संकेत पै

जीवनात आनंद सुखासुखी मिळत नाही. तो निर्माण होण्याची प्रक्रिया घडवून आणावी लागते! सततच्या घाई-गडबडीला बळी पडण्यापेक्षा जीवनात थोडा ‘ठहराव’ तुम्हाला आणायचा आहे का? मुख्य म्हणजे जीवनातली अनिश्चितता, गुंतागुंत आणि संदिग्धता यांना संयमानं आणि सहज हाताळायचं आहे का? तर हे सदर तुमच्यासाठी आहे. ‘माईंडफुल’ वा पूर्णत: जागरूकतेने जगण्याचा अनुभव तुम्हाला समृद्ध कसा करू शकतो, हे सांगणारं सदर दर पंधरवड्यानं.

सहा वर्षांपूर्वीपर्यंत मी एक फारसा कोणात न मिसळणारा, काहीसा लाजाळू असा संगणक अभियंता होतो. मोठमोठ्या कंपन्यांसाठी अद्ययावत कार्यप्रणाली तयार करण्यावर मी मनापासून परिश्रम घेत होतो. तीन देशांमधल्या कामाचा अनुभव आणि दोन दशकं औद्योगिक क्षेत्रात सातत्यानं प्रगती करत मी ‘हेड ऑफ प्रॉडक्ट अँड कस्टमर एक्स्पीरियन्स’ म्हणून नियुक्त झालो. अगदी ०.०३ टक्के प्रमाण असणाऱ्या तथाकथित उच्चभ्रू वर्गात स्थान मिळवलं. इतकं यश मिळवूनही माझा अंतरात्मा मला वेगळय़ाच गोष्टीसाठी साद घालतोय असं जाणवलं आणि मी अज्ञाताकडे झेप घेण्यास उद्युक्त झालो.

ज्या समाजात आपण राहतो त्या वातावरणामुळे, आपल्यावर झालेल्या संस्कारांमुळे आपली एक विशिष्ट विचारसरणी तयार होते आणि तिला अनुसरूनच आपण कृती करत असतो. आपल्या संपूर्ण जीवनाची जडणघडण ही भोवतालच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीनुसार होत असते. त्यातूनच आपली विचारपद्धती, श्रद्धा, मूल्यं आणि अगदी आपली स्वप्नंदेखील आकार घेत असतात. आपले विचार आणि कृती याला अनुसरूनच घडत असते. त्याप्रमाणेच वागणं, बोलणं, विचार करणं, ही कालांतरानं आपली जीवनशैली बनून जाते. माझ्या दृष्टीनं अभियांत्रिकीचं किंवा वैद्यकीय शिक्षण घेणं हा अशाच तयार झालेल्या आदर्श विचारसरणीचा एक भाग होता. त्यानुसार मी संगणक अभियंता झालो आणि या क्षेत्रातच कार्यरत राहिल्यास आपण सुखी-समाधानी होऊ अशी मला खात्री वाटल्यानं त्याचीच कार्यक्षेत्र म्हणून निवड केली. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. माझ्या अंतर्मनाची हाक मला वेगळ्या विश्वाची ओळख करून देऊ पाहात होती आणि या हाकेवर संपूर्ण विश्वास ठेवून त्यास प्रतिसाद देण्याचं मी ठरवलं.

आणखी वाचा-चिरकालीन यशाच्या दिशेने..

या स्वत:ला नव्यानं शोधण्याच्या प्रवासात मला माझ्यातली बलस्थानं उदा. दृढनिश्चय, वचनबद्धता, कोणतंही काम वेळेत पूर्ण करण्यासाठीची तळमळ, इत्यादींचा शोध नव्यानं लागला. याच बलस्थानांच्या जोरावर मी यशाची शिखरं काबीज करू शकलो. आणि या गुणांच्या सामर्थ्यांवरच मी आज या जीवनपथावर मार्गक्रमण करत आहे.

