मृणाल जोशी
वर्षभर कितीदाही मोदक केले तरी मोदक करण्याचा सोहळा मात्र रंगतो तो एकदाच. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी, प्रसाद दाखवण्यासाठी केलेला. घरातले सगळे जण एकत्र जमलेले असतात. ख्यालीखुशाली सांगत, गप्पा मारत हा सोहळा यथेच्छ रंगतो.. नाती पुन्हा एकदा गुंफली जातात.. गणपतीच्या साक्षीनं..

गणेशोत्सवाचा पहिला दिवस..
आम्ही निदान २०-२२ जण एकत्र जमलेलो. घर ऐसपैस १० खोल्यांचे. गणपतीची प्रतिष्ठापना होणार असल्याने सगळे पहाटे ५ पासूनच उठलेले. प्रत्येक जण हसत, गप्पा मारत, चहाची आवर्तने करत समोर दिसणारी कामे करण्यात गर्क.. मोठय़ा काकू हार करतायत, दुसऱ्या काकू झरझर स्वत: कामे करता करता माझ्यासारख्या नव्या सुनेला, माझ्या नणंदांनासुद्धा कामे सोपवतायत, काका पूजेसाठी लागणारी तयारी करताएत.., असे प्रत्येकच जण कुठल्यान् कुठल्या कामात गुंतलेला; पण ते करता करता गप्पाही छान रंगलेल्या होत्या.. मधूनच आम्ही बायका काठापदराच्या साडय़ा नेसून तर पुरुष झब्बे घालून तयार होत होते.. छान प्रसन्न वातावरण..

या सगळय़ा सुंदर वातावरणाचा परमोच्च बिंदू म्हणजे.. साधारण स्वयंपाक तयार झाला आहे, अर्धा सुरू आहे आणि आम्ही मोदक वळायला बसलो आहोत. (वि.सू.- मोदक उकडीचेच असतात, तळून तर काय करंज्याही करतात.)

आदल्या दिवशीचा मोदकाचे सारण तयार करण्याचा प्रसंग म्हणजे पुढच्या सोहळय़ाची जणू रंगीत तालीमच.. संध्याकाळी तीन-चार जणी साधारण १२-१४ नारळ खवायला एका वेळी बसणार, मधेच नंतर आलेली एखादी नणंद किंवा जाऊ एखादीला खो देऊन तिची जागा घेणार. पांढराशुभ्र चव वेगळा आणि चटणी, उसळीसाठी चॉकलेटी निघालेला चव वेगळा ठेवला जाणारच. कोणाची नवी नोकरी तर कोणाचा नुकताच लागलेला परीक्षेचा उत्तम निकाल इथपासून दैनंदिन दूरचित्रवाणी मालिका, त्यातला भंपकपणा कोणताही विषय- गप्पा रंगणारच.. चुलत सासू-सासरे, दीर, नणंदा सगळे त्यात हिरिरीने भाग घेणार. अशा मस्त खेळीमेळीच्या वातावरणात कधी नारळ खवून झाले ते कळतही नाही.

दुसरीकडे घरातली सजावट सुरू झालेली असते, विविध प्रकारचे दिवे, फुलं असं साहित्य वापरून प्रत्येक जण आपले मत मांडतोय, दुसरे कोणी ते मत खोडतंय.. आणि रात्री १२ नंतर आरती करून गरम साबुदाणा खिचडीवर सगळेच ताव मारतायत.. अहाहा!! काय चव येते त्या खिचडीला त्या वातावरणाने.. आम्ही मुली खाण्यात किंवा सजावटीत गर्क असताना स्वयंपाकघरात अनुभवी हातांनी सराईतपणे तोवर नारळ आणि गूळ एकत्र करून खमंग सारण तयारही केलेलं असतं.

