हॉटेल तसं छोटंसं पण छान होतं. वातावरण प्रसन्न होतं. मला कॉफीचे घोट घेताना मस्त हायकू आठवत होता – कॉफी हाऊस कॉफी हाऊस – प्रत्येक टेबलवर वेगळा पाऊस! इतक्यात बाजूच्या टेबलावरून दबका हुंदका ऐकू आला. तरुण जोडपं बसलं होतं. लग्नाला एक-दोनच र्वष झाली असावीत. तो खालच्या आवाजात तिच्याशी बोलत होता, ‘‘हे बघ. तू रडण्या-बिडण्याचा तमाशा करू नकोस. अशी कोणती जहागिरी मी मागतोय? फक्त बारा लाख रुपये कमी पडताहेत. मी सगळा हिशेब केलाय. जुना ब्लॉक विकून आलेले पैसे, फंडातून मिळणारं कर्ज हे एकत्र केलं तरी बारा लाख रुपये कमी पडताहेत. तेवढे तुझ्या बाबांकडून घेऊन ये. त्यांच्यासाठी बारा लाख ही काही मोठी रक्कम नाही. म्हणजे आपल्याला मोठा फ्लॅट घेता येईल. माझ्या आईलाही इथे आणता येईल आणि काही वर्षांनी तूच म्हणशील बरं झालं मोठं घर घेतलं!’’
तिने डोळे पुसले. ती म्हणाली, ‘‘मी हिशेब केलाय. लग्न झाल्यापासून काही ना काही कारणाने तुम्ही मागणी केलीत म्हणून आतापर्यंत बावन्न लाख रुपये बाबांकडून मागून आणले. मागच्या वेळेस आईने स्पष्टच सांगितलं, आता येशील ती माहेरी म्हणून ये. पैसे मागण्यासाठी येऊ नको. मी आता पुन्हा काही पैसे मागणार नाही.’’ तो चिडून म्हणाला, ‘‘ठीक आहे. तुला दोन दिवसांचा वेळ देतो. नाहीतर कायमचं माहेरी पाठवतो.’’ तो उठून तरातरा चालू लागला. ती मान खाली घालून त्याच्या मागे जाऊ लागली..
कट्टय़ावर सात-आठ तरुण मुलं जमून गप्पा मारत होती. चित्रपट, राजकारण, मैत्रिणी, फॅशन, करिअर अनेक विषय होते. मध्येच हशा होत होता. मध्येच एकाची दुसऱ्याला टाळी जात होती. किशोर मात्र कुणाच्याही लक्षात यावं इतका गप्प होता. नंदू म्हणाला, ‘‘ए किशा बोल की काही. जगबुडी झाल्यागत काय करतो रे? टिनू म्हणाला, ‘‘काय रे या वेळी आईने डोकं खाल्लं का बाबांनी पिडलं? लागेल रे नोकरी!’’ किशोर म्हणाला, ‘‘अरे दोघांनी वैताग आणलाय! कॅम्पस इंटरव्ह्य़ूत नोकरी मिळाली होती तेव्हा ती इतक्या लांब नको म्हणून मला नाकारायला लावली. आता इथे नोकरी मिळत नाही. मिळाली तर यांना पगार फारच कमी वाटतो. स्टार्टअप योजनेतून काही बिझनेस करतो म्हटलं तर आधी हो म्हणाले. प्रस्ताव घेऊन कर्जासाठी भेटायला बाबांना बरोबर घेऊन गेलो. घरी आल्यावर म्हणाले, ‘‘एवढं कर्ज करून तुला नाही फेडता आलं तर माझ्याच डोक्यावर येईल. तू आपली नोकरीच बघ. लांबची असली तरी चालेल.’’ काय करू आता? यांना आताच्या परिस्थितीची जाणीवच नाही. मला इतका वैताग आलाय की कुठेतरी निघूनच जावंसं वाटतंय!’’ नंदू म्हणाला, ‘‘काहीतरीच विचार करू नको किशा. मिळेल चांगली नोकरी. अरे मी तर दीड वर्ष बेकार होतो. सब्र का फल मीठा होता है!’’ सगळे हसले.
