संपदा सोवनी

गावपातळीवर समाजाशी आरोग्यसंवाद साधण्याचं काम करताना लोकांमध्ये वर्षांनुवर्षांपासून रुजलेले गैरसमज आणि अंधश्रद्धांबरोबरच जातिभेदाचाही सामना कार्यकर्त्यांना करावा लागतो. या सगळ्याचा अनुभव घेतलेल्या मटिल्डा कुल्लू या ओडिशातील एक ‘आशा’ आरोग्य कार्यकर्त्यां. ‘करोनायोद्धा’ म्हणून कामगिरी बजावताना ‘फोर्बज्’च्या भारतातील निवडक शक्तिशाली स्त्रियांच्या यादीत मटिल्डा यांचा समावेश झाला आहे. तुटपुंज्या पगारावर काम करणाऱ्या या कार्यकर्तीच्या तळमळीचंच मिळालेलं हे फळ. केवळ आरोग्यसेवकांसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही प्रेरणादायी ठरलेल्या मटिल्डा कुल्लू यांचा हा परिचय.

मटिल्डा कुल्लू. वय- ४५. ‘फोर्बज्’नं ‘डब्ल्यू पॉवर- सेल्फ मेड विमेन’ ही भारतातील २१ शक्तिशाली स्त्रियांची यादी नुकतीच प्रसिद्ध केली. त्यातील मटिल्डा यांच्या नावानं सर्वाचं लक्ष वेधून घेतलं आणि त्या अचानक प्रकाशझोतात आल्या.

 या कुठल्या मोठय़ा कंपनीच्या प्रमुख वा व्यावसायिक नव्हेत. अगदी साध्या राहणाऱ्या, सायकलवर फिरणाऱ्या मटिल्डा यांच्यावर ओडिशाच्या सुंदरगड जिल्ह्य़ातल्या बारागाव येथील ९६४ लोकांच्या आरोग्याची प्राथमिक जबाबदारी आहे. त्या गावातल्या ‘आशा’ कार्यकर्त्यां आणि आता ‘करोनायोद्धा’ही. उत्पन्न प्रतिमहा जेमतेम साडेचार हजार रुपये! पण आपण लोकांचा जीव वाचवण्यात अतिशय महत्त्वाची मदत करतो, याचा त्यांना अत्यंत अभिमान आहे.

गेली १५ वर्ष गावात आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करताना मटिल्डा यांनी अनेक आव्हानं पार के ली आहेत. ग्रामीण भागातला शिक्षणाचा अभाव, लोकांचा वैद्यकीय सेवेवरील अविश्वास, अंधश्रद्धा, जातीपातींची रुजलेली मुळं असे कित्येक अडथळे पार करत त्या वाटचाल करत राहिल्या. यातील विशेषत: अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यास अनेक वर्ष लागली. आजारी पडल्यावर तंत्रमंत्राचे उपचार करून घेणं हाच मटिल्डा यांच्या परिसरातील बहुसंख्य लोकांचा शिरस्ता होता. रीतसर वैद्यकीय सेवा घेण्याबद्दल लोकांना सतत सांगणं, मांत्रिकाकडील उपचारांचे संभाव्य दुष्परिणाम लक्षात आणून देणं आणि त्यांचं मन वळवणं हे मोठंच आव्हान होतं. त्यात त्या बऱ्यापैकी यशस्वी झाल्या याचं समाधान त्या आवर्जून व्यक्त करतात. यात ग्रामीण स्तरावर प्रकर्षांनं जाणवणारा जातिभेदाचा अडसर आणि त्यानुसार व्यक्ती-व्यक्तीस मिळणारी वागणूक हा मुद्दाही लक्षात घ्यायला हवा; पण कामाचं लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवून मटिल्डा चालत राहिल्या.     

