सुहास सरदेशमुख/चारुशीला कुलकर्णी

घरातल्या मोठय़ा माणसांच्या मनात मुलीचं लग्न करून द्यायचा विचार कधी येईल काय माहीत! तो विचार आला आणि त्याच वेळी एखादं स्थळ चालून आलं, तर झालं तेवढंच आपलं शिक्षण आणि झाले तेवढेच स्पर्धा परीक्षेसाठीचे प्रयत्न, हे कन्नड तालुक्यातल्या हसनखेडय़ातून आलेल्या प्रिया मस्केला पक्कं ठाऊक आहे.

Denial of child custody on charges of adultery is wrong
व्याभिचाराच्या आरोपास्तव अपत्याचा ताबा नाकारणे चुकीचे
Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
jitendra awhad ajit pawar l
“नशीब त्यांनी डॉक्टरांना विषाचं इंजेक्शन…”, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांचा टोला
Womens health It is need to understand mentality of pregnant women
स्त्री आरोग्य : काय असतं गर्भवतीच्या मनात?

वडिलांची केवळ तीन एकर शेती. कापूस आणि मका पेरणारा, कोरडवाहू शेती करणारा आपला बाप शेतीत राबून आपल्याला शहरात शिकायला पैसे पाठवतो याचं भान गाठीशी घेऊन आलेली प्रिया छत्रपती संभाजीनगरमध्ये आली. शहरात राहिली, तरी शहरी वारं आपल्याला लावून घ्यायचं नाही, या मनोभूमिकेतून आलेलं तिचं राहणीमान. आता ती विज्ञान शाखेच्या दुसऱ्या वर्षांत शिकते. घरी आई, भाऊ, आजी असा परिवार. समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात प्रिया राहते. त्यामुळे मोफत राहण्याची आणि दोन वेळच्या जेवणाची सोय झाली. पण महाविद्यालय बंद झालं, की महिन्याला पाच हजार रुपये लागतात आणि मग गावी वडिलांची होणारी आर्थिक ओढाताण आठवून जरा मान मोडूनच ती अभ्यास करते. प्रश्न स्पर्धा परीक्षेचा, अभ्यासाचा नाही, पण या परीक्षेत अपयश आल्यानंतर गावातील लोक, शेजारी वडिलांना काय बोल लावतील अशी तिची खरी चिंता आहे. ‘एवढे दिवस मुलीला शहरात ठेवून काय शिकली?’ या बोचणाऱ्या प्रश्नाला वडील काय उत्तर देतील? याचा ताण प्रियाला अधिक असतो. त्यामुळे तिला माहिती आहे, की पदवी मिळाल्यानंतर फार तर दोन वर्ष एवढाच आपला स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होण्याचा कालावधी आहे. त्यामुळे अभ्यासाची तयारीही तेवढय़ाच कालावधीत करायची, असं नियोजन.

