी १८ वर्षांची रूपकंवर सती गेल्याची बातमी आली आणि विविध स्त्री संघटना या प्रथेच्या विरोधात उतरल्या. देशव्यापी आंदोलन झाले आणि त्याच वर्षी या प्रथेविरुद्ध फाशी व जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. २००० सालानंतर एकही स्त्री सती गेली नसली तरी आजही देशातील सती मंदिरात होणारे उत्सव सुरूच आहेत. त्यासाठी गरज आहे ती पितृसत्ताक धारणा बदलण्याची!
१९८०च्या दशकात ‘हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है’ ही स्त्री चळवळीची आवडती घोषणा बनली होती. बिहारच्या कामगार चळवळीतून ही घोषणा देशभर पसरली. आजही अंगणवाडी कर्मचारी, शेतकरी स्त्रियांच्या चळवळीत ही घोषणा दिली जाते. मी या घोषणेत बदल करून, ‘हम भारत की नारी है, फुल और चिंगारी है’, अशी देते. स्त्री चळवळीतील भाकरी आणि गुलाबाच्या संघर्षाशी जोडते.
तर झाले असे की, १९८२ मध्ये ‘राणी सती सर्व संघ’ या संघटनेमार्फत राजस्थान आणि दिल्लीत सती मंदिरे उभी करण्यासाठी निधी संकलनाचे काम सुरू होते. १९८३मध्ये संघटनेने दिल्लीत भव्य मंदिर बांधण्यासाठी सरकारकडून परवानगी मिळवली होती. त्यानंतर निघालेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येने स्त्री-पुरुष सहभागी झाले होते. दिल्लीतील स्त्री संघटनांनी सती प्रथा समर्थनार्थ निघालेल्या या मिरवणुकीच्या विरोधात निदर्शने केली. त्या वेळी समर्थनाच्या मिरवणुकीत सहभागी स्त्रियांनी ‘हिंदू व त्यातही स्त्री असल्याने त्यांना सती होण्याचा, सती पूजेच्या व सती प्रथा समर्थनाचा अधिकार मिळायला हवा,’ अशी भूमिका जाहीर केली. मिरवणुकीतील स्त्रिया ‘हम भारत की नारी है, फुल नही चिंगारी है’ ही घोषणा देत होत्या. स्त्री संघटना हतबल व निराश झाल्या. त्यांचीच घोषणा त्यांच्या विरोधात वापरली जात होती.
सती प्रथेच्या समर्थनार्थ सुरू झालेल्या या अभियानाने स्त्रीवादी संघटनांना अस्वस्थ केले. स्त्री संघटनांनी सतीची अस्मिता, सतीची मंदिरे तसेच सतीधर्म प्रचारकांच्या भूमिकेविषयी संशोधन आणि अभ्यास करण्याचा संकल्प केला. सती प्रथेच्या विरोधात कृतीचा निर्णय घेतला. राजस्थानातील राजपूत समाजात संस्कृती आणि परंपरेच्या नावाने सती प्रथेचे अवशेष शिल्लक होते. अधूनमधून सती जाण्याच्या घटनाही घडत होत्या. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर विवाहितेने सती जाण्याच्या घटनांपैकी तीन चतुर्थांश घटना राजस्थानमध्ये घडल्या होत्या.
आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांचे नाव सती प्रथा निर्मूलनाशी जोडले गेलेले आहे. बंगालमध्ये सती प्रथेच्या नावाने स्त्रियांना जिवंत जाळले जात होते. राजा राममोहन रॉय यांनी जातिप्रथा, हुंडा, बालविवाह आणि सती प्रथेला विरोध केला. व्यक्तिगत जीवनातील एका घटनेने त्यांना सती प्रथाविरोधातील संघर्ष तीव्र करण्याची प्रेरणा दिली. ते परदेशात गेलेले असताना त्यांच्या भावाचा मृत्यू झाला. त्यांची भावजय सती गेली. राजा राममोहन रॉय यांना भावजयीच्या अशा मृत्यूचा धक्का बसला. अशी क्रूर घटना देशातील अन्य भगिनींच्या बाबतीत घडू नये म्हणून संघर्ष करण्याचा त्यांनी संकल्प केला. सती प्रथा बंदीसाठी सातत्याने आंदोलन व समाज प्रबोधन केले. सती जाणे, जायला लावणे बेकायदा ठरवून दंडनीय अपराध मानण्यात यावे अशी मागणी इंग्रज सरकारकडे केली. सनातनी मंडळी त्यांच्या विरोधात उभी राहिली. त्यांच्यावर प्राणघातक हल्लाही झाला. सती प्रथा समर्थकांनी इंग्लंडमधील संसदेकडे आमच्या धर्मात हस्तक्षेप नको अशी मागणी केली. राजा राममोहन रॉय यांनी सुधारक मित्रांसह ब्रिटिश संसदेसमोर आपले म्हणणे मांडले. ब्रिटिश संसदेने त्यांची मागणी मान्य केली. ४ डिसेंबर १८२९ रोजी लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या पुढाकाराने संपूर्ण देशभर सती प्रथा बेकायदेशीर ठरवण्यात आली.
