‘‘ चित्रपट ‘सरदारी बेगम’ साठी गाताना दिग्गज मंडळींबरोबर काम करण्याचा अनुभव विलक्षण होताच. यातील उपशास्त्रीय गाणी गाताना वर्षांनुवर्ष केलेला रियाझ मला फारच उपयुक्त ठरला. काही मिनिटांच्या गाण्यात सामावलेला विशिष्ट राग गळय़ात घोळवावा लागतो आणि त्याच वेळी पडद्यावर दिसणारा भाव अचूक पकडायचा असतो. मला गायिका म्हणून समृद्ध करणारीच होती ही सारी गाणी!’’

१९९६ मध्ये ‘सरदारी बेगम’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातल्या गाण्यांची प्रशंसाही झाली. त्यानंतर २००० च्या सुमारास कधी तरी माझा पुण्यात कार्यक्रम होता. कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी ‘डेक्कन क्वीन’नं मुंबईला निघाले होते. माझ्या बाजूला लष्करातील काही तरुण येऊन बसले. २३-२४ वर्षांचे असावेत. त्यातला एक मुलगा पूर्णवेळ आपल्या वॉकमनवर गाणी ऐकत बसला होता. माझ्याशी गप्पा मारणाऱ्या त्याच्या मित्रांनी ‘तो सारखा गाणी ऐकत असतो,’ असं सांगितलं. मग मी त्याला कुतूहलानं विचारलं, ‘‘काय ऐकतोयस?’’ त्यानं मला एका कॅसेटचं कव्हर दिलं. पाहते, तर ‘सरदारी बेगम’! ‘हुजूर इतना अगर हम पर करम करते तो अच्छा था..’ ही गझल तो त्यावेळी ऐकत होता. ती त्याची खूप आवडती गझल आहे, असं तो म्हणाला. मग मी विचारलं, ‘‘कुणी गायली आहे माहिती आहे का?’’ तो म्हणाला, ‘‘हो! आरती अंकलीकरांनी गायली आहे.’’ मी म्हटलं, ‘‘मीच आहे आरती अंकलीकर!’’ त्याचा विश्वासच बसेना. त्यानं सांगितलं, की गेले अनेक महिने तो तीच कॅसेट परत परत ऐकत होता. गाण्यांचा असा चाहता वेगळाच आनंद देऊन जातो.

Loksatta chaturanga Fat phobia women mentality
स्त्री ‘वि’श्व: फॅट फोबियाच्या चक्रात स्त्रिया?
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Why is neem and jaggery consumed during Gudi Padwa 2024
गुढीपाडव्याला कडुलिंब आणि गुळाचे सेवन का करतात? काय आहे कारण, तज्ज्ञांकडून जाणून घ्या….
ravi shastri
संवादातील स्पष्टता महत्त्वाची- शास्त्री

‘सरदारी बेगम’ चित्रपटातील सगळीच गाणी उपशास्त्रीय अंगाची होती. मग ही गझल असो किंवा मी आणि शुभा जोशी यांनी गायलेलं ‘राह में बिछी हैं पलके आओ’ हे गीत असो.. किंवा ‘घिर घिर आई बदरिया कारी’ हे मियाँ मल्हारमधलं गीत असो. प्रत्येक गाणं उपशास्त्रीय ढंगाचं. अशी गाणी तरुण पिढीलाही खूप आवडतात. ते प्रेमाने ती गाणी ऐकतायत हे पाहून आनंद झाला. उपशास्त्रीय संगीत गाताना स्वरांबरोबरच शब्दही तितकेच महत्त्वाचे असतात. सुरेल शब्दफेक ही त्या स्वरांत घोळलेली, शब्दांना जोडणारी एक अदृश्य अशी स्वरांची तारच!

हेही वाचा… विधुरत्व.. नको रे बाबा!

