अमेरिकेत गेलेल्या आपल्या नातवाचे खाण्यापिण्याचे हाल होऊ नयेत म्हणून इच्छा नसताना आजी अमेरिकेत गेली खरी पण कसे होते तिचे तिथले अनुभव?

आदित्यला अमेरिकेत एम.एस. करण्याची संधी मिळाली. म्हणून घरातले सर्वजण खूप आनंदात होते. पण त्याला अमेरिकेत राहावं लागणार म्हणून थोडी काळजीही वाटत होती. आतापर्यंत तो कधीही घरच्यांना सोडून फार दिवस एकटा राहिला नव्हता. शिवाय घरात स्वत:साठी काही बनवून खाणं त्याला माहितीच नव्हतं. त्यामुळे त्याचं कसं होणार याच विचारात सगळे होते.

आदित्यची आजी तर कित्येक वेळा डोळ्यातून पाणी काढायची. पण इलाज नव्हता. भविष्यात काही तरी चांगली कामगिरी करायची तर हे अटळ होतं. सगळी मुलं जातातच की या वयातून पुढे. यालाही होईल सवय हळूहळू म्हणून सर्वांनी मनाची तयारी केली, पण आजी काही केल्या ऐकेना. म्हणायची, ‘‘जे काही करायचं ते आपल्या देशात राहूनच कर.’’

आदित्य मात्र स्वत:मध्येच दंग होता. तरुण वय असंच असतं. नव्या आकांक्षा उराशी बाळगलेल्या असतात. ‘‘आजी तू ये ना माझ्याबरोबर अमेरिकेला,’’ असं म्हणत चेष्टा करायचा. मग आजी झिडकारायची. म्हणायची, ‘‘चल रे, माझी कसली फिरकी घेतोस? कधी विमानात बसलेही नाही मी आणि म्हणे चल अमेरिकेला!’’ त्यानंतर काही दिवसांनी आदित्य एकटाच अमेरिकेला गेला, पण तिथं रमला नाही. खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले त्यामुळे त्याची तब्येत बिघडायला लागली. अभ्यास, स्कॉलरशिप वगैरे सारं ठीक होतं, पण घरी आपलं कुणी नाही, कुणी चहा-पोहे करून देणारं नाही, यामुळे त्याचं शारीरिकपेक्षा मानसिकच झुरणं सुरू झालं होतं.

एक दिवस आदित्यच्या वडिलांना एक कल्पना सुचली. नोकरीमुळे आपल्या दोघांना अमेरिकेला जाता येत नाहीए, पण आजीला पाठवलं तर आदित्यकडे? ती हुशार आहे, तिची तब्येतही ठणठणीत आहे, छोटी छोटी रोजची कामे करू शकते, आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा आदित्यवर फार जीव आहे. त्यालाही सोबत होईल. कल्पना छान होती, पण आजी सोडून सर्वांना आवडली. ‘उगाच नसते प्रयोग करू नका. माझं काही बरं-वाईट झालं तर अमेरिकेत? मला नाही मरायचं तिथं.’ आजी येता-जाता तेच बोलायची. कसं समजवणार हिला? सर्वांनाच प्रश्न पडला.

शेवटी नातवंडाचं प्रेम जिंकलं. आदित्यनं आजीला पटवलं. ‘‘आजी, तुला मी कसलाच त्रास होऊ देणार नाही. बाबा विमानात बसवून देतील आणि मी विमानतळावर तुला घ्यायला येईन.’’ असं आदित्यनं म्हटल्यावर आजी कशीबशी तयार झाली. विशेष म्हणजे तिला व्हिसाही चटकन मिळाला. नियम समजावणं, कागदपत्रं पडताळणी, उपदेश वगैरे सगळ्या दृष्टीने तिची तयारी झाली. अखेर आजी अमेरिकेला जायला निघाली.

व्हील चेअरवर बसून जेव्हा तिने सर्वांचा निरोप घेतला तेव्हा साऱ्यांनाच गहिवरून आलं. आपण करतोय ते चूक की बरोबर या विचारानं आदित्यच्या बाबांना दडपण आलं होतं. इमिग्रेशन, चेकिंग कसं करायचं हे सारं आदित्यनं वेबकॅमवर आजीला शिकवलं होतं. तिला इंग्रजी मात्र बोलता येत नव्हतं. पण चहा, गरम पाणी, शाल, टॉयलेटसंबंधी काही अडचण आली तर एअर होस्टेसला सांगण्याची वाक्यं कागदावर लिहून आणि चित्र काढून दिली होती. हे सारं पाठ करून झालं होतं. पण तरीही हा तिचा पहिलाच विमान प्रवास असल्यामुळे आपण ऑक्सिजनवरच आहोत असं आजीला वाटत होतं. सुदैवानं एअर होस्टेस चांगली होती. आजीची नातच जणू! तिनं आजीला जास्तीची फळं, बिस्किटं दिली. अंगावर शाल पांघरली. कोण कुठली पोरगी आपल्यासाठी किती करतेय असं वाटलं आजीला. तिनं एअर होस्टेसच्या गालावरून हात फिरवला. तिची दृष्ट काढली. हे सारं बघून तिलाही गंमतच वाटली असेल. ड्युटीवर असतानाच तिला प्रथमच हा आगळावेगळा अनुभव आला असेल.