महात्मा फुले, लोकहितवादी गोपाळराव देशमुख, ताराबाई शिंदे आणि महात्मा गांधींनी सती प्रथेला विरोध केला होता. सती प्रथा बंदीचा कायदा झाल्यानंतरही या दुष्ट प्रथेचा गौरव सुरूच होता. विसाव्या शतकातही सतीच्या घटना घडत होत्या. भारतात दरवर्षी एक तरी सतीची घटना घडते असे मानले जात होते. १९४३ ते १९८७ या काळात ३० घटना घडल्याची माहिती मिळते.
सती प्रथा बंदी कायद्याला १५८ वर्षं झाल्यानंतर ४ सप्टेंबर १९८७ रोजी राजस्थानातील सीकर जिल्ह्यातील देवराला गावातील १८ वर्षांची रूपकंवर सती गेल्याची बातमी आली. या घटनेने पूर्ण देश हादरला. रूपकंवरचे आठ महिन्यांपूर्वी मानसिंहशी लग्न झाले होते. पती निधनानंतर त्याच्या चितेवरील अग्नीत जळून रूपकंवरचा मृत्यू झाला. राजपूत समाज आणि देवराला गावकऱ्यांच्या मते ती आपल्या मर्जीने सती गेली. पोलीस तपासात मात्र ती तिच्या मर्जीने नाही तर तिच्यावर दबाव टाकल्याने सती गेली ही बाब पुढे आली.
राजपूत समाजाने रूपकंवरला ‘सती माता’ घोषित केले. देवराला गावात ‘चुनरी महोत्सव’ आयोजित करण्यात आला. जयपूरमधील स्त्री संघटनांच्या आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी राजस्थान उच्च न्यायालयाला पत्र पाठवून ‘चुनरी महोत्सव’ रोखण्याची विनंती केली. या पत्राला जनहित याचिका मानून असा महोत्सव सती प्रथेचा गौरव आहे असे म्हणत न्यायमूर्तींनी स्थगिती दिली. १४ सप्टेंबरला जयपूर शहरातील शेकडो स्त्रियांसह मोर्चा काढून स्त्री संघटनांनी ‘चुनरी महोत्सव’ आणि ‘सती प्रथे’ला विरोध केला. न्यायालयाने स्थगिती आदेश देऊनही १५ सप्टेंबरला सकाळी आठ वाजताच ‘चुनरी महोत्सव’ झाला. त्यात हजारो लोक आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती. देशभर सती प्रथेच्या विरोधात स्त्रियांच्या संघटनांनी आंदोलन केले. मुंबईत मृणाल गोरे यांच्या पुढाकाराने झालेल्या सती प्रथाविरोधी सभेत महाराष्ट्रातील प्रमुख स्त्रीवादी कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या.
जगभरातील माध्यमांचे रूपकंवर सती प्रकरणाकडे लक्ष होते. सर्वत्र टीका होत होती. राजस्थान सरकारने गृहमंत्री गुलाब सिंह शेखावत यांच्या अध्यक्षतेत या विषयावर समिती नेमली. १ ऑक्टोबर १९८७ रोजी सती प्रथा निर्मूलनासाठी आणि गौरवीकरणाविरोधी अध्यादेश जारी केला. कोणाही स्त्रीला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सती होण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांना फाशी व जन्मठेपेच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. सती प्रथेचे गौरवीकरण करणाऱ्यांना सात वर्षांची शिक्षा आणि ३० हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली. राज्यपाल वसंतदादा पाटील यांनी अध्यादेशाला मंजुरी दिली. त्याचे कायद्यात रूपांतर झाले. केंद्र सरकारने या कायद्याला संपूर्ण देशासाठी कायदा म्हणून मान्यता दिली.
‘वायर’, वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार राजस्थानात १९८७ मध्ये १३, १९८८ मध्ये ७, १९८९ मध्ये २, १९९३ मध्ये १, आणि २००० मध्ये १ याप्रमाणे २४ गुन्हे नोंदवले गेले. मात्र रूपकंवर ही सती प्रथेमुळे मृत्यू झालेली शेवटची स्त्री होती. वरील घटनांमधील स्त्रियांनी सती जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आणि प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप करत त्यांचा जीव वाचवला. वरिष्ठ पत्रकार जितेंद्रसिंह शेखावत यांच्या मते, ‘राजपूत समाजासाठी सती जाणे ही उचित परंपरा होती. परंतु आधुनिक समाजात अशा घटनांना विरोध होणारच होता. या प्रथेच्या विरोधात मोठे आंदोलन झाले. डाव्या आणि प्रगतिशील संघटनांच्या नेत्यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.’
