विभावरी सावरकर
दृष्टिहीन मुलींना स्वप्न पाहायला शिकवून, ती स्वप्नं सत्यात उतरवण्यासाठी त्यांच्यात आत्मविश्वासाचं बळ निर्माण करणारी दादर येथील ‘कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड.’ आज या शाळेतल्या विद्यार्थिनी शैक्षणिक, वकिली, संगीत, वादन, आदी विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. दृष्टिहीन मुलींना मायेची ऊब देऊन समाजात वावरण्यासाठी सक्षम करणाऱ्या या शाळेला १४ जुलै रोजी १२५ वर्षं पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने या शाळेतल्या माजी विद्यार्थिनीचे मनोगत…

विशाखा मेहता, आमच्या शाळेत शिकून नंतर १९६९मध्ये ‘मिठीबाई महाविद्यालया’मधून त्यांनी पदवी घेतली. अर्थार्जनासाठी शिक्षकी पेशा स्वीकारायचा, हे त्यांनी आधीच ठरवलेलं होतं. ‘व्हिक्टोरिया मेमोरियल स्कूल’मधून दृष्टिहीनांना शिकवण्यासाठी असलेला एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर बी.एड्. करून १९७२ मध्ये विशाखा या शाळेतल्या दृष्टिहीन मुलींमधल्या पहिल्या बी. ए., बी.एड्. ठरल्या. याच शाळेत त्या शिकल्या आणि याच शाळेत शिक्षक म्हणून त्या निवृत्तही झाल्या.

अशा प्रकारे अनेक दृष्टिहीन मुलींची शैक्षणिक जडणघडण करून त्यांना आत्मविश्वासाचं बळ देऊन स्वत:च्या पायावर उभं राहायला शिकवणारी शाळा म्हणजेच ‘कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड’. मुलींना वेगळ्या वाटेवर आत्मविश्वाचे पाऊल टाकायला शिकवणाऱ्या या शाळेला येत्या १४ जुलैला १२५ वर्षं पूर्ण होत आहेत.

१९००मध्ये अॅना मिलार्ड यांनी तीन दृष्टिहीन मुलांना घेऊन एक शाळा सुरू केली. त्यातून उत्तीर्ण झालेल्या देवजी देवदान या विद्यार्थ्याने १९५० मध्ये दृष्टिहीनांमध्ये सर्वप्रथम बी. ए. होऊन शाळेला ओळख मिळवून दिली. १९५६ मध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका असणाऱ्या नमा आजगावकर यांनी काही दिवसांतच शाळेचं रूपच पालटवलं. शाळेत प्रवेश घेतलेल्या दृष्टिहीन मुलींच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाला पोषक वातावरण मिळावं, यासाठी त्यांनी खास प्रयत्न केले.

त्यांनी १५ ऑगस्ट १९५७ मध्ये १८ वर्षांवरील मुलींसाठी ‘इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाईंड’ची स्थापना केली. तिथे मुलींना खुर्च्या विणणे, शिलाई काम, लूम चालवणे, झाडू बांधणे यांसारखे उद्याोग शिकवले जाऊ लागले. ज्यामुळे मुली स्वावलंबनाचे धडे घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या.

मुलींनी निदान दहावीपर्यंत शिकावं हा विचार करून ‘एकात्मिक शिक्षण पद्धती’चा अवलंब करून १९५८ मध्ये मुलींची ८ वी ते ११ पर्यंतची शिक्षणाची सोय केली. यामुळे मुलींना पुस्तकी ज्ञानाबरोबरच वास्तव जीवनातील समस्या सोडवण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञानही दिले जाऊ लागले. सर्वसमावेशक शिक्षणामुळे मुलींची विचारसरणी बदलू लागली. ज्ञानभंडारातील ही शैक्षणिक शिदोरी घेऊन इथल्या दृष्टिहीन मुली एक नवी प्रेरणा घेऊनच शाळेचा उंबरा ओलांडतात.

