मागील लेखात आपण ॐकार उच्चारणाच्या अष्टगुणांपकी विस्सष्ठ व मंजू या दोन गुणांचा ऊहापोह केला आहे. या लेखात आणखी दोन गुणांच्या उच्चारणाविषयी माहिती घेऊ.
विञ्ञेंय
विञ्ञेंय याचा अर्थ स्पष्टपणे कळणारा म्हणजेच ज्यातील शब्द स्पष्टपणे कळतात असा. नादचतन्य ओम्मधील ‘ओ’चा उच्चार करताना तो ‘ओ’च ऐकू आला पाहिजे. तो वोम्-आम्-अम्-एॅम् किंवा ऑम् या पद्धतीने होता कामा नये. ‘ओ’ उच्चारताना दोन्ही गाल थोडेसे आत घेतले तर ‘ओ’चा उच्चार ‘ओ’प्रमाणे निश्चित होतो. प्रत्येकाने आपल्या कंठातून उमटणारा ‘ओ’चा उच्चार स्वत:च्याच कानांनी ऐकावा, तो जर वोम् होत असेल तर चा याचा अर्थ जीभ हलून ती वरच्या दाताच्या आतल्या बाजूला लागत आहे असे समजावे. तशी ती लागता कामा नये. ॐकार उच्चारणात जीभ हलता कामा नये. ती  स्थिर राहिली पाहिजे, हे मी पुन:पुन्हा सांगत आहे. जिभेचे टोक ॐ उच्चारणभर खालच्या दंतपंक्तीच्या पाठीमागे स्थिर हवे. एकदा का ॐ या वर्णाचे उच्चारण उत्तम झाले तर मुखातून बाहेर पडणारे सर्व स्वर व व्यंजने सुस्पष्ट होत जातात.
 सबनीय –
सबनीय म्हणजे श्रवणीय. ॐ हा परमशुद्ध नादोच्चार शास्त्रशुद्ध पद्धतीने उच्चारल्यास तो श्रवणीयच असतो. मग तो कोणीही म्हटलेला असो. श्रवणीय म्हणजे सतत ऐकावासा वाटणारा. आपल्या कंठातून उमटलेला आपणच केलेला ॐचा उच्चार आपल्याला स्वत:ला पुन:पुन्हा म्हणावासा वाटला पाहिजे. कितीही वेळपर्यंत उच्चार केला तरी थकवा आला नाही तर तो उच्चार श्रवणीय होतो आहे, असे साधकाने समजण्यास हरकत नाही. ॐ उच्चार श्रवणीय झाला तर तो सांसर्गिकही होतो म्हणजे तो उच्चार ऐकणाऱ्या व्यक्तीलाही म्हणण्यास प्रवृत्त करतो म्हणजेच ॐ म्हणण्यास प्रवृत्त करतो.
उपमा द्यायचीच झाल्यास एक सडका आंबा, आंब्याची सर्व आढी नासवतो परंतु पाण्यात जर तुरटी फिरवली तर ती तुरटी सर्व पाणी शुद्ध करते. त्याप्रमाणेच ॐचे कार्य हे तुरटीप्रमाणेच आहे.
म्हणजेच ॐकार साधक साधनेने स्वत: शुद्ध व सात्वीक होऊ लागतोच व आपल्या भोवतालच्या परिसरालाही शुद्ध व सात्त्विक करू लागतो. अर्थात तो उच्चार शास्त्रशुद्ध व सुयोग्य पद्धतीने केलेला असेल तरच अन्यथा नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Information about the pronunciation of the two marks
First published on: 04-04-2015 at 01:01 IST