संसाराच्या व्यापातून मान वरती करण्याची उसंत मिळाल्यावर त्या मैत्रिणींनी तरुणपणी छंद म्हणून शिकलेल्या सतारीवरची धूळ झटकून स्वरसाज चढवला आणि आज या आठ जणींनी सतारवादनाचे कार्यक्रम करत आपल्या या छंदाला विश्वविक्रमी रूप दिलंय.
त्या सगळ्या मध्यमवयीन गृहिणी. मुलं कर्तीसवरती होऊन आपापल्या मार्गाला लागल्याने संसाराच्या व्यापातून मान वरती करण्याची उसंत मिळालेल्या. तरुणपणी छंद म्हणून शिकलेल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या पुरचुंडय़ा प्रत्येकीने मुठीत धरून ठेवलेल्या. जरा वय झाल्यावर गरज पडली तर वापरण्यासाठी, पण अवचित एक लखलखीत संधी त्यांच्यासमोर आली. आणि दार उघडून या संधीचे स्वागत करणाऱ्या या मैत्रिणींच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळालं. या वळणावर होती स्वरांची दाट छाया आणि लयीचा घुंगरवाळा. त्यामुळे बघता-बघता या मैत्रिणींना स्वत:ची वेगळी ओळख मिळाली, अभिमानाने मिरवावी अशी.
ही संधी नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त हातात आली. सरस्वतीच्या दरबारातील या तालेवर उत्सवाचा प्रारंभ एखाद्या वाद्यवादनाने व्हावी अशी कल्पना आयोजकांपैकी एक, वासुदेव दशपुत्रे यांच्या मनात आली. तेव्हा नाशिकमध्ये काही स्त्रिया सतार वाजवत असल्याची त्यांना कुणकुण असावी. या शहरातील प्रसिद्ध सतारवादक डॉ. उद्धव अष्टुरकर यांच्या मदतीने शोध घेतला तेव्हा तब्बल आठ जणी भेटल्या आणि त्यांच्याबरोबर साहित्य संमेलनाची नांदी ठरावी अशी ‘यमन’ची बंदिश विणली जाऊ लागली. सगळ्या सतार शिकलेल्या पण प्रत्येकीवर वेगळ्या घराण्यांचे संस्कार आणि त्यावरही, फारसा सराव नसल्याने धूळ बसलेली. वाद्यावरची आणि मनावरची धूळ झटकून प्रत्येकाची सतार सुरात वाजू लागली आणि उद्घाटनाच्या संध्याकाळी त्या ‘यमन’ने जो माहौल जमवला त्यातून प्रत्येकीने पुढे एक वाट उजळवली, आनंदाची, स्वरांची.
वासंती खाडिलकर, उमा निशाणदार, राधिका गोडबोले, अंजली नांदूरकर, सोनल शहाणे, सुनीता जळगावकर, सुप्रिया फणसळकर आणि मोहिणी कुलकर्णी या आठ मैत्रिणींनी त्या संध्याकाळी जणू एकमेकींना वचन दिले. ती बंदिश पुढे नेण्याचे. प्रत्येकाची घराणी, सतारीवर उमटणारा स्ट्रोक भले वेगळा असेल पण उद्दिष्ट तर समान होते. संगीताच्या साधनेचा असीम आनंद मिळविण्याचे. मग डॉ. अष्टुरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली दर रविवारी सगळ्या सगळ्या एकत्र भेटू लागल्या. सरावासाठी साधनेसाठी यापूर्वीचे प्रत्येकीचे शिक्षण झालं होतं. परीक्षेसाठी, आता त्या वाद्याशी दोस्ती करीत वेगवेगळ्या रागांच्या वाटांवरील प्रवास सुरू झाला. मुक्तपणे त्या रागांच्या सौंदर्याचा शोध घेत. दर रविवारच्या भेटीत त्या उस्ताद शाहीद परवेझ यांच्या इटावा घराण्याची तालीम घेऊ लागल्या. या घराण्याची ओळख म्हणजे गायकी अंगाने वाद्यवादन. एकदा नियमितपणे शिक्षण आणि मनापासून साधना सुरू झाल्यावर त्याची उत्सुक चर्चा त्यांच्याच मित्र-परिवारात सुरू झाली आणि संधीच्या छोटय़ा खिडक्या नव्याने उघडू लागल्या. इन्डो-फ्रेंच सांस्कृतिक  देवाण-घेवाणीच्या अंतर्गत काही फ्रेंच नागरिक नाशिकमध्ये येणार होते. यानिमित्ताने दोन देशांमधील सांगीतिक विचार-कल्पनांची देवाण-घेवाण करण्याची कल्पना यजमानांच्या मनात आली आणि मग फ्रेंच कलाकार आणि या आठ मैत्रिणी यांचा एकत्र सराव सुरू झाला. ‘स्वर जरा चढा लागलाय’ किंवा ‘तीन मात्रांत ही तान बसव’ हे एकमेकांना समजेल अशा इंग्लिश भाषेत समजावण्याचा आटापिटा सुरू झाला, पण तरीही प्रत्यक्ष कार्यक्रमात दोन्ही देशाच्या या कलाकारांनी रंगतदार सहवादन केले. पाश्चात्त्य वळणाची फ्रेंच कलाकारांची वाद्ये आणि भारतीय सतार यातून निघालेल्या वेगळ्या जातकुळीच्या स्वरांनी हातात हात गुंफल्यावर उमटलेल्या स्वराकृती अगदी अनोख्या पण सुरेल होत्या.
