डॉ. सविता पानट

‘जागतिक आरोग्य संघटने’नं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासानुसार जगातल्या सुमारे १७.५ टक्के नागरिकांना वंध्यत्वाची समस्या आहे. मूल होऊ देणं हा जोडप्यांचा खासगी निर्णय असला, तरी वंध्यत्वाचं प्रमाण चिंता वाढवणारं आहे. मात्र योग्य पावलं उचलली तर या समस्येवर मात करता येऊ शकेल..

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
iPhone users in 91 countries warned to beware of Pegasus like spyware
‘पेगॅसस’सारख्या स्पायवेअरपासून सावधान! ९१ देशांतील आयफोन वापरकर्त्यांना इशारा
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

शरयू शिकलेली, अर्थार्जन करणारी ३५ वर्षीय स्त्री. एके दिवशी ओ.पी.डी.त आली, शांतपणे खुर्चीत बसली. थोडा वेळ गेला आणि एकाएकी तिचा बांध फुटला. म्हणाली, ‘‘डॉक्टर, सगळय़ांना मुलं होतात, मग मलाच का होत नाही? काय नाही केलं मी यासाठी! आयुर्वेद, होमिओपथी, अ‍ॅलोपथी, इतकंच काय, विश्वास नसतानाही नारायण नागबळीसारखे उपायही केले. आता मी पार खचलेय.’’

शरयूचं उदाहरण प्रातिनिधिक. रोज असे किमान ३-४ रुग्ण पाहायला मिळतातच. त्यांच्यात अगतिकता, नैराश्य दिसतं. ‘जागतिक आरोग्य संघटने’नं नुकताच एक विस्तृत अभ्यास केला. त्यानुसार जगातल्या सुमारे १७.५ टक्के नागरिकांना वंध्यत्वाची समस्या आहे. जगातल्या सहापैकी एका व्यक्तीला वंध्यत्वाचा विकार (इन्फर्टिलिटी) आहे. आणि दर चौथं दाम्पत्य वंध्यत्वग्रासित आहे. दहा वर्षांपूर्वी वंधत्वाचं प्रमाण १० टक्क्यांपेक्षा कमी होतं. या अभ्यासाला काही मर्यादा निश्चित आहेत (उदा. वंध्यत्वाची वेगवेगळी व्याख्या, प्रश्नावलीद्वारे केलेलं निरीक्षण, भौगोलिक परिस्थितीचा, सामाजिक रूढीपरंपरांचा विचार इ.). तरीही व्यंध्यत्वाचं वाढणारं प्रमाण चिंता वाढवणारं आहे हे नक्की.

वंध्यत्वाच्या निरनिराळय़ा व्याख्या आहेत. पण सर्वसाधारणपणे स्वीकृत व्याख्या अशी, की प्रजननक्षमतेच्या वयात (१५ ते ४५ वर्ष) असलेल्या कुठल्याही स्त्रीला जर लग्नाच्या दोन वर्षांत इच्छा असूनही गर्भ राहात नसेल तर त्याला वंध्यत्व म्हणतात. मुलीच्या वयाप्रमाणे विवाहोत्तर काळाची मर्यादा बदलते. म्हणजे, जर मुलीचं वय ३० वर्षांच्या पुढे असेल तर दोन वर्षांऐवजी १ वर्ष किंवा तिचं वय ३५ च्या पुढे असेल, तर लग्नानंतर फक्त सहा महिने वाट पाहावी, असे बदल या व्याख्येत अंतर्भूत आहेत. वंध्यत्वाची कारणं असंख्य आहेत. स्त्रीमधील कारणं अशी- वाढलेलं वय (३०-३५ वर्षांपेक्षा जास्त), उशिरा होणारं लग्न, नोकरीच्या अनियमित वेळा, रात्रपाळी, कामाचा- आर्थिक ताण, नैराश्य, लठ्ठपणा, गर्भाशयातील दोष, स्त्रीबीज न निघणं (स्त्रीबीज फॅलोपिन टय़ूबमधून गर्भाशयात न येणं), पाळीतली अनियमितता, गर्भनलिका बंद असणं, इतर आजार- उदा. मधुमेह, थॉयरॉईड व इतर आंतरग्रंथीचे आजार, खूप शारीरिक श्रम, कौटुंबिक ताण वगैरे.

पुरुषांमधील कारणं अशी- सर्वसाधारणपणे स्त्री-पुरुषांमधील वंध्यत्वाचा दोष पाहता तो त्यातील ४५ टक्के पुरुषांमध्ये असू शकतो. मूल होत नाही हे लक्षात येऊनही सुशिक्षित पुरुष तपासणी करून घेण्यासाठी तयार नसतात. खरं म्हणजे वंध्यत्वाची पहिली तपासणी ही पुरुषाची तपासणी असते आणि ती ‘नॉर्मल’ आली, तर स्त्रीच्या तपासण्या केल्या जातात. लैंगिक क्रियेतही काही समस्या आढळतात. उदा. नियमित लैंगिक संबंध नसणं, शुक्रजंतूंमधील दोष, शुक्रजंतू कमी प्रमाणात, कमी गुणवत्तेचे असणं, व्यसनाधीनता- विशेषत: धूम्रपान, दारू, गुटखा इत्यादी. तसेच इतर आजार. दोघांमध्ये काही ‘कॉमन’ कारणंही आढळू शकतात. उदा. लठ्ठपणा, बदलती जीवनशैली, चैनीचं जीवन, मानसिक आजार, एकटेपणा, नैराश्य, कौटुंबिक आधार नसणं, मोबाइलचा अतिवापर या सर्व गोष्टी जीवनशैलीशी संबंधित असल्या, तरी त्यांचा आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून येतो.

