अभावग्रस्त ‘गवलान’

गवळी ही भटकी जमात आणि तत्सम  गवलान जमात यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे 'पेसा' कायद्यानुसार वारसाहक्काचा किंवा वहिवाटीचा हक्क वनावर सांगता येतो. परंतु कायद्याचे अज्ञान आणि नोकरशाहीची पोलादी चौकट …

गवळी ही भटकी जमात आणि तत्सम  गवलान जमात यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे ‘पेसा’ कायद्यानुसार वारसाहक्काचा किंवा वहिवाटीचा हक्क वनावर सांगता येतो. परंतु कायद्याचे अज्ञान आणि नोकरशाहीची पोलादी चौकट यामुळे ते त्यांच्या अधिकारापासून कोसो दूर आहेत.

‘‘प न्नास-साठ वर्षांपूर्वी माझे लग्न झाले तेव्हा साठ म्हशी आणि शंभर गायींची ‘हेटी’ (स्वत:च्या जनावरांच्या कळपासह संपूर्ण कुटुंबाचा जंगलातला फिरता डेरा) घेऊन आमचे कुटुंब जंगलात वर्षांचे बारा cr24महिने फिरायचे. जंगलात भटकत, दुभती जनावरे सांभाळणे हा आमच्या ‘गवलान’ जमातीच्या लोकांचा परंपरागत व्यवसायच होता. आम्हाला ना घर, ना शेत, ना गाव. जंगलात फिरताना पावसाळ्यात थोडा त्रास व्हायचा, पण तेवढय़ापुरते गवताच्या कुंच्या आणि गवताच्याच झोपडय़ा तयार केल्या जायच्या. जंगलातल्या वेलभाज्या, पालेभाज्या, फळभाज्या, कंदभाज्या भरपूर मिळायच्या. काही जण तितर, ससे वगैरेंची शिकार करायचे. जनावरांना जंगलात चारा भरपूर मिळायचा. विक्री करून उरलेल्या दुधाचे तूप करण्यावर तेव्हा जोर होता. एवढी जनावरे सांभाळायला रात्रंदिवस खूप कष्ट करावे लागायचे. पण मजेत असायचे सगळे. तीन वेळेला पोटभरुन अन्न मिळायचे.. जंगलातल्या इतर लोकांबरोबर मैत्रीची आणि सहयोगी जीवनपद्धती होती. कोणाचे कसलेच बंधन नव्हते. आम्ही म्हणजे जंगलाचे राजेच म्हणा की. गाविलगडचा राजा यादव येऊन येथे बाराव्या शतकात गड बांधायच्या आधीपासून आमचे पूर्वज या जंगलात गुरे घेऊन आले असे आमचे वाडवडील सांगायचे. स्वराज्यात तर आम्हाला जंगलातून हाकलून देण्याचे कायदे केले. जंगलात चरणाऱ्या आमच्या गायी-म्हशी जप्त करून त्यांचा लिलाव करायला सुरुवात केली. जंगलाशिवाय तर आम्हाला सहाराच नव्हता. जनावरे चारण्यासाठी जंगलाचा आणि जनावरे एकत्र थांबविण्यासाठीही जंगल-जमिनीचाच आधार होता. तो नष्ट झाला. त्यामुळे आमचे पशुधन नष्ट झाले. मुळातले आम्ही भूमिहीन व बेघर भटके. त्यात सरकारने जगण्याचे आमचे परंपरागत साधनच हिरावून घेतले. आता आमचे जगणे कठीण झाले आहे.’’ अशा आपल्या व्यथा मांडत होत्या वयोवृद्ध महिला जमुनादेवी आणि तुलसादेवी. आम्ही बसलो होतो मेळघाट क्षेत्रातल्या धारणी तालुक्यातील ‘गवलान’ जमातीच्या कच्च्या घरांच्या सादराबार्डी या वस्तीतल्या लोकांच्या बैठकीत.cr21
