दलित म्हणून आणि स्त्री म्हणून होणाऱ्या दुहेरी शोषणाचा काच दलित महिलांना होता. बाबासाहेबांच्या एकूण चळवळीतील सर्व महत्त्वाच्या टप्प्यांवर महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक लढय़ामध्ये पुरुषांइतकीच स्त्रियांची संख्या असे, परंतु त्यांची नावे कुठे इतिहासात फारशी नोंदली गेली नाहीत. या चळवळीविषयी..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्याय आणि समता यांसाठी व्यवस्थेच्या विरोधात जे विविध लढे दिले, त्या सर्व लढय़ांत स्त्रियांचा सक्रिय सहभाग राहील यावर त्यांचा कटाक्ष असे. ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ हा संदेश त्यांनी केवळ दलित पुरुषांना दिला नव्हता, तर पुरुषांबरोबर स्त्रियांनीही शिक्षण घ्यावे आणि स्व-उन्नतीबरोबर सामाजिक संघर्षांत यावे, अशी त्यांची अपेक्षा होती आणि त्या दृष्टीने ते जिथे जातील तिथे स्त्रियांना संबोधित करत.
पुरुषसत्ता आणि जातव्यवस्था मिळून निर्माण होणाऱ्या शोषणाचा मुद्दा त्यांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून देशाच्या राजकारणाच्या अग्रभागी आणला. प्रत्येक जातीच्या वेगळेपणाची तथाकथित ओळख असणारी जातीविशिष्ट कर्मकांड, रूढी, परंपरा स्त्रियांवर लादून त्यांच्यामार्फत जातव्यवस्था घट्ट केली जाते, हे लक्षात घेऊन त्यांनी विवाह, घटस्फोट, वारसा, मालमत्ता, दत्तक या संदर्भातील जातीनिहाय कायद्यांना ठाम नकार दिला होता. यासाठी स्वत: स्त्रियांनी शिकून जागृत झाले पाहिजे, अशी त्यांची धारणा होती. त्याच धारणेतून ते दलित स्त्रियांना सांगत असत, ‘‘आपल्या मुलांना तसेच मुलींनाही शिकवा. कथिल आणि चांदीचे दागिने घालणे सोडून द्या, मुलांची लवकर लग्ने करण्याची घाई करू नका, नवऱ्याची दासी म्हणून नाही तर त्याच्या बरोबरीने राहा.’’ अशा छोटय़ा छोटय़ा गोष्टींमधून ते स्त्रियांचे प्रबोधन करीत. त्याचा मोठा प्रभाव स्त्रियांवर पडत असे.
या संदर्भात, नंतरच्या काळात दलित पँथरच्या चळवळीत महत्त्वाची भूमिका निभावणारे जयदेव गायकवाड यांच्याशी याविषयी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘बाबासाहेबांच्या एकूण चळवळीतील सर्व महत्त्वाच्या टप्प्यांवर महिलांनी भरभरून प्रतिसाद दिला. प्रत्येक लढय़ामध्ये पुरुषांइतकीच स्त्रियांची संख्या असे, परंतु त्यांची नावे कुठे इतिहासात नोंदली गेली नाहीत.’’ गायकवाड यांचे वडील मारुती साबाजी गायकवाड हे बाबासाहेबांचे निकटचे सहकारी होते. त्यांची आई जनाबाई यांना बाबासाहेबांविषयी अपार आदर. ती बाबासाहेबांच्या अनेक गोष्टी सांगायची. अशा असंख्य महिला मुलांना प्रेरणा देत.
महाडच्या सत्याग्रहात डेव्हीडबुवा, दादासाहेब गायकवाड, संभाजी गायकवाड, शांताराम अनाजी उपशा इत्यादींबरोबर अनेक महिला सत्याग्रहात उतरल्या होत्या. त्या वेळी बाबासाहेबांनी महिलांना उद्देशून फार हृदयस्पर्शी भाषण केले. त्यांनी या स्त्रियांना विचारले होते,‘‘आम्हाला जनावरापेक्षाही हीन वागणूक मिळते हे ठाऊकअसूनही तुम्ही आम्हाला जन्म का दिलात, असा प्रश्न कुणी विचारला तर तुम्ही काय उत्तर देणार आहात?’’