लग्नाआधी मी काही काळ शोभाताई गुर्टू यांच्याकडे ठुमरी, दादरा शिकायला जात असे. ग्रँट रोडला भारत नगरमध्ये राहत असत त्या. संध्याकाळी ५ वाजता क्लास असे. शोभाताई अत्यंत मनस्वी. त्यांचा खरा पिंड कलाकाराचा. मी त्यांच्याकडे जात असे तेव्हा त्या साठीच्या असाव्यात. घरी नात, मुलगा, सून या संसारात त्या रंगलेल्या होत्या. अत्यंत कुटुंबप्रिय. बहुतेक वेळा नातीशी खेळत बसलेल्या असायच्या. मी गेल्याबरोबर त्या नातीची वेणी घालणं संपवत आणि मग आम्ही गायला बसत असू. काळीज भेदून जाणारा त्यांचा स्वर होता. आवाजाचा वेगळाच पोत. अत्यंत दर्दभरा, भावपूर्ण. त्यांची पेशकारीसुद्धा अत्यंत आकर्षक. मैफलीमध्ये कधी कधी वरचा मध्यम आकाश भेदून जाणारा लावत. एक नटखटपणा, मिश्कीलपणा त्यांच्या सादरीकरणात असे. मला काही दादरे, गझला, ठुमऱ्या शोभाताईंनी शिकवल्या.

अतिशय प्रेमळ स्वभावाच्या आणि गोड बोलणाऱ्या त्या! उपशास्त्रीय संगीत गाताना मी कायम शोभाताईंना डोळय़ांसमोर ठेवलं. त्यांच्या आवाजाचा लगाव, शब्दफेक, गाण्यातली भावपूर्णता, हे सगळं काही माझ्या गाण्यात आणण्याचा मी प्रयत्न करत असे. हे नकळत कधी माझंच होऊन गेलं मला कळलंच नाही. त्यामुळे ‘सरदारी बेगम’ चित्रपटातली गझल असो, की गाणं असो; मी माझं अगदी सर्वस्व दिलं त्या गाण्यांना.

ही गाणी रेकॉर्ड होत होती तेव्हा एक दिवस श्यामबाबू, अशोक पत्की, वनराज भाटिया, जावेद अख्तर आणि आम्ही सगळे नेहमीप्रमाणे स्टुडिओत भेटलो होते. श्यामबाबूंनी आपल्या कथेतला प्रसंग सांगितला आणि जावेद अख्तरांनी एक ओळ आम्हाला तिथे म्हणून दाखवली ‘घर नाही हमरे श्याम..’ त्यांनी श्यामबाबूंना विचारलं की, ‘‘कशी वाटतेय ही ओळ?’’ श्यामबाबूंनी लगेच हिरवा कंदील दिला. जावेदजींनी थोडय़ाच वेळात ‘घर नाही हमरे श्याम.. वो जा के परदेस बिराजे, सुना हमरा धाम..’ असं गीत तयार करून आणलं. अत्यंत पारंपरिक असे शब्द वापरलेलं सुंदर गाणं. अशोक पत्कींनी नंद रागात त्याची चाल तयार केली. तसा नंद राग माझ्या गळय़ावर चढलेला होता. किशोरीताईंनी मला शिकवला होता. ‘म्युझिक इंडिया’च्या माझ्या पहिल्या रेकॉर्डमध्येही मी ‘नंद’ गायले होते. त्यामुळे तो चांगला गळय़ावर चढलेला! शब्द गाताना शोभाताईंची शब्दफेक डोक्यात होतीच. त्या रागात अशोक पत्कींनी जेव्हा गाणं तयार करून मला शिकवलं, ते मला खूप आवडलं. माझ्या गळय़ाला ते अगदी शोभून दिसत होतं. ‘घर नाही हमरे श्याम’ यानंतरची जी दुसरी ओळ होती, ‘वो जा के परदेस बिराजे, ही ओळ २-३ वेळा म्हणा आणि त्यात थोडेसे बदल करून गा, असं मला अशोकजींनी सांगितलं. तिथल्या तिथे गाण्यात ‘इम्प्रोवायझेशन’ करत ते गाणं मी अशोकजींसमोर गात गेले. त्यांनी अंतरा शिकवला. अंतऱ्यामध्ये काही आलाप, त्यातल्या ताना, कधी खालचे स्वर, कधी वरचे स्वर, गाण्यातली आर्तता, या सगळय़ाकडे मी डोळसपणे पाहिलं आणि सिंगर्स बूथमध्ये जाऊन उभी राहिले. स्वरभाव आणि शब्दभाव लक्षात घेऊन गाऊ लागले. एकरूप झाले त्या गाण्याशी.. ते गाणंच झाले म्हणा ना मी! मला वाटतं, की तीन वेळा गाणं रेकॉर्ड झालं असावं. सगळे खूप खूश झाले आणि मीही स्वत:वर खूश झाले. अनेक वर्ष घेतलेली नंद रागाची तालीम, त्याचा केलेला रियाझ, शोभाताईंकडे शिकलेले दादरे, ठुमऱ्या, त्याचं केलेलं चिंतन, या सगळय़ाचं फळ मला मिळालं होतं. बाकी गाणीदेखील उत्तम होत गेली एकामागोमाग..