मृणाल बाहेर जायची तयारी करत होती. आई तिथेच कपडय़ाच्या घडय़ा करत होती. तिनं विचारलं, ‘‘कुठे जाणारेस?’’ मृणाल म्हणाली, ‘‘अगं आज स्नेहाचा वाढदिवस आहे. ती पार्टी देतेय!’’ आईने विचारले, ‘‘कुठे जाणार?’’ मृणाल म्हणाली, ‘‘अगं मला काय माहीत ती कुठे नेणार आहे ते?’’ आईने पुन्हा विचारलं, ‘‘कोण कोण आहे?’’ मृणाल म्हणाली, ‘‘सगळा ग्रुपच आहे गं!’’ आई म्हणाली, ‘‘परत कधी येणार?’’ मृणाल म्हणाली, ‘‘तरी साडेआठ-नऊ होतील. रश्मी सोडेल मला स्कूटीवरून.’’ आई म्हणाली, ‘‘बाबांनी परवानगी दिली का?’’ मृणाल म्हणाली, ‘‘अगं बाबा बाहेरगावी गेलेत ना?’’ आई म्हणाली. ‘‘जायचं नाही. मी तुझ्या वागण्याची गॅरंटी देत नाही!’’ मृणाल वैतागली. म्हणाली, ‘‘अगं ताईने पळून जाऊन लग्न केलं म्हणून मीही तसंच कसं करीन? ’’ आई म्हणाली, ‘‘तरी नाहीच जायचं!’’ त्यांचं भांडण बराच वेळ चाललं.
मीना इडल्यांचा डबा घेऊन आली. तेव्हा घरी आजी, आजोबा आणि छकुली होती. मीना म्हणाली, ‘‘काका कुठे गेले? आज तुमची फिरायची वेळ पुढे गेली का? आणि छकुली का रडतेय? तुमच्यासाठी इडल्या आणल्यात मस्त. खाऊन घ्या गरम गरम.’’ आजोबा म्हणाले, ‘‘ती दोघं गेली सिनेमाला. एकच सुटीचा दिवस मिळतो म्हणून आधी सिनेमा आणि मग बाहेरच खाऊन येणार.’’ मीनाने आश्चर्याने विचारलं, ‘‘पण आजीना दोन दिवस ताप आहे ना? काका-काकू नोकरीला गेले की रोज तुम्हीच सांभाळता ना छकुलीला. मग एक दिवस तरी तुम्हाला दोघांना सुटी नको का?’’ आजोबा म्हणाले, ‘‘तो विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नाही. आजीला तापाच्या गोळ्या आणल्या त्यांनी. येणाऱ्या पेन्शनचा चेक मात्र ते माझ्याकडून न चुकता घेतात.’’ फार तक्रार केली तर पुन्हा सूनबाई ऐकवेल, ‘‘आम्ही म्हणून सांभाळतो. लोकांनी म्हाताऱ्यांना घराबाहेर काढलंय नाही तर वृद्धाश्रमात ठेवलंय.’’ मीनाला वाईट वाटलं. म्हणाली, ‘‘मग तुम्ही आमच्याकडे येऊन राहा.’’
जगताना एकाच वेळी अनेक जणांशी वेगवेगळ्या नातेसबंधांमध्ये आपण वावरतो. कधी नातं चांगलं असतं. सकारात्मक असतं. कधी ताणलेलं असतं. टेन्शन असतं. कधी तुटलेलं, नकारात्मक असतं. प्रत्येक कुटुंबातल्या, घरातल्या नात्यांच्या कहाण्या वेगळ्या असतात. त्यातून निर्माण होणारे ताण तणाव, सुख-दु:ख प्रत्येकजण अनुभवतो. रोजचं वर्तमानपत्र उघडलं तरी नावं बदलून त्याच कहाण्या दिसतात. लोकांच्या जगण्याचे, परस्पर नातेसंबंधांचे, व्यक्तिगत अपेक्षांचे, उपेक्षांचे, परिस्थितीतून निर्माण होणाऱ्या घटनांचे धागेदोरे एकमेकांत गुंतून निर्माण होणारे ताणतणाव!