दीपाली वाळके आणि वैष्णवी गायकी या दोघी मावस बहिणी. वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यात असलेल्या जनता महाविद्यालयातून ‘बी.ए.’पर्यंत शिकलेल्या. दोघींचे वडील शेतकरी. एकीला दुसरीची सोबत होईल, म्हणून स्वतंत्र खोली करून पुढच्या शिक्षणाला परवानगी मिळालेली. एका बाजूला शिक्षण सुरू असतानाच स्पर्धा परीक्षाचा शिकवणी वर्ग करावा लागतो, तरच काही तरी भविष्य घडेल, असं वाटून अभ्यास करणाऱ्या या दोघी. तीन हजार रुपये खोलीचं भाडं. घरातच स्वयंपाक करून स्पर्धा परीक्षेचे क्लास करायला रोज दोन किलोमीटर चालत येतात आणि जातात. दर महिन्याला कुणी तरी घरून किराणा किंवा धान्य पाठवतं. तरी सहा हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो. याशिवाय प्रत्येकीचं स्पर्धा परीक्षेसाठीच्या क्लासचं शुल्क ३५ हजार रुपये भरलेलं.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणारी बहुसंख्य मुलं ही सरासरी गुणवत्तेची. त्यामुळे मान मोडून आता अभ्यास केला नाही, तर भविष्यात काही मिळणार नाही, हे माहीत असणारी. दीपाली आणि वैष्णवी याच मानसिकतेच्या. ग्रामीण जीवन माहीत असणाऱ्या. शिक्षणाची मुभा मिळालेल्या, पण काय केलं तर भविष्य चांगलं घडेल याचा अंदाज घेत चाचपडणं सुरू असतानाचा जेवढा आत्मविश्वास असतो, तेवढाच या दोघींच्या अंगी आहे. आपल्याला मुलांपेक्षा जास्त अभ्यास करावा लागणार, हे त्यांच्या मनात ठसलेलं आहे. कारण स्वयंपाकात आणि येण्या-जाण्यात वेळ जातोय ते त्यांना दिसतंय. तो भरून काढायचा आणि कमी कालावधीत ही परीक्षा उत्तीर्ण होण्याचा ताण मुलींना मुलांपेक्षा अधिक असतोच. नाहीच यश मिळालं, तर मुलींसाठी लग्न आणि मुलांसाठी शेती, असा प्रवास करत अनेक जण मग गावी परततात. हे चित्र पाहणाऱ्या या मुली अभ्यासात कमालीच्या सजग आहेत.
शहरात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या परीक्षेतील विविध पदांसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी शहरांत हजारो मुलं आलेली असतात. त्यात मुलींच्या अडचणी वेगळय़ा. सुरक्षितता, हा एक मुद्दा असला, तरी त्यावर आता आपल्या मुलीला मात करता येते आहे, याचा आत्मविश्वास आता ग्रामीण भागातील पालकांकडे आला आहे. एखाद्या वेळी जीन्स पॅण्ट, टी-शर्ट घालून जरी मुलगी क्लासला गेली, तरी त्याला आता परवानगी मिळू लागली आहे. पण वेशभूषेतील, केशरचनेतील मुभा देताना एकच अट असते- ‘जेव्हा आम्ही सांगू तेव्हा लग्नाला नाही म्हणायचं नाही!’
शहरातील बहुसंख्य मुली आता संगणकाच्या वेगवेगळय़ा अभ्यासक्रमांच्या वर्गात दिसतात आणि ग्रामीण भागातून आलेल्या मुली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या शिकवणी वर्गातून दिसून येतात. एखाद्या वर्गात ५० मुलं असतील आणि त्यात २० मुली असतील तर त्यातल्या किमान १० जणी विवाहित असतात. करोनानंतर हे प्रमाण वाढलं असल्याचं शिकवणी वर्गाचे चालक सांगतात.

आपल्या स्पर्धा परीक्षेला घरच्यांचा विरोध नाही, पण पाठिंबाही नाही, असं सांगत नाशिकची ज्योती देव आपले अनुभव सांगते, ‘‘मला शिक्षणाची आवड असल्यानं दोन ‘बी.ए.’, दोनदा ‘एम.ए.’ पदव्या प्राप्त केल्या आहेत. ‘बी.एड.’ केलं आहे. तेव्हापासूनच स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू आहे. याच दरम्यान माझं लग्न झालं. आता मला आठ वर्षांचा मुलगा आणि पावणेदोन वर्षांची मुलगी आहे. लग्न झाल्यानंतर सासरच्यांनी माझ्या ‘एमपीएससी’ करण्याला विरोध दर्शवला नाही, पण कुणी पाठिंबाही दिला नाही. ‘तू ठरवलं आहेस, तुझं तू पाहा अशी त्यांची भूमिका असते.’ नोकरी, अभ्यास आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना माझी आई, बहिणी यांनी मदत केली. परीक्षेच्या काळात तरी मला सासरच्या मंडळींकडून मदत अपेक्षित होती, पण उलट तेव्हाच पाहुणे, कुणाचं आजारपण असं काही ना काही ना येत राहिलं. मुलांचा अभ्यास त्यांची आजारपणं सगळं सांभाळून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणं ही माझ्यासाठी तारेवरची कसरतच आहे.’’ पाहिजे तसा अभ्यास होत नाही, म्हणून आता ज्योती स्पर्धा परीक्षांपेक्षा ‘नेट-सेट’चीच तयारी प्राधान्यानं करत आहे. रात्री मुलं झोपल्यावर किंवा पहाटे लवकर उठून ती अभ्यासासाठी वेळ काढते. परीक्षेच्या वेळी आई किंवा आजी तिला मदत करतात.

