केक करण्यासाठी ओव्हन २२० अंश सेल्सिअसवर प्रीहिट करायला ठेवला. त्यावेळीस तयार केलेलं पीठ भांडय़ात घातलं. प्रीहिटेड ओव्हनमध्ये ३० मिनिटे केक बेक होण्यास ठेवला. टिपिकल चित्रपटामध्ये जसं ऑपरेशन थिएटरबाहेर चिंतामग्न स्थितीत येरझारा घालत असतात तसा मी घालायला लागलो. कसा होईल केक? वेळ झाल्यावर ३ बिप्सचा आवाज झाला आणि..

माझी आणि पाककलेशी गट्टी म्हणावं तर अपघाताने जमली. २००५ मध्ये आम्ही मायक्रोवेव्ह ओव्हन घेतला. सुरुवातीला आम्ही त्याचा उपयोग फक्त फ्रिजमधलं गार जेवण गरम करण्यासाठी करत होतो. साधारण त्याच वेळी हिंदी चित्रपट ‘सलाम नमस्ते’ बघायला मिळाला. त्यात सैफ अली खानने रंगवलेल्या पात्राला लहानपणापासून ‘शेफ’ व्हायची इच्छा असते. बाकीची लहान मुले क्रिकेट, फुटबॉल असे मैदानी किंवा बैठे खेळ खेळतात पण तो ‘कुकिंग कुकिंग’ खेळत असतो. मला त्या पात्राचं वेगळंच आकर्षण वाटलं. नेहमीचा मार्ग सोडून आडवळणाचा मार्ग निवडणाऱ्या व्यक्तीचं मला कौतुक वाटतं. त्यामुळेच कदाचित डोक्यात ‘केमिकल लोचा’ झाला आणि मला पाककलेत रुची वाटू लागली!

मी विज्ञान शाखेला अकरावीत असल्याने वाटलं एखादा रसायनशास्त्राचा प्रयोग असल्यासारखा एक प्रयोग करू. ओव्हन सोबत असलेल्या पाककृतीच्या पुस्तकात योगायोगाने पहिलीच रेसिपी केकची होती. मग केक बनवायचा घाट घातला गेला. प्रथम बाजारातून सामान आणलं. लोणी, साखर, अंडी, बेकिंग पावडर, मैदा. सगळ्यात आधी साखर मिक्सरमध्ये घालून पिठी साखर केली. घरी असलेल्या मेजरिंग ग्लासचा वापर करून २०० ग्रॅम लोणी आणि २५० ग्रॅम पिठीसाखर घेतली आणि एकत्र मिसळली. त्यात फेटलेली ४ अंडी घालून नीट ढवळली. ‘फेटलेल्या अंडय़ांना जितका जास्त फेस येईल तितका चांगला’ असं म्हटलेलं म्हणून जोरजोरात काटय़ाचमच्याने फेस काढायला लागलो. (त्या पुस्तकात असं लिहिलं नव्हतं की, जर तुमच्याकडे सनी देओल सारखे ‘ढाई किलो के हाथ’ नसतील तर तुम्ही व्हिस्कर किंवा इलेक्ट्रिक मशीनचा वापर करू शकता..) मग त्यात २५० ग्रॅम मैदा तीन वेळा चाळून घातला आणि हळूहळू घालून एकजीव केला. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेतली. त्यात २ टेबलस्पून बेकिंग पावडर घातली. केकच्या भांडय़ाला लोणी लावलं आणि त्यावर मैद्याचा थर नीट पसरवला जेणेकरून केक मोकळा होईल. ओव्हन २२० अंश सेल्सिअसवर प्रीहिट करायला ठेवला. त्यावेळीस तयार केलेलं पीठ भांडय़ात घातलं. प्रीहिटेड ओव्हनमध्ये १८० अंश सेल्सिअसवर ३० मिनिटे केक बेक होण्यास ठेवला. टिपिकल चित्रपटामध्ये जसं ऑपरेशन थिएटरबाहेर चिंतामग्न स्थितीत येरझारा घालत असतात तसा मी घालायला लागलो. वेळ झाल्यावर ३ बिप्सचा आवाज झाला. नीट बेक झाला की नाही हे पाहण्यास रेसिपी बुकमध्ये दिलेल्या टीपनुसार मी त्यात सुरी खुपसून पहिली. जर सुरी स्वच्छ निघाली तर केक बरोबर बेक झालाय. आणि समजा स्वच्छ नाही निघाली तर जुन्या हिंदी सिनेमातल्या आयांसारखं दोन्ही हातांचे तळवे कानांवर ठेवून ‘नहीऽऽऽ’ म्हणून किंचाळी फोडायची. (साहजिकच ही टीप माझी.) पण त्यावेळी मी शम्मी कपूर सारखा ‘याहू..’ असा ओरडलो. कारण तुम्हाला कळलंच असेल की खुपसलेली सुरी स्वच्छ बाहेर आली आणि केक बरोबर बेक झाला आणि चविष्टही.