शांता वाध्यार-नरसिंहन दहावीनंतर उल्हासनगरच्या ‘सी.एच.एम’ महाविद्यालया- मधून १९७२ मध्ये पदवीधर झाली. त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे शिक्षिका होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी तिला वकिली करण्याचा सल्ला दिला. आपल्या बोलक्या स्वभावाला साजेसं खाद्या मिळालं तर बरं, असं राहून राहून शांताला वाटत होतं. ‘निर्मला निकेतन’ची माहिती मिळताच शांताने तिथे धाव घेतली. ‘मुलाखत पास झालात तर तुम्हाला घेऊ, असं तिला सांगण्यात आलं. रीतसर मुलाखतीत पास होऊन तिने तिथे प्रवेश घेतला.

१९७४ मध्ये एम.एस.डब्ल्यू. होऊन ती ‘निर्मला निकेतन’मधून बाहेर पडली. दृष्टिहीनांमधली ती बहुधा पहिली एमएसडब्ल्यू असावी. पुढे २-३ वर्षं नोकरी केली आणि अंधांसाठी काम करणाऱ्या संस्थांसोबत ऐच्छिक कामं करून समाजाच्या ऋणातून काही अंशी बाहेर पडण्याचा त्यांनी प्रयत्न केला. बातम्या, क्रिकेट समालोचन ऐकणं, लेखन करणं, कविता करणं याची आवड असलेल्या अनुजा संख्ये हिने पदव्युत्तर शिक्षण पत्रकारितेमधूनच करण्याचा निर्णय घेतलेला. २००९मध्ये ‘रुईया महाविद्यालया’मधून बी. ए.ची पदवी प्राप्त करून तिने नंतर पत्रकारिता अभ्यासक्रम पूर्ण करून ती पत्रकारिता करू लागली.

शाळेने मुलींच्या कलागुणांना नेहमीच भरपूर वाव दिला. १४ जुलै हा शाळेचा वर्धापन दिन. त्या दिवशी आजी विद्यार्थिनी या माजी विद्यार्थिनींसाठी एका सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करतात. वर्धापन दिनानिमित्त नाटक बसवणं, गाणी शोधणं, हे सारं इयत्ता १० वीच्या मुलीच बघतात. मात्र नृत्य बसवणे, नाटकातील कृती-हालचाली यासाठी ‘रीडर’ची मदत घ्यावी लागते. शिक्षिका, मुख्याध्यापिका किंवा इतर कुणाचाही त्यात हस्तक्षेप नसतो.

शाळेचा एक छोटासा वाद्यावृंदही आहे. त्याच्या माध्यमातून शाळेव्यतिरिक्त इतर ठिकाणीही विविध कार्यक्रम सादर केले जातात. १९८२ मध्ये शाळेच्या इमारत फंडासाठी एक ‘चॅरिटी शो’ करण्याचं ठरवलं. हा कार्यक्रम शाळेतल्या मुलींनीच करावा असं ठरलं. मीही त्यात सहभागी होते. अमराठी भाषेत कार्यक्रम करण्याची ही आमची पहिलीच वेळ होती. शबरीच्या जीवनावर एक गुजराती नृत्यनाटिका बसवण्याचं निश्चित झालं. त्यात नृत्याचा भाग सगळ्यात मोठा म्हणून आधी नृत्य बसवण्यात आलं. नृत्य करणाऱ्या आम्हा आठ जणींचा गट तयार झाला. मी एकटी नृत्यात पारंगत. इतर सगळ्या जणी नवशिक्या होत्या, तरीही त्यांनी शिकवलेलं आत्मसात केलं. म्हाताऱ्या शबरीची भूमिका आशा इराणी हिने उत्तम केली.

