डॉ. वैशाली बिनीवाले
प्रेमात असणं ही भावना सुंदर असतेच, परंतु त्या वाटेवरून चालताना ती वाट निसरडी होऊ नये म्हणून काळजी घ्यावी लागते, पुढचे धोके टाळण्यासाठी ‘प्यार मे जरा संभलना’ हाच मंत्र योग्य. कोणते गर्भनिरोधक, गोळ्या निवडाव्यात? याचा विचार करताना त्यांचा अपयशदर किती हेही पाहायला हवं. कारण आज भारतातील ६० टक्के स्त्रिया अप्रशिक्षित व्यक्तींकडून गर्भपात करून घेत असल्याने रोज सरासरी ८ स्त्रिया मृत्युमुखी पडतात. हे केवळ अज्ञान वा चुकीची माहिती यामुळे घडत असतं. त्यामुळे जरा सावधच.
१९७५ मध्ये प्रदर्शित झालेला ‘ज्युली’ हा एक चित्रपट. महाविद्यालयीन ज्युली मित्राच्या प्रेमात पडते. हळूहळू प्रेमात आकंठ बुडत जाते. भावनेच्या भरात त्यांचं प्रेम शारीरिक पातळीही गाठतं आणि ज्युली लग्नाआधीच गरोदर राहते. ती गर्भपात करू शकत नाही. शेवटी ती समाजापासून दूर पळून जाते. तिथे बाळाला जन्म देते. बाळाची रवानगी अनाथालयात होते. आणि ज्युली नाइलाजाने एकटीच घरी परतते. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे काही काळानंतर तिला तिच्या मित्राची व घरच्यांची साथ मिळते आणि सर्व काही छान होतं. त्या काळी अत्यंत गाजलेला हा चित्रपट.
५० वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेला हा चित्रपट खरं तर काळाच्या खूप पुढचा विषय घेऊन आला होता. त्या काळी सर्वसाधारण मराठी मध्यमवर्गीय कुटुंबात अशी घटना फारशी घडत नव्हती. आपल्यापासून खूप दूर आहे असं वाटणारं हे प्रकरण अलीकडे मात्र आपल्या दारात येऊन पोचलं आहे, नव्हे काहींच्या घरांमध्येही आलं आहे. तारुण्य म्हणजे उत्साह, ऊर्जा, कुतूहल, बिनधास्तपणा, फारसा विचार न करता स्वत:ला झोकून देणं. पण हीच तरुणाई कधी कधी मात्र होणाऱ्या परिणामांचा विचार न करता बेपर्वाईने वागू शकते.
काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक तरुण स्वत:च्या मैत्रिणीला घेऊन दवाखान्यात आला होता. लग्नाआधीच गर्भधारणा झाल्याने त्या मुलीने वैद्याकीय सल्ल्याशिवाय गर्भपातासाठीच्या गोळ्या घेतल्या होत्या. गर्भारपणाचे किती महिने झाले आहेत? गर्भपातासाठी कोणत्या गोळ्या किती प्रमाणात घ्यायच्या असतात? याची काहीही माहिती तिला नव्हती. भीतीपोटी घरी कुणालाच याविषयी सांगितलं नव्हतं. गोळ्या घेतल्यानंतर तिच्या पोटात खूप दुखू लागलं व रक्तस्राव होऊ लागला. तिला उभं राहाण्याचं, बोलण्याचंही त्राण राहिलं नाही. तिची अवस्था खूप गंभीर झाली. हे सगळं बघून तिचा मित्र खूप घाबरून गेला. तो घाईघाईने तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला. गोळ्यांच्या चुकीच्या वापराने तिच्या गर्भाशयाला इजा पोचली होती. पोटामध्ये खूप रक्तस्राव झाला होता. अगदी जीवघेणी परिस्थिती निर्माण झाली होती. नाइलाजानं शस्त्रक्रिया करून तिचं गर्भाशयच काढावं लागलं होतं.
चित्रपटातील ज्युलीला किंवा ‘क्या कहना’मधील प्रियाला कुटुंबीयांकडून किंवा समाजाकडून साथ मिळते, पण समाजात प्रत्यक्षात काय होताना दिसतं? असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे गर्भधारणा झाल्यास अनेक मुली व स्त्रिया गर्भपाताचा निर्णय घेतात तर काही जणींना नाइलाजाने मातृत्व स्वीकारावं लागतं. गर्भपाताचा पर्याय निवडणाऱ्या भारतातील सर्वच वयोगटातल्या ६० टक्के स्त्रिया अजूनही अप्रशिक्षित व्यक्तींकडून गर्भपात करून घेतात. असुरक्षित गर्भपातामुळे भारतामध्ये दररोज सरासरी ८ स्त्रिया मृत्युमुखी पावतात.