हेही वाचा… वृद्ध पर्वाची सुरुवात?

रेकॉर्डिगच्या अशाच एके दिवशी श्याम बेनेगल आणि आम्ही सर्व मंडळी एकत्र आलो. श्यामबाबू म्हणाले की, ‘‘आज आपण जे गाणं रेकॉर्ड करणार आहोत, ते गाणं चित्रपटात सरदारी जेव्हा तिच्या गुरूंकडे गाणं शिकण्यासाठी पहिल्या दिवशी जाते, त्या दिवशी जे गाणार त्याचं ध्वनिमुद्रण असेल.’’ ती मीर अनीस यांचा एक कलाम गाते तिच्या गुरूंसमोर. जावेदजी म्हणाले की, ‘हुसैन जब के चले बादे दोपहर रन को’ असा हा कलाम आहे आणि तो तुम्हाला गायचा आहे. मी गझला गात असे. शोभाताईंनी शिकवलेली ‘शम-ए-मेहफिल’, ‘मेरे हम नफस’, ‘ए मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया’ तशा बेगम अख्तारांच्यादेखील गझला मी गात असे; परंतु उर्दूचा सखोल अभ्यास काही मी केलेला नव्हता. माझ्याकडे एक उर्दू-मराठी असा शब्दकोश होता. त्यातल्या अनेक शब्दांचा मी अभ्यास करत असे; पण प्रत्यक्ष उर्दू शिकण्याची संधी मला मिळालेली नव्हती. त्यामुळे हा कलाम गायचा ठरल्यावर मी थोडी संभ्रमात होते. उर्दू शब्द.. त्याचा तरफ्फुस.. तेसुद्धा सुरात गाणं हे सगळं जमवणं महत्त्वाचं होतं. जावेदजींनी धीर दिला. म्हणाले, ‘‘मेरे होते हुए आपको चिंता करने की कुछ जरुरत नही हैं!’’ हा कलाम गाताना एकाही वाद्याची संगत नव्हती. केवळ माधव पवार या तबलावादकानं लांब ‘सा’चा उच्चार करायचा, श्वास संपला की परत श्वास भरेपर्यंत थांबायचं आणि परत तो ‘सा’ सुरू करायचा. त्याच्या ‘सा’ची संगत माझ्या गाण्याला. तो मीर अनीस यांचा कलाम मी अत्यंत आर्ततेनं गायले.

पुढे काही दिवसांनी ‘घिर घिर आई बदरिया कारी’ हे ‘मियाँ मल्हार’मधलं गीतही रेकॉर्ड झालं. ‘हुजूर इतना अगर हम..’ ही गझल रेकॉर्ड झाली. तसंच ‘मोरे कान्हा जो आये पलट के.. अब के होरी मैं खेलूंगी डट के’ ही होरीदेखील माझ्या आवाजात रेकॉर्ड झाली. ‘सरदारी बेगम’च्या संगीतामध्ये अशोक पत्कींचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्याबरोबर ‘सरदारी बेगम’साठी महिनाभर काम केल्यानंतर काही वर्षांनी गोव्याचा चित्रपट निर्माता राजेंद्र तालक याचा फोन आला मला.