सात घाटांचा मेळ असलेले अमरावती जिल्ह्य़ातले मेळघाट हे क्षेत्र डोंगरदऱ्या व जंगलाने भरलेले आहे. अचलपूर, चिखलदरा व धारणी या तीन तालुक्यांत मेळघाट क्षेत्र विस्तारलेले आहे. त्याच क्षेत्रातले चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आणि गाविलगड हा ऐतिहासिक किल्ला प्रसिद्ध आहे. सेमाडोह या प्रेक्षणीय स्थळाबरोबर तिथले अभयारण्य आणि व्याघ्र प्रकल्पही प्रसिद्ध आहेत. परंतु अलीकडच्या काळात मेळघाट हे क्षेत्र केवळ राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात कुप्रसिद्ध झाले ते आदिवासींच्या कुपोषणाबाबत. स्वराज्यातील कायद्यांचा विपरीत परिणाम म्हणून हातातला दुधाचा व्यवसाय गमावलेल्या गवलान जमातीच्या भूमिहीन, बेघर व निरक्षर असलेल्या निराधार लोकांची अवस्था या कुपोषित आदिवासीपेक्षा फारशी वेगळी नाही. पशुधनच नष्ट झाले म्हणून जंगलात फिरणेही बंद झाले. आता गवलान जमात केवळ मेळघाटातल्या डोंगरदऱ्यांतील वाडय़ा-वस्त्यांवर विखुरलेली आहे. रोजंदारीवर मिळेल ते मजुरीचे, कष्टाचे काम करणे किंवा गुराखी म्हणून ज्यांच्याकडे शेती आहे त्यांची गुरे राखण्याचे काम करणे हा व्यवसाय सध्या चालू आहे. शेतकऱ्यांची किंवा इतर दुग्ध व्यावसायिकांची जनावरे राखण्याची/ सांभाळण्याची कामे मिळाली तर पुरुषांपेक्षा महिलाच जास्त काम करतात. लोकोपयोगी इतर कसले कौशल्य नाही, खात्रीचे काम नाही आणि कामाचे योग्य दाम नाही अशा बिकट परिस्थितीत हा समाज अभावग्रस्तांचे जीवन जगत आहे. ही जमात मेळघाट क्षेत्र सोडून महाराष्ट्रात इतरत्र आढळत नाही. मेळघाट क्षेत्रात यांची एकूण लोकसंख्या सुमारे पंचवीस हजार असावी असा अंदाज सामाजिक व राजकीय जाणकारांचा आहे. महाराष्ट्राच्या भटक्या जमातींच्या यादीतील गवळी जमातीची तत्सम जमात म्हणून ‘गवलान’ या जमातीची नोंद आहे. मात्र केंद्र शासनाच्या ‘इतर मागासा वर्गीय’च्या यादीत गवळी जमातीची नोंद असूनसुद्धा ‘गवलान’ची नोंद केंद्राच्या मागास वर्गाच्या कोणत्याच यादीत नाही. ती तिथे दुर्लक्षित राहिलेली आहे.
गवलान जमातीची स्वतंत्र बोलीभाषा असून तिला ‘ब्रज’ असे संबोधतात. त्यांच्यात एकूण चार गोत्र असल्याचे सांगितले गेले. १. ‘कारामांझ गोत्र’ ज्याचा अपभ्रंश ‘कस्तुरे’ असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत चिखलदरा तालुक्यात बिबा या गावी आहे. या कुलदैवताचे नाव आहे, ‘मिठ्ठ्कुंवर तुलसा सत्ती’. (सती गेलेल्या महिलेचे नाव). २. ‘पटोरा गोत्र’ ज्याचा अपभ्रंश पाटोरकर असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत मध्य प्रदेशमधील बैतूल जिल्ह्यातील झलमार गावी आहे. कुलदैवताचे नाव ‘अलजी कुंवर जमुना सत्ती’ असे आहे. (हेही सती गेलेल्या महिलेचे नाव). ३. ‘मेंडकार गोत्र’ ज्याचा अपभ्रंश मेटकर असा झाला आहे. या गोत्राचे कुलदैवत ‘बिजासन माता’, मध्य प्रदेशातील होशिन्गाबादमधील सलकनपूर येथे आहे. ४. ‘मासागोला गोत्र’ ज्याचा अपभ्रंश मावसकर असा झाला आहे. चिखलदरा येथील अंबादेवी ही यांची कुलदेवता आहे. या जमातीत कृष्णजन्माष्टमीचा उत्सव मोठय़ा उत्साहाने साजरा केला जतो.