कुटुंबीयांचा, समाजाचा दबाव, नाचक्कीची भीती व वैद्याकीय तज्ज्ञ उपलब्ध नसणं ही असुरक्षित गर्भपातामागची सर्वसामान्य कारणं. पण यामुळे काहीजणींना स्वत:चा जीव गमवावा लागतो तर अनेक जणींच्या शरीरावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात. शारीरिक व भावनिक प्रलोभनांना बळी पडणं व क्षणिक सुखासाठी शरीरसंबंध ठेवणं ही तरुण वयातील असुरक्षित लैंगिक संबंधामागची महत्त्वाची कारणं. अनेकदा या मुलींना दुष्परिणामांची माहिती नसते, गर्भनिरोधकाच्या साहाय्याने हे दुष्परिणाम टाळता येतात हे माहिती नसतं. गर्भनिरोधक साधनांविषयीचं अज्ञान, त्यांच्या वापराबद्दल वाटणारी भीती व त्याविषयीचे गैरसमज समाजात अनेकदा आढळतात. म्हणूनच क्षणिक सुखासाठी धोकादायक लैंगिक वर्तन टाळणं नेहमीच योग्य. गर्भधारणा नको असल्यास व असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी गर्भनिरोधक साधनांचा वापर करायला हवा.
तरुण वयात वापरता येणाऱ्या गर्भनिरोधक साधनांविषयी माहिती असायला हवी. यातील पहिल्या प्रकारचे गर्भनिरोधक साधन म्हणजे ‘बॅरियर’ गर्भनिरोधक. या गर्भनिरोधकांमुळे स्त्रीच्या योनीमार्गात शुक्राणूंना प्रवेश करण्यात अडथळा येणं म्हणजे कंडोम. बाळ नको असेल तर प्रत्येक लैंगिक संबंधाच्या वेळी पुरुषाने ते वापरायला हवे. कंडोमचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याच्यामुळे गर्भधारणेबरोबरच लैंगिक संबंधातून होणारा जंतुसंसर्गही टाळता येतो. कंडोमच्या अपयशाचा दर थोडा जास्त आहे, साधारणत: १० टक्के. परंतु त्याचे महत्त्वाचे कारण आहे अनियमित व चुकीचा वापर.
गर्भधारणेसाठी दुसरे वापरले जाणारे साधन म्हणजे संप्रेरकयुक्त गर्भनिरोधक गोळ्या. यात इस्ट्रोजेन व प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके असतात. यातील संप्रेरकांमुळे बीजनिर्मितीची प्रक्रिया थांबते व गर्भनिर्मिती होत नाही. या गोळ्या फक्त शरीरसंबंधाच्या वेळी न घेता महिनाभर नियमितपणे घ्यायच्या असतात. या गोळ्या अत्यंत कार्यक्षम असतात. यांचा अपयशदर हजारात एकपेक्षाही कमी असतो. यात असलेल्या संप्रेरकांमुळे क्वचितप्रसंगी स्त्रियांना त्रास होऊ शकतो. म्हणूनच गर्भनिरोधक गोळ्या वैद्याकीय सल्ल्यानेच घ्यायला हव्यात. गोळ्यांप्रमाणेच संप्रेरकयुक्त इंजेक्शन व इतर साधनेही गर्भनिरोधनासाठी वापरता येतात. अर्थात त्यासाठी प्रशिक्षित डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.
पहिले अपत्य होण्यापूर्वी ‘तांबी’सारखी गर्भनिरोधक साधने क्वचितच वापरली जातात. ‘तांबी’ हे गर्भाशयात बसविण्याचे दीर्घकालीन गर्भनिरोधक साधन आहे. ते ३ ते १० वर्षं काम करतं. याचा अपयश दर एक टक्क्यापेक्षा कमी असतो. मात्र तांबीमुळे क्वचितप्रसंगी मासिक पाळीदरम्यान जास्त रक्तस्राव किंवा पोटदुखी होऊ शकते. तसेच जंतुसंसर्ग होण्याची शक्यताही थोडी जास्त असते.
‘इमर्जन्सी’ गर्भनिरोधकाचा वापर हल्ली वाढलेला दिसतो. असुरक्षित लैंगिक संबंधांनंतर ‘इमर्जन्सी’ गर्भनिरोधक साधन वापरून गर्भधारणेची शक्यता कमी करण्यात येते. यासाठी बहुतेकदा संप्रेरकयुक्त गोळ्या वापरल्या जातात. मात्र यात संप्रेरकांचे प्रमाण जास्त असल्याने त्याचे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. नियमितरूपी वापरल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांपेक्षा याचा अपयशदरही थोडा जास्त असतो. म्हणूनच इमर्जन्सी गर्भनिरोधकांपेक्षा नियमितरूपी गर्भनिरोधके वापरणे संयुक्तिक ठरते. इमर्जन्सी गर्भनिरोधनासाठी तांबी किंवा संप्रेरकयुक्त गर्भाशयातील साधनही वापरता येते.