‘बॉम्बे युनियन ऑफ जर्नालिस्ट’ने स्त्री कार्यकर्त्या आणि पत्रकारांची ‘फॅक्ट फाइंडिंग टीम’ तयार केली. या गटाने ४० पानांचा अहवाल तयार करून घटनेचे तपशील जाहीर केले. त्यात लग्नानंतर रूपकंवर केवळ २० दिवस नवऱ्यासह एकत्र राहिली होती असे निदर्शनास आले. ‘रूपकंवर सती प्रकरणा’तील सर्वात दु:खद बाब म्हणजे तिच्या माहेरच्या मंडळींना तिचे सती जाणे अजिबात खटकले नाही. त्यांना आपल्या तरुण मुलीच्या जिवंत राहण्यापेक्षा राजपूत परंपरेचा वृथा अभिमान महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा वाटला. तिच्या सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्याऐवजी तेही सती गौरवाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. आपली मुलगी ‘सती माता’ झाली याचे कौतुक करू लागले. तिचा भाऊ गोपाल सिंहला सती प्रथाविरोधी झालेला कायदाच मान्य नाही. स्त्री संघटनांच्या कार्यकर्त्यांना याच्या प्रचंड वेदना झाल्या. रूपकंवरला मरणोत्तर न्याय मिळावा तसेच पुन्हा दुसरी रूपकंवर घडू नये म्हणून प्रखर आंदोलनाचा निर्णय संघटनांनी घेतला.
स्त्रीवादी संघटनांनी जयपूर व दिल्ली आंदोलनाचे केंद्र बनवले. दिल्लीत १५ स्त्री संघटनांनी एकत्र येऊन ‘संयुक्त कारवाई फोरम- सतीविरोधी संघर्ष मंच’ स्थापन केला. दिल्ली शहरात निघालेल्या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी सहभागी झाले होते. दिल्लीच्या ‘सबला महिला संघटने’ने सती प्रथेविरुद्ध केलेल्या नाटकाला जनतेचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
स्वामी अग्निवेश यांनी सती प्रथा हिंदू धर्माचा भाग नाही. ती नष्ट व्हायला हवी, अशी भूमिका घेतली. त्यांनी देवराला गावात जाऊन धरणे धरले. तसेच त्यांनी वाराणसी आणि जगन्नाथ पुरीच्या मंदिरातील पुजाऱ्यांना सती प्रथेच्या शास्त्रसंमत चर्चेचे आव्हान दिले. त्यांचे आव्हान ठोकरण्यात आले. ओरिसामध्ये १० हजार स्त्री-पुरुषांनी जगन्नाथ पुरीच्या मुख्य पुजाऱ्याला घेराव घातला. चर्चेचे आव्हान दिले. त्यांना उत्तर मिळाले नाही. सती प्रथा समर्थकांची चर्चेची तयारी नव्हती.
१९८७ ते ८८ या वर्षात अनेक ठिकाणी सती प्रथाविरोधी आंदोलने झाली. राजस्थानमधील ग्रामीण भागातील स्त्रियांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन रूपकंवरच्या मृत्यूचे गौरवीकरण करणे, तिच्या मृत्यूबाबत सरकारची निष्क्रियता आणि सती प्रथेविरोधात ठिकठिकाणी निदर्शने केली. आंदोलनामुळे राज्य आणि केंद्र सरकारला भूमिका घ्यावी लागली.
सामाजिक कार्यकर्त्या, महिला आलेखन आणि संदर्भ केंद्राच्या सचिव ममता जैतली यांनी या विषयावर, रूपकंवर ‘देहदहन से अदालत तक’, हे पुस्तक लिहिले. त्यात घटनांचा विस्तृत आढावा घेतला. ममता यांच्या मते, रुपकंवर सती प्रकरणानंतर धर्म, राजनीती आणि पितृसत्तेचे एकत्रीकरण पुढे आले. राजसत्ता पुरुषप्रधान मानसिकतेने ग्रासलेली आहे. त्यामुळे राजसत्तेचे समर्थन या समूहाला मिळाले.
रूपकंवरला सती जाऊन ३८ वर्षं झाली आहेत. १९८७ ते २००० पर्यंत सती जाण्याच्या घटना कमी होत गेल्या. २०००नंतर एकही अशी घटना समोर आलेली नाही. हे स्त्रियांच्या चळवळीचे यश आहे. अखेर, ‘हम भारत की नारी है, फुल और चिंगारी है’ ही घोषणा भारतीय स्त्रियांसाठी परिवर्तनाची दिशा व प्रेरणा देणारी आहे.
सती प्रथेचे गौरवीकरण मात्र अद्याप थांबलेले नाही. देशातील सती मंदिरात होणारे उत्सव सुरूच आहेत. कायद्याबरोबरच समाजातील पितृसत्ताक धारणा बदलण्याची गरज आहे. ते सतत करायला पर्याय नाही. सध्याच्या सांप्रदायिक पितृसत्ताक राजकारणाच्या काळात स्त्रियांच्या चळवळीपुढे हे मोठे आव्हान आहे.
advnishashiurkar@gmail.com