या प्रवासातील आजवरचा सर्वात रोमांचकारी अनुभव मिळाला तो श्री रवीशंकर यांच्या कल्पनेतून जन्माला आलेल्या एका अनवट प्रयोगामुळे. एकाच वेळी बाराशे सतार वादकांनी एकत्रितपणे वाद्यवादन करण्याचा हा प्रयोग विश्वविक्रम करणारा. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे एक निस्सीम साधक विजय हाके यांनी गुरुजींतर्फे या स्त्रियांना या प्रयोगात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले. हंसध्वनी, गारा आणि बागेश्री या तीन रागांच्या बंदिशीची सीडी त्यांना सरावासाठी मिळाली. सरावानंतर चोख बसलेल्या या बंदिशी मोबाइलवर रेकॉर्ड करून या कार्यक्रमाच्या समन्वयकांना ऐकवल्या गेल्या तेव्हा त्यांनाही जाणवलं, नाणं चोख आहे! त्यामुळे नोएडाच्या त्या भव्य पटांगणात नऊ पातळ्यांवर केल्या गेलेल्या आसन व्यवस्थेत या आठ मैत्रिणींचे स्थान सगळ्यात पुढे होत. साधनेतून येणारा आत्मविश्वास आणि या आत्मविश्वासातून येणारी सहजता या वादनात होती. एका वेळी देशभरातील बाराशे सतारवादकांचा समन्वय साधण्याची किमया साधता आली ती आधुनिक तंत्रज्ञानामुळे. या मैत्रिणींच्या मनात त्या कार्यक्रमाच्या आठवणी आजही टवटवीत आहेत, त्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’च्या अत्यंत नेटक्या पण जिव्हाळय़ाचा स्पर्श असलेल्या व्यवस्थेमुळे!
एव्हाना, या प्रत्येकीच्या मनात एक पाऊल पुढे टाकण्याची इच्छा मूळ धरू लागली होती. आपल्या गुरूंच्या, शाहीदभाईंच्या नावाने गुरूकुल स्थापन करण्याची सतारीसारखे वाद्य अधिक लोकप्रिय व्हावे, तरुण गायक-वादक यांना व्यासपीठ व भविष्यात शिष्यवृत्ती देऊन प्रोत्साहन द्यावे. लयकारी रागसौंदर्य याविषयी समृद्ध समज निर्माण व्हावी या उद्देशाने मग उस्ताद शाहीद परवेझ संगीत गुरुकुलाची स्थापना २०१० साली केली. उद्घाटनाला केवळ शाहीदभाईच नाही तर अरविंद पारीख, पं. उल्हास बापट अशी मातब्बर मंडळीही आली. प्रत्येकीने व्यक्तिश: वर्गणी भरून हे गुरुकुल केले, इतकी यामागची इच्छा प्रामाणिक होती. गेल्या तीन वर्षांत या गुरुकुलातर्फे  ‘लयकारी’वर पं.उल्हास बापट यांचे शिबीर आणि अनेक कार्यक्रम घेतले गेले. त्यात पाच सतारवादक भावांचे सहवादन ‘पंचसतार’ त्याखेरीज अर्जना कान्हेरे, शिवानी मारुलकर दसककर यांच्या मैफली अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. नाशिकमध्ये या आठ मैत्रिणी आणि त्यांची सतार आता प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे विविध मंडळे संगीत महोत्सवांमधून त्यांना आमंत्रण देऊ लागली आहेत. पण नेहमी आठ जणीच वादन करायला जातात असं घडतेच असे नाही. एखाद्या कार्यक्रमात दोघी, कधी चौघी तर कधी सगळ्याजणी अशी त्यांची हजेरी असते, याचं कारण प्रत्येकीला आपल्या वादनााविषयी आत्मविश्वास आला आहे. प्रत्येकीचा स्वत:चा रोजचा घरातील रियाझ सुरू झाल्याने केवळ छंद, हौस यापुरती आता ही गोष्ट उरलेली नाही. त्यापलीकडे उभ्या जरा अधिक उंच शिखरांचे माथे त्यांना खुणावू लागले आहेत. पुण्यात झालेल्या अखिल भारतीय सांस्कृ तिक संघटनेच्या गायन-वादन स्पर्धेत उमा निशाणदार यांना सोलो वादनात तर गटाला दुसरे पारितोषिक मिळाले आहे.
‘‘आम्ही सगळ्या जणी भेटल्यावर कधीही सतारीखेरीज दुसरा विषय आमच्या गप्पांमध्ये डोकावतसुद्धा नाही. कार्यक्रम करताना जेवढे लक्ष सहवादनावर असते तेवढाच प्रयत्न या सहवादनात काही क्षण प्रत्येकीला स्वतंत्र वादनाचे मिळावे यासाठीही असतो.’’ त्या सांगतात. एका अर्थाने प्रत्येकीला हा सहजीवनाचा मंत्रच मिळतो आहे. एकमेकींच्या साथीने पुढे जायचे पण त्यात स्वत:ची मुद्रा मिटू द्यायची नाही! अशा वेळी मग एकमेकींना सांभाळून घेणं, मागे राहिलेल्याची वाट बघणं, एकमेकींवर कुरघोडी करण्याचा करंटेपणा न करणं हे सगळं ओघाने आलंच! तरुण वयातच हातातून निसटून गेलेल्या एखाद्या गोष्टीचे बोट पुन्हा धरता येते आणि त्याच्या आधारे आयुष्य एका वेगळ्या, आनंदाच्या वेगळ्या वाटेवर नेता येऊ शकते याचे हे छान उदाहरण या मैत्रिणींनी समोर ठेवलंय.     
vratre@gmail.com