हेच आदल्या दिवशी केलेलं सारण पुढय़ात घेऊन सुरू होतो तो ताजे ताजे मोदक करण्याचा आजचा सोहळा.. एका काकूंनी खूप सुरेख, पांढरी शुभ्र, सुवासिक आंबेमोहोर तांदळाची मऊ उकड काढलेली असते. (निदान ३-४ वेळा उकड काढावी लागते, कारण २४-२५ जणांसाठी १००-१२० मोदक हवेतच) आणि मग बरोब्बर वेळेत आपापल्या वाटणीची स्वयंपाकाची कामे आटोपून एकएक जण त्या काकूंभोवती येऊन बसते. हळूहळू ६-७ जणींचा मोठा गोल तयार होतो आणि मग प्रत्येकीची कला समोर ओळीत एकत्र यायला लागते. मोदकाचे नाक कसे, पाकळय़ा किती, त्या सुबक किती यावर उत्साहाने चर्चा सुरू होते. कॉलेजमध्ये जाणारे दोन दीर, कधी नुकताच लग्न झालेला दीर हेसुद्धा आपली कला दाखवायला हळूहळू हजर होतात, क्वचित परीक्षण करतात, आपापली निरीक्षणं नोंदवतात, सल्ले तरी देतातच..

असा सुंदर साज जमून येतो की वाह! त्यात कोकणात माहेर असलेल्या काकू एकावर एक दोन मोदकांचा एक मोदक करून समोरच्यांना जणू अजून एक माइलस्टोन सेट करून अशा काही त्यांच्या इतर कामांना लागतात की त्या इथून बाहेर गेल्या कधी हेच कळत नाही.एकीकडे पुढची उकड काढणं आणि दुसरीकडे काकूंचं दोन शेगडय़ांवर आम्ही सगळय़ांनी केलेले मोदक वाफवण्याचं काम चालू असतं. दुसरी एखादी जाऊ किंवा नणंद सराईतपणे चटणी, कोिशबीर करता करता झालेले मोदक हलकेच डब्यात ठेवत असते.

साधारण तासभर गेलेला असतो. ४०-५० मोदक तयार असतात. बोलण्याचा विषय मोदक कथांवरून बरीच वळणे घेऊन भलत्याच गोष्टीवर आलेला असतो. उत्साह मात्र तोच आणि तेवढा असतोच.आणि ती माझी सगळय़ात आवडीची वेळ येते..बाहेर गणपतीची प्राणप्रतिष्ठा, पूजा अतिशय साग्रसंगीत वेळ घेऊन झालेली असते. (पूजा मोठे काका सांगणार आणि दुसरे काका किंवा पुतण्या ती करणार) पाच काका, त्यांची पाच मुले आणि घरात असलेले सगळेच आवर्तन करायला बसतात. बाहेर ‘अथर्वशीर्ष’चे शब्द एका सुरात सुरू झाले, की आत आमचे हात जास्तच वेगानं मोदक वळू लागतात. मनातल्या मनात स्तोत्र म्हणणं सुरू झालेलं असतंच. क्वचित कधी तरी २१ आवर्तने पूर्ण होतात, पण तरीही थोडे मोदक करायचे शिल्लक असतातच. अशा वेळी शेवटची उकड काढून नुकत्याच मोकळय़ा झालेल्या काकू, मघाशी इतर कामांना गेलेल्या काकू हे बरोब्बर ओळखतात आणि त्यांना विचारायच्या आतच सांगतात, ‘तुम्हा मुलींना जायचं असेल तर जा बाहेर आरतीला, आम्ही करतो उरलेले..’मग जल्लोशात सुरू होते गणेशोत्सवातली पहिली आरती..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरती करताना चांदीच्या ताटात वाफाळलेल्या मोदकांवर जेव्हा जेव्हा नजर जाते त्या प्रत्येक वेळी यासाठी आपलाही हात लागलाय ही भावना इतकी सुखावणारी असते की बस..उरलेला स्वयंपाक झाल्यावर गणपतीसमोर छान पंगत सुरू होते आणि तेव्हाच मोदकासाठी निरुपयोगी असणारी पातेल्याला किंचित लागलेली उकड समोर येते. वाटलेलं आलं-मिरची असतेच, थोडं मीठ, जिरेपूड टाकून निवगऱ्या करायला सुरुवात होते. मोदकाबरोबर करंजी हवीच तसे गोड मोदकाबरोबर तिखट निवगरी ही हवीच ना?पुढच्या पंगतीत हा एक पदार्थ जास्तीचा हवाच.. तेव्हा खरा मोदक अध्यायाला पूर्णत्व येते.
वर्षभर कितीही वेळा मोदक करत असलो तरी मोदक करण्याचा सोहळा वर्षांतून फक्त एकदाच..बाप्पासाठीचा.

joshimrinal97 @gmail.com