अर्चना मुळे

पहाडी तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी पर्यटकांना डोलीतून पहाडावर नेणारे डोलीवाले असतातच, पण झारखंडमधल्या पार्श्वनाथ पहाडावर पुरुषांबरोबर स्त्रियाही डोली उचलताना दिसल्या. काही वेळा अनवाणी सत्तावीस किलोमीटर खडा पहाड तुडवतात. अतिगरिबीमुळे त्यांनी ही वाट निवडली असली, तरी ते दृश्य म्हणजे देशाच्या अमृतकालातही आज किती समाज असे आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक बाबतीत मागासलेले आहेत त्याचं विषण्ण करणारं कटू सत्य.

nashik, Adulterated Goods, Worth Rs 54 thousand, Adulterated Goods Seized, Adulterated prasad, Trimbakeshwar Adulterated prasad, nashik news,
त्र्यंबकेश्वरमध्ये ५४ हजार रुपयांचा भेसळयुक्त माल जप्त
GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
Tipeshwar Sanctuary
VIDEO : टिपेश्वर अभयारण्यात वाघच नाही, तर रानकुत्र्यांसह ‘या’ वन्यप्राण्यांना पर्यटकांची पसंती
(11 goats died in attack by stray dogs in Jalgaon )
जळगावात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात ११ बकर्‍या मृत्युमुखी

‘डोली’ हा शब्द कानी पडला, की डोळय़ासमोर येते विवाहप्रसंगी सजूनधजून डोलीत बसलेली नववधू किंवा पूर्वी राजघराण्यातल्या वा श्रीमंत घरांतल्या स्त्रियांना फिरण्यासाठी वापरली जाणारी डोली किंवा मेणा. पण आजही विविध पहाडांवर दिसणारे डोलीवाले म्हणजे हातातोंडाशी गाठ असलेले अनेक गरजू, गरीब. झारखंडमध्ये गिरीडीह जिल्ह्यात पार्श्वनाथ पहाड (पारसनाथ पहाडावर) डोली वाहून नेणाऱ्या स्त्रिया पाहिल्या तेव्हा आश्चर्य वाटलं. यात्रेकरूंना डोलीत खांद्यावर घेऊन सत्तावीस किलोमीटर खडा पहाड तुडवणाऱ्या संथाल स्त्रियांना भेटले तेव्हा त्यांचं जगणं समोर आलं.
रापलेला चेहरा, बारीक अंगकाठी. थकलेलं, दमलेलं शरीर आणि घामेजलेला चेहरा. अनवाणी चालणं. जाड दोन लांब काठय़ा आणि काठय़ांच्या मधोमध खुर्ची, ही डोली. डोली धरणाऱ्या मागे दोन आणि पुढे दोन स्त्रिया आणि त्यांच्याबरोबर आलटून पालटून खुर्ची उचलून घेण्यासाठी मदत व्हावी म्हणून पळणाऱ्या दोन स्त्रिया. प्रत्येकीच्या अंगावर जुनी फाटकी लुगडी. शिक्षणाचा गंध नाही, ‘संथाली’शिवाय दुसरी कुठली भाषा अवगत नाही. पारसनाथ पहाडावरच्या या डोलीवाल्या स्त्रियांबद्दल वाचताना, ऐकताना यांच्या ताकदीबद्दल शंका येईल. त्या डोली उचलू शकतात यावर स्वत: डोळय़ानं पाहिल्याशिवाय कदाचित विश्वासच बसणार नाही. पण जेव्हा त्या यात्रेकरूचं पन्नास-साठ किलो वजन उचलून डोंगर चढतात तेव्हा सगळय़ा प्रवाशांच्या नजरा आपोआप तिकडे वळतात.

हे जैन धर्मीयांचं एक महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. संपूर्ण पहाड खडा असल्यामुळे परतीच्या प्रवासापर्यंत भले भले दमतात. पायी चालणाऱ्या तीर्थयात्रींच्या हातातसुद्धा आधारासाठी काठी असते, कारण थोडं ओझंही अशा वेळी पेलवत नाही. जसंजसं वर जाऊ तसातसा जोराचा वारा अडथळे निर्माण करतो. थंडीमुळे माणसं बोबडी बोलू लागतात. गारठल्यामुळे बोटं थिजून जातात. अशा वातावरणात रोज या स्त्रिया एकदा तरी वर-खाली ही यात्रा करतातच. त्या अनवाणीच असतात किंवा साधी स्लिपर वापरतात. कारण हे तीर्थक्षेत्र अत्यंत पवित्र मानलं जातं. शिवाय पायांत चपला घालून चालणं शक्यही होत नाही. अतिगरिबीमुळे पोटाखातर त्यांनी ही वाट निवडलीय, हे लगेच लक्षात येतं.