परंपरेनुसार गवलान जमातीतले लग्न पाच दिवसांचे असते. त्याआधी मुलाकडून मुलीला देज देण्याची पद्धत आहे. किमान एक मण कुटकी (एक प्रकारचे धान्य), पाच किलो उडीद दाळ, दोन किलो मिरची, एक किलो गूळ व तीन किलो तूप एवढे देज तरी दिले पाहिजे. यांच्यात हुंडा पद्धती नाही. मात्र चांदीच्या दागिन्यांबाबत बोलणी होतात. तडिया (बाजूबंद), त्यावर बाखडय़ा, कोदरा (कमरपट्टा), तागली (गळ्यातली कडी), पटली (हातातल्या पाटल्या),पायात चंपक (पैंजणासारखे) आणि पिंजणी (कडे) इ. दागिन्यांबाबत बोलणी होतात. मात्र सासर व माहेर यांच्या सहकार्याने लग्नात सर्वच दागिने वधूच्या अंगावर घातले जातात.
लग्नाच्या पहिल्या दिवशी कुलदैवताची पूजा केली जाते. नैवेद्य म्हणून कोंबडा कापून जेवण बनवले जाते. हे नैवेद्य त्याच कुळातील (म्हणजे त्याच घरातील माणसांनी) लोकांनी खायचे असते. म्हणूनच जेवल्यानंतरचे खरकटे किंवा उरलेले अन्न चांगला खड्डा करून त्यात गाडतात. कुत्रे-मांजरेसुद्धा ते खाऊ  शकणार नाहीत याची काळजी घेतली जाते.
दुसऱ्या दिवशी नवरीच्या क्षेत्रात नवरीसाठी बारा खांबाचा मांडव आणि नवऱ्यासाठी नऊ  खांबाचा मांडव तयार केला जातो. ‘खणमातीची पूजा’ म्हणजे गावाबाहेरच्या बोराच्या झाडाची व त्याच्या बुडाजवळील मातीची पूजा करून ती माती एका ‘छिबळी’मध्ये ठेवतात. (छिबळी म्हणजे साधारणपणे तीन ते चार इंच व्यासाचे बांबूच्या काडय़ाचे छोटेसे गोल उघडे भांडे.) ही अशी पूजा करण्याचा मान घरच्या जावई व मुलीचा असतो. सर्वप्रथम ही छिबळी डोक्यावर ठेवून जावई मंडपात संगीताच्या तालावर नाचतो-गातो. जंगलातले ‘बसोड’ जमातीचे लोक ढोलक व पुंगीच्या साहाय्याने संगीत देतात. जावयाचा हा नाच झाला की मग इतर नातेवाईक छिबळी डोक्यावर घेऊन फेर धरतात.
तिसऱ्या दिवशी मुलाकडचे लोक मुलीसाठी साडी व हळद घेऊन येतात. ही साडी व हळद मिळाल्यावरच मुलगी लग्नासाठी ‘बसते’ म्हणजे लग्नासाठी तयारी दर्शविते. या दिवशी मुलीकडचे लोक ‘मंडा मारणे’चा कार्यक्रम करतात. म्हणजेच नवऱ्या मुलाची थट्टा मस्करी करतात. पाण्यात, चहात मीठ/ मिरची टाकून पाजणे, हातपाय धुण्यासाठी तिखट पाणी देणे इ.इ.
चौथ्या दिवशी नवरा नवरीला आपापल्या मांडवात स्वतंत्रपणे हळद लावतात. मुलाकडील लोक मुलीच्या मांडवात जाऊन ‘बेली’ची (देवक खांबाची) पूजा करतात. एकमेकास आलटून पालटून आहेर केले जातात. त्यास ‘चिकट देणे’ म्हणतात. या पद्धतीत एका साडीच्या साहाय्याने अनेक महिलांना आहेर केला जातो. आपण एक साडी दिली की आपणास दुसरी येते. ही दुसरी दिली की तिसरी येते. अशा तऱ्हेने आपल्याजवळ एक साडी कायम राहते.