समाजाला बांधिलकी देण्यासाठी, काही आकार आणण्यासाठी माणसांच्या वर्तनाला काही नियमांच्या चौकटीत बसवून त्यांचे एकत्रित सामूहिक जगणे समृद्ध करण्यासाठी कायदे केले गेले. कुठलीही गोष्ट एखाद्या सूत्ररूपाने विशिष्ट पद्धतीने झाली तर परिणामकारक होते. कायद्यांचे पालन करून वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर लोकांनी सलोख्याने, इतरांना त्रास न देणाऱ्या सरळ मार्गाने जगून आपली प्रगती करावी आणि इतरांच्या प्रगतीला मदत करावी ही अपेक्षा. पण परस्पर नातेसंबंधांत वागताना मुख्य गाइडलाइन असते ती स्वत:च्या सदसद्विवेक बुद्धीची. स्वत:चा स्वार्थ साधताना दुसऱ्याचे नुकसान होऊ नये याची जाणीव ही विवेकबुद्धी देते. स्वत:च्या भावनांचे अर्निबध प्रकटीकरण करण्यापासून हीच विवेकबुद्धी रोखते. स्वत:च्या इच्छा-आकांक्षा, अपेक्षा यांची पूर्तता करताना आपल्या नात्यातल्या माणसांच्या हिताचा बळी घेण्यापासून हीच विवेकबुद्धी आपल्याला रोखते. आपल्या वागण्याच्या, विचारांच्या, भावनांच्याही बाबतीत योग्य-अयोग्यतेच्या कल्पना स्पष्ट करून त्यांच्या मर्यादांची सुस्पष्ट जाणीव हीच विवेकबुद्धी करून देते. म्हणूनच वेळीच माघार घेणं, आपला हट्ट सोडून देणं, मनाला न लावून घेणं, कदर करणं, निराश न होता पुन्हा प्रयत्न करणं, अहंकाराला बाजूला सारून वागणं – हे सगळं आपल्याला जमू शकतं. नातेसंबंधांतला गोडवा कायम राखण्यासाठी हे सारं वेळोवेळी करावं लागतं. हे करणं सहज जमतं ते प्रेमामुळे. प्रेम करणं ही एक नितांत सुंदर भावना आपल्या प्रत्येकात असते. थेट जन्मापासूनच असते. त्या त्या नातेसंबंधांतल्या आपल्या भूमिकेनुसार त्या प्रेमाची पद्धत, तऱ्हा आणि अभिव्यक्ती असते. प्रेमाची उत्कटता जितकी – तितकी मनाची सहनशीलता, सहिष्णुता आणि लवचीकता! हेच प्रेम प्रत्येक नात्यात सतत जागृत ठेवलं तर आपण स्वत: आधी दुसऱ्याचा विचार करतो. वागताना दुसऱ्या व्यक्तीवर त्याचा काय, किती आणि कसा परिणाम होईल याचं भान बाळगतो. नात्यातल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्त्वाचं अनन्य साधारणत्व लक्षात घेऊन आपल्या स्वभावातला, वागण्यातला टोकदारपणा बोथट करतो. दुसऱ्यांबद्दल आदर करणं आणि कदर करणं हे मग सहजच जमतं. आपलं मन मोठं आणि हृदय उदार होत जातं. नातेसंबंध संपन्न होत जातात. समृद्ध होत जातात! इतकंच नाही तर आपल्या पडत्या काळात, संकटकाळात याच नातेसंबंधांचा भक्कम आधार आपण सहजपणे घेऊ शकतो!
हॅपी रिलेटिंग टू अदर्स!!
अंजली पेंडसे
manobal_institute@yahoo.co.in