वयोमानाप्रमाणे विस्मरण, सहनशक्तीही कमी होते. हे सर्व नैसर्गिकच असते. त्यात कोणालाही दोष देता येत नाही. पण आपली खोली विकून घर घेताना आजीसाठीही स्वतंत्र खोली असावी, असं एकालाही वाटलं नाही? ट्रेनमध्ये चौथ्या सीटवर बसताना जी कुचंबणा होते, तशीच आजीचीही होते आहे हा विचार कुणाच्याही मनात येऊ नये?
निवृत्त श्यामराव घरातच येरझारा घालीत होते, चिडलेले होते. पत्नी अलकाही तेथेच होती. सरस्वती आजी सत्तरी पार केलेल्या. वाती वळत होत्या. इतक्यात कॉलेजात जाणारी वरदा आली. पाठोपाठ गौरवही आला. श्यामराव भडकले, ‘काय ग! वरदा, घरी लवकर यायला काय झालं आणि गौरव, तू कोठे होतास रे इतका वेळ?’ वरदा आणि गौरव गप्पच. मग आईनेही त्यांना हटकलं. त्यावर ‘आई! लवकर घरी येऊन काय करायचं, एकमेकांची तोंडं बघत गप्पच बसायचं ना? नाही आम्हाला स्वतंत्र खोली, नाही प्रायव्हसी, नाही आमचा आवडीचा कार्यक्रम, नाही वाचन, दहा वाजले की सगळेच चिडीचूप.’
असं म्हणून तावातावानं मुलं आतल्या खोलीत निघून गेली. सगळ्यांची जेवणं झाली. अंथरुणावर पडल्या पडल्या श्यामराव मुलांचा विचार करू लागले आणि त्यांनी निर्णय घेतला. सकाळी उठल्यावर आजींचं चहापाणी झाल्यावर आजीजवळ जाऊन बसले. ‘आई, कालचा वरदा आणि गौरवचा प्रकार पाहिला ना? ’ आता काय करायचं याच विचारात आहे मी. ‘होय रे..मीसुद्धा त्यामुळे अस्वस्थ झालेय’ आजी सुरात सूर मिसळत म्हणाल्या. थोडा वेळ गेल्यावर ते म्हणाले, ‘आई, माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे. आपण गावाकडची खोली आणि ही खोली विकून उपनगरात मोठं घर विकत घेऊ. सगळ्यांनाच आराम मिळेल.’ आजीनंही संमती दिली. मग भराभर जागेचा व्यवहार करून, कांदिवलीला दोन बेडरूम हॉलचं घर घेतलं. तिसऱ्या माळ्यावर मिळालं. ‘चला ठीक आहे, आपण थोडंच सारखं सारखं उतरणार आहोत. काही लागलंय तर वरदा, गौरव आहेतच की,’ असं म्हणून यथासांग गृहप्रवेश झाला. नवीन घर सजवून झालं. मुलांनी आपली बेडरूम सजवली. श्यामराव, सरस्वतीनंही आपली सोय करून घेतली. पण आजीचं काय? स्वयंपाकघरात एक फोल्डिंग खाट घालून आजीची व्यवस्था झाली. म्हणजे ती ट्रेनमधली चौथी सीटच जणू. आजीला अडचण होऊ लागली. हॉलमध्ये बसलं तर कुणी आलं की उठून आत जावं लागायचं. मुलांच्या खोलीत जायचं म्हटलं तर आतून कडी. सूनबाईच्या खोलीत जायचं म्हणजे सूनबाईंचे विस्फारलेले डोळे. मग आजी बाल्कनीतच वेळ काढायच्या.
आजीलाही ‘प्रायव्हसी’ लागते हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हते. आजीला बसून कंटाळा आला तर..जरा पडावं तर कुठे? मनासारखा टी.व्ही.वरचा  कार्यक्रम बघता येत नाही. निवांत काही वाचन-लिखाण करावं म्हटलं तर कुठे? मुलांच्या खोलीत तर त्यांचाच पसारा. त्यांचे मोबाइल्स, त्यांची गाणी.. आजी वैतागून जायची. खाली जायचं झालं तर तीन जिने उतरा. आजूबाजूच्यांशी गप्पा मारणंही नाही. वयोमानाप्रमाणं काही ना काही दुखतं. बाम लावायचा असतो पण त्याचा वास कुणालाही आवडत नाही. रात्री वारंवार बाथरूमला जावं लागतं. अशा वेळेला अ‍ॅटच बाथरूमची जरुरी वाटते. खोकला येतो. सगळ्यांची झोपमोड होते. एक ना दोन अडचणी. वयोमानाप्रमाणे विस्मरण, सहनशक्तीही कमी होते. हे सर्व नैसर्गिकच असतं. त्यात कोणालाही दोष देता येत नाही. पण आपली खोली विकून घर घेताना आजीसाठीही स्वतंत्र खोली असावी, असं एकालाही वाटलं नाही? ट्रेनमध्ये चौथ्या सीटवर बसताना जी कुचंबणा होते, तशीच आजीचीही होते आहे हा विचार कुणाच्याही मनात येऊ नये?’ आजींच्या मनात विचार येई. पण आता सगळं स्वीकारण्याशिवाय पर्याय नव्हता..
सीटवरची तीनही माणसं सामंजस्यानं, चौथ्या माणसाचा विचार करून बसली तर उरलासुरला प्रवासही सहज संपतो, सुसह्य़ होतो. म्हणूनच वयोवृद्धांच्या मनाचा, त्यांच्या गरजांचाही, चौथ्या सीटप्रमाणे जरूर विचार व्हायला हवा, अन्यथा ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे, चित्ती असू द्यावे समाधान’ हे संतवचन ज्येष्ठांसाठी मानायला हवं.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fourth seat for veteran people
First published on: 12-04-2014 at 02:21 IST