असुरक्षित लैंगिक संबंधामुळे होणारा दुसरा धोका म्हणजे जननसंस्थेचा जंतुसंसर्ग. हा जंतुसंसर्ग अनेक प्रकारच्या जिवाणू, विषाणू व बुरशींमुळे होतो. जंतुसंसर्ग झाल्यास स्त्रीच्या योनीमार्गातून नेहमी येणाऱ्या पारदर्शक स्रावाचा रंग हिरवा-पिवळा होतो. कधी- कधी स्राव घट्ट दह्यासारखा पांढरा होतो. त्याला दुर्गंधी येते. बाह्य जननसंस्थेवर खाज येते, आग होते व पुरळ येऊ लागते. पोटात व कमरेत दुखू लागते. जंतुसंसर्ग वाढल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. गर्भाशय, गर्भाशय नलिका व बीजांडकोशासारख्या अंतर्जननसंस्थेच्या अवयवांना इजा पोचू शकते. जंतुसंसर्गामुळे गर्भाशयनलिका बंद झाल्यास पुढे वंध्यत्वाचा धोका उत्पन्न होते. ‘ह्युमन पॅपिलोमा’ या विषाणूचा संसर्ग झाल्यास काही वर्षांनंतर गर्भाशयमुखाचा कर्करोग होण्याची भीती असते. एच.आय.व्ही. (Human Papillomavirus) च्या विषाणूमुळे एड्ससारखा गंभीर आजार होतो.
लैंगिक संबंधातून हिपॅटायटीस, सिफिलिससारखे जीवघेणे आजार उद्भवू शकतात. जननसंस्थेचा जंतुसंसर्ग टाळण्यासाठी असुरक्षित लैंगिक संबंध टाळायला हवा. एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर किंवा केवळ शारीरिक आकर्षणामुळे शारीरिक संबंध ठेवणं यासारख्या धोकादायक लैंगिक वर्तनापासून दूर राहायला हवे. लैंगिक संबंधांच्या वेळी कंडोम वापरल्यास जंतुसंसर्गाचा धोका कमी होतो. जंतुसंसर्ग टाळण्यासाठी शारीरिक संबंधाच्या वेळी स्त्री व पुरुषांनी जननसंस्थेची स्वच्छता ठेवायला हवी. जननसंस्थेच्या जंतुसंसर्गाची लक्षणे दिसल्यास त्वरित वैद्याकीय उपचार घेऊन पुढील दुष्परिणाम टाळायला हवा. अशा वेळी स्त्री व पुरुष दोघांनाही उपचार देणे जरुरी असते. हिपॅटायटीस व एचपीव्हीचे लसीकरण या विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका कमी करते.
हिपॅटायटीसची लस लहानपणीच दिली जाते. त्याचा बूस्टर डोसही घ्यायला हवा. एचपीव्ही लसीकरणाबाबत मात्र पुरेशी जनजागृती झालेली नाही. ‘ह्युमन पॅपिलोमा’या विषाणूमुळे होणारा गर्भाशयमुखाचा कर्करोग ‘एचपीव्ही’च्या लसीकरणाने टाळता येतो. हे लसीकरण वय वर्षे ९च्या मुलींपासून ते ४५ वर्षांपर्यंतच्या स्त्रियांना २ डोस व त्यानंतर ३ डोस देण्यात येतात. ही लस दोन प्रकारांत उपलब्ध आहे. या लसीकरणाविषयीची माहिती आपल्या डॉक्टरांकडून नक्की घ्या.
तरुण मुलींना दिली जाणारी आणखी एक लस म्हणजे रुबेलाची लस. रुबेला किंवा जर्मन गोवर आजार गर्भावस्थेत झाल्यास बाळामध्ये व्यंग निर्माण होऊ शकते. रुबेला विषाणू विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी तरुण मुलींना रुबेलाची लस देण्यात येते.
काव्या माझ्या मैत्रिणीची, मनीषाची मुलगी. अतिशय हुशार. एका आयटी कंपनीत नोकरी करते. सकाळी ९ वाजता काम सुरू केले की कधी संपेल याची खात्री नसते. परदेशातील ग्राहक वा सहकारी यांच्या बरोबर मीटिंग असेल तर ती रात्री उशिरापर्यंत ती चालू राहाते. जेवायला, झोपायला मध्यरात्र उलटून जाते. काव्याच्या या दिनचर्येमुळे मनीषा फार चिंतेत आहे. वेळच्या वेळी जेवणं नाही. घरूनच काम करायचं त्यामुळे व्यायाम नाही. पुरेशी झोप नाही यामुळे काव्या हल्ली सारखी आजारी पडते. आज डोकं दुखतंय. उद्या मान दुखतेय. पित्त झालंय यासारख्या कुरबुरी सारख्या चालूच असतात. काव्याची समस्या ही आजकालच्या तरुण मुलींची सर्वत्र आढळणारी समस्या आहे. तारुण्य हे खरं तर शारीरिक तंदुरुस्तीचं वय. मात्र या वयात आरोग्याची नीट काळजी न घेतल्यास पुढील आयुष्यात अनेक व्याधी होऊ शकतात. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यसुद्धा जपायला हवं. संतुलित आहार, नियमित व्यायाम व पुरेशी विश्रांती ही उत्तम आरोग्यासाठीची त्रिसूत्री कायम आचरणात आणायला हवी. मानसिक समस्या जाणवत असल्यास समुपदेशन करून घ्यायला हवे. व्यसनांपासून दूर राहायला हवे. या तरुण वयात मिळवलेले उत्तम आरोग्य पुढील आयुष्यासाठीची एक मौल्यवान ठेव आहे.