पहिल्यांदा तीन तुकड्यातलं नृत्य बसवण्यास सुरुवात झाली. तिसऱ्या तुकड्यात नाचत नाचत हातात टिपऱ्या घेऊन जोड्या बदलणं हा खाऊ नव्हता आमच्यासाठी. दीपनृत्य करण्याचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे मन थोडं साशंक होतं, तरी आत्मविश्वास ढळला नाही. हे नृत्य आम्ही लीलया सादर केलं. मात्र तब्बल दीड वर्षं लागलं ही एक नृत्यनाटिका बसवण्यासाठी. अडसर होता तो फक्त भाषेचा. २५ सप्टेंबर १९८२मध्ये याचा पहिला प्रयोग ‘बिर्ला मातोश्री’ सभागृहात झाला. त्यानंतर लगेचच ‘दूरदर्शन’ने याची दखल घेतली. ऑक्टोबर महिन्यात ‘संताकुकडी’ या त्यांच्या गुजराती कार्यक्रमात आम्ही याचं सादरीकरण केलं.

शाळेतल्या मुली गाण्याच्या व वाद्यांच्याही परीक्षा देत असतात. यातील पारंगत काही जणी संगीत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. अग्रेसर आहे योगिता तांबे. आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेली योगिता एकूण ४० वाद्यो वाजवू शकते. हरहुन्नरी योगिताला ‘गगनाला पंख नवे’ या कार्यक्रमात पुरस्कारही मिळाला आहे.

शाळेने जसा मुलींच्या कलेला भरपूर वाव दिला. तशीच मुलींची इतर क्षेत्रातील प्रतिभाही जाणली. सुधा म्हात्रे ही आमच्या शाळेतली उत्कृष्ट कवयित्री. तिने शाळेत केलेली पहिलीवहिली कविता सुधीर मोघेंसारख्या मोठ्या कवी-गीतकारासमोर वाचण्याची संधी तिला मिळाली. ‘अश्रूंनो, तुम्ही खारटच का असता?’ यासारखा निरुत्तर करणारा प्रश्न तिलाच पडावा. तो तिने तिच्या कवितेतून मांडला. सुधा आज वेगवेगळ्या स्तरांवरच्या काव्यस्पर्धांचं परीक्षणही करते.

सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालणाऱ्या या शाळेचं सायंकाळी ५ वाजल्यानंतर ‘घरकुला’त रूपांतर होतं. शाळेतल्या शिस्तीत वावरणाऱ्या आम्ही या घरकुलात मात्र एकमेकींच्या मैत्रिणी होऊन जातो. या शाळेच्या छताखाली आम्ही मुली २४ तास एकत्र राहतो. इथे आम्हाला आमच्या कला जपायलाही वाव मिळतो. इथे आम्ही हस्तकलेबरोबरच पाककलाही आवडीने शिकतो. शाळा सुटल्यानंतर मिळालेला वेळ आमच्या इतर जीवनकौशल्य वाढवण्यासाठी वापरला जातो. या शाळेत आम्हा मुलींच्या दुखण्या-खुपण्याकडेही तितक्याच जाणीवपूर्वक लक्ष दिलं जातं. प्रेम, आपुलकी, जिव्हाळा हे सारं इथल्या कर्मचारी वर्गाने आम्हाला भरभरून दिलंय. इतकं सारं शाळेकडून मिळाल्यावर मुलींना शाळेचे ऋण कसे फेडावे तेच कळत नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२००० या वर्षी जेव्हा शाळेने १०० वर्षं पूर्ण केली तेव्हा काही माजी विद्यार्थिनींनी एकत्र येऊन शाळेचं ‘शताब्दी वर्षं’ आपल्या परीनं उत्तमरीत्या साजरं केलं होतं. प्रेम, आपुलकी याबरोबरच शिक्षण, कला, साहित्य यांची झोळी भरून शाळेतून घेऊन जाताना आम्ही सर्व मुली भरून पावतो. मैत्रिणी, इथला कर्मचारी वर्ग यांचा आम्हाला कधीही विसर पडत नाही. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, ही फक्त् एक शाळा नाही, ते आहे आमचं घरकुल…!’’