गिरीडीहचा हा कठीण प्रवास करताना त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा शांत बसू देत नव्हती. त्यांच्याशी बोलायचं तर कधी, हा एक प्रश्न होता कारण डोली घेऊन चालताना त्यांना एक शब्दही उच्चारणं अशक्य होतं. नंतर कुठे निघून जातील कळणारही नाही, हेही माहीत होतं. त्यांना कसंबसं गाठून मध्येच प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्यावर त्या त्यांच्या भाषेत आणि खाणाखुणा करून कुजबुजल्या. लक्षात आलं, की या स्त्रियांना त्यांची भाषा सोडून इतर भाषा समजत नाही. आम्ही हिंदी समजेल अशा डोलीवाल्या पुरुषांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्याकडूनही समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत, कारण तेही थकले होते. मग फक्त या डोलीवाल्या स्त्रियांचं निरीक्षण करणं आणि जे दिसतंय ते सजगपणे टिपणं, हाच मार्ग उरला. काही दिवसांनी तिथे गेलेल्या माझ्या एका मैत्रिणीला-उज्ज्वला चौधरीला मात्र एकीशी बोलता आलं. ती हिंदीत बोलत होती आणि त्यांची डोलीही थोडी वेगळी होती. एक जण पुढे आणि एक जण मागे अशा दोघीच ही डोली उचलत होत्या. एका यात्रेचे एक हजार रुपये घेतले जातात आणि शक्यतो ५० किलो- पर्यंतच्या वजनाची व्यक्ती त्या घेऊन जातात. मग तो पुरुष असला तरी चालतो, असं त्यांनी सांगितलं. डोलीच्या कार्यक्षेत्रात स्त्री-पुरुषांच्या मोबदल्यात फरक दिसून आला नाही. इतर आर्थिक, शैक्षणिक तफावतही सारखीच. आदिवासी समाजातल्या डोलीवाल्या पहाटे प्रवाशांना गरम पाणी आणून देणं, खोली स्वच्छ करून देणं, चहा आणून देणं अशी कामं करून त्याचे पाच ते वीस रुपये घेतात. एक बादली गरम पाणी खोलीत आणून द्यायचे पंधरा ते वीस रुपये. परंतु त्यातली काही पर्यटक भाव करताना दिसले. पारसनाथ आणि आजूबाजूच्या परिसरातही मुलंबाळं, स्त्री, पुरुष भीक मागताना दिसतात. संथाल आदिवासी समाज सावकाश गतीनं का होईना, पण शहरी प्रवाहात येऊ पाहतोय. तरीही तिथल्या स्त्रियांची आणि त्या समाजाची शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक पीछेहाट दिसतेच.

इथे पाहिलेले सगळे डोलीवाले, मग ती बाई असो वा पुरुष, आजच्या आधुनिक जगातही शिक्षणापासून वंचित आहेत. डोली उचलून पोट भरणं याशिवाय दुसरा कुठलाच व्यवसाय ते करू शकत नाहीत. याचं कारण काय असावं? उदासीन शासनव्यवस्था, की इथल्या लोकांच्या मानसिक मर्यादा? अनेक स्थानिक मुलं शाळेत जात नसल्यामुळे गल्लीबोळात भरदिवसा त्यांच्या कुवतीनुसार पैशांचे खेळ खेळताना, भीक मागताना दिसली. अंगाला चिखल लावून वेडय़ावाकडय़ा उडय़ा मारून आपल्याकडे लक्ष वेधून घ्यायचं आणि पैसे मागायचे असेही उद्योग दिसले. या मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तिथल्या सरकारनं विशेष प्रयत्न करायला हवेत, असं आवर्जून वाटलं.