आजपासून दर पंधरवडय़ाने मी या स्तंभात जे लिहिणार आहे, त्याविषयी सांगायचं तर, जीवन अधिक जागरूकतेनं जगण्याच्या संकल्पनेला हा स्तंभ समर्पित आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवातून मी एक मोठी गोष्ट आत्मसात केली, ती म्हणजे, आपल्या जीवनाला योग्य दिशा देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता?.. तर जीवन अधिक अवधानपूर्वक, अधिक जागरूकतेनं जगणं. एका गोष्टीची मी नक्कीच खात्री देतो, की या लिखाणातून अमुकच एका मार्गाचा अवलंब करण्यास मी तुम्हाला सांगणार नसून तुमचा मार्ग तुम्ही स्वत:च ठामपणे निश्चित करावा, यासाठी विविध दृष्टिकोन, संकल्पना सांगणाऱ्या आणि चिंतनास प्रवृत्त करणाऱ्या विचारांचं दालन मी आपल्यासमोर खुलं करणार आहे. माझे व्यक्तिगत अनुभव, माझ्या या क्षेत्रातल्या शिक्षकांकडून मिळालेलं अमूल्य मार्गदर्शन, मी ज्यांना मार्गदर्शन करतो त्यांच्याबरोबर झालेले अर्थपूर्ण संवाद, वेगवेगळय़ा पुस्तकांमुळे वाढलेली चिंतनशीलता, अर्थगर्भ चित्रपटांमुळे विकसित झालेला दृष्टिकोन, इतकंच नव्हे, तर अगदी माझ्या मनातले स्वैर विचार आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारे काही प्रसंगदेखील या लेखनात असतील.

कित्येकदा आपलं आयुष्य हे प्रवाहाबरोबर वाहत चाललेलं असतं. व्यग्रतेच्या एका लाटेवरून दुसऱ्या लाटेवर आपण अगदी विनासायास हेलकावे घेत असतो. आयुष्य म्हणजे संकटं आणि अडचणींचा महासागर वाटू लागतो. कर्तव्यं, इच्छा आणि अपेक्षांचा ताळमेळ घालता घालता या जबाबदाऱ्या आणि काळज्यांमधून आपली कधीच सुटका होणार नाही, आपल्याला मन:शांती कधी लाभणारच नाही, असा विचार आपल्या मनात वारंवार येऊ लागतो. कधी कधी आपल्या आयुष्यात असेही क्षण येतात, जेव्हा आपण अजूनही आपल्या नियोजित मुक्कामावर पोहोचलेलो नाही अशी भावना येते. जगरहाटीशी, तिच्या अफाट वेगाशी आपलं गणित जुळवून घेताना आपण तणाव आणि संघर्षांच्या कधीच न संपणाऱ्या दुष्टचक्रात अडकलोय असं वाटण्याची शक्यता असते. कित्येकदा सभोवतालची परिस्थिती गोंधळात टाकणारी आणि अनिश्चिततेनं व्यापलेली असते. काही प्रसंगांमधून जाताना ही भोवतालची परिस्थिती विरुद्ध आपण, या सततच्या चाललेल्या झगडय़ात आपण अडकून पडलोय, एखाद्या नदीच्या प्रवाहाबरोबर तरंगत वाहत चाललेल्या निष्क्रिय लाकडी ओंडक्याप्रमाणेच आपल्याही हाती प्रवाहपतित होण्याखेरीज काही नाही, असं वाटून जाते. यावरून काही वर्षांपूर्वी वाचलेल्या एका गोष्टीची आठवण झाली. रस्त्यानं चाललेल्या एका माणसाला घोडय़ावरून चाललेला दुसरा माणूस दिसला. उत्सुकतेनं त्यानं विचारलं, ‘आपण कुठे चालला आहात?’ घोडय़ावर बसलेला मनुष्य त्वरित उत्तरला, ‘‘मला माहीत नाही. घोड्याला विचारा!’’ जागरूकतेनं, अवधानपूर्वक जगण्याची प्रक्रिया अनुभवताना, आपल्या संवादाचा आशय हा त्यासाठीच्या नवनवीन मार्गाचा नव्यानं शोध घेणं हा असेल.

आणखी वाचा-इतिश्री: भावनिक परिपूर्तीकडे..

नववर्षांत पदार्पण केल्यानंतर आपल्यासमोर दोन पर्याय आहेत- एक म्हणजे आपली जुनीच तणावग्रस्त आणि डोईजड झालेली जीवनशैली कायम ठेवणं किंवा आपल्याकडे असलेल्या वेळेचा आणि ऊर्जेचा सदुपयोग करत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वोत्तम विकास करून घेणं. जर आपण दुसरा पर्याय निवडला असेल, तर त्यासाठी नव्यानं शोधाची प्रक्रिया अवलंबणं आवश्यक आहे. कोलिन्सच्या इंग्रजी शब्दकोशानुसार ‘पुनशरेध’ म्हणजे एखादी वस्तू, सेवा इत्यादी तिच्या संपूर्ण नव्या स्वरूपात पुनप्र्रस्थापित करणं. हेच तत्व माणसाला लागू होतं तेव्हा त्याचा अर्थ ‘तुमच्या वर्तणुकीत किंवा तुम्ही करत असलेल्या कृतीत बदल घडवून आणणं,’ असा होतो.