मायक्रोवेव्ह ओव्हन चालू असताना पंखा लावला तरी चालतो. नाहीतर पारंपरिक गॅस शेगडीवर आई जेवण बनवत असताना पंखा चालू केला तर गॅस विझेल म्हणून ओरडा मिळायचा आणि उष्णतेने अंग चिकचिकीत होईपर्यंत जेवण बनवायचं हे पाहिलं होतं. त्यामुळे या यशस्वी प्रयोगानंतर पाककलेचे इतर प्रयोग करायचे देखील धाडस झाले. एकदा काही कारणाने माझ्या पालकांना मुंबई बाहेर जावं लागलं. त्यावेळी घरी एकटा असताना हिरव्या वाटण्याचा पुलाव केला. त्यात घातलेल्या पाण्याचं आणि मसाल्याचं प्रमाण चुकलं आणि चवीला थोडा मिळमिळीत झाला. पण त्यातल्या त्रुटी घालवून पुढच्या वेळी फक्कड पुलाव केला. मग वेगवेगळ्या प्रसंगी वेगवेगळे पदार्थ बनवायचा सपाट लावला. घरी मित्र-मैत्रिणी जमले तर पिझ्झा केला, तर वडिलांच्या वाढ दिवशी चिकन चिली खिलवून त्यांच्याकडून ‘मोगॅम्बो खुश हुआ’ अशी दाद मिळवली. या सगळ्या प्रवासात माझी आई, मोठी बहीण, आमच्या शेजारच्या आंटी-मिसेस कोचर, पाककृतींवर आधारित पुस्तकं यांची मदत झाली आणि उपयुक्त सल्ले मिळत गेले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काम झाल्यावर नीट स्वच्छ करणे, वेळोवेळी सव्‍‌र्हिसिंग करणे यामुळे आजही ओव्हन चांगला चालत आहे. इतकी काळजी घेताना पाहून वडील मला डिवचवायचे की लग्न झाल्यानंतर बायकोची काळजी घेशील की ओव्हनची? मागच्याच वर्षी माझं लग्न झालं. आणि त्यामुळे असेल (कदाचित) माझी स्वयंपाकघरातील लुडबुडसुद्धा कमी झाली. मग कधी साधं पाणी गरम करून दे किंवा पापड भाजून दे अशाप्रकारे ओव्हनचा माझ्याकडून उपयोग केला जातोय. परंतु ‘पहिलं प्रेम हे विसरता येत नाही’वाली थेअरी ओव्हनवर लागू होते. बायकोला जेव्हा माझ्या या पहिल्या प्रेमाबद्दल सांगितलं तेव्हा ती मला चिडवते की ‘हा ओव्हन म्हणजे पती, पत्नी और वो मधला ‘वो’ आहे..’

श्रीकांत चव्हाण

hi.shrikantchavan@gmail.com