पाचव्या दिवशी मुला-मुलीला मांडवात आणून आंघोळ घालतात. त्याआधी मुलीच्या भोवती महिला साडय़ा धरून आडोसा निर्माण करतात. मुलीच्या मागे तिच्या लहान बहिणीस किंवा लहान भावास बसवितात. मुलाच्या मागेही त्याचा लहान भाऊ  वा बहिणीस बसवितात. मुलामुलीला ‘चिकसा’ लावून आंघोळ घालतात. चिकसा म्हणजे निरनिराळ्या पिठांचे मिश्रण, ज्यात चण्याचे पीठ आवश्यक आहे. आंघोळीनंतर नवऱ्याला लाल रंगाचा जामा आणि नवरीला लाल रंगाचे तूस (लुगडे) नेसवतात.  मुलाच्या हातात कटय़ार व शिंदीचा ‘बिजना’ (पंखा) दिला जातो. आंघोळीची जागा सोडून दोघांना मांडवातल्या मोकळ्या जागेत आणले जाते. तिथे जमातीतला निवडलेला एक ‘घट्टीबच्चा’ (लग्न लावणारा प्रौढ व अनुभवी प्रमुख माणूस) असतो. त्याने नवरा-नवरीला समोरासमोर उभे करून त्यांच्या एकमेकांच्या हाताच्या बोटांना बोटे व पायाला पाय चिटकवून हलकेच डोक्याला डोके आपटले की झाले. लग्नानंतर मुलगा मुलीच्या गळ्यात काळीपोत बांधतो. यानंतर सर्वाना लग्नाचे जेवण दिले जाते. जेवणात नांज (भात) आणि सुवारी (पुरी) असणे प्रतिष्ठेचे समजले जाते.
लग्नानंतर पहिली चार ते पाच वर्षे मुलगा, घरजावई या नात्याने मुलीकडे राहण्याची पद्धत आहे. त्या काळात तो कष्ट करून कुटुंब सांभाळू शकतो असा विश्वास निर्माण झाला की त्याला स्वतंत्र घर करून राहण्यास परवानगी मिळते. धारणी तालुक्यातील ‘टिकली’ गावातील बहुतेक सगळ्या गवलान कुटुंबात ही पद्धत अवलंबलेली दिसते.
‘‘लगीन काय असतं हेही माहीत नसलेल्या वयात माझं लगीन झालं. १२-१३ वर्साची असेन. काही महिन्यांनंतर उलटय़ा सुरू झाल्या. नजर लागली म्हणून नजर उतरविण्याचे अनेक प्रकार झाले. भूतबाधेच्या संशयाने या बाबाला दाखव, त्या बाबाला दाखव करत २ महिने गेले. नवस-सायासही झाले. माहेरच्यांनी डॉक्टरकडे नेले तेव्हा कळले की मी पोटुशी आहे. पोटात बाळ आहे म्हटल्यावर काहीच कळेनासे झाले. लाज वाटायची. लोकांसमोर यायलाच धीर होईना..’’ हे सांगत होत्या
२६ वर्षांच्या मुलीची आई असलेल्या ३९ वर्षांच्या पिवसादेवी. लहान वयात लग्न केल्यामुळे तब्येतीची खूप फरफट होते. म्हणूनच मुलीचे लग्न सोळाव्या वर्षी केले,असे  कौतुकाने त्यांनी सांगितले. या जमातीतील ९० ते ९५ टक्के महिला निरक्षर आहेत. यांच्या शिक्षणाचा व आरोग्याचा प्रश्न गंभीर आहे.
गवळी ही भटकी जमात आणि तिची तत्सम जमात गवलान यांची मेळघाटातील लोकसंख्या वीस टक्क्यांपेक्षा जास्त आहे. पिढय़ान्पिढय़ा शेकडो वर्षांपासून वनाच्या आधाराने जगणाऱ्या गवलान जमातीला आदिवासींप्रमाणे ‘पेसा’ कायद्यानुसार वारसाहक्काचा किंवा वहिवाटीचा हक्क वनावर सांगता येतो. परंतु कायद्याचे अज्ञान, स्थानिक पंचायत व्यवस्थेची यांच्याप्रति असलेली अनास्था आणि नोकरशाहीची पोलादी चौकट यामुळे हे दुबळे लोक त्यांच्या अधिकारापासून कोसो दूर आहेत. मेळघाट क्षेत्रात विकासाचा विषय निघाला की आदिवासींचा प्राधान्याने विचार केला जातो. ते योग्यही आहे. परंतु तेवढेच मागास मात्र दुर्लक्षित राहिलेल्या या जमातीचा प्राधान्याने अभ्यास व विकास होणे मानवतेचे आणि भारतीय राज्यघटनेची ध्येयपूर्ती करणारे ठरेल.

अॅड.पल्लवी रेणके -pallavi.renke@gmail.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Gavali nomadic tribes