सु ’ जा ’ ण ’ पा ’ ल ’ क ’ त्व
देहबोलीतून भावना व्यक्त होत असतात. शिक्षकाचा साधा हसरा चेहराही वातावरणात बदल घडवून आणू शकतो. हसरे, विनोद सांगणारे, जोरात न रागावणारे शिक्षक मुलांना आवडतात. गोष्टी सांगणारे शिक्षक लोकप्रिय असतात, याचं कारण हेच आहे. गोष्टींमध्ये भावना असतात. त्या रूक्ष अभ्यासामध्ये नसतात. त्यातली रूक्षता काढून अभ्यासही रंजक करणारे शिक्षक सर्व शाळांमध्ये असतात. तेच लोकप्रिय असतात.
मेंदू हा सतत जागं राहून आपली कामं चोख पार पाडणारा अवयव. या मेंदूला विश्रांतीची गरज असते. तशीच त्याला चलाख, तरतरीत ठेवण्याचीही गरज असते. त्यासाठी मेंदूपूरक कृती अवश्य कराव्यात.
१. पूर्ण झोपेचं महत्त्व मेंदूवरील संशोधनातून आता सिद्ध झालेलं आहे. पूर्ण झोपेची गरज सगळ्यांनाच असते. झोप कमी झाली तर एकूणच हालचालींवर परिणाम होतो. कारण मुळात मेंदूच्या एकाग्रतेवर परिणाम झालेला असतो. जिम हॉर्न आणि युवेन हॅरिसन या मानसशास्त्रज्ञांनी प्रयोग केला. त्यात एका गटाला जागरण करायला लावलं व काही प्रश्न विचारले. तेव्हा आढळून आलं की सर्जनशील विचार, निर्णयक्षमता आणि मिळालेली नवी माहिती स्वीकारणं यात अडचणी आल्या.
पूर्ण झोप ही मानसिक आरोग्यासाठी अतिशय आवश्यक असते. कारण झोपेतदेखील मेंदूचं काम थांबत नाही. ते चालूच असतं. उलट झोपेच्या अवस्थेत मेंदूत अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी घडत असतात. या घडामोडी शिक्षणाला मदत करत असतात, असे संशोधन पिअरे मॅक्वेट यांनी लंडन विद्यापीठात केले आहे.
आधुनिक मेंदूसंशोधनातून असं दाखवता येतं की प्रत्येक कृती करण्यासाठी मेंदूत एक विशिष्ट कार्यक्षेत्र असतं. भाषा आकलनाचं काम एका क्षेत्रात चालतं, तर गणिताचं काम एका क्षेत्रात चालतं. सर्जनशील कृतीचं कार्यक्षेत्र वेगळंच असतं, तर भावभावनांशी संबंधित अनुभव वेगळ्या क्षेत्रात सांभाळले जातात. या प्रयोगात त्यांनी एका गटाला अतिशय गुंतागुंतीचं प्रशिक्षण देऊ केलं. हा गट दिवसभर त्याच कामात गुंतला होता. हे सर्व जेव्हा रात्री झोपले, तेव्हा त्यांनी त्यांच्या मेंदूचं स्कॅिनग केलं. हे स्कॅनिंग (REM sleep- rapid eye movement) या अवस्थेत केलं. संशोधनात असं आढळलं की दिवसभर केलेलं काम मेंदूच्या ज्या कार्यक्षेत्रात घडलं होतं, तीच क्षेत्रं झोपेतही उद्दिपित होती. याचा अर्थ असा की दिवसभर जी माहिती मेंदूला मिळाली होती, त्यावर शांतपणे काम चालू होतं. पूर्ण झोपेनंतर दुसऱ्या दिवशी या सर्व गटाचा उत्साह टिकलेला होता. त्यांना आदल्या दिवशीचं सर्व लक्षात होतं. झोपेच्या काळात, जे काही शिकलं आहे, त्यावर प्रक्रिया झालेली असते. त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीही चांगली असते.  
चांगलं शिकायचं तर त्यासाठी झोपही चांगली हवीच.