पहाडी भागातले लोक पोटापाण्यासाठी पूर्वी शिकार करायचे. आजही बहुसंख्य लोकांकडे चरितार्थ चालवण्यासाठी फार वेगळ्या व्यवस्था उपलब्ध नाहीत. छोटी छोटी दुकानं आणि डोली उचलण्याची कामंच ते करतात. त्यातून कसंबसं पोट भरत असावं. आपण जगतो त्यापेक्षा खूप वेगळं असं एक जग आहे याची त्यांना जाणीव आहे, पण त्या जगाशी त्यांचा थेट संबंध आलेला नाही. त्यांचं राहणीमान अत्यंत साधं आणि गरजा मर्यादित आहेत. झोपडीवजा घरं, मोजकेच कपडे आणि डाळभात यासारखं जेवण. या समाजातील तरूण काटक आहेत. यांच्या शारीरिक तंदुरुस्तीचा खरंतर देश- विकासात, समाजविकासात निश्चितच उपयोग करून घेतला जाऊ शकतो. त्यांच्या हाताला काम देणं गरजेचं आहे. हाताला काम नाही, बुद्धीला ताण नाही, यामुळे या भागात व्यसनाधीनता मोठय़ा प्रमाणात दिसली. ती व्यसनाधीनता स्थानिक स्त्रियांना पसंत नाही, हेही दिसून आलं. परंतु त्यांनी आपला कष्टाचा आणि मिळेल ती कामं करण्याचा मार्ग अवलंबला आहे. त्यांच्यासाठी डोली उचलणं हा त्याचाच भाग आहे.

खरंतर संथाल आदिवासी समाजात स्त्रियांचा आदर केला जातो. मुलीच्या जन्माचं स्वागत केलं जातं. लग्न ठरवताना मुलींच्या मताचा आदर केला जातो. ही जमेची बाजू म्हणायला लागेल. स्वत:च्या प्रथा, परंपरांची चांगली जाण या स्त्रियांना आहे. त्यांना शिक्षणाच्या आणि नोकरीच्या चांगल्या संधी मिळणं किती आवश्यक आहे, हे डोलीवाल्या स्त्रियांकडे पाहताना वारंवार मनात येत होतं.गिरीडीह पारसनाथ यालाच ‘शिखरजी’ म्हणतात. शिखरजीमध्ये अनेक राजकीय नेते, विविध संस्थांचे सदस्य जाऊन आले आहेत. दरवर्षी देशविदेशातून लाखो तीर्थयात्री येतात. काही जण पायी पहाड चढतात, काही जण डोली करतात. पण डोलीवाल्यांच्या प्रश्नांची जाणीव कितीजणांना होते याबद्दल शंका वाटते. काही तीर्थकऱ्यांना वाटतं, की दुसऱ्या माणसाला असं आपलं ओझं उचलायला लावणं हे पाप आहे, म्हणून डोली नको. दुसरीकडे डोलीवाले मात्र प्रवाशांना अगदी राग येईपर्यंत गळ घालत असतात, कारण त्यावर त्यांची चूल अवलंबून असते. चरितार्थ अवलंबून असतो.

शिखरजीमधे वीस जैन र्तीथकर मोक्षास गेले आहेत. प्रत्येक र्तीथकरांच्या निर्वाणस्थळी त्यांच्या पादुका आहेत. त्यांचं दर्शन घेणं, अघ्र्य देणं, प्रदक्षिणा घालणं अशी तीर्थयात्रींची पद्धत असते. या ठिकाणी माकडांचा हैदोस आहे. बऱ्याच वेळा माकडांचे हल्लेही होतात. काही वेळा यात्रींवर आदिवासी हल्ले होतात. अशा वेळी तिथला मूळ निवासी असणारा संथाल समाज मदतीला येतो. त्यामुळे यात्रेकरू आणि हा समाज यांच्यात काही काळापुरतं एक अनोखं नातं तयार झालेलं असतं. त्यासाठी का असेना, पण या समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त करायला हवी.हे पवित्र, प्रभावी तीर्थस्थळ आहेच, पण इथे अनेक पुरातन छोटीमोठी मंदिरं आहेत. तरीही कितीतरी नवी भव्यदिव्य मंदिरं बांधली जात आहेत. अशा वेळी वंचित, मागास, जंगली आयुष्य जगणाऱ्या या समुदायाचाही विचार व्हायला हवा. डोलीवाल्या स्त्रियांच्या प्रश्नांकडे प्रामुख्यानं लक्ष द्यायला हवं. त्यांचे दीनवाणे चेहरे बघून हृदयाला पीळ पडतो.
त्यांना पाहिल्यापासून ‘डोली’ म्हटलं, की मला तरी चित्रपटांतली लग्नांची गाणी न आठवता या स्त्रियाच आठवतात! सध्या तरी आपण त्यांच्या जिद्दी, कष्टकरी वृत्तीला सलाम करू शकतो आणि भविष्यात तरी ही परिस्थिती बदलेल अशी आशा.