प्रवास संपला एकदाचा. विमानतळावर तिला नेण्यासाठी तिचा लाडका नातू आदित्य आला होता. दोघेही उराउरी भेटले. आता सारं काही आदित्यच बघणार असल्यामुळे आजी निर्धास्त झाली. खूप मोठी लढाई जिंकली आजीनं! काही महिन्यांतच ती अमेरिकेत चांगलीच रुळली. नातवाला घरचं छान छान करून खाऊ घालू लागली. स्वत:ची तब्येत आणि आदित्यचं वेळापत्रक छान संभाळू लागली. शिवाय देवपूजा आदी सगळं नियमित चालूच होतंच. आजूबाजूच्या भारतीय लोकांच्या ओळखी झाल्या. कुणाला मेतकूट शिकव, कुणाला पाकातले लाडू तर कुणाला पुरण करून दे, असे तिचे उद्याोग सुरू झाले. थोडक्यात काय, तर आदित्यची आजी आता सर्वांची लाडकी आजी झाली. आजी आता कुर्ता घालू लागली. मोडकंतोडकं इंग्लिश बोलू लागली. मोबाइल फोनही वापरू लागली.

आदित्य बऱ्यापैकी स्थिरावला आणि लवकरच त्याला दुसरी चांगली नोकरीही लागली. आजीच्या हाताखाली बरेच खाद्यापदार्थही तो बनवायला शिकला. मात्र आता आजीला वाटलं आपली जबाबदारी संपली. तिला भारतात परत जाण्याचे वेध लागू लागले. आजीला फार त्रास नको म्हणून मग आदित्यनंही तिला भारतात परत पाठवण्याचा निर्णय घेतला. आजी भारतात येण्यासाठी निघाली. जड अंत:करणानं आदित्यनं तिचा निरोप घेतला. विमानात बसताना आपण किती घाबरलो होतो, ते आजीला आठवलं. खरं तर विमानाचा प्रवास किती सोप्पा. कुठेही हरवलो तरी शोधून काढून कुणीतरी घरी पोहोचवेल हा आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला होता. गंमत म्हणजे येताना जी एअर होस्टेस होती तीच आताही होती. तिनं आजीला लगेच ओळखलंच नाही, कारण आता आजी खूपच बदलली होती. तिची तब्येत सुधारली होती. चेहऱ्यावर छान तुकतुकी आली होती. पर्स घेऊन आजी विमानातून उतरली. बॅगा ताब्यात घेऊन ट्रॉली ढकलत निघाली. सामान खूप वाढलं होतं. ‘याच्यासाठी हे आणि त्याच्यासाठी ते’ असं बरंच काही आणलं होतं तिनं.

आदित्यचे बाबा तिला घ्यायला आले होते. ट्रॉली ढकलत येणाऱ्या आपल्या आईचं हे रूप बघून ते हबकूनच गेले. जाताना मुळुमुळु रडणारी आपली आई ती हीच का? ती नेहमी सर्वांची दृष्ट काढायची, पण आज तिचीच दृष्ट काढावी असं त्यांना वाटलं. पुढचे काही दिवस अमेरिकेतले किस्से ती सगळ्यांना रंगवून सांगत होती. शेजारीपाजारी, तिच्या मैत्रिणी सगळ्यांनी तिचा सत्कार केला. आजीनंही त्यांच्यासाठी प्रेमाने आणलेल्या वस्तू त्यांना दिल्या.

बघता बघता काळ पुढे सरकू लागला. आदित्यची नोकरी उत्तमच होती आणि आता कुण्या मैत्रिणीबरोबर त्याचं सूत जमलं असं कानावर आलं होतं. ते ऐकून बोळकं विस्फारत आजी म्हणाली, ‘आता मी परत जाणार सर्वांच्या आधी अमेरिकेला नातसून बघायला.’

shobha.pingle@yahoo.com