२. लहान मुलांनी आनंदात शिकलं पाहिजे. मुलांना मारा, रागवा आणि शिकवा असं कोणीही म्हणत नाही.
शिकण्याच्या एकेक अनुभवात आनंद असायला काय हरकत आहे? हे अनुभव चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. शिक्षकांनी दिलेली शाबासकी, शाळेच्या काचफलकात लावलेला निबंध, मुद्दाम घेतलेलं नाव या जाणिवा सुखद असतात. स्वत:च्या प्रयत्नाने जमलेलं गणित, उत्तम काढलेलं चित्र, चटकन पाठ झालेली कविता याचा आनंद होतो. या आनंदाचे अनुभव व्हायला हवेत. अशा आनंदी भावना जोडलेल्या असल्या की लक्ष आपोआप लागतं. लक्ष दिलं की लक्षातही राहतं. त्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही.
३. बालवाडी- पहिल्या-दुसरीतल्या मुलांना शिक्षकांच्या जवळ जायला, त्यांना स्पर्श करायला आवडतो. ही त्यांची प्रेमाची भावना असते. ती त्यांना व्यक्त करायची असते. त्यामुळे या वर्गात मुलं शिक्षकांच्या आसपास घुटमळताना दिसतात. मोठय़ा वर्गामध्ये असं दृश्य दिसत नाही. देहबोलीतून भावना व्यक्त होत असतात. शिक्षकाचा साधा हसरा चेहराही वातावरणात बदल घडवून आणू शकतो. हसरे, विनोद सांगणारे, जोरात न रागावणारे शिक्षक मुलांना आवडतात. गोष्टी सांगणारे शिक्षक लोकप्रिय असतात, याचं कारण हेच आहे. गोष्टींमध्ये भावना असतात. त्या रूक्ष अभ्यासामध्ये नसतात. त्यातली रूक्षता काढून टाकून असा अभ्यासही रंजक करणारे शिक्षक सर्व शाळांमध्ये असतात. तेच लोकप्रिय असतात.
भावना ही माणसाला मिळालेली एक वेगळ्या प्रकारची देणगी आहे. भावनांमध्ये गुंतली तरी बुद्धी योग्य प्रकारचे निर्णय घेऊ शकते. त्यालाच भावनिक बुद्धिमत्ता असं म्हणतात. ती जोपासण्यासाठी योग्य वेळी भावना व्यक्त करणं, त्या थोपवणं हे ही तितकंच महत्त्वाचं असतं.
४. आपल्या मेंदूला सातत्याने आवश्यकता असते ती प्राणवायूची, ग्लुकोजची आणि पाण्याची. प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन. वास्तविक ऑक्सिजनची गरज आपल्या संपूर्ण शरीरालाच असते. बघायला गेलं तर मेंदूचं वजन आपल्या एकूण शरीराच्या केवळ दोन टक्के असतं. मात्र संपूर्ण शरीराला जेवढा प्राणवायू लागतो त्यापकी २० टक्के प्राणवायू एकटय़ा मेंदूला लागत असतो. आपल्या मेंदूच्या कामाचा प्रचंड वेग यावरून लक्षात येईल. चालणं, पळणं, व्यायाम करणं यातून हा प्राणवायू मेंदूला पोचत असतो.
५. मेंदू सजग ठेवायचा असेल तर पाणी हवंच. पाण्याची कमतरता भासली तर त्याचा गंभीर परिणाम शिकण्याच्या प्रक्रियेवर होत असतो. जर व्यवस्थित पाणी प्यायलं तर त्याचा खूपच चांगला परिणाम एकाग्रता आणि स्मरणशक्तीवर होत असतो, असं मेंदूचे अभ्यासक मांडतात. अभ्यास करताना तसंच कोणतंही बौद्धिक काम करताना थोडं थोडं पाणी प्यायलं तर ते बुद्धीला आलेली मरगळ घालवतं.