‘आशा’ म्हणजे ‘अक्रे डिटेड सोशल हेल्थ अ‍ॅक्टिव्हिस्ट’. गावांमध्ये घरोघरी जाऊन लोकांच्या आरोग्याची खबरबात घेणं, त्यांना विविध आजारांबद्दल आणि उपचारांबद्दल माहिती देणं, गर्भवतींच्या तपासण्या, पोषक आहार व लसीकरणाबद्दल, तसंच नवजात बाळांच्या आरोग्यासाठी मार्गदर्शन करणं, किशोरवयीन मुलींशी आणि त्यांच्या आईंशी संवाद साधणं, ही ‘आशा’ कार्यकर्त्यांची सगळ्यांत महत्त्वाची कामं. गेल्या दीड-दोन वर्षांमध्ये या आरोग्य कार्यकर्त्यांवरील कामाची जबाबदारी आणखीनच वाढली. या स्त्रिया ‘करोनायोद्धा’ही झाल्या. विशेषत: जिथे निरक्षर आणि अल्पशिक्षित असा गरीब समाज मोठय़ा प्रमाणावर आहे, तिथे करोनापासून कसा बचाव करावा, इथपासून आता लसीकरण पूर्ण करून घेण्यापर्यंतच्या प्रवासात ‘आशा’ कार्यकर्त्यांनी बजावलेली भूमिका फार मोलाची होती. त्यात आरोग्यविषयक साधनसामग्रीची कमतरता ग्रामीण भागात पाचवीलाच पुजलेली असते. अशा ‘आशां’मधून मटिल्डा यांच्या नावाची मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘फोर्बज्’च्या यादीत निवड होणं, ही विशेषच बाब.

करोनाच्या काळात चाचण्या करण्यासाठी मटिल्डा दररोज त्यांना दिलेल्या भागातील जवळपास ५० हून अधिक घरांना भेटी देत असत. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांना स्वत:लाही करोनाचा संसर्ग झाला. मात्र दोन आठवडय़ांच्या विश्रांतीनंतर त्या पुन्हा कामावर रुजू झाल्या. गावांमध्ये लसीकरणाचं महत्त्व पटवून देणं ही जिकिरीची गोष्ट होती. के वळ तेवढं करून थांबता येत नव्हतं, तर वृद्धांच्या लसीकरणासाठी त्यांना लसीकरण केंद्रांपर्यंत नेण्या-आणण्याचं नियोजन करण्यापर्यंत विविध पातळ्यांवर ‘आशां’नी लक्ष घातलं. मटिल्डा यांची करोनाकाळातील सेवा आणि आता झालेला गौरव याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनीही ‘ट्वीट’ करून त्यांचं अभिनंदन केलं.

आणखी एक गोष्ट म्हणजे आपल्या सामाजिक परिस्थितीत यातील जवळपास सगळ्या कार्यकर्त्यां बाहेर कोणतीही जबाबदारी निभावत असल्या, तरी त्यांना सांसारिक कामं चुकत नाहीत. मटिल्डाही पहाटे लवकर उठून घरातील कामं, स्वयंपाक, गाईगुरांची देखरेख हे सांभाळूनच ‘आशा’ म्हणून असलेलं काम आस्थेनं करत राहिल्या.   

निळ्या रंगाची साधी साडी नेसलेल्या, कोणताही दागिना न घातलेल्या आणि शांतपणे सायकलवरून घराघरांत जाऊन विचारपूस करणाऱ्या मटिल्डा यांच्याकडे या गौरवानंतर माध्यमांचा मोर्चा वळला. प्रसारमाध्यमांच्या प्रश्नांची त्या उडिया भाषेत उत्तरं देत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास तर दिसतोच, पण ‘आपण योग्य मार्गावर आहोत’ हे प्रगल्भतेतून आलेलं समाधान आणि आणखी खूप सेवा देण्याचा उत्साहदेखील जाणवतो. तो आत्मविश्वास आणि उत्साह तमाम आरोग्य कार्यकर्त्यांनाच नव्हे, तर इतरांनाही प्रेरणा देईल.

chaturang@expressindia.com