ज्योतीची ही कहाणी तर पूनम रायतेचा वेगळाच अनुभव. नुकतीच तिची जलसंपदा विभागात अभियंता पदावर निवड झाली आहे. पण हा टप्पा गाठणं खडतर होतं. ती सांगते, ‘‘स्पर्धा परीक्षा हे माझं स्वप्न होतं. अभ्यासाची आवड असली तरी शेतकरी कुटुंबातील असल्यानं त्याचं फारसं कुणाला महत्त्व नाही. आई आणि भाऊ मात्र सुरुवातीपासून माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले. वडिलांशी सुरुवातीपासून बोलणं कमी होतं. केवळ अभ्यासाबद्दल किंवा काय हवं-नको ते सांगणं, एवढंच.

मी सिव्हिल इंजिनीयर झाल्यापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे आणि २०१९ मध्ये पहिल्यांदा परीक्षा दिली. घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानं कुठलाही खासगी क्लास, अभ्यासिका याचा आधार न घेता घरीच अभ्यास करण्याचं ठरवलं. आई, वडील, अन्य लोक शेतात कामावर जातात, त्याआधीच लवकर उठून अभ्यास करायला सुरुवात केली. घरात कुणी नसताना आजी-आजोबांकडे लक्ष द्यायचं, संध्याकाळचा स्वयंपाक करायचा, हेही सुरू राहतं. मग पुन्हा सगळे घरी आल्यावर अभ्यासाला सुरुवात करत असे. आधी घरच्यांना वाटत होतं, की मी पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होईन. लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले, पण शेवटच्या टप्पात माझी संधी हुकली. मग मात्र सगळय़ांनी मला परीक्षेविषयी विचारणं सोडलं. काहींनी थेट लग्नाचा प्रस्ताव मांडला. काही नातेवाईंकांनी ‘अभ्यास खूप झाला, आता लग्नाचं बघा, नोकरी करा,’ असं सुचवलं. आई आणि भाऊ मात्र ठाम होते. ते ‘अभ्यासावर लक्ष दे’ असं सतत सांगायचे. त्यांचा पाठिंबा आणि अभ्यास यामुळे तिसऱ्या प्रयत्नात मात्र अपेक्षित यश मिळवू शकले याचा आनंद आहे.’’

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रा. देवीदास गिरी आपला अनुभव सांगताना आशावाद व्यक्त करतात. त्यांच्या मते, ‘‘सध्या स्पर्धा परीक्षांविषयी मुलींमध्ये जागरूकता आली आहे. पदवी, पदविका शिक्षण घेतल्यानंतर बऱ्याच जणी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. पहिल्या टप्प्यात पालकांचा पाठिंबा असतो. मात्र दोन ते तीन वर्ष तयारी करावी लागते. बारावी-पदवी-स्पर्धा परीक्षा यासाठी वेगवेगळय़ा टप्प्यांवर मुलींना मार्गदर्शन मिळत गेलं, तर त्यांची पुढील वाटचाल सोपी होईल. स्पर्धा परीक्षेच्या तारखाही लवकर जाहीर होत नाहीत. अशा स्थितीत पालकांचा संयम सुटायला लागतो आणि पालकांकडून सातत्यानं मुलींना लग्न करण्यासाठी गळ घातली जाते. कुटुंबाची साथ मिळाली, मार्गदर्शन मिळालं, तर मात्र स्पर्धा परीक्षेत आणखी मुली चमकतील.’’
जयश्री सोनवणे गंगापूर तालुक्यातल्या शिंदी सरगावमधून आलेली विद्यार्थिनी. पद्मपुरा भागातल्या समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात शिकणारी. ती सांगत होती, की ही स्पर्धा जशी बेरोजगारीवर मात करण्यासाठी आवश्यक असते, तेवढीच ती मुलगी म्हणून अस्तित्वाची जाणीव करून देणारी असते. मुलांना वयाची अट संपेपर्यंत परीक्षा देता येण्याची मुभा असते. एखादं वर्ष किंवा सहा महिने काही कारणानं वाया गेलेच, तर मुलांना फरक पडत नाही. कारण त्यांना लग्नाचं टेन्शन नसतं! लग्न झाल्यानंतरही आता काही मुलींना मुभा मिळते. पण ते प्रमाण कमीच आहे. मराठवाडय़ासारख्या मागास भागातून शहरात येणाऱ्या मुलींना मग अभ्यासाचा कालावधी वाढवावा लागतो. कधी स्वयंपाक करून, कधी आई-वडिलांना मदत करून मुली सारं जमवून आणतात.ही स्पर्धा तिहेरी आहे. मुलगी असण्याची, वडिलांच्या आर्थिक स्थितीची आणि ‘एमपीएसी’च्या परीक्षेत उत्तीर्ण होण्याची.