६. ग्लुकोजची मेंदूला नितांत गरज असते. ग्लुकोज मुख्यत: मिळतं ते आहारातून. आहारातून मिळणारी ऊर्जा रक्तात मिसळली जाते आणि तिथून ती मेंदूकडे रवाना होते. कोणत्या प्रकारचा आहार बुद्धीसाठी पोषक असतो, यावर अनेक प्रकारची संशोधनं झाली आहेत आणि चाललेली आहेत. या संदर्भात आपल्या आयुर्वेदात अनेक रसायनं सुचवलेली आहेत. अशी सर्व उपाययोजना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने करावी.
पाश्चात्त्य देशात या विषयावर सखोल संशोधन चालू आहे. त्यातून असं दिसतं की, ओमेगा-३ आणि ओमेगा-६ ही मेदाम्लं ज्या पदार्थामध्ये आहेत, ते पदार्थ आहारात असणं चांगलं. त्या दृष्टीने कारळं, जवस यांसारख्या तेलबिया आणि अक्रोड आहारात असणं आवश्यक आहे. याशिवाय अंडी, दूध-दुभत्यांचे पदार्थ, केळं, सूर्यफुलाच्या बिया, चीज, मासे, चिकन, रेड मीट यातही असतं. वास्तविक शाकाहारी असणाऱ्यांनी सकस आहारावर भर दिला पाहिजे. आहारात शक्य तेवढी विविधता आणली पाहिजे.
७. एखादी नवी गोष्ट शिकायची तर लहान मुलं ती पटकन शिकतात, पण प्रौढ मेंदूला त्यासाठी वेळ जास्त लागतोच, तसंच सरावही जास्त लागतो आणि शिकलेलं विसरून जाण्याची शक्यताही जास्त असते. मात्र जर संपूर्ण लक्ष देऊन, ठरवून मेहनत केली तर प्रौढ ते शिकून घेऊ शकतो. कारण पेशीनिर्मितीचा वेग मंदावलेला असला तरी पेशींना सतत चालनाही लागतेच आणि म्हणूनच प्रौढ मेंदूही आव्हानांच्या शोधात असतो.
मेंदूला आव्हानात्मक काम देत गेलं तर तो सतत तरतरीत राहतो. मुलं निसर्गत:च वेगवेगळी आव्हानं शोधत असतात. कारण त्यांना सतत शिकत राहायला आवडतं. मेंदूची मागणी पूर्ण करण्याच्या कामात ते सततच असतात. जर मेंदूशास्त्रीय दृष्टय़ा ही गोष्ट सिद्ध झालेली असेल तर आपली मुलं बऱ्याचदा कंटाळलेली का असतात? अभ्यास करायला कायमच नकार का असतो?
याचं कारण आपल्या अभ्यासपद्धतीत सापडतं. पुस्तकात लिहिलेलं वहीत उतरवणं, प्रश्नांची उत्तरं पुन्हा लिहिणं, पाठ करून लिहिणं, वही उतरवून काढणं, पुन्हा पुन्हा परीक्षा देणं यात शून्य आव्हान आहे. अभ्यासाचा विषय एकदा समजून घेणं म्हणजे नवा विषय आत्मसात करणं यात मेंदूला आव्हान मिळतं. पण त्याचं पुन्हा पुन्हा सादरीकरण करण्यातून नवी पेशीनिर्मिती होत नाही. अभ्यास पक्का होण्याचं काम यातून काही प्रमाणात होतं. पण पुढे त्यांचा चांगलाच कंटाळा येतो. म्हणून मुलं कंटाळतात. अभ्यास हा आव्हानांशी- वेगवेगळ्या उपक्रमांशी जोडला गेला तरच त्यांना त्यातून नक्कीच आनंद मिळेल. मग हे उपक्रम अवघड असतील तरी त्यात त्यांना आनंदच मिळेल. उत्क्रांतीच्या काळात माणसाचा मेंदू अधिकाधिक तत्पर- चलाख होत गेला. त्याला तसंच ठेवायचं असेल तर जाणीवपूर्वक दिनचय्रेत बदल करावा लागेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व कट्टा मुलांचा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Essential requirements to boost your childs brain
First published on: 18-05-2013 at 01:01 IST