रीमा लागू यांचा एक चित्रपट करत होता तो. रीमा लागू चित्रपटात शास्त्रीय गायिका आणि त्यांची मुलगी पॉप सिंगर. त्या दोघींमधलं द्वंद्व, अशी कथा होती त्या चित्रपटाची. रीमाताईंसाठी पार्श्वगायन करायचं होतं मला. संगीत दिग्दर्शक अशोक पत्की. परत एक सुवर्णसंधी चालून आली अशोकजींबरोबर काम करण्याची. ‘आजीवासन’ या सुरेश वाडकरांच्या स्टुडिओमध्ये आम्ही जमलो. निर्माता राजेंद्र तालक, अशोकजी, मी आणि उत्पल दत्त हा तबलावादक. मध्य प्रदेशातला उत्पल. चर्चा सुरू झाली, तालकने कथा सांगितली, प्रसंग सांगितला. उत्पललादेखील अनेक ठुमऱ्या, दादरे, गझला माहीत होत्या. त्यानं ‘बालमवा तुम क्या जानो प्रीत’ अशी एक ओळ म्हणून दाखवली अशोकजींना. त्यांना ती खूप आवडली. त्यांनी ‘मांड’ रागामध्ये त्याला सुंदर चाल दिली आणि मला शिकवली. ‘बालमवा तुम क्या जानो प्रीत.. मैं गयी हार.. तुम्हरी जीत..’ संगीतबद्ध केलेल्या ओळी अशोकजींकडून एकामागोमाग येऊ लागल्या, त्या मी टिपू लागले, ग्रहण करू लागले आणि शिकता शिकताच त्यावर चिंतनही करत गेले. त्यानंतर अशोकजी मला म्हणाले, ‘‘या पाच ओळी आहेत. आता तुम्ही पाच-सहा मिनिटं हे गाणं गा. तुम्हाला हवं तसं गा. जिथे बढत करायची आहे असं तुम्हाला वाटतंय, तिथे आलाप करा. तुमच्या स्टाईलनं गा.’’ मी दोन-तीन वेळा उत्पलबरोबर गायले गाणं. विचार केला थोडा.. कुठे आलाप घ्यायचा.. कुठे ओळी पुन्हा गायच्या.. अशा तऱ्हेनं गाण्याचं रेकॉर्डिग पूर्ण झालं. या ‘सावली’ चित्रपटाची सगळी गाणी झाली. हा चित्रपट कोकणीमध्ये ‘अंतर्नाद’ या नावानं प्रकाशित केला तालकनं. त्या चित्रपटात भैरवी रागात ‘मोरे घर आये बालमवा..’ हे गाणंदेखील खूप छान बनवलं होतं अशोकजींनी. आणि मीही माझ्या परीनं ते गायलं. चित्रपट प्रदर्शित झाला. एकीकडे माझे कार्यक्रम सुरू होते. चित्रपटाबद्दल मी विसरून बाकी कामात व्यग्र झाले. एका कार्यक्रमासाठी दिल्लीला गेले होते. ‘शंकरलाल फेस्टिव्हल’ होतो दिल्लीमध्ये, तिथे गाणं होतं माझं. गाणं झाल्यावर माझी बालमैत्रीण सिम्मी कपूर हिच्याकडे जेवायला गेले होते. बालपणीच्या गप्पांमध्ये रंगलो होतो. गप्पांबरोबर गरम-गरम पराठे, छोले, बुंदी रायता.. जेवण चालू होतं. तेवढय़ात मुंबईहून फोन. ‘‘आरतीताई, तुम्हाला काही पुरस्कार मिळाला का? मी आता तसं ‘दूरदर्शन’वर पाहतोय.’’ मला आश्चर्यच वाटलं. पुरस्काराबद्दल मला काहीच माहीत नव्हतं. आम्ही लगेच टीव्ही लावला आणि ‘दूरदर्शन’च्या बातम्यांमध्ये बातमी ऐकली की तालकच्या ‘अंतर्नाद’ या चित्रपटासाठी मला सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाचा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

या गाण्यांनी मला काय दिलं?.. आतापर्यंत टिपलेलं, फुलवलेलं संचित घेऊन काही मिनिटांच्या गाण्यात ते कसं ओतायचं, हे या अनुभवानं मला शिकवलं. शास्त्रीय गायकीचा आनंद वेगळाच असतो; पण या उपशास्त्रीय गाण्यांनीही मला अद्वितीय आनंद दिला. त्यासाठी ते अनुभव कायम स्मरणात राहतील.

aratiank@gmail.com