मागच्या अनेक वर्षांत मी लोकांचे प्रामुख्यानं दोन प्रकार पाहिले- एक प्रकार म्हणजे आपण मनातून ज्या प्रकारचं आयुष्य जगण्याची इच्छा बाळगून आहोत ती जीवनशैली अवलंबण्यात टाळाटाळ करणाऱ्यांचा आणि दुसरा प्रकार म्हणजे ज्यांना बदल घडवायची तीव्र इच्छा आहे पण जीवनातली आव्हानं आणि अडथळय़ांमधून बाहेर पडण्याचा योग्य मार्गच न उमगल्यामुळे अडकून पडलेल्यांचा! तुम्ही यांपैकी कोणत्या प्रकारात मोडता?..

वरीलपैकी कोणत्याही प्रकारात तुमचा समावेश असला तरी जागरूकतेनं जगण्याला अग्रक्रम देण्यासाठी माझ्याबरोबर पाऊल पुढे टाकण्याची तुमची तयारी आहे का? चहुबाजूंनी गोंधळ आणि संघर्षांनं वेढलेल्या आयुष्यात मन:शांतीला अग्रक्रम देण्याचा निश्चय तुम्ही करू शकता का? घडणाऱ्या घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया देण्यापेक्षा तुमची विचारसरणी आणि कृती याबाबत अधिक सजग राहण्यासाठी तयार आहात का? जीवनातली भीती, वेदना, दु:खापासून दूरवर चालत येत, आश्चर्य.., प्रेम आणि आनंदापर्यंतचा भावभावनांचा सप्तरंगी आविष्कार अनुभवण्यास उत्सुक आहात का? सततच्या घाईला बळी पडण्यापेक्षा जीवनात थोडा ‘ठहराव’ आणण्याकडे तुम्ही लक्ष द्याल का? आणि अखेरीस, जीवनातली अनिश्चितता, गुंतागुंत आणि संदिग्धता यांसारख्या गोष्टींना संयमानं आणि सहजगत्या हाताळण्याची तुमची तयारी आहे का?

आणखी वाचा-‘एका’ मनात होती..! मनी मानवा व्यर्थ चिंता वहाते..

एक लक्षात घ्या, की जीवनात आनंद सुखासुखी मिळत नाही. तो निर्माण होण्याची प्रक्रिया घडवून आणावी लागते! ज्या सुख आणि समाधानासाठी आपण धडपडत असतो, ते सुख, समाधान मिळवण्याची प्रक्रिया मात्र निखळ आनंदाची नसते. अपेक्षा आणि तुलनांच्या अवास्तव भारानं वाकलेली असते. शीतपेयाच्या बाटलीतल्या बुडबुडय़ांप्रमाणे! ते पाहताना आकर्षक दिसतात, पण त्यांचं अस्तित्व मात्र क्षणकालाचंच असतं. जर हा आनंद आपल्या मनाप्रमाणे, मर्जीनुसार कमवायचा आणि उपभोगायचा असेल, तर त्यासाठी धाडस अंगी बाणवायची तयारी हवी!

तर लक्षात ठेवायची गोष्ट अशी, की नव्या वर्षांत अधिक सजग आणि सशक्त जीवन जगण्याचा निश्चय आपल्याला करायचा आहे. काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा संगणक अभियंता ते आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रमाणित प्रशिक्षक, व्याख्याता आणि लेखक असा माझा जीवनप्रवाह हे स्वत:चा नव्यानं शोध घेत अधिक जागरुकपणे जीवन जगण्याचं एक उदाहरण आहे. आपण हे लक्षात घेऊ या, की ‘सजग जीवन’ ही आपोआप घडणारी गोष्ट नसून ती आपल्या कृतिशीलतेतून होणारी निर्मिती आहे. तुमचं जीवन ‘सुफळ संपूर्ण’ होण्यासाठी एकाच विशिष्ट मार्गाचं अनुसरण करणं सक्तीचं नाही. आपल्याकडे पर्याय नेहमीच उपलब्ध असतात आणि त्यानुसार आपण भविष्याची आखणी अगदी व्यवस्थितपणे करू शकतो, या गोष्टीचा आत्मविश्वासानं स्वीकार करण्याशी जीवनातल्या सजगतेचा संबंध आहे. चला, आपण एकत्रित या प्रवासाची मजा घेऊया!

sanket@sanketpai.com