यातली जी वैद्यकीय कारणं आहेत त्यासाठी अद्ययावत तपासण्या व उपचार उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीनं अनेक दाम्पत्यांना उपचारांनंतर मूल होतं. विविध औषधोपचारांपासून ते ‘आयव्हीएफ’पर्यंत (टेस्ट टय़ूब बेबी व त्यातील प्रकार) उत्तम व फलदायी उपचार निघाले आहेत. पूर्वी स्त्रीची गर्भनलिका बंद असल्यास किंवा गर्भाशयात दोष असल्यास मर्यादित उपचार होते. आता आयव्हीएफचा हमखास उपाय आहे. इतकंच नाही, तर अगदी कमी प्रमाणात आढळणाऱ्या गर्भाशय नसणं, गर्भाशय लहान वा दोषपूर्ण असणं, यासाठी गर्भाशयरोपणही आता करता येतं. अर्थात हा उपाय अजून प्राथमिक अवस्थेत आहे. पुरुषांतील शुक्रजंतूंच्या दोषासाठीसुद्धा विविध औषधं असून शुक्रजंतूंचं प्रमाण अत्यल्प असेल तर ‘आयसीएसआय’ (इन्ट्रासायटोप्लाझमिक स्पर्म इंजेक्शन) हा एक प्रभावशाली पर्याय आहे. इतर वैद्यकीय व आंतरग्रंथींच्या आजारासाठीही उपचार आहेत.

वंध्यत्वावरील सर्व उपचारांसाठी लागणारा वेळ, होणारा मन:स्ताप, त्यासाठीचं आर्थिक नियोजन या गोष्टी तापदायक ठरू शकतात. एका ‘आयव्हीएफ’ सायकलसाठी दीड लाख रुपयांपासून कितीही खर्च येतो. तपासण्यांचा खर्च वेगळा. हे उपचार खासगी इस्पितळातच होतात. त्यामुळे महागडय़ा उपचारांशिवाय पर्याय नसतो. स्त्रीची गर्भनलिका बंद असेल तर ‘आयव्हीएफ’ हा पर्याय आहे, पण हा उपाय योग्य वेळी केला तर त्याचे उत्तम परिणाम मिळतात. १०-१५ वर्ष वाट पाहून जर हा उपाय केला तर त्याचे समाधानकारक परिणाम मिळत नाहीत. उपचारांच्या पहिल्याच प्रयत्नात यश येईल असंही नसतं. वेळ लागू शकतो. या सगळय़ाची तयारी जोडप्यांनी ठेवायला हवी.

म्हणूनच लग्नानंतर बाळ हवं असल्यास योग्य वयात- २८ ते ३० वर्षांच्या आत पहिलं मूल व्हायला हवं. वाढत्या वयात गर्भ राहण्यासाठी समस्या तर येतेच, शिवाय गरोदरपणी उच्च रक्तदाब, गर्भपात, बाळाची वाढ नीट न होणं, यांसारखी गुंतागुंतही होऊ शकते. शिवाय ३५ वर्षांनंतर गर्भ राहिल्यास गर्भात व्यंग, दोष निर्माण होण्याचं प्रमाणही वाढतं. तेव्हा आपल्याला नेमकं काय हवंय हे जोडप्यानं लग्नाआधीच ठरवायला हवं आणि त्यानुसार करिअर, शिक्षण, आर्थिक स्थैर्य आणि निरोगी बाळ यासाठीचा प्राधान्यक्रम ठरवायला हवा.

वंध्यत्वाचे उपचार खूप खर्चीक असतात. सर्वानाच ते परवडत नाहीत. प्रसंगी रुग्ण सोनं विकणं, शेतीचा तुकडा विकणं, उधार-उसनवार वगैरे करतात. अशांसाठी सर्व उपचार व तपासण्या शासकीय दवाखान्यात सुरू व्हाव्यात. जिथं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत किंवा जिथं वैद्यकीय महाविद्यालय आहे, तिथं हॉर्मोन्सच्या तपासण्या व्हायला काय हरकत आहे? तसंच ‘आयव्हीएफ’ सारखी उपचारपद्धती शासकीय इस्पितळात का होऊ नये? वंध्यत्वाचे उपचार शासकीय योजनेअंतर्गत आणले, तर त्याचा लाभ स्त्रियांना आणि त्यांच्या कुटुंबाला होईल. याशिवाय अशा दाम्पत्यांनी इतर उपचारांबरोबर मूल दत्तक घेण्याच्या पर्यायाचा विचार करायला हवा, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. वेळेवर लग्न, योग्य वयात मूल होणं, त्यासाठी प्राधान्यक्रम बदलणं, आरोग्यपूर्ण जीवनशैली आणि योग्य उपचार केल्यास वंध्यत्वाचं प्रमाण निश्चित कमी होईल.