त्याचप्रमाणे, काळाराम मंदिर प्रवेशाच्या सत्याग्रहात १९३० ते ३५ या काळात दरवर्षी महिला आपली तान्ही बाळे खांद्यावर टाकून चालत येत. दादासाहेब गायकवाड यांच्या पत्नी सीताबाई, गीताबाई, शांताबाई दाणी अशा अनेक जणी सत्याग्रहात सामील झाल्या. १९४२ मध्ये नागपूर इथे बाबासाहेबांनी अखिल भारतीय महिला परिषद घेतली. तिला तब्बल चाळीस हजार महिला उपस्थित होत्या. एवढेच नव्हे तर, १९५६ मध्ये जेव्हा बौद्ध धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला तेव्हा त्यांच्यासमवेत पाच लाख दलितांनी स्वेच्छेने धर्मातर केले; त्यात दोन लाख स्त्रिया होत्या.
बाबासाहेबांच्या चळवळीत शांता दाणी यांचे लढवय्ये नेतृत्व पुढे आले. बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या राजकारण आणि समाजकारण यात सक्रिय राहिल्या. त्या काळात एका महिलेने समाजक्रांतीच्या लढय़ात असं स्वत:ला झोकून देणे हे धाडसाचेच काम होते. जयदेव गायकवाड म्हणतात, ‘‘महिला अधिक व्यापक चळवळीशी जोडल्या गेल्या होत्या असे दिसते, परंतु भारतीय समाजाने त्यांच्याकडे कधी लक्ष दिले नाही.’’
बाबासाहेबांच्या परिनिर्वाणानंतर मात्र दलित चळवळ काहीशी कमकुवत झाली. विशेषत: रिपब्लिकन पक्षाने दलितांच्या प्रश्नांबाबत जे धोरण ठेवले होते त्याने दलित समाजात नैराश्याचे वातावरण होते. दुसरीकडे दलितांवर अत्याचार सुरूच होते. याची तीव्र प्रतिक्रिया म्हणून ‘दलित पँथर’ नावाचा एक झंझावात महाराष्ट्रात निर्माण झाला आणि त्याने महाराष्ट्राच्या इतिहासावर स्वत:चा दीर्घकालीन ठसा उमटविला.
१९७२ मध्ये राजा ढाले, ज. वि. पवार, नामदेव ढसाळ, अविनाश महातेकर, लतीफ खाटिक, बाबुराव बागुल, भाई संगारे, सुनील दिघे या बंडखोर साहित्यिकांनी मिळून अमेरिकेतील ‘ब्लॅक पँथर’ या वर्णविरोधी चळवळीच्या धर्तीवर ‘दलित पँथर’ ही विद्रोही संघटना स्थापन केली. या वेळी प्रथमच ‘दलित’ हा शब्द व्यापक अर्थाने वापरण्यात आला. यात अर्जुन डांगळे, जयदेव गायकवाड, प्रल्हाद चेंदवणकर, उमाकांत रणधीर हेदेखील सामील होते. हे सर्वजण गरीब वर्गातून आलेले, चाळीत, झोपडपट्टय़ांत राहून जगण्याची धडपड करणारे बंडखोर तरुण होते. त्या काळात तामिळनाडूमध्ये बेचाळीस दलित भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीनदारांकडून हत्या झाल्या होत्या. महाराष्ट्रात दलित स्त्रियांची नग्नावस्थेत धिंड काढण्यात आली होती. त्याची जळजळीत प्रतिक्रिया राजा ढाले यांच्या ‘साधना’त लिहिलेल्या लेखातून उमटली होती. ज्या देशात महिलांची अब्रू सुरक्षित नाही तिथे तिरंग्याचा काय उपयोग, अशा आशयाचा तो लेख होता. या लेखामुळे समाजाला मोठाच धक्का बसला.
दलित पँथरचा उदय साठ-सत्तरच्या दशकातल्या झपाटय़ाने बदलत असलेल्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक पर्यावरणातून झाला. स्वातंत्र्य मिळून पंचवीस वर्षे झाली तरी अपेक्षित फळे न दिसल्याने निर्माण झालेल्या अस्वस्थतेतून विविध गटांतून तरुण एकवटत होते. दलित पँथरने मागास, सर्वहारा, गावकुसाबाहेरच्या अस्पृश्य समाजाला ‘दलित’ ही सर्वव्यापी संज्ञा दिली आणि त्यात कामगारांसह आदिवासी, भटके आणि महिला यांनाही सामावून घेतले.
दलित पँथरच्या चळवळीत महिला मोठय़ा प्रमाणावर सहभागी झाल्या. याचे मुख्य कारण म्हणजे महिलांवरच अत्याचार होत होते. दलित अत्याचाराच्या घटनांमध्ये दलित पँथरने ताबडतोबीचे धोरण अवलंबिले होते. केवळ मोर्चे, निदर्शने किंवा भाषणांवर अवलंबून राहण्यापेक्षा प्रश्नाची थेट तड लावण्याकडे त्यांचा कल असे. महिला अत्याचाराच्या घटनेची माहिती मिळताच, एरवी अभ्यासू मांडणी करणारे ‘पँथर्स’ हातात सायकलच्या चेन आणि काठय़ा घेऊन त्या गावी धावून जात असत. महिलांना संरक्षण देऊन अत्याचार करणाऱ्याला धडा शिकवीत. यामुळे दलित पँथरची चळवळ महाराष्ट्रात फार वेगाने पसरली.
या सर्व लढय़ांमध्ये स्थानिक महिलांचा सहभाग मोठय़ा प्रमाणावर असे. मग तो बावडा येथील दलितांचा बहिष्काराचा प्रश्न असो नागपूरजवळील ऐरणगाव येथील नवबौद्ध तरुणाचा दिला गेलेला नरबळी असो वा पुण्याजवळ दलितांच्या इनामी जमिनींचे अन्यायकारक वाटप असो, या सर्व घटनांमध्ये तसेच नामदेव ढसाळांनी मुंबईत काढलेल्या वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या समता मोर्चालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता.
असे असले तरीही दलित पँथरसह एकूणच दलित चळवळीतून स्त्री नेतृत्व समोर आले नाही, हे वास्तव आहे. याची कारणे काय असावीत? जयदेव गायकवाड म्हणाले, ‘‘बाबासाहेबांच्या काळापासून सर्व लढय़ांमध्ये महिलांची उपस्थिती पन्नास टक्के इतकी असायची. नामांतराच्या काळात मला आणि एल. डी. भोसले यांना अटक झाली होती तर चारपाच हजार महिला आक्रमक होऊन चालून आल्या. समतेच्या लढाईत त्या अधिक तळमळीने सामील होत. पण सत्तेची पदे त्यांना मिळाली नाहीत. दलित पुरुषांनाही ती कमी मिळाली तिथे महिलांचा काय पाड?’’
त्या काळात शिकून जागृत होणाऱ्या दलित पुरुषांचीही ती पहिलीच पिढी होती. महिलांपर्यंत अजून शिक्षण पोहोचले नव्हते. कदाचित स्त्री नेतृत्वाच्या अभावाचे हे एक कारण असावे. या शिवाय दलित स्त्री ही पुरुषी, वर्चस्ववादी मानसिकतेची बळी होतीच. दलित म्हणून आणि स्त्री म्हणून होणाऱ्या दुहेरी शोषणाचा तिला काच होता. खरे तर, जयदेव गायकवाड यांच्या म्हणण्यानुसार दलित महिला कुटुंबव्यवस्थेत अधिक अर्थपूर्ण भूमिका निभावतात. ज्या कुटुंबात महिला प्रभावी होत्या ती कुटुंबे परिस्थितीतून वर आली. आजही १४ एप्रिलला आणि ६ डिसेंबरला महिलांचीच संख्या अधिक दिसते.
दलित विद्रोही साहित्याच्या प्रवाहातही महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. जनाबाई गिऱ्हे, शांताबाई कांबळे, बेबी कांबळे, प्रतिमा परदेशी, सुरेखा भगत, उर्मिला पवार, प्रज्ञा दया पवार, ज्योती लांजेवार, हिरा बनसोडे यांनी आपल्या लेखनातून चळवळ पुढे नेण्यास हातभार लावला.
आज धर्मातरानंतरची चौथी पिढी शिकून सावरून मोठय़ा पदांवर काम करीत आहे. त्यात महिलांची संख्या लक्षणीय आहे. अजून जात पूर्णपणे गेलेली नाहीय ही खंत आहेच, पण कला, साहित्य, उद्योग, शिक्षण, राजकारण, समाजकारण अशा सर्व क्षेत्रांत दलित महिला आपला ठसा उमटवतायत, हे निरोगी समाजघडणीसाठी एक चांगले चिन्ह आहे. अजून जात पूर्णपणे गेलेली नाहीय ही खंत आहेच, पण थंडावलेल्या दलित चळवळीला पुन्हा चालना मिळाली तर स्त्रीनेतृत्व त्यातून नक्कीच पुढे येईल.
anjalikulkarni1810@gmail.com

Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
Vasai, Fake Doctor, Wrong Surgery, Leads to Death, woman, Social Activist, marathi news, maharashtra,
वसई : बोगस डॉक्टरने घेतला महिलेचा बळी; चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे महिला ४ वर्षे अंथरूणात
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!